Home Blog Page 1604

सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्हाभरात महासेवा दिनाचे आयोजन

  • जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जागेवरच सेवांचे वितरण

पुणे दि.२१: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्ह्यातील १४ तालुका मुख्यालये, ४ नगर परिषदा आणि ७ मोठ्या मंडळाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांना जागीच विविध २६ हजार ५२९ सेवांचे वितरण करण्यात आले.

शिबीरामध्ये विविध विभागांचे कक्ष स्थापित करण्यात आले होते. या माध्यमातून पंधरवड्यात द्यावयाच्या १४ सेवा आणि इतरही सेवांचे वितरण करण्यात आले. १४ सेवांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण पंतप्रधान किसान सन्मान योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थी यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, पात्र लाभार्थी यांना शिधापत्रिकेचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ता धारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीरी करीता अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वनहक्क पटटे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणे या सेवांचा समावेश होता.

या व्यतिरिक्त पोलीस, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण विभागांनी देखील या शिबिरामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत सेवा दिल्या. बार्टी संस्थेचे सहकार्य घेऊन जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी तालुक्यात अर्ज भरुन घेण्याची मोहिम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडे तालुकानिहाय एकूण विविध पोर्टलवर एकूण अर्ज ९८ हजार ४८८ प्रलंबित होते त्यापैकी १४ हजार ९८१ अर्ज आजपर्यंत निर्गत करण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या नुकसानीचे १६ कोटी अनुदान २७ हजार रुपये नुकसानग्रस्तांसाठी प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७ हजार ४३ इतक्या लाभार्थ्याचे ३ कोटी ४५ लाख अनुदान आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले व १० सप्टेंबरपासून आज अखेर १० हजार ६३४ लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरपर्यंत उर्वरीत नुकसानग्रस्तांचे अनुदान संबंधिताच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

आज महसूल विभागाच्या एका दिवसात १४ हजार ९८१ सेवा व इतर विभागाच्या ४ हजार ५०५ सेवा, नैसर्गिक आपत्ती लाभार्थी वितरण ७ हजार ४३ अशा एकूण २६ हजार ५२९ सेवा देण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. आज लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम घेण्यात आली. एका दिवसात ७० हजार लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत ८ लाख ४४ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.

महसूल विभागाने विविध दाखले, शिधापत्रिका, ४२ ब सनद, महावितरणने विद्युत जोडणीस मंजुरी, आरोग्य विभगाने दिव्यांग प्रमाणपत्र, पंचायत विभागाने जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी आणि नगर परिषदेतर्फे मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या सेवांचा लाभ नागरिकांना आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंनी दिले थेट अमित शहांना आव्हान, म्हणाले हिम्मत असेल तर या…मैदानात

आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा, हिम्मत असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या महिन्यात ,त्यानंतर विधानसभेच्या ..आम्हालाही कुस्ती खेळता येते , पाहू कोण कोणाला लोळवितंय

मुंबई-निजाम-आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा आहेत. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे, असा घणाघात बुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत देवेंद्र फडणवीसांना पिलावळ म्हणत अमित शहांना थेट नाव घेऊन आव्हान दिले .

ठाकरे शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटासह अमित शहांचाही समाचार घेतला.ऐका त्यांच्याच शब्दात

शहा त्याच कुळातले

ठाकरे म्हणाले, सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

कमळाबाई पहिल्यांदा बोललो

उद्धव पुढे म्हणाले की, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंधच काय. कमळाबाई पहिल्यांदा बोललो. कमळाबाई शब्द माझा नाही. बाळासाहेबांनी दिलेलाय. ही तीच शिवसेनाय. ती पाहता मुंबईवरती दावा सांगण्याचे धाडस करू नका. वंशवाद, वंशवाद कसला वशंवाद. मला माझ्या घराण्याचा अभिमानय.

ही त्यांचीच औलाद

ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्या लढाईत जनसंघ नव्हता. जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा माझे आजोबा होते. पहिल्या पाच अग्रणी नेत्यात माझे आजोबा होते. तेव्हा रण पेटले होते. तेव्हा निवडणुका लागल्या. त्यावेळी जनसंघाने मराठी माणसांची संघटना फोडली. केवळ राजकीय स्वार्थासाठी. आता राज्यातील हिच त्यांची औलाद आहे.

चित्त्याचा आवाज म्यँव…

ठाकरे म्हणाले, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? बाहेरचे उपरे एवढे घेतले की. बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सत्तर वर्षानंतर काय म्हणे चित्ता आणला पण चित्त्यांची काय डरकाळी, पण चित्ता डरकाळी फोडत नाही. पिंजरा उघडला तर आवाज म्यँव निघाला.

फॉक्सकॉन गेला, हे खोटे बोलतायत

उद्धव म्हणाले, धारावीचे आर्थिक केंद्र गुजरातेत नेले. माझी योजना असल्याने तिथे घर बांधा. धारावीकरांना घरे मिळावीच आणि ते आर्थिक केंद्र बनावेच. ही माझी आणि शिवसेनेची भूमिका आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला आणि हे धादांत खोटे बोलत आहेत.

