अखिल मंडई मंडळ : महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७६ वर्षे पूर्ण
पुणे : टाळ-मृदुंगाच्या साथीने केलेले भजन, सुवासिक मोगºयांच्या फुलांची आकर्षक आरास अशा प्रसन्न वातावरणात शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपन करण्यात आले. फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि ६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरण्यात आली.
यावेळी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरात पुण्यनगरीच्या वासंतिक उटी भजनाची सांगता झाली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, भारतीय वारकरी मंडळाचे वारकरी तसेच मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या या महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, पुण्यनगरीत सुरु होणाºया वासंतिक उटी भजनाची सांगता ६८ दिवसांनी महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरात होते. अतिशय संस्मरणीय असा हा सोहळा असतो. यानिमित्त मंदिरात मोगरा महोत्सव केला जातो. यंदा मोगरा, जुई,गुलाब आदी फुलांची आरास करण्यात आली होती.
ते पुढे म्हणाले, सुमारे ८० वर्षांपूर्वी, पुण्यातील लिंबराज महाराज मठ येथे सुरु झालेला हा उटी भजनाचा सोहळा आजवर अखंडितपणे सुरु आहे. भजनासाठी वारकरी सांप्रदायिक चाली व पारंपरिक सांगितीक चाली वापरतात. भगवान विष्णूंचे आवडते वाद्य पखावज, तबला व संवादिनी यांची साथ भजनाला असते. सध्या तरुणवर्गाचा सहभाग यामध्ये वाढताना दिसत आहे. या उटी भजनासाठी शहरासोबतच पाषाण, कर्वेनगर, कोथरुड, एरंडवणा, घोरपडी, संगमवाडी, कात्रज, येरवडा आदी भागातून भजनकरी सहभागी होतात.