मुंबई-मुंबईतल्या कामाच्या मुलाखती चेन्नईमध्ये कशासाठी घेतल्या जातायत, असा सवाल शिंदे सरकारला करत वेदांताच्या अध्यक्षांवर ट्विट करण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य म्हणाले, काम वर्सोवा – वांद्रे सी लिंक मुंबईतील कामासाठी चैन्नईमध्ये मुलाखती कशा झाल्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या परवानगीने हे चालले आहे का? येथे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही आणि मुंबईतील कामांसाठी चैन्नईत का झाले याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावे. जॉब कुणालाही द्यावा. मात्र, मुलाखती तिकडे का? महाराष्ट्रातील गोष्टीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादेत मुलाखती का घेतल्या नाही? आपल्याकडे तज्ज्ञ इंजिनिअर कमी आहेत का? माझ्या प्रश्नांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे, असे आव्हान आदित्य यांनी दिले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेंची ही 8 वी दिल्लीवारी आहे, ही दिल्लीवारी स्वत:साठी आहे की महाराष्ट्रासाठी आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. राज्यातील किती प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली? उद्धव ठाकरेंचे काम आता खोके सरकारला दिसत असेल असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. वेदांताच्या अध्यक्षांना ट्विट टाकण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असे म्हणतानाच स्थगिती सरकारने किती प्रकल्पांना स्थगिती दिली? वेदांतावर सरकारचे अद्याप उत्तर नाही. बल्क ड्रग पार्कही राज्याबाहेर गेला मात्र सरकार शांतच असल्याचे ते म्हणाले.