Home Blog Page 1568

रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 25 : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती/वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल कार्यालयातील उपायुक्त, विभागीय आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे; असे सांगून श्री. विखे- पाटील म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती, वाळू धोरणानुसार रेतीचे-वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून या धोरणाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येत आहेत याबाबतचा अभ्यास करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पूर परिस्थितीचा धोका कमी करणे, नदीपात्रातील दिशा सरळ करण्यासाठी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करणे, तसेच नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखावे, कमीत-कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे, असे महसूल मंत्री म्हणाले.

सुधारित रेती, वाळू धोरणाची वैशिष्ट्ये

या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये (रुपये 133 प्रति मेट्रिक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी केल्या.

​नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे.

प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा आज (दिनांक २५ एप्रिल २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. केसरकर बोलत होते.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक श्रीमती मनीषा पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मालती टोणपे, प्रथम संस्थेच्या सचिव श्रीमती फरिदा लांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.

व्यावसायिक शिक्षण मोलाचे

भारत हा तरूणांचा देश आहे. आपल्या देशातील तरूणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. राज्य शासन तरूणांना रोजगार मिळावा, यासाठीच्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके शासनामार्फत दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

‘पहिले पाऊल’ ठरणार ऐतिहासिक पाऊल

शिक्षण विभागातील ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.

महिला गटातून केनिया संघाला विजेतेपद.

सहावी रोलबॉल विश्व करंडक स्पर्धा : महिला विभागात भारत तिसऱ्या स्थानी : पुरुष गटात भारत, केनिया उपांत्य फेरीत.

पुणे : महिला गटाच्या अंतिम फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना सहाव्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातून भारत व केनिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

विश्वचषक विजेते केनिया,उपविजेते इजिप्त व तृतीय स्थान पटकवलेल्या भारतीय संघासोबत मान्यवर…

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्तला ५-० असे परभूत केले. मध्यंतराला केनिया संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवताना केनिया संघाने विजय साकारला. केनिया संघाकडून व्ही साटीया (३९.१० व ४३.४५) व कैथीन्जी (०.३२ व २५.२४) यांनी प्रत्येकी २ व रोप ज्युडिथने १ (१.३२) गोल केला. इजिप्त संघाला लढतीमध्ये एकाही गोल करता आला नाही.

ब्रांझ मेडल विजेत्या भारतीय संघासोबत मान्यवर…

महिला गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष व विश्वचषकाचे संयोजक संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, आर पी आय चे मंदार जोशी, लहू बालवडकर, सचिव अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात येत असून त्याअंतर्गत रोलबॉलच्या ६ व्या विश्वकरंडक स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले. राजू दाभाडे यांनी हा खेळ पुण्यात विकसित केला असून हा खेळ सुमारे ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आज झालेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करुन विजेतेपद पटकावले. त्याबद्दल केनिया संघाचे अभिनंदन सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताने पोलंड संघावर १२-१ अशी एकतर्फी मात केली. मध्यंतराला भारतीय संघाने ७-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून इशिका शर्माने ७ (०.३४, १५.२५, ३३.२५,३४.४९, ३५.२५, ३७.९० व ४६.२१) गोल केले. सुहानी सिंग (२३.१७ व २४.५१) व पूजा चौधरी (१०.३३ व ११.१२) यांनी प्रत्येकी २ तर श्रुती भगतने (२१.२१) एक गोल केला. पोलंड संघाकडून सायनोविक मारियाने (४४.५०) एक गोल केला.

तत्पूर्वी, महिला गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीमध्ये केनिया संघाने पोलंड संघाला २-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पोलंड संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर मात्र, केनिया संघाच्या सटीया मारियाने सलग दोन (३२.४० व ३३.३०) गोल करताना संघाला आघाडी मिळवून दिली. पोलंड संघाकडून नायाचेविझ मलास्काने (३.००) एक गोल केला.

महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये इजिप्त संघाने भारताला ४-३ असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या अतितटीच्या लढतीत मध्यंतराला दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. इजिप्त संघाकडून हबीब केंझी अहमदने २ (४२.२१ व ४६.४९), एल्डेक्कर नेजर (४९.२१) व मुस्तफा रितीज (३३.२८) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताकडून इशिका शर्माने २ (४४.१८, ४६.१९) तर पूजा चौधरीने १ (३६.४८) गोल केला. अंतिम लढत ही केनिया व इजिप्त दरम्यान होणार आहे.

पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने इराण संघाला अतिरिक्त वेळेत ७-५ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ३-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र इराणने जोरदार प्रतिआक्रमण करताना जोरदार खेळ केला. त्यामुळे लढत वेळेत दोन्ही संघांनी ५-५ अशी बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ करताना सलग २ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून आदित्य सुतार (००.४५, ४३.३९ व ५५.२३) व हर्षल घुगे (१७.५०, ३६.३६ व ५२.२९) यांनी प्रत्येकी ३ तर सचिन सैनीने १ (२४.००) गोल केला. इराण संघाकडून ओमीद डावरीने ३ (१०.५०, १६.१० व ४१.००) तर साईद मोहसीन (३५.१०) व यासीन खरगरअजीदाबी (३९.१०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.

पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला ७-४ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यापासून केनिया संघाने आक्रमक खेळ करताना मध्यंतराला ५-२ अशी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफ्फिन एसने ४ (४.३०, १३.०५, २२.४२, २७.३७) तर बोनफेसने २ (११.०१, २३.५०) तर केविन मोझेसने १ (४४.३२) गोल केला. इजिप्त संघाकडून हसन अहमद (५.०१, ४९.१३) व ए एम हसन (२.१३, ४७.५३) यांनी प्रत्येकी २ गोल केले.

जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी  प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.25 : “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ब्रिटिश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी आज मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जागतिक पातळीवर स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन याला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. या करारामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच परदेशी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील विद्यापींठाना शैक्षणिक सहकार्य मिळेल,” असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

श्री. रस्तोगी म्हणाले की, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांचे जागतिकीकरण व्हावे, ही शासनाची भूमिका आहे. या करारामुळे भारत आणि युके यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक वाढेल आणि अधिक नवीन शैक्षणिक संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई म्हणाले की, महाराष्ट्रासोबत केलेल्या या करारामुळे भारत आणि युके या दोन देशांमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ होऊन जागतिक आव्हानांचा सामना करण्यास यामुळे मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचा अनुभव आणि रोजगारक्षमता सुधारणे आणि यातून महाराष्ट्रासाठी चांगले सामाजिक – आर्थिक भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

ब्रिटिश कौन्सिलचे श्री. राशी जैन म्हणाले की, उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांना  नवीन कौशल्य व तंत्रज्ञानासह  उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रासोबत हा करार केला आहे.

राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे सोयीचे नसल्याने, मुंबई तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी १० उमेदवारांना पालकमंत्री यांच्या हस्ते तर, २ व ३ मे रोजी नियुक्ती प्राधिकारी यांच्या हस्ते उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

शासनाद्वारे आयोजित विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. महसूल विभागातील भूकरमापक (गट क) या पदाच्या 1,268 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत. तर, मराठी भाषा विभागातील सहायक भाषा संचालक (गट ब) पदासाठी एक उमेदवार, औषधी द्रव्ये (गट ब) वैज्ञानिक अधिकारी या पदाचे 5 उमेदवार, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट क) या पदाचे 114 उमेदवार, परिवहन विभागातील सहायक मोटर वाहन निरीक्षक (गट क) या पदाचे 177 उमेदवार, वित्त विभागातील राज्यकर निरीक्षक (गट क) 697 उमेदवार, विधि व न्याय विभागातील अवर सचिव (गट अ) या पदाचे 11 उमेदवार, सार्वजनिक आरोग्य विभागातील (गट अ) पदाच्या 224 उमेदवार अशा एकूण 2497 उमेदवारांपैकी 2002 उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

000

२४ अत्यावश्यक कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाला भारतीय शेतकऱ्यांकडून समर्थन

पुणे:

कीटकनाशक उद्योगाने सादर केलेल्या सुरक्षितता आणि परिणामकारकता यावरील भरीव माहितीच्या आधारे नियुक्त तज्ज्ञ समितीमार्फत २७ कीटकनाशकांचा व्यापक आढावा घेतल्यानंतर भारत सरकारने २४ कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अल्पभूधारक शेतकाऱ्यांसह संपूर्ण कृषी समुदायाने स्वागत व कौतुक केले आहे, कारण ते या उत्पादनांचा गेल्या दशकांपासून अनेक पिकांवर सुरक्षितपणे वापर करीत आहेत.

