Home Blog Page 1520

मंडईच्या शारदा गजाननाला चंदन उटी लेपन आणि मोगरा महोत्सव 

अखिल मंडई मंडळ : महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७६ वर्षे पूर्ण

पुणे :  टाळ-मृदुंगाच्या साथीने केलेले भजन, सुवासिक मोगºयांच्या फुलांची आकर्षक आरास अशा प्रसन्न वातावरणात शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपन करण्यात आले. फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि ६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरण्यात आली.

यावेळी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरात पुण्यनगरीच्या वासंतिक उटी भजनाची सांगता झाली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, भारतीय वारकरी मंडळाचे वारकरी तसेच मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित  होते. मंडळाच्या या महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.

अण्णा थोरात म्हणाले, पुण्यनगरीत सुरु होणाºया वासंतिक उटी भजनाची सांगता ६८ दिवसांनी महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरात होते. अतिशय संस्मरणीय असा हा सोहळा असतो. यानिमित्त मंदिरात मोगरा महोत्सव केला जातो. यंदा मोगरा, जुई,गुलाब आदी फुलांची आरास करण्यात आली होती.

ते पुढे म्हणाले,  सुमारे ८० वर्षांपूर्वी, पुण्यातील लिंबराज महाराज मठ येथे सुरु झालेला हा उटी भजनाचा सोहळा आजवर अखंडितपणे सुरु आहे. भजनासाठी वारकरी सांप्रदायिक चाली व पारंपरिक सांगितीक चाली वापरतात. भगवान विष्णूंचे आवडते वाद्य पखावज, तबला व संवादिनी यांची साथ भजनाला असते. सध्या तरुणवर्गाचा सहभाग यामध्ये वाढताना दिसत आहे. या उटी भजनासाठी शहरासोबतच पाषाण, कर्वेनगर, कोथरुड, एरंडवणा, घोरपडी, संगमवाडी, कात्रज, येरवडा आदी भागातून भजनकरी सहभागी होतात.

स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती!

नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे.

1 मे पासून 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ 600 रुपयांना मिळणार आहे. नवीन धोरणानुसार, सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास किंवा 133 रुपये प्रति मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीला बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी संबंधित अधिकाऱ्यानं सादर केलेली यादी तहसीलदार तपासून पाहतील आणि तहसीलदारांच्या लेखी परवानगीनंतर लाभार्थ्यास वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासन प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी हे धोरण राबवणार आहे.

 ‘अशी’ होणार वाळूची विक्री

महाराष्ट्र शासनाच्या आधीच्या वाळू धोरणानुसार, राज्यात वाळू घाटाचे लिलाव होत असत. पण, हे लिलाव वेळेवर होत नसल्यानं राज्यात वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा. दुसरीकडे बांधकामं मात्र थांबलेली नसायची. यामुळे राज्यात वाळूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण व्हायची. परिणामी नागरिकांना जास्त दरानं वाळू खरेदी करावी लागायची. सर्वसामान्य माणसाला 7 ते 8 हजार रुपये प्रति ब्रास या दरानं वाळू खरेदी करावी लागायची. एकीकडे वाळूचा तुटवडा आणि दुसरीकडे वाळूला मिळणारा प्रचंड दर, यामुळे राज्यात अवैध वाळू उपशाची प्रकरणं घडायची. अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही व्हायचा. आता मात्र नवीन वाळू धोरणानुसार, वाळू घाटाचे लिलाव बंद होणार आहेत.

नवीन धोरणानुसार, वाळूच्या उत्खननासाठी राज्य शासनाकडून आधी नदीपात्रातील वाळूचे गट निश्चित केले जातील. या वाळू गटातून वाळूचं उत्खनन केलं जाईल. मग ही उत्खनन केलेली वाळू शासनाच्याच तालुका स्तरावरील वाळू डेपोमध्ये साठवली जाईल आणि तिथूनच तिची विक्री करण्यात येईल. नदीपात्रातील वाळूचा गट निश्चित केल्यानंतर त्यातून वाळूचं उत्खनन आणि वाहतूक यासाठी संबंधित गावाच्या ग्रामसभेची शिफारस अनिवार्य राहिल. वाळूचं उत्खनन, उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी राज्य शासनाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल.

