Home Blog Page 1521

सावित्रिमाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवून सावरकर जयंती: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागावी -नाना पटोले

मुंबई- दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक असून,पुतळे हटवल्याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केली .

ते म्महणाले,’महाराष्ट्र सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.भारतीय जनता पक्ष महिलांचा सन्मान करत नाही त्यांच्या महिला विरोधी मानसिकतेतूनच असे प्रकार घडत असतात. सत्तेच्या बळावर भाजपा काहीही करु शकते, तेच महाराष्ट्र सदनातही झाले. सत्तेच्या बळावर नवा इतिहास निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात सदनात झालेला प्रकार चिड आणणार असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. जगाच्या पाठीवर महात्मा गांधी, बुद्धाची आठवण येते आणि देशात येताच भाजपाला या महापुरुषांचा विसर पडतो. असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

पुणे, दि. २९ : जून २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ आणि ६ जून रोजी खेड, १२ आणि १३ जून रोजी मंचर, १९ आणि २० जून रोजी जुन्नर, २६ आणि २७ जून रोजी वडगाव मावळ आणि २८ जून रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
०००

पुण्यात १४ दिवस जमावबंदी ३७ (१)(३) आदेश लागू :पुणे पोलीस सजग

पुणे- येथील विशेष शाखेचे उपायुक्त आर राजा यांनी १४ दिवसांसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)अन्वये पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३० मी पासून १२ जून अखेरीस पर्यंत लागू केले आहेत .यानुसार ५ पेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास बंदी असेल आणि अर्वाच्य घोषणा , वाद्य्ये वाजविणे ,प्रक्षोभक विधाने असलेली भाषणे करणे तसेच विनापरवानगी सभा आंदोलने करणे यास बंदी घालण्यात आली आहे. काठ्या, दगड अथवा कसल्याही प्रकारची शस्त्रे,दाहक ,ज्वलनशील पदार्थ नेण्यास ,बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.कोणत्याही इसमाचे, चित्राचे , प्रतीकात्मक प्रतिमेचे प्रदर्शन दहन करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील असे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी म्हटले आहे.

रूफटॉप सोलरमुळे गृहनिर्माण संस्थांच्या वीजबिलात मोठी कपात;संस्थांचा वाढता प्रतिसाद

            मुंबई,दि. २९ मे २०२३: राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

            श्री.सिंघल म्हणाले की, रूफ टॉप सोलरमुळे सोसायटीच्या छतावर निर्माण झालेली वीज सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचे पंप तसेच इमारतीतील जिने व पार्किंग येथील सार्वजनिक दिवे इत्यादी कामांसाठी वापरली जाते. सोसायटीच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंगद्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते. महावितरणला सोसायटीकडून मिळणाऱ्या विजेच्या बदल्यात सोसायटीच्या वीजबिलात कपात होते.

            ते म्हणाले की, ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेने ९० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे दीड लाखाचे वीजबिल ७१ हजारांवर आले. ठाण्यातीलच आणखी एका हाऊसिंग सोसायटीने ८० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे विजेचे बिल १ लाख ४८ हजारांवरून ६६ हजारांवर आले. भांडूपच्या एका गृहनिर्माण संस्थेने ४० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे १ लाख २० हजार रुपयांचे वीजबिल ३८ हजारांवर आले.

            हाऊसिंग सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart  या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. गृहनिर्माण संस्थांना ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी २० टक्के अनुदान मिळते. सौर ऊर्जानिर्मितीसाठी वापरलेले पॅनेल्स, वायर्सची गरज, पॅनेल्स बसविण्याच्या स्थानाची स्थिती इत्यादीनुसार खर्चात फरक पडतो. नोंदणी असलेल्या एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, अशी माहिती त्यांनी दिली.