ही कीटकनाशके भारतात उत्पादित होत असल्याने भारतीय शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी किफायतशीर किंमतीत तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची हमी या निर्णयामुळे राहील.

या अत्यंत महत्त्वाच्या कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय शेतीची वास्तविकता आणि शेतकऱ्यांना किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध असण्याची गरज दर्शवितो कारण प्रचंड महागड्या आयात केलेल्या पर्यायी कीटकनाशकांच्या तुलनेत आपलेच, परवडणाऱ्या किंमतीतील तंत्रज्ञान वापरुन  दर्जेदार व किफायतशीर अन्न उत्पादन करण्याची आज आवश्यकता आहे.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित  करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशके उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत देशभरातली शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या महत्त्वाच्या २४ कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे भारताच्या अन्न उत्पादन प्रणालीचे रक्षण करण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे आणि त्याचबरोबर यामुळे हे शेतकरी कार्यक्षमतेने आणि शाश्वतपणे अन्न उत्पादन करणे सुरू ठेवू शकतात.

     हरयाणा येथील अंबाला शेतकरी उत्पादन संस्थांचे संचालक श्री. गवनीत सिंग म्हणाले, शेतकरी म्हणून आम्ही जाणतो की आमच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशकांचा वापर करणे किती महत्वाचे आहे. सरकारचा हा निर्णय एक सकारात्मक पाऊल आहे कारण या कीटकनाशकांची राज्य कृषी विद्यापीठांकडून शिफारस केली जात आहे आणि शेतकऱ्यांना पिकांवर त्यांचा सुरक्षितपणे वापर करण्याचा अनुभव आहे.

हरियाणा येथील पेहोवा शेतकरी उत्पादन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरप्रीत सिंग म्हणाले, “उत्पादन आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. आम्ही या कीटकनाशकांसोबत काम केले आहे आणि त्यांच्या कामगिरीवर आमचा विश्वास आहे. अन्य कोणत्याही पर्यायांचा स्वीकार करावा लागल्यास त्याचा आमच्या इन्पुट खर्चावर आणि एकूण उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.”

आपले अन्न पुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. या २४ महत्त्वपूर्ण कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे ही एक आवश्यक पायरी आहे, कारण या कीटकनाशकांचा वापर तुलनेने नवीन उत्पादनांसाठी संभाव्य तण, कीटक व रोगांविरूद्ध प्रतिरोधक व्यवस्थापनासाठी मिश्रण म्हणून देखील केला जातो.

किडे आणि कीटके गोदामांमध्ये साठवलेल्या धान्यांसह २० ते ३० % एवढे पिकांचे नुकसान करू शकतात. गहू, तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांमधील साठवण कीडपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या कीटकनाशकांचा वापर धान्य साठवणुकीसाठी स्मार्ट फ्युमिगंट्स म्हणून केला जातो.

भारत सरकारने कीटकनाशकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापरासाठी ड्रोनच्या वापरास आधीच मान्यता दिली आहे. आपल्या अन्न पुरवठ्याची गुणवत्ता व सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. कीटकनाशके विशिष्ट कीटक व रोगांनाच केवळ  लक्ष्य करण्यासाठी तशा पद्धतीने  काळजीपूर्वक तयार केली जातात आणि त्यांचा वापर केल्याने लक्ष्य नसलेल्या जीवांना आणि पर्यावरणाला पोहोचू नये याची खात्री करण्यासाठी कठोरपणे नियम केले जाते.

शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही :अविनाश धर्माधिकारी

पुणे:

तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांपर्यंत वेगाने माहिती पोहोचविणे शक्य आहे, परंतु शिक्षक देत असलेले ज्ञान आणि जीवनातील शहाणपण कोणतेही नवीन तंत्रज्ञान देऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही, असे मत निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जिज्ञासा’ या शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत धर्माधिकारी बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा.धनंजय कुलकर्णी, प्रबंधिका डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्माधिकारी पुढे म्हणाले, उत्तम मनुष्य निर्मितीसाठी उच्च बुद्धिमत्तेच्या व्यक्तींनी शिक्षकी पेशात आले पाहिजे. एक एक शिक्षक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे.
शिकवण्यावरील जबरदस्त प्रभुत्व, मुलांना वेड लागेल असे शिकविण्याचे कौशल्य, सतत अद्ययावत राहण्यासाठी चतुरस्त्र वाचन, लेखन, संशोधन, अनुभवातून अभ्यासात स्वतंत्र बुद्धिने अभ्यासात नवीन भर घालण्याची क्षमता आणि विद्यार्थ्यांवर निरपेक्ष प्रेम करता येणे ही पंचशीले शिक्षकांनी अंगी बाणवली पाहिजेत.

राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या सचिव अनुराधा ओक, शिक्षक प्रशिक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केशव भांडारकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गावी देवदेव करण्यासाठी  तीन दिवसांच्या सुटीवर ?

मुंबई-सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी तीव्र झाल्यात. या गदारोळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुटीवर गेलेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. एकनाथ शिंदे सुटीवर का गेले, याची खुसखुशीत चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असे सुटीवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांच्या गावी ते देवदेव करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता. या साऱ्या घडामोडीत मुख्यमंत्री सुटीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजून लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याचे समजते. शिवाय राजकीय कोलाहलातून थोडी विश्रांती हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे.अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला, तर भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चाय. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडल्याचे समजते.महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी राज्यपालांची भेट घेऊन दबाव वाढवला. यामुळेही एकनाथ शिंदे सुटीवर गेल्याचे समजते.

आमदार राहुल कुल यांनी 500 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग केले- संजय राऊत, भीमा पाटस कारखान्याविरोधात CBIकडे तक्रार

राहुल कुल देवेंद्र फडणवीसांचे खासविरोधकांना 5 लाखांसाठी तुरुंगात टाकताउद्या दौंडमध्ये सभा

मुंबई-दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आज ट्विटवरून ही माहिती दिली. तसेच, पत्रकार परिषदेतही याबाबत सविस्तर भूमिका मांडली. भीमा पाटस साखर कारखाना हा भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजप आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. त्यांनीच भीमा पाटस कारखान्यात घोटाळा करून 500 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केले आहे. या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी दोन महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवले आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ते मला भेटीसाठी वेळ देत नाहीये. त्यामुळे राहुल कुल यांच्या कारखान्याची मी आता सीबीआयकडे तक्रार केली आहे. सीबीआयने मला पोचपावतीही दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे आता सीबीआयकडे दिले असून सीबीआय या प्रकरणात काय कारवाई करते, हे पाहू. विरोधी पक्षातील लोकांना अगदी 2 ते 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. मात्र, राहुल कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे.

संजय राऊत म्हणाले, पुरावे देऊनही देवेंद्र फडणवीसांनी राहुल कुल यांच्याविरोधात काहीही कारवाई केली नाही. त्यावरून गृहमंत्री फडणवीस हे केवळ विरोधकांवरच कारवाई करतात. मात्र, स्वपक्षातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना, चोर, लुटारूंचे फडणवीस संरक्षण करतात. फडणवीसांना आवाहन आहे की, त्यांनी दरोडेखोरांना पोटाशी घालू नये. महाराष्ट्रात हे फार काळ चालणार नाही.

संजय राऊत म्हणाले, मी उद्या संध्याकाळी 5 वाजता दौंड येथे जात आहे. तेथील शेतकऱ्यांनीच भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात माझी सभा ठेवली आहे. या सभेत राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मी आवाज उठवणार आहे. केवळ राहुल कुलच नव्हे तर मालेगाव येथील गिरणा सहकार साखर कारखान्यासाठी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 1800 कोटी रुपये जमा केले आहेत. या अपहाराबाबतही मी लवकरच ईडी, सीबीआयकडे तक्रार करणार आहे.

