पुणे – कला, गायन, वादन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी, सायंकाळी 5 वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होत असून, याचे उदघाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार भूषविणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यात माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीष बापट, खासदार वंदना चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव, आ. संग्राम थोपटे, आ. माधुरी मिसाळ, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, बालन ग्रूपचे चेअरमन पुनीत बालन, उद्योजक विशाल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.नवरात्रीनिमित्त पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशीला जाधव आणि नुपूर दैठणकर या नऊ चित्रतारका उदघाटन सोहळ्यात रंगमंचावर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. या नामवंत नऊ अभिनेत्री एकाच वेळी एका रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी रसिक पेक्षकांना लाभणार आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या पुणे नवरात्रौ महोत्सवात नऊ सिनेतारकांचा नृत्यविष्कार, महंमद रफी यांची अजरामर गीते, आर. डी. बर्मन यांची बहारदार गाणी, अभिनेते गिरीष ओक यांच्याशी गप्पा, हिंदी सुफी संगीत, तब्बल बारा तासांचा भरगच्च धडाकेबाज लावणी महोत्सव, शास्त्रीय संगीताची ताल यात्रा मैफल, भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना त्यांच्या अविट गीतांमधून श्रद्धांजली असे अनेक दर्जेदार कार्यक्रम हे रसिक प्रेक्षकांना मेजवानीच ठरणार आहेत.हा भव्य संस्मरणिय उदघाटन सोहळा व श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात 26 सप्टेंबर या घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष श्री. आबा बागूल व सौ. जयश्री बागूल विधीवत घटस्थापना करतील. याचे पौरोहित्य वेदमूर्ती पं. दंडवते गुरूजी करणार आहेत.
नवरात्रौनिमित्त शिवदर्शन, मुक्तांगण शाळेजवळील श्री आबा बागूल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दाक्षिणात्य घाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले असून, सर्वत्र आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. नवरात्रात सर्व मंदिर विद्युत रोषणाईने झळाळून निघेल. रांगोळी व लाखो फुलांची आरास रोज करण्यात येईल. मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती तेजंपूंज असून देवीस सोन्याचे अलंकार, सोन्याचा मुकूट व अन्य आभूषणे परिधान केली जातील. येथे रोज यथासांग पूजा, अष्टमीचा होम होणार आहे. येथे रोज सकाळ संध्याकाळ महिला मंडळांची भजने होणार असून हजारो महिला व भाविकांना दर्शनासाठी हे मंदीर सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत खुले राहील. याच मंदिराच्या प्रांगणात दिनांक 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत 22वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव संपन्न होईल. याच्या अध्यक्षा सौ. जयश्री आबा बागूल आहेत.पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदाचे 28वे वर्ष असून सन 2009मध्ये स्वाइन फ्लूमुळे आणि गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुणे नवरात्रौ महोत्सावाचे तीन वर्षे कार्यक्रम होऊ शकले नाहीत. नवरात्रात सलग दहा दिवस चालू असणारा व तब्बल 28 वर्षे सलग चालू असणारा हा सांस्कृतिक महोत्सव देशातील प्रमुख सांस्कृतिक महोत्सवात गणला जातो. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात.समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दरवर्षी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री निशीगंधा वाड, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सामाजिक नेते अॅड. अंकूश काकडे यांना श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन यंदा गौरविण्यात येणार आहे. यावेळी लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. तसेच वेदमूर्ती पंडीत श्रीकांत दंडवते गुरूजी आणि वेदमूर्ती पंडीत होतीलाल शर्मा यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.भव्य उदघाटन सोहळादरवर्षीप्रमाणे यंदाही उदघाटन सोहळा भव्यतेने सादर होईल. प्रारंभी नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार त्यांच्या शिष्यांसह सादर करतील. रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर करतील. यानंतर विनोद धोकटे, स्वाती धोकटे व ग्रूप हे अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर करतील. सँण्डी डान्स अॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर करतील. यानंतर जलवा सिनेतारकांचा हा दिलखेचक नृत्याविष्कार कार्यक्रम पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या नऊ चित्रतारका सादर करतील. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या डायरेक्टर व नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. पायलवृंदतर्फे हा कार्यक्रम सादर केला जाईल.उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन सुधीर गाडगीळ करणार आहेत.याच दिवशी सायंकाळी सात वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच येथे स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे वाद्यवृंदासह सादर करतील. ज्येष्ठ पार्श्वगायक महंमद रफी यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने ही पर्वणीच असणार आहे.
मंगळवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नवशक्ती हा हिंदी, मराठी व इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम प्रख्यात गायिका प्रियांका बर्वे, प्रांजली बर्वे व सौरभ दफ्तरदार सादर करतील.
बुधवार, दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सजदा हा हिंदी सुफी संगीताचा नजराणा संदीप पंचवाटकर, आशिष देशमुख, विवेक पांडे, विनल देशमुख आणि राधिका अत्रे सादर करतील.गुरूवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, टीएमडी प्रस्तुत नॉस्टॅल्जिक मेलडीज हा जुन्या – नव्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम तेजस्वीनी, गणेश मोरे, मुकेश देढीया आणि अभिनेते डॉ. गिरीष ओक सादर करणार आहेत. या प्रसंगी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या बरोबर गप्पा हे विशेष आकर्षण असणार आहे.शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, संगीतकार आर. डी बर्मन यांच्या गाण्यांचा ‘द रिदम किंग’ हा कार्यक्रम प्रख्यात गायक जितेंद्र भुरूक सादर करणार असून, त्यांना अली हुसेन, कोमल कृष्णा, माधवी देसाई गायन साथ देतील.लावणी महोत्सवदरवर्षी प्रमाणे यंदाही खास रसिकांच्या आग्रहास्तव सलग 12 तासांचा धडाकेबाज व दिलखेचक लावणी महोत्सव शनिवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीगणेश कला क्रिडा रंगमंच येथे सुरू होईल. हा बहारदार कार्यक्रम थेट रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेकांनी असा भव्य लावणी महोत्सव सुरू करण्यास सुरूवात केली आहे. यंदा इश्काचा नाद खुळा (वर्षा पवार, सोनाली जळगावकर), शिवानीचा नाद खुळा ( शिवानी कोरे, पूनम कापसे), लावण्य जल्लोष ( सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे), जल्लोष अप्सरांचा ( चतुर्थी पुणेकर, पतंजली पाटील), लावणी धमाका ( वैजयंती पाष्टे, वासंती पुणेकर), अहो नाद खुळा ( माया खुटेगावकर, प्रिया मुंबईकर), तुझ्यात जीव रंगला ( अर्चना जावळेकर, नमिता पाटील) असे महाराष्टातील सात नामवंत लावणी ग्रुप सुमारे शंभर सहकलावंतांसह थिरकत्या पावलांनी रंगमंचावर आपली अदाकारी सादर करतील.रविवार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी 7.00 वाजता भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहणारा ‘मेरी आवाज ही पहचान है’ हा विशेष कार्यक्रम लता दीदींच्या जुन्या अवीट गाण्यांना उजाळा देईल. कोमल कृष्णा, पल्लवी आनंद देव, वैजयंती मांडवे, जितेंद्र भुरूक व वाद्यवृंद हा कार्यक्रम सादर करतील.सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता, सूरपालवी ग्रूपतर्फे 1990 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांचा ‘कोयल सी तेरी बोली’ हा अविस्मरणीय कार्यक्रम पल्लवी पत्की ढोले, संजय हिरवाळे, संतोष गायकवाड, राज, विनोद सोनवणे सादर करतील.मंगळवार, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता, सध्या गाजत असलेला पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर यांचा ताल यात्रा हा शास्त्रीय संगीताचा सुरेल कार्यक्रम होईल.बुधवार, दिनांक 5 ऑक्टोबर दसर्याच्या दिवशी सायंकाळी 7.00 वाजता, प्रख्यात गायिका उत्तरा केळकर आणि मंदार आपटे यांच्या ‘उत्तररंग’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या 28व्या वर्षाच्या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता होईल.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सचिव धनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी व अमित बागुल आणि कार्यकारीणी सदस्य राजेंद्र बागूल, जयवंत जगताप, कपिल बागूल, हेमंत बागूल, राजेंद्र बडगे, टी. एस. पवार, सागर बागूल, सागर आरोळे, महेश ढवळे यांसह असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सकाळ आणि साम टीव्ही हे माध्यम प्रयोजक असून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन हे प्रायोजक आहेत.