क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवून सावरकर जयंती कार्यक्रम घेणे दुःखद-छगन भुजबळ म्हणाले …हिंमत होती कशी …

महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी तातडीने दिले स्पष्टीकरण .वाचा काय म्हटलेय त्यांनी …

नाशिक-महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे. ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहेत. त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे, या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

दरम्यान दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात आयोजित विविध शासकीय कार्यक्रम, समारंभावेळी आवश्यकतेनुसार सदनातील पुतळ्यांची जागा त्या समारंभाच्या वेळेपुरती बदलण्यात येते. अशी जागा बदलताना सर्व महनीय व्यक्तींचा सन्मान ठेवला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यानुसार या महनीय व्यक्तींचा योग्य तो सन्मान राखूनच रविवारी आयोजित कार्यक्रमावेळी सदर पुतळ्यांची तात्पुरती रचना केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात महनीय व्यक्तींचा अनादर केला, असे वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही.

नाशिक येथील कार्यालयात भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असताना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई करावी. पुतळे हटविण्याचे काम का केले, जाणीवपूर्वक हे केले का हे शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसे होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांडामध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. असा सोहळा राम मंदिर, शिव मंदिरात ठीक होता, पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या निवडीबद्दल ते म्हणाले की, काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. एकीकडे पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना बाजूला केले का ? असा सवाल करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील निवडणूक घेण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही निवडणुकीला तयार आहोत. कुठलाही राजकीय पक्ष कायम तयार असतोच. कर्नाटक मध्ये जे पानीपत झाले ते पाहता ते एकत्रित निवडणुकांचे पाऊल उचलतील असे वाटत नाही.छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकची बँक सर्वात मोठी होती तर देशातील दुसऱ्या नंबरची बँक होती. दिवसाढवळ्या बँक काही लोकांनी लुटली. या बँकेवर प्रशासक येण्यासाठी मी प्रयत्न केला. बँक पूर्व पदावर यायला आणखी वेळ लागेल. आज शेतकऱ्यांना खासगी बँकांकडे जावे लागते आहे. स्वाहाकारी नेत्यांनी बँकेची वाट लावली. याबाबत जनतेने आवाज उठविला पाहिजे. बँक पूर्वीसारखी होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली, दि. 29: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये महनीय व्यक्तींचे पुतळे दिसत नसल्याने, ‘महनीय व्यक्तींचा अनादर’ अशा मथळ्याखाली काही प्रसारमाध्यमांद्वारे वृत्त प्रसारित केले जात आहे.

याबाबत महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी वस्तुस्थिती नमूद केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात आयोजित विविध शासकीय कार्यक्रम, समारंभावेळी आवश्यकतेनुसार सदनातील पुतळ्यांची जागा त्या समारंभाच्या वेळेपुरती बदलण्यात येते. अशी जागा बदलताना सर्व महनीय व्यक्तींचा सन्मान ठेवला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यानुसार या महनीय व्यक्तींचा योग्य तो सन्मान राखूनच रविवारी आयोजित कार्यक्रमावेळी सदर पुतळ्यांची तात्पुरती रचना केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात महनीय व्यक्तींचा अनादर केला, असे वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही.

पुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा खून, भाजी चिरण्याच्या चाकूने वार

पुणे- शहरामध्ये शिक्षणासाठी आलेली एक तरुणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेली होती. मात्र, सदर ठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन दोघात झटपट झाली. यावेळी तरुणीने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर वार करत त्याचा निर्घृण खून केला. तर या घटनेत प्रेयेसीलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आकांक्षा पन्हाळे (वय -21 ,राहणार-, अहमदनगर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे तर यशवंत मुंडे( वय- 22 ,राहणार- लातूर )असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,यशवंत मुंडे आणि आकांक्षा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये डाटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या महाविद्यालयाची परीक्षा असल्याने ते दोघे एकत्रित अभ्यास करत होते. रविवारी रात्री आकांक्षा पन्हाळे ही तरुणी यशवंत मुंडे याच्या रायसोनी कॉलेजजवळ येईल खोलीवर अभ्यास करण्यासाठी आलेली होती. दरम्यान, सोमवारी पहाटे सदर दोघात वादविवाद झाल्यानंतर यशवंत मुंडे यानी तरुणी सोबत भांडण केली.