वाळू मागणीची प्रक्रिया

ज्या ग्राहकांना वाळू हवीय, त्यांना महाखनिज (Mahakhanij) या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणं आवश्यक राहिल. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागेल. यासाठी लागणारं शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील. याशिवाय मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही वाळूची मागणी नोंदवता येणार आहे. सध्या यावर राज्य सरकारचं काम सुरू आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 मेट्रिक टन वाळू मिळेल. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर वाळूची मागणी करता येईल.

वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक असेल. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकास करावा लागेल.

वाळू डेपोतून वाळू विक्रीसाठी ग्राहकाचा आधार क्रमांक अनिवार्य राहिल.

वाहतुकीचा खर्च

शासनाच्या डेपोतून प्रति ब्रास 600 रुपये दरानं वाळू मिळणार असली तरी या वाळूवर जीएसटी लागणार का आणि गौण खनिज कर आकारला जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय, ट्रॅक्टरभर वाळूच्या एका ट्रिपसाठी जाऊन-येऊन 10 किलोमीटर अंतरासाठी जवळपास 1 हजार रुपये वाहतूक खर्च आकारला जातो. किती अंतरावर वाळू वाहतूक करायची त्यानुसार हा दर कमी-जास्त होत असेल.

वाळू उत्खननासाठीचे नियम

अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या  नवीन धोरणात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यात, 10 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये वाळू उत्खनन करता येणार नाही. वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीतच करता येईल.

नदीपात्रात जास्तीस्त जास्त 3 मीटर इतक्या खोलीपर्यंत निविदाधारक किंवा ठेकेदारास वाळूचे उत्खनन करता येईल.

रेल्वे किंवा रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूनं 600 मीटर अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही.

शासनाचे धोरण चांगले आहे. यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू मिळणार आहे. याआधी किती दरानं वाळू विकावी यावर काही नियंत्रण नव्हतं. वाळू घाटातून वाळू काढली की ठेकेदार त्याला हव्या त्या किंमतीला ती वाळू विकायचा. आता मात्र वाळू गटातून वाळू काढली की ती ठेकेदाराला थेट वाळू डेपोत न्यावी लागेल. त्याला ती दुसरीकडे नेता येणार नाही. यामुळे वाळूवरील नियंत्रण वाढणार आहे. याआधी वाळू घाटाचा लिलाव झाला की संबंधित परवानाधारक ती वाळू थेट ग्राहकांना विकत असत. अशावेळी वाळू अवाजवी दरानं विकली जायची. यात एकप्रकारची एकाधिकारशाही निर्माण झाली होती. यातूनच वाळू माफिया तयार झाले होते. आता या प्रकाराला आळा बसेल. नवीन धोरणानुसार, वाळू गटाचे टेंडर निघतील. उत्खननाचं टेंडर मिळालेली व्यक्ती त्या गटातून वाळूचं उत्खननं करेल आणि ती वाळू त्या भागातल्या डेपोमध्ये पाठवली जाईल. या डेपोतूनच नागरिकांना ती वाळू घेता येईल. जवळपास 7 हजार रुपये ब्रासनं मिळणारी वाळू 600 रुपयांची पावती फाडून मिळत असेल तर ते ग्राहकांच्या फायद्याचंच आहे. वाळू गटापासून डेपोपर्यंत वाळू आणण्यावर महसूल विभागाला लक्ष केंद्रित करावं लागेल.  तर, वाळू गटापासून वाळू डेपो जवळच असणार आहेत. तो फार काही अंतरावर नसेल. यामुळे वाळू गटापासून वाळू डेपोपर्यंत होणारी वाहतूक आणि तेवढ्या मार्गावर लक्ष ठेवणंही सोपं होणार आहे.

वाळू वाहतुकीचे नियम

नवीन वाळू धोरणानुसार, वाळू वाहतुकीसाठी पुढील नियम सांगितले आहेत.

 वाळूगटातून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक ट्रॅक्टर किंवा 6 टायरच्या टिप्पर या वाहनांनी करणे बंधनकारक राहिल.

 वाळूगटापासून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि टिप्पर या वाहनांची संख्या आणि त्यांचे क्रमांक याची नोंदणी करावी. या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांनी वाळू वाहतूक केल्याचे आढळल्यास निविदाधारकावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

 वाळूगटातून वाळू डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणं बंधनकारक राहिल.