कितीदा दिल्लीसमोर झुकता

ठाकरे म्हणाले, लाज वाटायला हवी तुम्ही कुणाची बाजू घेऊन मांडत आहात. चला मी तुमच्यासोबत येतो. उद्योग परत आणू. पण मिंध्या गट नुसता शेपटी घालून होय महाराजा असे म्हणतो. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जातात. कितीदा दिल्लीत जाऊन झुकता. वेदांताला केंद्र सरकार सवलती देत आहे. हा कट आहे, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातेत न्यायचा आणि सवलती द्यायच्या.

शिवसेनेने आधार दिला

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने अनेकांना आधार दिला. प्राण वाचवणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या पत्नीला नोकरी दिली. मी आज एक पत्र दिले आहे. मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोसाठी चहा पाणी आणि मदत केली. मदत करताना हरीश नावाचा शिवसैनिक अतिरेक्यांच्या गोळीत मृत्यूमुखी पडला. चार शिवसैनिक जखमी झाले होते. आम्ही लढवय्ये आहोत. भाई और बहनो असे सभेत म्हणणारे कुठे होते. भाजपवाले अशावेळी कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला.

आम्ही झुकणारे नाही

ठाकरे म्हणाले, शिवसैनिक आणि मुंबईचे नाते का दृढ आहे, तर ते रक्तदान, संकटात मदतीची जेव्हा गरज असते तेव्हा ते शिवसैनिक पुढे सरसावतो त्यामुळे. आमचे नाते अथांग आहे. भाजपवाले म्हणतात आमचे ठरले काय ठरले? मुंबईला पिळणार आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवणार आम्ही झुकणारे नाही.

आम्ही आश्वासने पाळली

आम्ही जी आश्वासने दिली ती पाळली. पाचशे फूटापर्यंत मालमत्ता कर रद्द केला. दिल्लीतील शाळांचा विकास झाला चांगली गोष्ट आहे. आज मुंबईत महापालिकेच्या शाळात प्रवेशासाठी रांगा लागतात. हे शिवसेना आणि शिवसैनिकांचे यश आहे. अमिताभ बच्चन, रघुनाथ माशलेकर, माधुरी दीक्षितही या शाळात येऊन गेल्या हेच आमचे यश असल्याचे उद्धव म्हणाले.

खुशाल आरोप करा

उद्धव पुढे म्हणाले की, चीनने कोविड केअर सेंटर उभे केले. त्यानंतर वांद्र्यात आपणही असेच काम केले. साथ येण्यापूर्वी आणि पहिल्या लाटेत आपण उपाययोजना केली. कोरोना अहवाल समोर आला. त्यात केंद्राचा हलगर्जीपणा दिसून आला. आता कमळाबाई कशाला टीका करतेय. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असाल तर खुशाल करा. कोरोनामध्ये प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर आम्ही तो पुन्हा करू.

मंदिराऐवजी आम्ही रुग्णालये उघडली

ठाकरे म्हणाले, आपले सरकार आले हिंदु सणावरील विघ्न टळले. हा प्रकार काय आहे. घटनेवर हात ठेवून शपथ घेतली ना..तुमचे सरकार येण्यापूर्वी पंढरीची वारी झाली. कुणी बंधने काढली आम्हीच ना..तोपर्यंत सर्व आम्ही उघडे करून टाकले होते. कोश्यारींनी मला पत्र लिहिले आणि ईश्वरी संकेत मिळतात का? असा सवाल केला, सर्व प्रार्थनास्थळ उघडून टाका म्हणाले पण तेव्हा आम्ही रुग्णालये उघडली आरोग्यसेवा वाढवत होतो. ती तेव्हाची गरज होती. सर्व प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे. देव आपल्यात डाॅक्टरांच्या रुपात होता. हे जेव्हा मंदिरे उघडा म्हणून बोंबलत होते तेव्हा मी आरोग्य केंद्रे, सुविधा, कोविड सेंटर उघडीत होतो. हे पाप असेल तर होय मी ते केले. ते मी केले नसते तर आज भाजप-शिंदे सरकार वळवळले नसते.

ज्यांच्यावर आरोप तेच पक्षात

ठाकरे म्हणाले, मी मुंबई, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. युपीसारखे मी महाराष्ट्रात घडू दिले नाही. सुप्रीम कोर्टाने कौतूक केले. परदेशातील लोकांनी कौतुक केले पण कमळाबाईला कौतूक नव्हते. दुसऱ्यांना चांगले काम केले की, भ्रष्ट्राचार झाला म्हणून ते ओरडत सुटतात. लोकांना बदनाम करायचे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले.

लाॅंड्री काढली काय?

ठाकरे म्हणाले, मोदींचे आश्चर्य वाटते. ज्या महिला खासदारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. तिच बहिण राखी बांधायला मिळाले. भाजपने भ्रष्ट्रांना स्वच्छ करायची लाॅंड्री उघडली का? उद्या-परवा निकाल लागेल तो आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाचे आहेत. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत , आजही रामशास्त्रीसारखे न्यायमूर्ती आहेत आम्हाला विश्वास आहे. आम्ही बरोबर आहे की नाही हे आम्हाला कळू द्या.