शहरी गरीब योजना:महापालिकेत एजंटराज,गरीबांचा छळवाद तर हॉस्पिटल्सना रेड कार्पेट

१ लाख रुपये उत्पन्न मर्यादा तोच गरीब ..त्यावरचे सारे श्रीमंत ..अजब गजब कागदपत्रांची महागजब तपासणी

पुणे – दहा हजार रुपये द्या आणि शहरी गरीब योजनेचा लाभ घेणारे कार्ड घ्या असा एजंटगिरीचा प्रकार आता महापालिकेत जोरदार पद्धतीने सुरु असल्याच्या चर्चा कानावर येत असताना याबाबत राष्ट्रवादीचे पर्वती भागातील कार्यकर्ते नितीन कदम आणि अभिजित बारवकर यांनी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत , महापालिकेने अनेक जाचक , अनावाश्यक अति लादून गरजूंचा छळवाद मांडला आहे आणि बड्या बड्या हॉस्पिटल्सना मात्र रेड कार्पेट च्या पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबिले कि काय ? अशी शंका येणारी परिस्थिती असल्याचा आरोप केला आहे. याच कारणास्तव आपल्या काही मागण्या मांडत राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासकांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे कि,’ शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश होऊन आता अनेक वर्ष झाली आहेत. परंतु जी कामे सहजरीत्या स्मार्ट पद्धतीने होऊ शकतात अशी कामे देखील करण्यात प्रशासनास रस नाही असे शहरी गरीब योजनेच्या अंमलबजावणी वरून दिसते. शहरी गरीब योजना हि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुढाकाराने चालू झालेली योजना असून सदर योजनेची अंमलबजावणी पूर्वी उत्तमरीत्या चालू होती. आता ऑनलाईन पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होत असून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. नागरिक सर्व कागदपत्रे (उदा.शिधापत्रिका, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, ग.व.नी.पावती) फोटो, ऑनलाईन जमा करीत असून त्यांना पुन्हा मनपामध्ये बोलावून सदर कागदपत्रे तपासून कार्ड दिले जाते. ऑनलाइन आपल्याकडे जमा असलेली कागदपत्रे पुन्हा घेण्याचे कारण काय याचा खुलासा करावा.
वास्तविक शिधापत्रिका, आधार कार्ड तपासून गृह तपासणी करून तलाठी मार्फत तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला मिळाल्यानंतर पुन्हा तीच कागदपत्रे आपण पुन्हा पुन्हा तपासतो, सदर कागदपत्रे तपासली तरी हरकत नाही, परंतु यामध्ये नाहक वेळ जाऊन तासनतास ज्येष्ठ नागरिक, महिला मनपामध्ये उभे असतात. हे सर्व कामकाज करण्यास आपला असेलला स्टाफ वाढविणे आवश्यक आहे हि साधी बाब कोणाच्याही लक्षात येत नाही हे लाजिरवाणे आहे.
मनपा कार्यालयाच्या बाहेरील रांगेत उभे असलेल्या प्रत्येक नागरिकास कार्ड देणे बंधनकारक असताना आपण ज्यांना टोकन दिले आहे अशा नागरिकांना कार्ड देतो हे कितपत योग्य आहे, ज्यांना टोकन मिळाले नाही त्याला कार्ड मिळणार नाही हे नागरिकांना २ तास रांगेत थांबल्यानंतर कळते हे कसले नियोजन ? एकीकडे आपण स्मार्ट कामाचा दिंडोरा वाजवतो व एका बाजूला नागरिकांचे हाल करतो.
उपरोक्त सर्व बाबी पाहता तातडीने खालील उपाययोजना करण्यात याव्यात.
१.शहरी गरीब योजनेच्या कार्यालयातील स्टाफ, संगणक व प्रिंटरची संख्या वाढविण्यात यावी.
२.शहरी गरीब योजनेचे कार्यालय शनिवार व रविवारी देखील स.१० ते सायं.६ पर्यंत चालू ठेवण्यात यावे.
३.ऑनलाईन ओरिजिनल कागदपत्रे सादर केल्यानंतर पुन्हा तेच तपासणे हि प्रक्रिया चालू ठेवण्याची आवश्यकता आहे का यावर पुनर्विचार करण्यात यावा.
४.र.रु.१ लक्ष वार्षिक उत्पन्नाची मर्यादा र.रु.१,८०,०००/- इतकी करण्यात यावी.
५.हृदयरोग, मेंदू संबंधित रोग, किडनी संबंधित रोग यावरील वाढते खर्च पाहता यापोटी देण्यात येणारी रक्कम वाढवावी.
६. शहरी गरीब योजनेच्या पॅनेलवरील जी रुग्णालये मनपाचे पत्र स्वीकारत नाहीत अशा रुग्णालयाशी संपर्क करून समन्वय बैठक घेऊन त्यांना पत्र स्वीकारण्याचे बंधन करावे.
७.जास्तीत जास्त रुग्णालये शहरी गरीब योजनेच्या पॅनेलवर घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
८.नवीन समाविष्ट गावातील नागरिकांना शहरी गरीब योजनेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया चालू करावी.

लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया   

नांदेड :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरील गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदीच्या अस्तित्वाप्रती वास्तवाचे भान आणून दिले. “चला जाणूया नदीला” या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यातील शहापूर येथे आयोजित जलग्राम सभेत ते बोलत होते.

संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव ग्रामसभेची रूजूवात राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शहापूरचे सरपंच वंदना माडपत्ते, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष तथा जलनायक प्रमोद देशमुख, तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, डॉ. सुमंत पांडे, नदी प्रहरी शिवाजी देशपांडे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, कैलास येसगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मन्याड नदीच्या काठावरही कधीकाळी श्रीमंती होती. इथल्या नदीकडे जसे दुर्लक्ष झाले तसे इथल्या समृद्धीला आळा बसत गेला. समाजाबरोबर राज व्यवस्थेकडून जेव्हा दुर्लक्ष होते तेव्हा समाजही क्षीण बनत जातो. अशा स्थितीत समाजाला भानावर आणण्याचे काम वेळोवेळी संतांनी केले आहे. आज मन्याडच्या काठावर तिन्ही घटक सोबत असून समाजाकडूनही अधिक लोकसहभागाच्या माध्यमातून बांधिलकी वृद्धींगत होईल, असा विश्वास जलपुरूष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.

जल साक्षरतेच्यादृष्टिने जलग्रामसभा हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे. गावाच्या काठावर असलेल्या झाडांपासून, छोटे नदी-नाले, ओहोळ, विहिरी, झरे, लहान मोठी डोंगर ही त्या गावची संपत्ती असते. याला आपण नैसर्गिक संपत्ती म्हणतो. एखाद्या गावाच्या शिवारात जर नदी असेल तर स्वाभाविकच ही नदी सुद्धा त्या गावाचा अभिमान असू शकते. नदीचे आरोग्य, तिची स्वच्छता, तिची निगा ही गावाच्या लोकसहभागाशिवाय केवळ अशक्य आहे. जिथे लोकसहभाग आहे तिथे प्रशासनही अधिक सजग व तत्पर होत जाते, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

संगमवाडी ते बंडगार्डन एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे काढणे अत्यावश्यक: पालिकेच्या प्रकल्प अभियंत्यांचे स्पष्टीकरण

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही

समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे : पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ झाडे सामाविष्ट आहेत, अशी माहितीही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदी काठच्या बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जी वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत असताना बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत यापूर्वीही पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जी वृक्ष काढली जाणार आहेत, त्यामध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा अजिबात समावेश नाही. तर, मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण हे जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातीमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे. तर, याशिवाय खैर २, निलगिरी २ अशी चार वृक्ष काढण्यात येणार आहेत.
तर, बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम करीत असताना १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहेत. यामध्येही १ हजार २५३ वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील असून अशा झाडांचे प्रमाण हे एकूण काढावयाच्या झाडांच्या ७९ टक्के आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ/विलायती किकर/विलायती चिंच ५७९ अशी एकूण १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे.