 सदर वाहनानं वाळू डेपो वगळता इतरत्र वाळूची वाहतूक केल्यास ते वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल.

वाळू पुरवठ्यासाठी सध्या तरी तालुक्याच्या ठिकाणी डेपो तयार करण्यात येत आहेत. त्या त्या भागातील वाळूची मागणी लक्षात घेऊन डेपोंची निर्मिती केली जाऊ शकते, असाही अंदाज काही अधिकारी बांधत आहेत.

सध्या राज्य सरकार 1 वर्ष प्रायोगिक तत्वावर हे धोरण अवलंबणार आहे. अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच त्यातल्या त्रुटी लक्षात येतील आणि मग त्यात सुधारणा केल्या जातील.

रणजितसिंह राजपूत,

जिल्हा माहिती अधिकारीनंदुरबार

पुण्यात रात्रीच्या जबरी चोऱ्या ..बाईकवरून आले अन एकट्या दुकट्याला लुटून गेले..

पुणे- देशात बेरोजगारी,महागाई ने थैमान घातल्यावर आता गुन्हेगारी वाढू लागली आहे,रात्री बेरात्री एकट्या दुकट्याला गाठून लुटण्याचे प्रकार सुरु झाल्याच्या घटना कानावर येऊ लागल्या आहेत पुणे पोलिसांनी याबाबत शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याचे अधिकृत वृत्त असून या दोन घटनात सुमारे अडीच लाखाची लुट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

शिवाजी नगर येथील घटना पहाटे ३ वाजता कृष्णा प्रेसिडेन्सी ,बांबू हाउस या हॉटेल च्या जवळपास घडली , येथे मोटारसायकल वरून आलेल्या चौघांनी एका ३५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी ,गळ्यातील सोन्याची चेन असा १ लाख ३५ हजाराचा ऐवज लुटून नेला . तर दुसर्या घटनेत देवानंद गालफाडे नावाचे मुंबईतील ३८ वर्षीय गृहस्थ कार ने कात्रज घाटाजवळील भिलारेवाडी येथून रात्री पावणेदोन च्या सुमारास जात असताना मोटार सायकल वरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पेंडल असा एक लाखाचा ऐवज शास्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करून पळवून नेला .

शिवाजीनगरच्या जबरी चोरी प्रकरणी चोरट्यांचा शोध फौजदार अर्जुन नाईकवाडे 8180881993 तर कात्रज येथील जबरी चोरीच्या प्रकरणी चोरट्यांचा शोध फौजदार धीरज गुप्ता 9850820307 हे घेत आहेत .

“शतजन्म शोधिताना” या सांगीतिक कार्यक्रमातून उलगडले इतिहासातील सुवर्ण पान 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : शत जन्म शोधितांना, शत आर्ति व्यर्थ झाल्या… ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला… हे हिंदुशक्ति संभूत दीप्तीतम तेजा…  अशा धगधगत्या क्रांती गीतांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या स्वरमयी आविष्काराची अनुभूती पुणेकरांनी घेतली. यावेळी शतपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शौर्य गाथा कुंचल्यातून साकार करीत भारताच्या इतिहासातील सुवर्ण पान उलगडले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात शत जन्म शोधिताना या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी पंचरत्नेश्वर मंडळाचे चेतन चव्हाण, संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, पश्चिम प्रांत महामंत्री केशव कुलकर्णी, पुणे महानगर-सचिव धनश्री देवी, संघटन प्रमुख नितीन क्षीरसागर, सह सचिव योगेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गायक राजेश दातार, मीनल पोंक्षे, केतकी देशपांडे, देविका देशपांडे, श्रुती वैद्य, ईरा देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, अभिजीत नांदगावकर, योगेश बडे यांनी गीतांचे सादरीकरण केले. प्रांजली देशपांडे यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना संस्कार भारती संगीत विधा संयोजक प्रांजली देशपांडे यांची होती. यावेळी डॉ. नरेंद्र चिपळूणकर (संवादिनी), तुषार दीक्षित (कीबोर्ड),, अमित कुंटे (तबला), विनोद सोनवणे (ऑक्टोपॅड व तालवाद्य) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाची सुरूवात “हे सदया गणया तार” … या गीताने झाली. त्यानंतर सावरकरांनी रचलेल्या शत जन्म शोधितांना, शत आर्ति व्यर्थ झाल्या…  परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला…या गीतांतून त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले. जय देव, जय देव जय जय शिवराया… सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेल्या या स्फूर्ती गीताने सभागृहात चैतन्य निर्माण झाले. छंद नसे चांगला… सावरकरांनी रचलेल्या या लावणीतून आजही ते समाजाला प्रबोधित करतात.  अनादी मी अनंत मी, अवध्य मी मला…जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे…  या अशा स्फूर्तीदायी गीतांमधून सावरकरांचा जीवन प्रवास उलगडला.

