- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जागेवरच सेवांचे वितरण
पुणे दि.२१: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्ह्यातील १४ तालुका मुख्यालये, ४ नगर परिषदा आणि ७ मोठ्या मंडळाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांना जागीच विविध २६ हजार ५२९ सेवांचे वितरण करण्यात आले.
शिबीरामध्ये विविध विभागांचे कक्ष स्थापित करण्यात आले होते. या माध्यमातून पंधरवड्यात द्यावयाच्या १४ सेवा आणि इतरही सेवांचे वितरण करण्यात आले. १४ सेवांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण पंतप्रधान किसान सन्मान योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थी यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, पात्र लाभार्थी यांना शिधापत्रिकेचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ता धारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीरी करीता अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वनहक्क पटटे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणे या सेवांचा समावेश होता.

या व्यतिरिक्त पोलीस, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण विभागांनी देखील या शिबिरामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत सेवा दिल्या. बार्टी संस्थेचे सहकार्य घेऊन जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी तालुक्यात अर्ज भरुन घेण्याची मोहिम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडे तालुकानिहाय एकूण विविध पोर्टलवर एकूण अर्ज ९८ हजार ४८८ प्रलंबित होते त्यापैकी १४ हजार ९८१ अर्ज आजपर्यंत निर्गत करण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या नुकसानीचे १६ कोटी अनुदान २७ हजार रुपये नुकसानग्रस्तांसाठी प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७ हजार ४३ इतक्या लाभार्थ्याचे ३ कोटी ४५ लाख अनुदान आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले व १० सप्टेंबरपासून आज अखेर १० हजार ६३४ लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरपर्यंत उर्वरीत नुकसानग्रस्तांचे अनुदान संबंधिताच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
आज महसूल विभागाच्या एका दिवसात १४ हजार ९८१ सेवा व इतर विभागाच्या ४ हजार ५०५ सेवा, नैसर्गिक आपत्ती लाभार्थी वितरण ७ हजार ४३ अशा एकूण २६ हजार ५२९ सेवा देण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. आज लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम घेण्यात आली. एका दिवसात ७० हजार लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत ८ लाख ४४ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
महसूल विभागाने विविध दाखले, शिधापत्रिका, ४२ ब सनद, महावितरणने विद्युत जोडणीस मंजुरी, आरोग्य विभगाने दिव्यांग प्रमाणपत्र, पंचायत विभागाने जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी आणि नगर परिषदेतर्फे मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या सेवांचा लाभ नागरिकांना आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.