यावेळी आकांक्षा हीने स्वयंपाक घरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू हातात घेत यशवंत याच्यावर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या यशवंत मुंडे याचा मृत्यू झाला आहे. तर या भांडनाचा झटापटीत आकांक्षा ही सुद्धा जखमी झाली असून तिला उपचार करीता वाघोली परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती मिळताच, लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मयत यशवंत मुंडे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवला तर, आकांशा हीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतचा पुढील तपास लोणीकंद पोलिस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली आहे.

दिल्लीत अल्पवयीन मुलीची भररस्त्यात हत्या,बॉयफ्रेंडने चाकूने 20 हून अधिक वार केले, 6 वेळा दगड डोक्यात घातला

नवी दिल्ली-दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी साहिलने साक्षीला वाटेत अडवून चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात 6 वेळा दगड घातला.पोलिसांनी आरोपी साहिलच्या बुलंदशहर येथून मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांचे मते, आरोपी व मृत मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. पण शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. साहिलने साक्षीवर किती वेळा वार केले हे शवविच्छेदनानंतर कळेल.पोलिसांनी सांगितले- एका व्यक्तीने मुलीच्या हत्येची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाला साक्षीचा मृतदेह रस्त्यात पडलेला आढळला. ती जेजे कॉलनी भागातील रहिवासी होती. रविवारी संध्याकाळी ती बर्थडे पार्टीला जात असताना अचानक साहिलने तिला अडवून तिच्यावर हल्ला केला. चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात 6 वेळा दगडही घातला. तो तिला सतत लाथा मारत होता.

हत्येनंतर साहिल फरार झाला. घटनेवेळी काही लोकांनी साहिलला रोखण्याचा प्रयत्न केला. साक्षी आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना ही घटना घडली. पोलिस साहिलचा शोध घेत आहेत.

दिल्लीचे उप पोलिस आयुक्त सुमन नलवा यांच्या माहितीनुसार, मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. आरोपी साहिलच्या शोधासाठी 6 टीम तयार करण्यात आल्या होत्या.

सीएम अरविंद केजरीवाल या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत म्हणाले – दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे. गुन्हेगार निडर झालेत. त्यांना पोलिसांचा धाक उरला नाही. एलजी साहेब, कायदा आणि सुव्यवस्था तुमची जबाबदारी आहे, काहीतरी करा. दिल्लीतील लोकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे.

अभिनेता दिग्दर्शक आर माधवन ने आयफा 2023 मध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला !  

अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि दिग्दर्शनाची पारख आर माधवनने IIFA 2023 मध्ये रॉकेट्रीसह त्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ चा पुरस्कार पटकावला. उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधवनने आता दिग्दर्शनात देखील आपली कमाल दाखवली आहे आणि हा खास पुरस्कार प्राप्त केला.

रॉकेट्री हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मधील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित बायपोकि असून माधवन ने यात उत्तम अभिनय केला आहे. त्यांनी केवळ चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही तर नारायणन यांची प्रमुख भूमिकाही साकारली आणि कलाकार म्हणून त्याने अभिनायची जादू यातून दाखवली आहे.

IIFA 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळण हे आर हे माधवन साठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

या चित्रपटाचं कौतुक देखील झालं आणि प्रेक्षकांच्या सोबतीने समीक्षकांनी या चित्रपटांची तारीफ केली.

