नवख्या कलाकारांना आकार देत भाऊरावांनी ‘टीडीएम’ साकारला, पृथ्वीराज आणि कालिंदीने मानले आभार
रोमँटिक आणि आशयघन कथा घेऊन दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून दोन नवे चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतील, ते म्हणजे ‘ऑफिस बॉय’ पृथ्वीराज थोरात आणि ‘विदर्भ कन्या’ कालिंदी निस्ताने. पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास ‘टीडीएम’च्या टीमला आहे. ‘टीडीएम’मधील गाणी याचा पुरावा देतात.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा आणि बबनमधील गाणी आजही लोकांना भुरळ घालतात. अशातच ‘टीडीएम’मधील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहेत. ‘एक फूल वाहतो सखे’, या गाण्यात पृथ्वीराज आणि कालिंदीमध्ये हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाने तरुण-तरुणींच्या हृदयाला साद घातली आहे. तर ‘मन झालं मल्हारी’ गाण्यानेही प्रेमीयुगुलांना वेड लावलं आहे. या दोन्ही गाण्यांबरोबरच टीडीएमच्या ट्रेलरमध्येही नवखे कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जबरदस्त अभिनयाची अनुभूती होते.
अभिनेत्री कालिंदीला करावा लागला या आव्हानाचा सामना
पृथ्वीराज आणि कालिंदी या दोघांसाठी या भूमिका करणे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. कारण कालिंदी ही मूळची विदर्भातील आहे. त्यामुळे तिची भाषा आणि ‘टीडीएम’मधील तिच्या पात्राची अस्सल रांगडी मराठी भाषा यांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे.
भाषेबद्दलच्या आव्हानाबद्दल सांगताना कालिंदी म्हणते, “मी विदर्भाची असल्यामुळे वर्कशॉपदरम्यान सातत्याने माझ्या बोलण्यात तोंडात रुळलेले शब्द यायचे. परंतु वर्कशॉपवेळी सर्वांची भाषा सतत कानावर पडल्याने मला माझ्या पात्राची भाषा शिकण्यात मदत झाली. बऱ्याचदा म्हणी, वाक्यप्रचार मला समजत नसत. आताही मी म्हणी किंवा वाक्यप्रचार ऐकले की गोंधळून जाते. एकूणच मला भाषेसाठी खूप तयारी करावी लागली. परंतु सगळ्या गोष्टी मला नव्याने शिकायला मिळाल्या याचा मला आनंद आहे.”
अभिनेता पृथ्वीराजने टीडीएमसाठी घेतली खूप मेहनत
पुण्यात ऑफिस बॉयची नोकरी करणारा पृथ्वीराज याची ‘टीडीएम’मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि पृथ्वीराजही त्या भूमिकेवर खरा उतरला आहे. शिक्षण कमी असताना आणि ऑडिशनचा अनुभन नसतानाही पृथ्वीराजने ‘टीडीएम’मधील पात्र कसे साकारले? याबद्दल तो म्हणतो, “भाऊरावांनी मला बरीच पुस्तके वाचायला सांगितली, ज्यांची मला खूप मदत झाली. भाऊरावांना स्लिम आणि फिट बॉडी अपेक्षित होती. त्यासाठी मी एकही दिवस न चुकता व्यायाम केला. जिमला जाण्याचा कंटाळा यायचा, म्हणून घरीच दररोज कसरत केली. चपाती भाजी असा घरचाच पौष्टिक आहार घेतला. याबरोबर भिजलेले शेंगदाणे, कडधान्ये खाल्ले.”
याशिवाय आपल्यातील कलेला ओळखून आपल्याला टीडीएममध्ये संधी दिल्याने पृथ्वीराज आणि कालिंदीने दिग्दर्शक भाऊरावांचे आभार व्यक्त केले.