Home Blog Page 1522

स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.

महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात येत आहे. शासनातर्फे नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिना’च्या औचित्याने आज ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान व त्याग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक तसेच समाजसुधारक होते. त्यांचे तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट व वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, कपिल पाटील यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित, माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रारंभी महाराष्ट्र सदनच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणीशी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. पंतप्रधान म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.”  “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. पंतप्रधान म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन  यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले.

“भारत हा फक्त लोकशाहीवादी देश नाही तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक लोकशाहीसाठी राष्ट्र हा मूलभूत पाया आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात लोकशाही ही फक्त एक व्यवस्था, प्रणाली म्हणून रूजलेली नाही तर ती संस्कृती, विचारप्रक्रिया आणि परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले. वेद आपल्याला लोकशाही सभा आणि समित्यांची तत्वांची शिकवण देतात  असे त्यांनी वेदांचा संदर्भ देत सांगितले.  महाभारतात प्रजासत्ताकाचे वर्णन सापडते आणि वैशालीत भारत लोकशाही जगला आणि तिथे भारताने लोकशाही अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. “भगवान बसवेश्‍वरांचे अनुभव मंटप्पा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे”, असे मोदी पुढे म्हणाले.इ.स. 900 मधील तामिळनाडूमध्ये सापडलेल्या शिलालेखांविषयी पंतप्रधान बोलले. आजच्या काळात आणि युगातही हे शिलालेख सर्वांना आश्चर्यचकित करतात असे मोदी म्हणाले.आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हाच आपला संकल्प  आहे.ही प्रेरणा, या संकल्पाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आपली  संसद आहे”, असे मोदी यांनी नमूद केले. जे पुढे जाणे थांबवतात त्यांना दैवही साथ देत नाही, परंतु जे पुढे जात राहतात त्यांचा भाग्योदय होतो  असे एका श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले.

कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, कितीतरी गमावल्यानंतर भारताने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि तो अमृतकालापर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. “अमृतकाल  म्हणजे आपला वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठण्यासाठीचा काळ आहे. या काळात देशाला नवी दिशा देण्याचा हा अमृत काळ आहे. असंख्य आशाआकांक्षाची पूर्तता करण्याचा हा अमृत काल आहे.” असे त्यांनी सांगितले.लोकशाहीसाठी नवसंजीवनीची गरज असल्याचे त्यांनी  एका श्लोकाद्वारे सांगितले. लोकशाहीचे कार्यस्थळ म्हणजेच संसद ही नवीन आणि आधुनिक असायला हवी यावर पंतप्रधानांनी भर दिला.

भारतातील समृद्धी आणि वास्तुकलेच्या सुवर्णकाळाचे स्मरण त्यांनी केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आपले हे वैभव हिरावून घेतले, असे ते म्हणाले. 21व्या शतकातील भारताकडे मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.“आजच्या भारताने गुलामगिरीची मानसिकता सोडून कलेच्या  त्या  प्राचीन वैभवाकडे पुन्हा वळला आहे.  नवीन संसद भवन हे या प्रयत्नाचे मूर्तिमंत  उदाहरण आहे. या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला तसेच कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत.,” असे पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल कमळावर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी केल्याची माहिती पंतप्रधानांनी केली. “या वास्तूच्या प्रत्येक कणात एक भारत श्रेष्ठ भारताचा भाव आहे”, असे ते म्हणाले.

संसदेच्या जुन्या इमारतीत काम करताना येत असलेल्या  अडचणी पंतप्रधानांनी लक्षात आणून दिल्या. तांत्रिक सुविधांचा अभाव आणि सभागृहात बसण्याच्या जागांची कमतरता यासारखी उदाहरणे त्यांनी दिली. संसदेच्या गरजांवर अनेक दशकांपासून चर्चा झाली असून नवीन संसद भवनाचा  विकास होणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नवीन संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि सभागृहांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