शिंदे म्हणजे फिरते सरकार

ठाकरे म्हणाले, ​​​​​​ खोक्यातून आधी बाहेर या मग भ्रष्ट्राचाराशी लढा. मुल विकल्या जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे फिरते सरकार आता फिरा गोवा, सुरत, गुवाहटीला फिरत आहेत. माझ्यावर आरोप होतो की, मी घरीच बसलो, होय मी लोकांनाही घरीच बसा असे सांगितले तेव्हा कोरोनाचा काळ आहे.

ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड ॲपद्वारे महसुली अर्धन्यायिक प्रकरणांच्या निकालाला विक्रमी गती

पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पुणे दि.२१: अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅप’द्वारे अर्धन्यायिक प्रकरणांबाबत वकील आणि पक्षकारांना माहिती देण्याची प्रणाली विकसीत केली आहे. या अभिनव उपक्रमाचा वकील आणि पक्षकारांना फायदा होत असून प्रकरणे निकाली काढण्याचा कामाला गती मिळाली आहे.

महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना जुन्या प्रणालीत वकील आणि पक्षकारांना तारखा लिहून घ्याव्या लागायच्या. प्रशासकीय कामामुळे बोर्ड रद्द झाला किंवा वेळ बदलली तर पक्षकार, वकिलांना पुर्वसूचना देणारी यंत्रणा नव्हती. सुनावणीच्या वेळेस वकील व पक्षकारांची गर्दी होऊन त्यांना सुनावणीसाठी ताटकळत बसावे लागत होते. प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढत होते. या नव्या प्रणालीमुळे सर्वांना सुविधा होणार असून पक्षकार आणि वकिलांना मोबईलच्या माध्यमातून प्रकरणांबाबत अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.

अर्धन्यायिक प्रकरणांची प्रक्रिया सुटसुटीत
सुनावणी बोर्ड आणि बजावणी बोर्ड अशी विभागणी करून त्याचे दिवस निश्चित केले. बजावणी बोर्डमध्ये नोटीस न बजावलेल्या तसेच कोर्टाची कागदपत्रे न आलेल्या अपरिपक्व प्रकरणांचा समावेश असतो. सुनावणी बोर्डवर फक्त परिपक्व प्रकरणे घेतली जातात. त्यावर तीन ते चार वेळा सुनावणी होऊन निर्णय दिला जातो. त्या केसचा निर्णय दिला जातो. त्यानंतर पक्षकारांना सर्टिफाईड नकला दिल्या जातात, त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे सुनावणी असलेल्या वकील व पक्षकारांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. आठवड्यात तीन दिवस सुनावणी बोर्ड आणि दोन दिवस बजावणी बोर्ड असे पाचही दिवस बोर्ड सुरू रहात असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाणे वाढले आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात वाढ झाली आहे.अधिकाऱ्यांना टच स्क्रीन टॅब लाईव्ह बोर्ड अपडेट करणे एका क्लिकवर शक्य झालू असून जुन्या केसेस निकाली काढण्यासाठी प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे. संबंधितांनी प्रकरणांची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर जावून ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.

विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारीपक्षकार आणि वकीलांना केसेसची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने सुनावणी व्यतिरिक्त कार्यालयात चौकशीसाठी होणारी गर्दी कमी होते. महसुली न्यायालयाच्या कामात पारदर्शकता आणी गतिमानता आली आहे. केसेस निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यस्तरावर प्रत्येक महसुली न्यायालयात करण्याचे नियोजन आहे.

ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅपची वैशिष्ट्ये

  • सुनावणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता प्रकरणांची माहिती (बोर्ड) मोबाईल ॲपवर
  • सुनावणीची संभाव्य वेळ पक्षकार आणि वकिलांना आदल्या दिवशी उपलब्ध.
  • सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्ष कामकाजानुसार संभाव्य सुनावणीची वेळ अद्ययावत होते.
  • मोबाईल संदेशाद्वारे प्रकरणांची सद्यस्थिती, वादी प्रतिवादी, त्यांचे वकील, सुनावणीची तारीख याची माहिती
  • अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, रिसेप्शन परिसर, कॅन्टीनमध्ये स्मार्ट स्क्रीनची सुविधा
  • स्मार्ट स्क्रीनवर चालू केसेस, पुढील केसची संभाव्य वेळ याची माहिती नागरिकांना समजेल अशा पद्धतीने कलर कोडींगनुसार
    -पुणे जिल्ह्यात सर्व महसुली कोर्टमध्ये अर्थात जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, आठ उपविभागीय अधिकारी, १५ तहसिलदार आणि १०० मंडळ अधिकारी अशा एकूण १२५ कोर्टमध्ये ही प्रणाली कार्यरत.
    -प्रकरणांची माहिती ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड मोबाईल ॲप आणि टच स्क्रीन इन्फॉर्मेशन किऑस्कवर उपलब्ध

