पुणे- श्री चतुःश्रृंगी देवीचा नवरात्र उत्सव 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान जल्लोषात साजरा होणार आहे. यंदा प्रथमच देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान विश्वस्त नितीन अनगळ यांनी बुधवारी येथे दिली.उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. घटस्थापना सोमवारी सकाळी 9 वाजता होईल व त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे. उत्सवादरम्यान रोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. तसेच 5 ऑक्टोबरला दुपारी 5 पासून सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकर्यांचा सहभागाने निघेल. यावेळी हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाईल.
‘ग्रीन हिल्स ग्रुप’च्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने 12 हजार रोपे लावली असून त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणार्या खताची निर्मिती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येते, असे अनगळ म्हणाले.
भाविकांसाठी सुविधा
- अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्यापर्यंत)
- ‘24 तास सेवा’ तर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे ‘कार्डिक अॅम्ब्युलन्स’ची सोय करण्यात आली आहे. तसेच पूर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध
- पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था
- बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था
- सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा
असे मिळेल दर्शन
देवस्थान ट्रस्टने भाविकांना यावर्षीपासून ऑनलाइन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाइन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाइन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाइटवर भाविकांना पास उपलब्ध असणार आहेत.
तीन टप्प्यातं जीर्णोद्धार
चतुःश्रृंगी देवी मंदिर आणि परिसर सुमारे अडीच एकरांचा आहे. या परिसराचा एकूण तीन टप्प्यांत जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम या नवरात्रोत्सवानंतर लगेच सुरू होणार आहे. त्यानंतर उर्वरित टप्प्यांची कामे होतील. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे, असे विश्वस्त नितीन अनगळ यांनी सांगितले.