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्यरोहिणी महोत्सवाचे आयोजन

पुणे-

भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात उभारणार असून, त्यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. तसेच सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्य रोहिणी महोत्सव हा कार्यक्रम नृत्यकलाकारांसाठी स्वतंत्र कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नृत्य गुरु मनिषा साठे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मनेषा नृत्यालय कार्यक्रम तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते. यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, नृत्य गुरु शमा भाटे, सुचेता चापेकर, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सह कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह शास्त्रीय नृत्यप्रेमी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक सुप्रसिद्ध कलाकार या शहरात वास्तव्यास आहेत. नृत्य क्षेत्रातील अनेक दिग्गज देखील आपल्या कलेची जोपासना करतात. त्यामुळे नृत्यकला संवर्धनासाठी पुण्यात समर्पित व्यासपीठ असावे; अशी मागणी होत होती. त्याला अनुसरूनच पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, “या नृत्य संकुलासाठी पुणे विद्यापीठाने पाच एकर जागा प्रस्तावित केली आहे. तसेच यासाठी २२५ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर उर्वरित २०० कोटी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे संकुल साकार झाल्यानंतर, देश-विदेशातील शास्त्रीय नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.”

नामदार पाटील पुढे म्हणाले की, “पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचे एक वेगळेच महत्त्व आहे. देश विदेशातील अनेक शास्त्रीय गायक इथे आपली कला सादर करण्यासाठी आतूर असतात. त्याचप्रमाणे नृत्य कलाकारांना ही आपली कला सादर करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, नृत्य रोहिणी महोत्सव यंदा डिसेंबर २०२३ पासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यालाही नृत्यप्रेमींकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशस मधील सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

मॉरिशस, दि. २८ मे –

“स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे”, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वा. सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. मॉरिशसचे माननीय राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

“मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध हिंदी महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपली आहे. या देशात मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इथल्या सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर मोदीजींनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरीशसचे भावबंध अजून घट्ट झाल्याचं जाणवलं.” असेही यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

“महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच वीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही आज भेट दिला आहे. वीर सावरकरांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसच्या समस्त हिंदू आणि मराठी बांधवांना मिळत राहील.” असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

“अटल बिहारी वाजपेयी आणि मोरेश्वर यांचेही एक अतूट नाते होते. डिजिटल क्रांती झाली त्या डिजिटल क्रांतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान होते. सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकर यांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.” असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

“भारत आणि मॉरिशस राष्ट्र या दोन्ही देशांचे संबंध अतिशय वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक रित्या पुढे जात आहेत मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे” असेही गौरवोद्गार मंत्री चव्हाण यांनी यावेळी काढले.

या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितिन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अ‍ॅश्ले इट्टू, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि.28 उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.

दिनांक 31 मे, 1961 रोजी न्या. रमेश धानुका यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी संपादन केली. 1985 मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या तिसऱ्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि द्वितीय क्रमांक मिळविला. ते गेल्या अनेक वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ वकील पॅनेलवर होते. न्या. धानुका दिनांक 23 जानेवारी 2012 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले.

नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

राजधानी नवी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज पार पडले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रखर देशाभिमानी असलेल्या प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे. त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अशा वास्तूचे आज लोकार्पण झाले असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल असा विश्वास आहे. आजचा दिवस हा १४० कोटी जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. प्रधानमंत्री श्री.मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केल्याचे सांगत त्यांनी प्रधानमंत्री श्री. मोदींचे आभार मानले.

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्वधर्म प्रार्थना सभा झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी लोकशाही मंदिराचे वातावरण अतिशय भक्तीमय झाले झाल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केला.

दरम्यान, नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती महाराष्ट्र सदनात साजरी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यासह खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित उपस्थित होते.