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर ‘एमओयु’साठी प्रयत्न करू- चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २१: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य केवळ पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असून ही एक ऐतिहासिक सेवा आहे. भारतीय संस्कृती प्रसाराला समर्पित ही संस्था आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संस्थेचा गौरव केला.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे निर्मित ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे (डिजिटल प्लॅटफॉर्म) श्रीमती सीतारामन यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैश्यंपायन आदी उपस्थित होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या १०५ वर्षाच्या कार्यापुढे मी अक्षरश: नतमस्तक झाले आहे अशा शब्दात गौरव करुन श्रीमती सितारामन म्हणाल्या, आपली समृद्ध संस्कृती, तत्त्वज्ञान, नीतितत्वे जगासमोर आणण्याचे काम ही संस्था करत आहे. महाभारत, विष्णूपुराणाच्या प्राचीन प्रतींसह अनेक प्राचीन ग्रंथे येथे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. इतर कोणत्याही विद्यापीठाशी, संस्थेच्या कार्याशी या संस्थेच्या कार्याची तुलना करता येणार नाही.

आपला देश समजून घ्यायचा असेल तर आपली अनेक शतकांमधील एकता, तत्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान, कला, संगीत, इतिहास आदी समजून घ्यावे लागतील. त्यासाठी भांडारकर संस्थेचे मोलाचे योगदान राहील. साहित्य, ज्ञानाचा वारसा ही आपली संपत्ती असून भांडारकर सारख्या संस्था त्याद्वारे देशाची सेवा करत आहेत, असेही श्रीमती सीतारामन म्हणाल्या.

संस्थेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर ‘एमओयु’साठी प्रयत्न करू- चंद्रकांत पाटील
भांडारकर प्राच्यविद्या शाखेचे अभ्यासक्रम अधिक व्यापक क्षेत्रात जावेत यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार होण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

श्री. पाटील पुढे म्हणाले, प्राचीन इतिहास समोर आणण्याचे काम संस्थेकडून होते. येथे झालेल प्राच्यविद्यांवरील संशोधनाचे काम सर्वांना डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून अभ्यासासाठी खुले करण्याचा स्तुत्य उपक्रम होत आहे. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत व्हावेत. या धोरणामध्ये बहु विद्याशाखीय अभ्यासक्रमाची रचना होणार असल्याने विद्यार्थी अनेक विषयांमध्ये पारंगत होणार आहे.

भूपाल पटवर्धन म्हणाले, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती परकीय अभ्यासकांनी त्यांच्या दृष्टीकोनातून जगासमोर मांडला. परंतु, आपल्या संस्कृतीकडे आपल्या स्वत:च्या दृष्टीकोनातून पाहण्याची आणि सर्वांसमोर मांडण्याची गरज लक्षात आली असून भांडारकर प्राच्यविद्या संस्था हे काम समर्थपणे करत आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून खुला करण्यात येत आहे.

यावेळी श्री. रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार ॲड. सदानंद फडके यांनी मानले.

चतुःश्रृंगीचा नवरात्रोत्सव 2 वर्षांनंतर होणार जल्लोषात

पुणे- श्री चतुःश्रृंगी देवीचा नवरात्र उत्सव 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान जल्लोषात साजरा होणार आहे. यंदा प्रथमच देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान विश्वस्त नितीन अनगळ यांनी बुधवारी येथे दिली.उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. घटस्थापना सोमवारी सकाळी 9 वाजता होईल व त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे. उत्सवादरम्यान रोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. तसेच 5 ऑक्टोबरला दुपारी 5 पासून सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकर्‍यांचा सहभागाने निघेल. यावेळी हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाईल.

‘ग्रीन हिल्स ग्रुप’च्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने 12 हजार रोपे लावली असून त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणार्‍या खताची निर्मिती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येते, असे अनगळ म्हणाले.

भाविकांसाठी सुविधा

  • अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्‍यापर्यंत)
  • ‘24 तास सेवा’ तर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे ‘कार्डिक अ‍ॅम्ब्युलन्स’ची सोय करण्यात आली आहे. तसेच पूर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध
  • पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
  • बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था
  • सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा

असे मिळेल दर्शन

देवस्थान ट्रस्टने भाविकांना यावर्षीपासून ऑनलाइन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाइन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाइन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाइटवर भाविकांना पास उपलब्ध असणार आहेत.

तीन टप्प्यातं जीर्णोद्धार

चतुःश्रृंगी देवी मंदिर आणि परिसर सुमारे अडीच एकरांचा आहे. या परिसराचा एकूण तीन टप्प्यांत जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम या नवरात्रोत्सवानंतर लगेच सुरू होणार आहे. त्यानंतर उर्वरित टप्प्यांची कामे होतील. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे, असे विश्वस्त नितीन अनगळ यांनी सांगितले.

आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0

मुंबई, दि. 21 : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता आणि त्यात 2014 पासून सरकारच्या विविध योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोहोचले, त्या यशोगाथांचा संग्रह त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींना भेटून तयार केला होता. त्यांच्या निधनाने एक संशोधकवृत्तीचा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच नंबर वन; शरद पवारांचा दावा

मुंबई- यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 608 जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीने 173, काँग्रेसने 84, भाजपने 168 आणि शिंदेगटाने 42 जागा जिंकल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले , आणि राष्ट्रवादीच नंबर १ असल्याचा दावा केला . मात्र, या निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या याची आकडेवारी पवारांनी सांगितली नाही.

आम्हाला माहीत आहे आमच्या जागा किती आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली असे म्हणत इतर पक्षांना जर वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर, त्यांनी त्या आनंदात राहावं असा टोला पवारांनी भाजपचं नाव न घेता लगावला असून, पवारांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत मविआने 277 जागांवर विजय मिळवला असून, शिंदे गट-भाजपला 210 जागा मिळाल्याचंही पवार म्हणाले.

रश्मी ठाकरेंबद्दल अनावधानाने बोलून गेलो,शब्द मागे घेतो – रामदास कदम

 मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं, रश्मी ठाकरे यांच्याविषयी रश्मी ठाकरेंबद्दल बोललो ते शब्द मागे घेतो. असे शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.मी जो बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. जे वास्तव आहे ते मी बोलतो, पश्चात्तापाचा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरेंचा अपमान होईल अशी कोणती गोष्ट मी बोललो नाही.अशी प्रतिक्रियादेखील शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनावर दिली. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांची भुमिका घ्यावी, या अर्थाने माझे बोलणे होते, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रश्मी ठाकरेंविरोधातील विधान आपण अनावधानाने केल्याचं सांगितलं. तसेच आपण हे विधान मागे घेत असल्याचंही ते म्हणाले. अंधारेंच्या टीकेवर तुम्ही काय म्हणाला? असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रामदास कदम यांनी, “एक गोष्ट मी बोलायला नको होती, ती म्हणजे रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी. हे माझ्याकडून बोलून गेलं हे मान्य. हे बोलण्याची आवश्यकता नव्हती. त्या उद्धवजींच्या पत्नी आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर येतात. त्याबाबतचं वाक्य मी मागे घेतो. मला काही अडचण नाही त्याची. ते अनावधानाने माझ्याकडून बोलून गेलं आहे,” असं उत्तर दिलं.

शिवसेनेच्या आंदोलनाला मी भीक घालत नाही. महाराष्ट्र मला ओळखतो. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. स्वत:ला बाळासाहेबांचा मुलगा म्हणता मग बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा का घेऊन जात नाही? पवारांशी युती का करता? असं मला म्हणायचं होतं.

पण काही लोकांनी विपर्यास केला. शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट झाले. मलाही दुख झालं. नुकसान आमचं झालं. मी त्यांना हातजोडून सांगत होतो, राष्ट्रवादी सोडा सर्व आमदार घेऊन येतो, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मला कुणाच्याही समर्थनाची गरज नाही. मी खेडला होतो. आताच मुंबईला आलोय. मी काय बोललो हे बाकींच्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे कोणी माझ्या बाजूने बोलले नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझी कोंडी किंवा शिंदे गटाची कोंडी होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन चाललो आहोत आणि उद्धव साहेब या भूमिकेसोबत नाहीत, त्यामुळे मी ते विधान केलं, असंही ते म्हणाले.

पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा : खासदार गिरीश बापट

पुणे दि.२१: पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा अशा सूचना खासदार बापट यांनी पुणे रेल्वे विभागाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनला टर्मिनल म्हणून विकसित केल्यास पुणे स्टेशनवरील ताण कमी होईल असे बापट यांनी सांगितले आहे.
याव्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर खासगी वाहनांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शहरातील पुणे व इतर रेल्वे स्टेशनवर वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रेल्वेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी. हडपसर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध कराव्यात, रस्ते विकसित करावे, रेल्वेने येणाऱ्या व इतर प्रवाशांसाठी पीएमपीएमएल बस व्यवस्था सुरु करावी, रेल्वे स्टेशन पार्किंग (महात्मा गांधी पुतळा) ते ताडीवाला रस्ता स्ट्रॉम वॉटर लाइनचा विकास करणेसाठी रेल्वेने परवानगी द्यावी, मनपा बहुमजली पार्किंगसाठी रेल्वे FOB चा विस्तार करावा, पुणे कँटोन्मेंट कार्यक्षेत्रातील मिरज रेल्वे लाईनवर घोरपडी परिसरात आरओबी बांधण्यासाठी रेल्वेची जमीन महानगरपालिकेला हस्तांतरित करावी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे बापट यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा; अतिरिक्त सवलतीही देणार/राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

0

मुंबई-धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या माध्यमातून (एसपीव्ही) एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला.  यामध्ये रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत रेल्वेच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा उल्लेख केलेल्या अटी व शर्ती देखील असतील. या संदर्भात ५ नोव्हेंबर २०१८ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबतचा गृहनिर्माण विभागामार्फत काढण्यात आलेला १५ सप्टेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरचाच शासन निर्णय पुनर्जिवित करण्यात येईल.