परिसंस्था सुधारण्यास होणार मदत

बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे. हे करीत असताना लावण्यात येणारे गवत व वृक्षांचे प्रकार स्थानिक असून सहजगत्या उपलब्ध होऊ शकणारे असेच असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिका जी वृक्ष लावणार आहेत, ती वृक्ष नैसर्गिकदृष्ट्या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी असतील हे वृक्ष हवामान बदल, पूर परिस्थिती आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती तसेच इतर सुक्ष्म बदलांना तोंड देण्यास सक्षम असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ही वृक्ष नदीकाठाच्या संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळण्यासाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्ष्यांची घरटी, निवासस्थाने निर्माण करण्यासाठी, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचरांच्या वाढीसाठी याचाच अर्थ एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी आहेत. याशिवाय, ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व नदीकाठ परिसंस्थेला सुसंगत असलेली योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, करंज, अर्जुन, मुचकुंद, गुलार, कैलासपती, निम, काडंब आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे.

वृक्षांना लावलेल्या फलकांबाबत गैरसमज

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करताना वृक्षांना एक फलक लावून त्यावर नंबर टाकण्यात आला होता. केवळ वृक्षांची संख्या मोजता यावी, यासाठी सर्वेक्षणाचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र समाज माध्यमांवर या फलकांबाबत सुद्धा गैरसमज निर्माण करून देण्याचे काम सुरू आहे. हा फलक ज्या ज्या वृक्षावर आहेत, ते सर्व वृक्ष तोडले जाणार आहेत, अशा स्वरुपाचा संदेश समाज माध्यमातून दिले जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे फलक केवळ सर्वेक्षणाचा भाग आहे.
मुळात, पुणे महानगरपालिका नेहमीच पुणे शहराचा विकास करीत असताना पर्यावरण संवर्धनाला सुद्धा तेवढेच महत्त्व देत असते. पर्यावरण संवर्धन आणि विकास याचा समतोल साधण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केला आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करीत असताना सुद्धा पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी पुणे महानगरपालिका घेत आहे. त्यामुळेच नदीच्या काठापासून जवळ असणाऱ्या जुन्या व दुर्मिळ वृक्षांना वाचवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहेच. तसेच बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जास्तीतजास्त वृक्षांचे पुर्नरोपण करण्यावर भर दिला जातोय. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पुणे महानगर पालिकेकडून ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार आहेत, अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमांवर टाकून चुकीची माहिती प्रसारीत करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातोय. या माहितीमध्ये तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.

संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशभरात ५०,००० हून अधिक यूनिट रक्त संकलित

गंगाधाम पुणे येथे ११८० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पुणे –  ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
              संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन चे प्रमुख आदरणीय ताराचंद करमचंदानी जी यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, पुणे येथे ११८० यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ५०००० हून अधिक रक्त संकलित करण्यात आले.


            सदगुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.
            निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ या दिवशी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते.
          रक्तदानाचे महत्व समजावताना सदगुरु माताजींनी म्हटले, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे. रक्त देताना ते कोणत्या शरीरामध्ये जाईल याचा आपण विचार करत नाही. हे तर एक मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक कार्य आहे. निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले.
           या रक्तदान शिबिराला सुनील शिंदे (आयकर विभाग), माधुरी मिसाळ (आमदार), स्मारथना पाटील (पोलीस उपायुक्त), सुनील कांबळे (आमदार) तसेच विभागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शिवली. या रक्तदान शिबिरामध्ये वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी यांनी ५५० युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ६३० युनिट रक्त संकलन केले.

