आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा, हिम्मत असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या महिन्यात ,त्यानंतर विधानसभेच्या ..आम्हालाही कुस्ती खेळता येते , पाहू कोण कोणाला लोळवितंय
मुंबई-निजाम-आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा आहेत. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे, असा घणाघात बुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत देवेंद्र फडणवीसांना पिलावळ म्हणत अमित शहांना थेट नाव घेऊन आव्हान दिले .
ठाकरे शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटासह अमित शहांचाही समाचार घेतला.ऐका त्यांच्याच शब्दात
शहा त्याच कुळातले
ठाकरे म्हणाले, सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
कमळाबाई पहिल्यांदा बोललो
उद्धव पुढे म्हणाले की, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंधच काय. कमळाबाई पहिल्यांदा बोललो. कमळाबाई शब्द माझा नाही. बाळासाहेबांनी दिलेलाय. ही तीच शिवसेनाय. ती पाहता मुंबईवरती दावा सांगण्याचे धाडस करू नका. वंशवाद, वंशवाद कसला वशंवाद. मला माझ्या घराण्याचा अभिमानय.
ही त्यांचीच औलाद
ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्या लढाईत जनसंघ नव्हता. जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा माझे आजोबा होते. पहिल्या पाच अग्रणी नेत्यात माझे आजोबा होते. तेव्हा रण पेटले होते. तेव्हा निवडणुका लागल्या. त्यावेळी जनसंघाने मराठी माणसांची संघटना फोडली. केवळ राजकीय स्वार्थासाठी. आता राज्यातील हिच त्यांची औलाद आहे.
चित्त्याचा आवाज म्यँव…
ठाकरे म्हणाले, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? बाहेरचे उपरे एवढे घेतले की. बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सत्तर वर्षानंतर काय म्हणे चित्ता आणला पण चित्त्यांची काय डरकाळी, पण चित्ता डरकाळी फोडत नाही. पिंजरा उघडला तर आवाज म्यँव निघाला.
फॉक्सकॉन गेला, हे खोटे बोलतायत
उद्धव म्हणाले, धारावीचे आर्थिक केंद्र गुजरातेत नेले. माझी योजना असल्याने तिथे घर बांधा. धारावीकरांना घरे मिळावीच आणि ते आर्थिक केंद्र बनावेच. ही माझी आणि शिवसेनेची भूमिका आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला आणि हे धादांत खोटे बोलत आहेत.
कितीदा दिल्लीसमोर झुकता
ठाकरे म्हणाले, लाज वाटायला हवी तुम्ही कुणाची बाजू घेऊन मांडत आहात. चला मी तुमच्यासोबत येतो. उद्योग परत आणू. पण मिंध्या गट नुसता शेपटी घालून होय महाराजा असे म्हणतो. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जातात. कितीदा दिल्लीत जाऊन झुकता. वेदांताला केंद्र सरकार सवलती देत आहे. हा कट आहे, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातेत न्यायचा आणि सवलती द्यायच्या.
शिवसेनेने आधार दिला
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने अनेकांना आधार दिला. प्राण वाचवणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या पत्नीला नोकरी दिली. मी आज एक पत्र दिले आहे. मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोसाठी चहा पाणी आणि मदत केली. मदत करताना हरीश नावाचा शिवसैनिक अतिरेक्यांच्या गोळीत मृत्यूमुखी पडला. चार शिवसैनिक जखमी झाले होते. आम्ही लढवय्ये आहोत. भाई और बहनो असे सभेत म्हणणारे कुठे होते. भाजपवाले अशावेळी कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला.
आम्ही झुकणारे नाही
ठाकरे म्हणाले, शिवसैनिक आणि मुंबईचे नाते का दृढ आहे, तर ते रक्तदान, संकटात मदतीची जेव्हा गरज असते तेव्हा ते शिवसैनिक पुढे सरसावतो त्यामुळे. आमचे नाते अथांग आहे. भाजपवाले म्हणतात आमचे ठरले काय ठरले? मुंबईला पिळणार आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवणार आम्ही झुकणारे नाही.