यावेळी चित्रकार कुडलय्या हिरेमठ व अमीत ढोणे यांनी सावरकरांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणाऱ्या चित्राने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तर कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांवर भरतनाट्यम नृत्य सादर करीत नृत्यांगना कल्याणी साळेकर, साक्षी जोशी व ईशा वेलणकर यांनी रसिकांची वाहवा मिळविली.

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी- मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 29: आरे स्टॉलसमोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात  कुर्ला (पश्च‍िम)  एल वॉर्ड  येथे आज ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 130 तक्रारींचे तत्काळ निराकरण  करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे  स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम  31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 वाजता सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येणार आहे.

०००००

आंबेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसे

मंचर : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसे पाटील व उपाध्यक्षपदी नीलेश काण्णव यांची बिनविरोध निवड झाली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. २८) आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी सल्लागार विलास शेटे व कुमार होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणू डी. के. वळसे पाटील यांनी काम पाहिले. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य अशोक वळसे पाटील, अशोक शेंगाळे, सुनील तोत्रे, संदीप गावडे, विठ्ठल तांबडे उपस्थित होते. नवनिर्वाचित पदार्थांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते पप्पू थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
संतोष वळसे पाटील म्हणाले, ‘‘पुढील काळात अनेक सामाजिक कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येतील. आंबेगाव तालुका मराठी पत्रकार सोशल मीडिया संघाची स्थापना करण्यात येणार आहे.’’
अन्य निवड झालेले पदाधिकारी : सचिव- चंद्रकांत घोडेकर, सहसचिव- विवेक शिंदे, खजिनदार अरुण सरोदे, सहखजिनदार- प्रताप हिंगे, पत्रकार परिषद प्रमुख (मंचर) जयेश शहा, पत्रकार परिषद प्रमुख (घोडेगाव)- विकास गाडे, पत्रकार संघ निरीक्षक- सुदाम बिडकर, हिशोब तपासनीस- भरत चिखले, कार्यकारणी सदस्य- अरुण गोरडे, विशाल करंडे, लक्ष्मण ढोबळे, रवींद्र वाळके.

 शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल

तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था शासन करणार आहे. ‘व्याज कसे द्यायचे’ या चिंतेतून तुमची मुक्ती होऊ शकते. त्यासाठी आपण इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो. या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यावा.

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी  बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लक्ष रूपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा वितरीत केली जाते. त्यासोबतच राज्यांतर्गत व देशांतर्गत अभासक्रमांसाठी महत्तम 10 लक्ष रुपयांपर्यंत रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत करण्यात येतो. यामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होवून  त्यांचे करीअर घडविण्यास लाभप्रद ठरते.

योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती

अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रूपयांपर्यंत असावी.अर्जदार हा इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे-

अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.  तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड ,ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबधित पत्र. शिष्यवृत्ती (Scholarship) , शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.  आधार संलग्न बँक खाते पुरावा.  तसेच इतर आवश्यक कागदपत्रे व पुरावे.

शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम

राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान – MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी – B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम – केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

परदेशी अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी

शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

कार्यपद्धती –सदर योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.

अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय टी आय समोर, राहाटे कॉलोनी, नागपूर -440022  या जिल्हा कार्यालयाच्या पत्यावर अथवा महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला किंवा  ई मेल – dmobcamaravati@gmail.com  वर भेट द्यावी. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक – 0712-2956086 असा आहे.