कोणताही तज्ञ गेल्या 9 वर्षांना पुनर्रचना आणि गरीब कल्याण वर्ष मानेल. नवीन इमारतीविषयी अभिमान वाटत असतानाच गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली याचेही समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे 11 कोटी शौचालये, गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 50 हजारांहून अधिक अमृत सरोवरे आणि 30 हजारांहून अधिक नवीन पंचायत भवन यासारख्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. “देश आणि देशांच्या नागरिकांचा विकास ही एकच प्रेरणा पंचायत भवनापासून ते संसदेपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करते, “, असे ते पुढे म्हणाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते जेव्हा त्या देशात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.  भारतात अशी वेळ स्वातंत्र्याच्या 25 वर्षांपूर्वी गांधीजींच्या असहकार चळवळीच्या कालखंडात आली होती आणि या चैतन्यामुळे  संपूर्ण देश  विश्वासाच्या वातावरणाने भारला  होता, असे त्यांनी अधोरेखित केले.‌ “गांधीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वराज्याच्या संकल्पाशी सांधले होते.  प्रत्येक भारतीय, स्वातंत्र्यासाठी लढतोय, असा तो काळ होता ”, असे पंतप्रधानांनी सांगितले. याचा परिणाम म्हणूनच 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, असेही पंतप्रधान म्हणाले. याच ऐतिहासिक कालावधीची तुलना, आजच्या  स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या अमृतकाळ या टप्प्याशी करता येईल.   भारत येत्या 25 वर्षात आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, ही 25 वर्षे  म्हणजेच अमृत काळ होय, असे त्यांनी नमूद केले. या 25 वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.  “ भारतीयांची आपल्या ध्येयाप्रति असलेली निष्ठा ही केवळ एका राष्ट्रापुरती मर्यादित नाही, याला इतिहास साक्षीदार आहे  ”,  असे सांगत पंतप्रधानांनी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने त्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली होती, याकडे लक्ष वेधले. “विविधतेने नटलेला, प्रचंड लोकसंख्येचा भारतासारखा देश जेव्हा विविध आव्हानांना तोंड देत, त्यावर मात करत, विश्वासाने पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो जगातील अनेक देशांना प्रेरणा देतो.  भारताचे प्रत्येक यश येत्या काळात जगातील विविध भागांतील विविध देशांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.   भारताचा विकासाचा  दृढनिश्चय इतर अनेक देशांसाठी पाठबळ ठरणार असल्याने, भारताची जबाबदारी आणखी वाढते, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

यशस्वी होण्यासाठी देशामध्ये निर्माण झालेला विश्वास, संसद भवनाची ही नवी वास्तू अधिक दृढ करेल आणि विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले. “राष्ट्र प्रथम या भावनेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करायची आहे. कर्तव्याचा मार्ग अनुसरायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे. स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा घडवत आपल्या चांगल्या वर्तणुकीचा आदर्श निर्माण करायचा आहे. आपल्याला आपला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा आहे आणि स्वबळावर वाटचाल करायची आहे ,” असेही ते म्हणाले.

संसद भवनाची नवी वास्तू जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला एक नवी ऊर्जा आणि एक नवे बळ मिळवून देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच,  आता समर्पित वृत्तीने  काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  संसदेचे महत्त्व पटवून देताना पंतप्रधानांनी सांगितले की 140 कोटी भारतीयांचा दृढ निश्चय, संकल्प,  संसदेला  पावित्र्य प्रदान करतात.

संसदेत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे येणारी अनेक शतके भारताची शोभा, आदर वाढवतील आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सशक्त सक्षम बनवतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग आणि समाजातील प्रत्येक वंचित कुटुंब यांच्यासह वंचितांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग संसदेमधून जातो, असे त्यांनी अधोरेखित केले. “संसद भवनाच्या या नव्या वास्तूची प्रत्येक वीट न वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कण न कण गरिबांच्या कल्याणासाठी वाहिलेला आहे,” असे मोदी यांनी सांगितले. संसद भवनाच्या या नव्या वास्तूत, येत्या 25 वर्षात निर्माण होणारे नवीन कायदे, भारताला विकसित राष्ट्र बनवतील, भारतातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी मदत करतील आणि या देशाचा युवावर्ग तसेच महिलांसाठी नव्या संधी निर्माण करतील असेही पंतप्रधानांनी ठासून सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की संसद भवनाची ही नवी वास्तू, नव्या संपन्न, मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीचा पाया ठरेल. धोरण, न्याय, सत्य, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचा मार्ग अनुसरुन सामर्थ्यशाली बनणारा  असा हा भारत देश आहे असे म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यासह इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

नवीन संसद भवनात सेंगोल (राजदंड) ची स्थापना करण्याआधी पंतप्रधानांनी घेतला अधिनमचा आशीर्वाद


नवीन संसद भवनात सेंगोल (राजदंड)ची स्थापना करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिनमकडून (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) आशीर्वाद घेतले.

अधिनमच्या उपस्थितीने आपल्या निवासस्थानाची शोभा वाढली असून ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान शिवाच्या आशीर्वादानेच त्याच्या सर्व भक्तांशी एकाच वेळी संवाद साधता आला, असे पंतप्रधानांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी अधिनम उद्या उपस्थित राहतील आणि आशीर्वाद देतील याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