आम्ही आश्वासने पाळली
आम्ही जी आश्वासने दिली ती पाळली. पाचशे फूटापर्यंत मालमत्ता कर रद्द केला. दिल्लीतील शाळांचा विकास झाला चांगली गोष्ट आहे. आज मुंबईत महापालिकेच्या शाळात प्रवेशासाठी रांगा लागतात. हे शिवसेना आणि शिवसैनिकांचे यश आहे. अमिताभ बच्चन, रघुनाथ माशलेकर, माधुरी दीक्षितही या शाळात येऊन गेल्या हेच आमचे यश असल्याचे उद्धव म्हणाले.
खुशाल आरोप करा
उद्धव पुढे म्हणाले की, चीनने कोविड केअर सेंटर उभे केले. त्यानंतर वांद्र्यात आपणही असेच काम केले. साथ येण्यापूर्वी आणि पहिल्या लाटेत आपण उपाययोजना केली. कोरोना अहवाल समोर आला. त्यात केंद्राचा हलगर्जीपणा दिसून आला. आता कमळाबाई कशाला टीका करतेय. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असाल तर खुशाल करा. कोरोनामध्ये प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर आम्ही तो पुन्हा करू.
मंदिराऐवजी आम्ही रुग्णालये उघडली
ठाकरे म्हणाले, आपले सरकार आले हिंदु सणावरील विघ्न टळले. हा प्रकार काय आहे. घटनेवर हात ठेवून शपथ घेतली ना..तुमचे सरकार येण्यापूर्वी पंढरीची वारी झाली. कुणी बंधने काढली आम्हीच ना..तोपर्यंत सर्व आम्ही उघडे करून टाकले होते. कोश्यारींनी मला पत्र लिहिले आणि ईश्वरी संकेत मिळतात का? असा सवाल केला, सर्व प्रार्थनास्थळ उघडून टाका म्हणाले पण तेव्हा आम्ही रुग्णालये उघडली आरोग्यसेवा वाढवत होतो. ती तेव्हाची गरज होती. सर्व प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे. देव आपल्यात डाॅक्टरांच्या रुपात होता. हे जेव्हा मंदिरे उघडा म्हणून बोंबलत होते तेव्हा मी आरोग्य केंद्रे, सुविधा, कोविड सेंटर उघडीत होतो. हे पाप असेल तर होय मी ते केले. ते मी केले नसते तर आज भाजप-शिंदे सरकार वळवळले नसते.
ज्यांच्यावर आरोप तेच पक्षात
ठाकरे म्हणाले, मी मुंबई, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. युपीसारखे मी महाराष्ट्रात घडू दिले नाही. सुप्रीम कोर्टाने कौतूक केले. परदेशातील लोकांनी कौतुक केले पण कमळाबाईला कौतूक नव्हते. दुसऱ्यांना चांगले काम केले की, भ्रष्ट्राचार झाला म्हणून ते ओरडत सुटतात. लोकांना बदनाम करायचे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले.
लाॅंड्री काढली काय?
ठाकरे म्हणाले, मोदींचे आश्चर्य वाटते. ज्या महिला खासदारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. तिच बहिण राखी बांधायला मिळाले. भाजपने भ्रष्ट्रांना स्वच्छ करायची लाॅंड्री उघडली का? उद्या-परवा निकाल लागेल तो आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाचे आहेत. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत , आजही रामशास्त्रीसारखे न्यायमूर्ती आहेत आम्हाला विश्वास आहे. आम्ही बरोबर आहे की नाही हे आम्हाला कळू द्या.
शिंदे म्हणजे फिरते सरकार
ठाकरे म्हणाले, खोक्यातून आधी बाहेर या मग भ्रष्ट्राचाराशी लढा. मुल विकल्या जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे फिरते सरकार आता फिरा गोवा, सुरत, गुवाहटीला फिरत आहेत. माझ्यावर आरोप होतो की, मी घरीच बसलो, होय मी लोकांनाही घरीच बसा असे सांगितले तेव्हा कोरोनाचा काळ आहे.