सुनीलदत्त जांभूळे

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

पुण्यासह पिंपरी चिंचवडला काही ठिकाणी २ तासांपर्यंत भारनियमन

पुणे, दि. २९ मे २०२३: विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी लोणीकंद उपकेंद्र अतिभारित होण्याचा व संपूर्ण उपकेंद्र बंद पडण्याचा धोका टाळण्यासाठी महापारेषणच्या काही १३२ व २२० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील नगररोड, खराडी, लोहगाव, वडगाव शेरी, येरवडा आदींसह चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, दिघी, लोणीकंद, थेऊर, उरळीकांचन आणि चाकणमधील काही भागात सोमवारी (दि. २९) दुपारी एक ते दोन तासांसाठी नाईलाजास्तवर विजेचे भारनियमन करावे लागले.

याबाबत माहिती अशी, की विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महापारेषण कंपनीचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच या अतिरिक्त भारामुळे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआयएल) ते लोणीकंद या अतिउच्चदाब ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड झाला. लोणीकंद उपकेंद्रामधील विजेच्या अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नसल्याने तसेच संपूर्ण लोणीकंद उपकेंद्र ओव्हरलोडींगमुळे बंद पडू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून स्वयंचलित यंत्रणेद्वारे महापारेषणच्या खराडी, थेऊर, यवत, चिंचवड, चाकण या अतिउच्चदाब उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे या सर्वच अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वीजवाहिन्यांवर नाईलाजाने आज दुपारी एक ते दोन तासांसाठी विजेचे भारनियमन करावे लागले.

यामध्ये पुणे शहरात प्रामुख्याने नगररोड विभाग अंतर्गत खराडी, नगररोड, चंदननगर, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, लोहगावचा काही भागामध्ये दुपारी २.२५ ते ३.२७ पर्यंत विजेचे भारनियमन करावे लागले. भोसरी विभाग अंतर्गत भोसरी एमआयडीसी, भोसरी गावठाण, दिघी या परिसरात दुपारी ३.०५ ते सायंकाळी ५.०५ पर्यंत तसेच पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागात दुपारी ३.०५ ते ४.४३ पर्यंत आणि मुळशी विभाग अंतर्गत पेरणे, उरळीकांचन, कोरेगाव मूळ, लोणीकंद, थेऊर या गावांमध्ये दुपारी २.२४ ते ३.५० वाजेपर्यंत भारनियमन करावे लागले. तसेच राजगुरुरनगर विभाग अंतर्गत चाकणमधील औद्योगिक पट्टा असलेल्या कुऱ्हळी, नाणेकरवाडी, चिंबळी, निघोजे, खालुंब्रे, आळंदी फाटा या परिसरात दुपारी ३.३३ ते ४.१६ वाजेपर्यंत विजेचे भारनियमन करावे लागले.

सोनू सूद बिहारमध्ये वंचित मुलांसाठी ” सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल ” ची करणार स्थापना !

अभिनेता सोनू सूद नुकताच कटिहार अभियंता ला भेटला  ज्याने आपली नोकरी सोडली आणि आता अनाथ मुलांसाठी शाळा सुरू करतोय  आणि त्याचे नाव”  सोनू सूद ” ठेवले आहे. अभिनेता सोनू सूद या नवीन इमारतीचा उपयोग आणि वंचित मुलांना उच्च शिक्षण  देण्यासाठी करणार आहे. फेब्रुवारीमध्ये सोनू सूदने 27 वर्षीय बिहार अभियंता बिरेंद्र कुमार महातो हा तरुण अनाथ मुलांसाठी शाळा उघडण्यासाठी आपली पूर्णवेळ नोकरी सोडतो हे वाचून तो आश्चर्यचकित झाला आणि या तरुणाने या शाळेचं नाव सोनू सूद ठेवलं ! 110 मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांना जेवण देण्याचा या महत्त्वपूर्ण कामाने सोनू प्रेरित झाला आणि सोनू ने महतो आणि शाळेतील मुलांची भेट घेतली. 
शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी या अभिनेत्याने महतोसोबत खास  वेळ घालवला. रेशनपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजात  जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी सोनू प्रयत्न करणार आहे. सोनू सूदने या शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरू केले असून जेणेकरून अनेक वंचित मुलांना येथे राहता येईल आणि शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल याची खात्री घेतली जाणार आहे. 
” मुलांना शिकवून गरिबीचा सामना करणं हा एक उत्तम मार्ग आहे. समाजातील उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून त्यांना नोकरीच्या अधिक चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही काम करत आहोत. त्यांच संगोपन उत्तम रित्या व्हावं आणि त्यांचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. ही शाळा देखील वंचित मुला साठी एक रात्र निवारा आहे ” अस सोनू सांगतो.  सध्या सूद देशभरात सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत आणि हे नक्कीच उल्लेखनीय आहे.