कोविडच्या आजारातून उद्भवलेली स्थिती आणि एकूणच बाजारातील मंदीचा विचार करून निविदेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करून रेल्वेच्या अंदाजे ४५ एकर जागेचा प्रकल्पात समावेश करण्याबाबत मान्यता देण्यात आली.

राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत असे ठरले.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात

0

मुंबई, दि. २१ : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संदर्भात १४ सदस्यांची समिती गठण करण्यात आली होती तसेच १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार एकूण एक वर्ष कालावधीचे ६ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मिळून १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.

या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित व उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आले असून यामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मयुरेश पै तसेच कला संचालक सदस्य असतील. या महाविद्यालयासाठी ग्रंथालय संचालनालयाची कालिना येथील ७ हजार चौरस मिटर जागा कला संचालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरुपात पु.ल.देशपांडे कला अकादमीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

सध्या अध्यापक पदे ही मानधन तत्त्वावर तसेच लिपिक टंकलेखक पदे बाह्य यंत्रणेकडून भरण्यात येतील. याशिवाय यंत्रसामुग्री व साधनसामुग्री देखील खरेदी करण्यात येईल.  यासाठी महिन्याला सुमारे १ कोटी ७५ लाख खर्च येईल.

28 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे दि. 26 रोजी दिमाखदार उदघाटन

पुणे – कला, गायन, वादन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी, सायंकाळी 5 वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होत असून, याचे उदघाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार भूषविणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यात माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीष बापट, खासदार वंदना चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव, आ. संग्राम थोपटे, आ. माधुरी मिसाळ, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, बालन ग्रूपचे चेअरमन पुनीत बालन, उद्योजक विशाल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.नवरात्रीनिमित्त पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशीला जाधव आणि नुपूर दैठणकर या नऊ चित्रतारका उदघाटन सोहळ्यात रंगमंचावर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. या नामवंत नऊ अभिनेत्री एकाच वेळी एका रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी रसिक पेक्षकांना लाभणार आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या पुणे नवरात्रौ महोत्सवात नऊ सिनेतारकांचा नृत्यविष्कार, महंमद रफी यांची अजरामर गीते, आर. डी. बर्मन यांची बहारदार गाणी, अभिनेते गिरीष ओक यांच्याशी गप्पा, हिंदी सुफी संगीत, तब्बल बारा तासांचा भरगच्च धडाकेबाज लावणी महोत्सव, शास्त्रीय संगीताची ताल यात्रा मैफल, भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना त्यांच्या अविट गीतांमधून श्रद्धांजली असे अनेक दर्जेदार कार्यक्रम हे रसिक प्रेक्षकांना मेजवानीच ठरणार आहेत.हा भव्य संस्मरणिय उदघाटन सोहळा व श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात 26 सप्टेंबर या घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष श्री. आबा बागूल व सौ. जयश्री बागूल विधीवत घटस्थापना करतील. याचे पौरोहित्य वेदमूर्ती पं. दंडवते गुरूजी करणार आहेत.