आयुर्वेद ‘सोरायसिस’सारख्या गंभीर आजारावर प्रभावी-केरळचे वैद्य गोपाकुमार

पुणे : “सोरायसिस आजार गंभीर असला, तरी आयुर्वेदात त्यावर अनेक उपचार आहेत. आयुर्वेद शास्त्रातील पंचकर्म, अग्निकर्म, शुद्धीकरण अशा विविध थेरपीने सोरायसिसला समूळ नष्ट करता येते. सोरायसिस यांसारख्या त्वचारोगावर आयुर्वेदशास्त्र प्रभावीपणे ठरत आहे,” असे प्रतिपादन केरळ येथील वैद्य गोपाकुमार यांनी केले.
वैद्य हरिश पाटणकर यांच्या कायायुर्वेदतर्फे आयोजित ‘कायाकेशकल्पना’ या विषयावरील ज्ञानसत्रात गोपाकुमार बोलत होते. ‘आयुर्वेद व त्वचाविकार’ यावर वैद्य गोपाकुमार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य (बोर्ड ऑफ आयुर्वेद) डॉ. अतुल वारस्ने होते. प्रसंगी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरचे प्राध्यापक डॉ. पवनकुमार गोदतवार, वैद्य हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते.   ‘एनआयए’ येथील द्रव्यगुण व सौंदर्य विभागाच्या प्रमुख डॉ. मिता कोटेचा यांच्या पुढाकाराने, तसेच रोगनिदान विकृती विभाग आणि राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानचे संचालक डॉ. संजीव शर्मा यांच्या सहकार्याने कायायुर्वेद व केशायुर्वेद यांच्यासोबत जयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराचे डॉ. गोदतवार व डॉ. स्नेहल पाटणकर यांनी हस्तांतरण केले. या करारामार्फत देशभरातील त्वचा रुग्णांसाठी कायायुर्वेद येथे संशोधन व निदान पद्धती विकसित होणार आहे.

डॉ. अतुल वारस्ने यांनी अध्यक्षीय भाषणात कायायुर्वेद संकल्पना व वैद्य पाटणकर यांचे विशेष कौतुक केले. आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विशेष बदल घडविणे गरजेचे असून, यामध्ये वैद्यांचे कार्य महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. गोदतवार यांनी आयुर्वेदामध्ये संशोधनाचे महत्व अधोरेखित करताना कायायुर्वेद ही संस्था त्वचाविकार क्षेत्रात नवीन क्रांती आणू शकते, असे सांगितले.  
वैद्य हरिश पाटणकर यांनी केशायुर्वेद व कायायुर्वेद संशोधन संस्थांतून होत असलेल्या नव्या संशोधनाची माहिती दिली. देशभरातून विविध वैद्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत-प्रास्ताविक डॉ. स्नेहल पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. यी मेन्द्र व डॉ. आंचल यांनी केले. आभार डॉ. विवेक आंबरे यांनी मानले.

पीएमपीएमएल ची पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस

 पर्यटन बससेवा क्र. ७ चा दि. २८ मे २०२३ रोजी निगडी भक्ती शक्ती स्थानक येथून शुभारंभ
पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून रविवार दि. २८ मे
२०२३ रोजी पर्यटन बससेवा क्र. ७ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ मेकॅनिकल इंजिनिअर रमेश चव्हाण व
चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) श्री. सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्र. कामगार व जनता संपर्क
अधिकारी तथा कोथरूड डेपो मॅनेजर अल्ताफ सय्यद, भोसरी डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे, पिंपरी डेपो मॅनजेर
भास्कर दहातोंडे, न.ता.वाडी डेपो मॅनेजर संतोष किरवे, निगडी डेपो समन्वयक लक्ष्मण कावली, उमाजी
शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. निगडी भक्ती शक्ती स्थानक येथे वातानुकूलित बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन
बससेवा क्र. ७ चा शुभारंभ करण्यात आला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया,
सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या संकल्पनेतून पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी
चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत बसेसव्दारे
विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. ०१/०५/२०२३
पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात
येतो.
पर्यटन बससेवा क्र. ७ द्वारे हौशी पर्यटकांना अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड),
प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी इ. धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देता येते. पीएमपीएमएल ने सुरू
केलेल्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६)
भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता येईल.
तरी पीएमपीएमएल च्या किफायतशीर दरात असणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी
घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.

महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात येत आहे. शासनातर्फे नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिना’च्या औचित्याने आज ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान व त्याग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक तसेच समाजसुधारक होते. त्यांचे तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट व वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, कपिल पाटील यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित, माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रारंभी महाराष्ट्र सदनच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.