पुण्यात लोकसभेसाठी कॉंग्रेसचीच ताकद जास्त ..अजित पवारांचे मेरीट नुसार जागांची मागणी योग्यच -नाना पटोले

मुंबई- पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर आज येथे कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले राज्यभरात मेरीट नुसार जागा वाटप व्हावे अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे ,अजित पवार आमच्या भूमिकेशी सहमत आहेत यामुळे मी त्यांचे स्वागतच करेल .पुण्याच्या बाबत बोलायचे झाले तर पुण्यात कॉंग्रेसचीच ताकद जास्त आहे . मेरीटनुसार पुणे लोकसभा आम्हीच लढवू आणि जिंकू देखील. निवडणुका माझ्याच अध्यक्षतेखाली होतील असेही ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, मी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला आहे. या सर्व गोष्टींना काँग्रेस पक्षात स्थान नाही. आम्ही सर्वजण सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कशा जिंकता येतील याच्या योजनांवर काम करत आहोत. तसेच मी प्रसारमाध्यमांचे आभार मानेन, कारण गेल्या काही दिवसात या चर्चांमुळे तुम्ही माझ्या नावाला खूप प्रसिद्धी दिली आहे. परंतु या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या सगळ्या बातम्या केवळ सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. कुठलाही नेता माध्यमांसमोर काहीही बोललेला नाही.

पीटीई अकॅडेमिक कॅनडामध्ये स्टुडन्ट डायरेक्ट स्ट्रीम व्हिसासाठी स्वीकारले जाणार

नवी दिल्ली – शिक्षण क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी पीयर्सनला इमिग्रेशन, रेफ्यूजीज अँड सिटिझनशिप कॅनडाकडून (आयआरसीसी) पीटीई अकॅडेमिकसाठी मंजुरी मिळाली असून, त्यामुळे आता पीटीई अकॅडेमिक सर्व स्टुडन्ट डायरेक्ट स्ट्रीम अर्जांसाठी स्वीकारले जाणार आहे.

१० ऑगस्ट २०२३ पासून आयआरसीसी सर्व एसडीएस अर्जांसाठी पीटीई अकॅडेमिक स्वीकारले जाणार आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला कॅनेडियन कायमस्वरूपी निवासी किंवा नागरिकत्वासाठी इंग्रजी भाषा नैपुण्याचा पुरावा म्हणून पीटीई कोरला आयआरसीसीने मंजुरी दिली होती.

अँटिगा व बार्बुडा, ब्राझील, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, भारत, मोरक्को, पाकिस्तान, पेरू, फिलिपिन्स, सेनेगल, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो व व्हिएतनाम येथून कॅनडामध्ये शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसडीएस ही जलद स्टडी परमिट प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

२०२२ च्या आयआरसीसीच्या आकडेवारीवरून दिसून येते की, या काळात कॅनडामध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या आजवरची सर्वात जास्त होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत आयआरसीसीने २०२२ कॅलेंडर वर्षात ७,५०,३०० पेक्षा जास्त स्टडी परमिट अर्जांवर कार्यवाही केली होती.

युके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सरकारांनी सर्व व्हिसा अर्जांसाठी पीटीई अकॅडेमिक याआधीच स्वीकारले आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आयर्लंड, युके आणि यूएसएमधील हजारो विद्यापीठांमध्ये देखील पीटीई अकॅडेमिक स्वीकारले जाते. ११८ देशांमधील ४०० पेक्षा जास्त पीटीई सेंटर्समध्ये पीटीई उपलब्ध आहे.

पीयर्सनचे सीईओ अँडी बर्ड म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी कॅनडा खूप चांगला आहे, उत्तम महाविद्यालये, सुंदर निसर्ग, रोचक संस्कृती आणि नाईटलाईफ या सर्वच गोष्टी याठिकाणी खूप चांगल्या आहेत. एसडीएससाठी आता पीटीई अकॅडेमिकला मंजुरी मिळालेली असल्याने मला खूप आनंद होत आहे की, पीयर्सन आता अजून अनेक विद्यार्थ्यांचे कॅनडामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकेल.