नवरात्रौनिमित्त शिवदर्शन, मुक्तांगण शाळेजवळील श्री आबा बागूल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दाक्षिणात्य घाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले असून, सर्वत्र आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. नवरात्रात सर्व मंदिर विद्युत रोषणाईने झळाळून निघेल. रांगोळी व लाखो फुलांची आरास रोज करण्यात येईल. मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती तेजंपूंज असून देवीस सोन्याचे अलंकार, सोन्याचा मुकूट व अन्य आभूषणे परिधान केली जातील. येथे रोज यथासांग पूजा, अष्टमीचा होम होणार आहे. येथे रोज सकाळ संध्याकाळ महिला मंडळांची भजने होणार असून हजारो महिला व भाविकांना दर्शनासाठी हे मंदीर सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत खुले राहील. याच मंदिराच्या प्रांगणात दिनांक 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत 22वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव संपन्न होईल. याच्या अध्यक्षा सौ. जयश्री आबा बागूल आहेत.पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदाचे 28वे वर्ष असून सन 2009मध्ये स्वाइन फ्लूमुळे आणि गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुणे नवरात्रौ महोत्सावाचे तीन वर्षे कार्यक्रम होऊ शकले नाहीत. नवरात्रात सलग दहा दिवस चालू असणारा व तब्बल 28 वर्षे सलग चालू असणारा हा सांस्कृतिक महोत्सव देशातील प्रमुख सांस्कृतिक महोत्सवात गणला जातो. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात.समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दरवर्षी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री निशीगंधा वाड, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सामाजिक नेते अ‍ॅड. अंकूश काकडे यांना श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन यंदा गौरविण्यात येणार आहे. यावेळी लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. तसेच वेदमूर्ती पंडीत श्रीकांत दंडवते गुरूजी आणि वेदमूर्ती पंडीत होतीलाल शर्मा यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.भव्य उदघाटन सोहळादरवर्षीप्रमाणे यंदाही उदघाटन सोहळा भव्यतेने सादर होईल. प्रारंभी नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार त्यांच्या शिष्यांसह सादर करतील. रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर करतील. यानंतर विनोद धोकटे, स्वाती धोकटे व ग्रूप हे अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर करतील. सँण्डी डान्स अ‍ॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर करतील. यानंतर जलवा सिनेतारकांचा हा दिलखेचक नृत्याविष्कार कार्यक्रम पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या नऊ चित्रतारका सादर करतील. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या डायरेक्टर व नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. पायलवृंदतर्फे हा कार्यक्रम सादर केला जाईल.उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन सुधीर गाडगीळ करणार आहेत.याच दिवशी सायंकाळी सात वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच येथे स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे वाद्यवृंदासह सादर करतील. ज्येष्ठ पार्श्वगायक महंमद रफी यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने ही पर्वणीच असणार आहे.
मंगळवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नवशक्ती हा हिंदी, मराठी व इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम प्रख्यात गायिका प्रियांका बर्वे, प्रांजली बर्वे व सौरभ दफ्तरदार सादर करतील.
बुधवार, दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सजदा हा हिंदी सुफी संगीताचा नजराणा संदीप पंचवाटकर, आशिष देशमुख, विवेक पांडे, विनल देशमुख आणि राधिका अत्रे सादर करतील.गुरूवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, टीएमडी प्रस्तुत नॉस्टॅल्जिक मेलडीज हा जुन्या – नव्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम तेजस्वीनी, गणेश मोरे, मुकेश देढीया आणि अभिनेते डॉ. गिरीष ओक सादर करणार आहेत. या प्रसंगी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या बरोबर गप्पा हे विशेष आकर्षण असणार आहे.शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, संगीतकार आर. डी बर्मन यांच्या गाण्यांचा ‘द रिदम किंग’ हा कार्यक्रम प्रख्यात गायक जितेंद्र भुरूक सादर करणार असून, त्यांना अली हुसेन, कोमल कृष्णा, माधवी देसाई गायन साथ देतील.लावणी महोत्सवदरवर्षी प्रमाणे यंदाही खास रसिकांच्या आग्रहास्तव सलग 12 तासांचा धडाकेबाज व दिलखेचक लावणी महोत्सव शनिवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच येथे सुरू होईल. हा बहारदार कार्यक्रम थेट रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेकांनी असा भव्य लावणी महोत्सव सुरू करण्यास सुरूवात केली आहे. यंदा इश्काचा नाद खुळा (वर्षा पवार, सोनाली जळगावकर), शिवानीचा नाद खुळा ( शिवानी कोरे, पूनम कापसे), लावण्य जल्लोष ( सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे), जल्लोष अप्सरांचा ( चतुर्थी पुणेकर, पतंजली पाटील), लावणी धमाका ( वैजयंती पाष्टे, वासंती पुणेकर), अहो नाद खुळा ( माया खुटेगावकर, प्रिया मुंबईकर), तुझ्यात जीव रंगला ( अर्चना जावळेकर, नमिता पाटील) असे महाराष्टातील सात नामवंत लावणी ग्रुप सुमारे शंभर सहकलावंतांसह थिरकत्या पावलांनी रंगमंचावर आपली अदाकारी सादर करतील.रविवार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी 7.00 वाजता भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहणारा ‘मेरी आवाज ही पहचान है’ हा विशेष कार्यक्रम लता दीदींच्या जुन्या अवीट गाण्यांना उजाळा देईल. कोमल कृष्णा, पल्लवी आनंद देव, वैजयंती मांडवे, जितेंद्र भुरूक व वाद्यवृंद हा कार्यक्रम सादर करतील.सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता, सूरपालवी ग्रूपतर्फे 1990 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांचा ‘कोयल सी तेरी बोली’ हा अविस्मरणीय कार्यक्रम पल्लवी पत्की ढोले, संजय हिरवाळे, संतोष गायकवाड, राज, विनोद सोनवणे सादर करतील.मंगळवार, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, सध्या गाजत असलेला पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर यांचा ताल यात्रा हा शास्त्रीय संगीताचा सुरेल कार्यक्रम होईल.बुधवार, दिनांक 5 ऑक्टोबर दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी 7.00 वाजता, प्रख्यात गायिका उत्तरा केळकर आणि मंदार आपटे यांच्या ‘उत्तररंग’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या 28व्या वर्षाच्या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता होईल.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सचिव धनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी व अमित बागुल आणि कार्यकारीणी सदस्य राजेंद्र बागूल, जयवंत जगताप, कपिल बागूल, हेमंत बागूल, राजेंद्र बडगे, टी. एस. पवार, सागर बागूल, सागर आरोळे, महेश ढवळे यांसह असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सकाळ आणि साम टीव्ही हे माध्यम प्रयोजक असून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन हे प्रायोजक आहेत.

“महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी चेन्नईत मुलाखती का?”; आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई-मुंबईतल्या कामाच्या मुलाखती चेन्नईमध्ये कशासाठी घेतल्या जातायत, असा सवाल शिंदे सरकारला करत वेदांताच्या अध्यक्षांवर ट्विट करण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य म्हणाले, काम वर्सोवा – वांद्रे सी लिंक मुंबईतील कामासाठी चैन्नईमध्ये मुलाखती कशा झाल्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या परवानगीने हे चालले आहे का? येथे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही आणि मुंबईतील कामांसाठी चैन्नईत का झाले याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावे. जॉब कुणालाही द्यावा. मात्र, मुलाखती तिकडे का? महाराष्ट्रातील गोष्टीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादेत मुलाखती का घेतल्या नाही? आपल्याकडे तज्ज्ञ इंजिनिअर कमी आहेत का? माझ्या प्रश्नांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे, असे आव्हान आदित्य यांनी दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेंची ही 8 वी दिल्लीवारी आहे, ही दिल्लीवारी स्वत:साठी आहे की महाराष्ट्रासाठी आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. राज्यातील किती प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली? उद्धव ठाकरेंचे काम आता खोके सरकारला दिसत असेल असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. वेदांताच्या अध्यक्षांना ट्विट टाकण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असे म्हणतानाच स्थगिती सरकारने किती प्रकल्पांना स्थगिती दिली? वेदांतावर सरकारचे अद्याप उत्तर नाही. बल्क ड्रग पार्कही राज्याबाहेर गेला मात्र सरकार शांतच असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांचे खुले आव्हान :माझी चौकशी करायची तर लवकर करा; आरोप खोटे ठरले तर काय करायचे तेही स्पष्ट करा

मुंबई-पत्राचाळप्रकरणी आपण चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असे शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.भाजप नेते अतुल भातखळककरांनी काल पत्राचाळप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली म्हणत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. या आरोपाला शरद पवारांनी आज मुंबईतील वाय.बी. चव्हाण येथे पत्रकार परिषदेत उत्यातर दिले .या वेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.

पवारांनी पत्राचाळ प्रकरणी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, बैठकीच्या इतिवृत्तात सगळं काही स्पष्ट आहे. चौकशी करायची असेल तर लवकर करा आरोप खोटे ठरले तर काय करणार हे सरकारने स्पष्ट करावे.शरद पवारांनी मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात एकही प्रकल्प झाला नसता. त्यांनी गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही. मात्र या प्रक्रियेत पवारांचा काहीही संबध नाही. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका. हा सगळा डाव असून, शरद पवारांना बदनाम करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.आरोपाचे खंडन करताना आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी 14 ऑगस्ट 2006 मध्ये मिटींग घेतली होती. देशामधील हाउसिंगबाबतचे सर्व जण या मिटींगला उपस्थित होते. हा प्रकल्प 1988 चा असून तेव्हापासून पत्राचाळीचे टेंडर दारोदारी भटकत राहीले. शरद पवारांना बैठका काही नव्या नाहीत. जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी 10-20 हजार बैठका घेतल्या असतील. अनेक प्रकल्पांत त्यांनी मध्यस्थी करून बैठका घेतल्या. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेला दिशा देण्याचे काम शरद पवारांनी दिले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, राज्यात गुंतवणुकीच्या मुद्द्यावर राजकीय भूमिका नको, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा विचार करावा. राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सकारात्मक राहावे.दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना पवार म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत वाद वाढू न देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री शिंदेंची आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर विलंब करणे हे योग्य नाही.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजपासून तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अन्य नेते याआधीही बारामतीत आले होते. सीतारमण यांच्या दौऱ्याचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. देशातले चित्र भाजपला अनुकूल ठेवायचे नाही. देशातली स्थिती बघूनच भाजपकडून तयारी सुरू असल्याचे पवार म्हणाले.राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेसाठी शुभेच्छा असून, देशात विरोधकांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकांची एकजूट यशस्वी झाली तर देशासाठी चांगले होईल, असे म्हणत पवारांनी विरोधकांना मोदींविरोधात एकत्र येण्याचे सांगितले आहे.नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने 277 जागांवर यश मिळवले असून भाजप आणि शिंदे गटाला 210 ग्रामपंचायतीत यश मिळाले, एकंदरीतच महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन

पुणे : येथील सुपरिचित वरिष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (वय 44) यांचे बुधवारी रहात्या घरी निधन झाले. चांदोरकर यांच्या अचानक निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात्य एक बहिण असा परिवार आहे.‘सांजसमाचार’’प्रभात ‘ पासून चांदोरकर यांनी पत्रकारितेली सुरवात केली. त्यानंतर ते ‘केसरी’ सकाळ च्या साम सह हैदराबाद येथे ‘ई टीव्ही’मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये पत्रकारिता केली ’सामना’च्या मुंबई आवृत्तीही त्यांनी काम केले. पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ते उपसंपादक म्हणून रुजू झाले. ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दोन्ही दैनिकांमध्ये वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवरचे लेखन प्रसिद्ध झाले. त्याला खवैयांनी मोठा प्रतिसाद दिला.