अभिनेत्री कालिंदी आणि अभिनेता पृथ्वीराज करणार ‘टीडीएम’ चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश

नवख्या कलाकारांना आकार देत भाऊरावांनी ‘टीडीएम’ साकारला, पृथ्वीराज आणि कालिंदीने मानले आभार

रोमँटिक आणि आशयघन कथा घेऊन दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून दोन नवे चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतील, ते म्हणजे ‘ऑफिस बॉय’ पृथ्वीराज थोरात आणि ‘विदर्भ कन्या’ कालिंदी निस्ताने. पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास ‘टीडीएम’च्या टीमला आहे. ‘टीडीएम’मधील गाणी याचा पुरावा देतात. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा आणि बबनमधील गाणी आजही लोकांना भुरळ घालतात. अशातच ‘टीडीएम’मधील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहेत. ‘एक फूल वाहतो सखे’, या गाण्यात पृथ्वीराज आणि कालिंदीमध्ये हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाने तरुण-तरुणींच्या हृदयाला साद घातली आहे. तर ‘मन झालं मल्हारी’ गाण्यानेही प्रेमीयुगुलांना वेड लावलं आहे. या दोन्ही गाण्यांबरोबरच टीडीएमच्या ट्रेलरमध्येही नवखे कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जबरदस्त अभिनयाची अनुभूती होते. 

अभिनेत्री कालिंदीला करावा लागला या आव्हानाचा सामना
पृथ्वीराज आणि कालिंदी या दोघांसाठी या भूमिका करणे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. कारण कालिंदी ही मूळची विदर्भातील आहे. त्यामुळे तिची भाषा आणि ‘टीडीएम’मधील तिच्या पात्राची अस्सल रांगडी मराठी भाषा यांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे.

भाषेबद्दलच्या आव्हानाबद्दल सांगताना कालिंदी म्हणते, “मी विदर्भाची असल्यामुळे वर्कशॉपदरम्यान सातत्याने माझ्या बोलण्यात तोंडात रुळलेले शब्द यायचे. परंतु वर्कशॉपवेळी सर्वांची भाषा सतत कानावर पडल्याने मला माझ्या पात्राची भाषा शिकण्यात मदत झाली. बऱ्याचदा म्हणी, वाक्यप्रचार मला समजत नसत. आताही मी म्हणी किंवा वाक्यप्रचार ऐकले की गोंधळून जाते. एकूणच मला भाषेसाठी खूप तयारी करावी लागली. परंतु सगळ्या गोष्टी मला नव्याने शिकायला मिळाल्या याचा मला आनंद आहे.”

अभिनेता पृथ्वीराजने टीडीएमसाठी घेतली खूप मेहनत
पुण्यात ऑफिस बॉयची नोकरी करणारा पृथ्वीराज याची ‘टीडीएम’मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि पृथ्वीराजही त्या भूमिकेवर खरा उतरला आहे. शिक्षण कमी असताना आणि ऑडिशनचा अनुभन नसतानाही पृथ्वीराजने ‘टीडीएम’मधील पात्र कसे साकारले? याबद्दल तो म्हणतो, “भाऊरावांनी मला बरीच पुस्तके वाचायला सांगितली, ज्यांची मला खूप मदत झाली. भाऊरावांना स्लिम आणि फिट बॉडी अपेक्षित होती. त्यासाठी मी एकही दिवस न चुकता व्यायाम केला. जिमला जाण्याचा कंटाळा यायचा, म्हणून घरीच दररोज कसरत केली. चपाती भाजी असा घरचाच पौष्टिक आहार घेतला. याबरोबर भिजलेले शेंगदाणे, कडधान्ये खाल्ले.”

याशिवाय आपल्यातील कलेला ओळखून आपल्याला टीडीएममध्ये संधी दिल्याने पृथ्वीराज आणि कालिंदीने दिग्दर्शक भाऊरावांचे आभार व्यक्त केले.

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.

मुंबई, दि. २४ एप्रिल
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर व नागपूरच्या सभेला उपस्थित होते. अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत असे चित्र प्रसार माध्यमात रंगवण्यात आले होते पण वस्तुस्थिती जनतेने पाहिली आहे. मविआची वज्रमूठ सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची एकत्रित सभा असून या सभेला राज्यातील तीन्ही पक्षांचे नेते उपस्थित असतात.

मुंबई येथे १ मे २०२३ रोजी होणा-या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसाठी टिळक भवन, दादर येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ, राजू वाघमारे यांच्यासह ठाणे शहर व ग्रामीण, भिवंडी शहर, कल्याण शहर, उल्हासनगर शहर, वसई विरार शहर, मिरा भाईंदर शहर, नवी मुंबई शहर, पनवेल, रायगड, पालघर व मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.