या वर्षीच्या सुरुवातीला कॅनेडियन इकॉनॉमिक मायग्रेशनसाठी पीटीई कोरला मंजुरी दिली गेल्यानंतर आता ही अजून एक मंजुरी मिळाली आहे. परदेशात राहू, काम करू आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी पीटीई ही पसंतीची टेस्ट बनावी हा आमचा निश्चय यामधून दर्शवला जात आहे.”

निष्पक्ष आणि अतिशय अचूक इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्यासाठी पीटीईने मानवी नैपुण्ये आणि आधुनिक एआय तंत्रज्ञान यांचा मिलाप घडवून आणला आहे. स्कोअरिंगसाठी एआय तंत्रज्ञान वापरले जाते आणि बायोमेट्रिक डेटा कलेक्शनमध्ये प्रगत सुरक्षा पुरवली जाते. पीयर्सनचा संगणक-आधारित टेस्टिंग व्यवसाय पीयर्सन व्हीयुईमार्फत पीटीई उपलब्ध करवून दिली जाते.

टेस्ट देऊ इच्छिणारे विद्यार्थी २४ तास आधीपर्यंतचे ऍडव्हान्स बुकिंग ऑनलाईन करू शकतात, संपूर्ण वर्षभर उपलब्ध असलेल्या जगभरातील टेस्ट सेंटर स्लॉट्सचा फायदा त्यांना मिळू शकतो आणि सरासरी १.३ दिवसांमध्ये त्यांना त्यांचे रिझल्ट मिळू शकतात.

१० ऑगस्टच्या आधी देण्यात आलेल्या पीटीई अकॅडेमिक टेस्ट्स जर या तारखेच्या नंतर प्रस्तुत केल्या जात असतील आणि आयआरसीसीने आखून दिलेल्या एक्स्पायरी कालावधीच्या आत असतील तर त्या स्वीकारल्या जातील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआरसीसीच्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यांचे पालन करावे.

पीयर्सन

पीयर्सनमध्ये आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: आयुष्यभर शिक्षण घेणे संभव बनवणे. आम्ही मानतो की, शिक्षणाची प्रत्येक संधी ही वैयक्तिक यश मिळवण्याची संधी असते. म्हणूनच आमचे २०००० पीयर्सन कर्मचारी प्रत्यक्ष जीवनावर प्रभाव निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले समृद्ध शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही जगातील एक आघाडीची शिक्षण कंपनी आहोत, जवळपास २०० देशांमध्ये डिजिटल कन्टेन्ट, आकलन, पात्रता आणि डेटा या सेवा ग्राहकांना प्रदान करत आहोत. आमच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त आमचे काम नाही तर शिक्षण म्हणजे ते सर्व जे आम्ही आहोत. अधिक माहितीसाठी – www.pearsonplc.com

एनडीए येथे बाजीराव पेशवेंचा पुतळा उभारण्यासाठी ३० लाखाचा निधी

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानला धनादेश सुपूर्द
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यातर्फे तीस लाख रुपये निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी हा धनादेश स्वीकारला.
एनडीए येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. अजिंक्ययोद्धा बाजीराव पेशवे यांच्या  पुतळा उभारणीसाठी पुण्यातून तसेच भारतातून निधी उभारण्यात आला आहे. 
कुंदनकुमार साठे म्हणाले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा पुण्यातील एनडीए येथे उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे अनावरण ऑगस्ट २०२३ मध्ये होणार आहे. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे लवकरच नाशिक मधील डुबेरे आणि औरंगाबाद येथील पालखेडमध्ये सुद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्यात येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले. 

टोळक्याची दहशत मोडण्यासाठी पोलीस गस्त वाढविणार

आमदार शिरोळे यांच्याकडून
हुतात्मा ओंबळे मैदानाची पाहणी

पुणे – गोखले नगरमधील हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदान, वीर बाजीप्रभू चौकात चाललेला मद्यपींचा गोंधळ आणि दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस गस्त वाढविली जाणार आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

मागील तीन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार गोखलेनगरमध्ये हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदानावर तसेच वीर बाजीप्रभू शाळा या रस्त्यावर मद्यपी गोंधळ घालतात व दहशत पसरविण्याचे काम करतात असे निदर्शनास येताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) मैदान व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या समवेत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर रवी खंदारे होते.

यावेळी या मैदानावर बेकायदेशीर प्रकार मध्यरात्रीपर्यंत चालू असतात, यामुळे या परिसरातील महिला व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम काही टोळक्यांकडून केले जात असल्याच्या तक्रारी आल्या. याकरिता टोळक्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय पाहणीदरम्यान करण्यात आला. तसेच या मैदानावरील खोलीमध्ये आरोग्य विभागाची कोठी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आमचे सरकार हे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहे. याठिकाणी सर्वसामान्य जनतेवरील व महिलांवरील होत असलेले अत्याचार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं या परिसरात दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जन्माची अद्दल घडविण्यात येईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, आदित्य माळवे, सतीश बहिरट, राम म्हेत्रे, अपर्णाताई कुऱ्हाडे, विनोद धोत्रे, प्रशांत लाटे, ख़ुशीताई लाटे, सुजित गोटेकर, केतन जोशी, रमेश भंडारी, राजेश धोत्रे आदि उपस्थित होते.

विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

पुणे, दि. २९ :- समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारींचे निवारण करुन त्यांना न्याय मिळावा यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जून महिन्याचा महिला लोकशाही दिन १२ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे महिला व बाल विकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी कळविले आहे.

विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे तक्रार अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, पोलीस आयुक्तालय शेजारी, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ या पत्त्यावर स्विकारले जाणार आहेत. तक्रार अर्ज स्विकारल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभाग प्रमुखाकडे अर्ज पाठविण्यात येतील. संबंधित विभागप्रमुख हे तक्रारीवर केलेल्या अहवालासह लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. अर्जदारास महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत अंतिम उत्तरे दिली जाणार आहेत.

महिला लोकशाही दिनात अर्ज करण्यासाठी तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे, तक्रार अर्ज दोन प्रतीत तसेच विहित नमुन्यात असावा. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले,सेवा व आस्थापनाविषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही उप आयुक्त संजय माने यांनी कळविले आहे.

वेल्हे महसूल प्रशासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे ३० मे रोजी आयोजन

पुणे, दि. २९: वेल्हे महसूल प्रशासनाच्यावतीने वेल्हे, अंबवणे व विंझर मंडळातील गावांसाठी लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय, कोंढावळे खु येथे ३० मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

तहसिल कार्यालयाअंतर्गत शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, सर्व प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र देणे, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी मंजूर पत्र वाटप व नवीन अर्ज स्वीकारणे, सलोखा योजना, लक्ष्मी मुक्ती योजना आदी सेवेचा लाभ देण्यात येणार आहे.

नागरिकांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभ वाटप, कुटुंब कल्याण योजना प्रमाणपत्र वितरण, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ता फेरफार व आकारणी पत्रक, जन्म मृत्यू प्रमाणत्र, रमाई घरकुल योजनांचे पत्र वितरण, बचत गट कर्ज प्रकरण मंजुरीपत्र वाटप, रक्त चाचणी, डोळ्याची चाचणी, आभा कार्ड आदी सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

कृषि विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषि औजारे, बियाणे, औषधे, माती परीक्षण पत्र वाटप, रानमोडी झुडूप निर्मूलन अभियान, महाडीबीटी पोटर्लवर नोंदणी आदी योजना व सेवांचा लाभ देण्यात येईल. पाटबंधारे विभागाअंतर्गत पाणी मागणी अर्ज स्वीकरणे, पंप, मोटर परवाने मंजूर करणे, एकात्मिक बाल विकास विभागांर्गत भाग्यश्री योजना, पुरक पोषण आहार वाटप, कुपोषित बालकांची तपासणी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाअंतर्गत बस पास, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सेवेचा लाभ देण्यात येणार येणार आहे.

उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनीची मोजणी, अ-शेतजमीन, ब-नगर भुमापन, ऑनलाईन प्रापर्टी कार्ड, ऑनलाईन फेरफार आदी सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक वनीकरण, पशुवैद्यकीय विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था, महावितरण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आदी विभागातील योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.
0000