तामिळनाडूच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे, असे ते म्हणाले. तामिळ लोकांमध्ये नेहमीच माँ भारतीची सेवा आणि कल्याणाची भावना होती मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांत तामिळ योगदानाला योग्य ती मान्यता दिली गेली नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आता या मुद्द्याला योग्य तो न्याय दिला जात आहे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या वेळी सत्ता हस्तांतराच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यासंदर्भात वेगवेगळ्या परंपरा होत्या, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “त्या वेळी अधिनम आणि राजा जी यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक पवित्र मार्ग सापडला – सेंगोलच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा मार्ग”, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्या व्यक्तींकडे सेंगोल होता त्यांच्याकडे देशाच्या कल्याणाची जबाबदारी आहे आणि त्यांनी कर्तव्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये याची जाणीव सेंगोलने करून दिली. त्यावेळी 1947 मध्ये थिरुवदुथुराई अधिनम यांनी खास सेंगोल तयार केला, असे त्यांनी पुढे नमूद केले. “आज त्या काळातील चित्रे तामिळ संस्कृती आणि आधुनिक लोकशाही म्हणून भारताची नियती यांच्यातील खोल भावनिक बंधनाची आठवण करून देत आहेत. ही गाथा इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा जिवंत झाली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. यावरून त्या काळातील घडामोडींना योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी मिळते. या पवित्र प्रतीकालाही कशी वागणूक दिली गेली हे देखील आपल्याला कळले आहे, असेही ते म्हणाले.

राजाजी आणि इतर विविध अधिनमांच्या दूरदृष्टीला पंतप्रधानांनी वंदन केले आणि शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रत्येक प्रतीकातून मुक्त करून देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात करणाऱ्या सेंगोलचे महत्त्व विषद केले. सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले आणि देश स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये सत्तेचे हस्तांतरण सूचित केले. भारताची भूतकाळातील गौरवशाली वर्षे आणि परंपरा याला सेंगोलने स्वतंत्र भारताच्या भविष्याशी जोडले आहे, हे सेंगोलचे आणखी एक महत्त्व आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

सेंगोलला जो सन्मान मिळायला हवा होता, तो दिला गेला नाही, त्याला प्रयागराजच्या आनंद भवन इथे ठेवण्यात आलं, आणि त्याचं प्रदर्शन “चालण्याची काठी’ असं केलं गेलं, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी व्यक्त केली. मात्र आमच्या सरकारला हे सेंगोल आनंद भवनात आणण्याची संधी मिळाली. यानिमित्त, आपल्याला ह्या सेंगोलची संसदेत स्थापना करतांना, भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास नव्याने पुनरुज्जीवित करण्याची संधी मिळते आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “आता सेंगोलला त्याच्या हक्काची जागा, म्हणजे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत स्थान मिळत आहे” असे मोदी म्हणाले. भारताच्या एका महान परंपरेचे प्रतीक असलेल्या या सेंगोलची स्थापना नव्या संसद भवनात केली जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे सेंगोल आपल्याला सातत्याने याचे स्मरण करून देईल की आपल्याला कर्तव्यपथावर चालायचे आहे आणि कायम जनतेला उत्तरदायी राहायचे आहे.

अधिनामांची अत्यंत महान आणि प्रेरणादायी परंपरा म्हणजे जिवंत पवित्र ऊर्जेचे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शैव परंपरेचा उल्लेख करत हे अधिनाम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या तत्वज्ञानाचे आचरण करत असल्याचे, पंतप्रधान म्हणाले. अनेक अधिनामांची नावे, हीच भावना व्यक्त करणारी आहेत की ही नावे, आपल्या पवित्र कैलास पर्वताशी संबंधित आहेत, जो खरे तर दूर हिमालयात आहे, मात्र तरीही, त्यांच्या हृदयात त्याला स्थान मिळाले आहे. महान शैव संत, तिरूमुलार कैलास पर्वतावरुनच, त्यांच्या शिवभक्तीचा संदेश द्यायला आले होते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी अनेक महान तामिळ संतांचा उल्लेख केला, ज्यांचा अलीकडेही उज्जैन, केदारनाथ आणि गौरीकुंड मध्ये उल्लेख केला जातो.

वाराणसीचे खासदार या नात्याने, पंतप्रधानांनी, धर्मपुरम अधिनामचे स्वामी कुमारगुरुपारा यांच्याविषयी माहिती देतांना सांगितले की ते तामिळनाडू इथून काशीला गेले होते, आणि बनारसच्या केदार घाटावर त्यांनी, केदारेश्वर मंदिराची स्थापना केली. तामिळनाडूतील थिरुप्पनंदल येथील काशी मठाचे नावही काशीच्या नावावर आहे. या मठासंबंधीच्या एका मनोरंजक गोष्टीवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी सांगितले की थिरुप्पनंदलचा काशी मठ यात्रेकरूंना बँकिंग सेवा प्रदान करत असे. कोणीही जाऊन  तामिळनाडूच्या काशी मठात पैसे जमा करू शकत असे आणि काशीमध्ये प्रमाणपत्र दाखवून पैसे काढू शकतो. “या प्रकारे, शैव सिद्धांताच्या अनुयायांनी, शिवाप्रती आपल्या भक्तीचा प्रसार तर केलाच, त्याच सोबत, एकमेकांना जवळ आणण्याचे कामही केले.” असे पंतप्रधान म्हणाले.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर देखील, अनेक वर्षांच्या तामिळ संस्कृती जिवंत ठेवण्यात अधिनाम सारख्या महान परंपरांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याचे श्रेय त्यांनी शोषित आणि वंचित घटकांना देखील दिले, ज्यांनी या संस्कृतीची जोपासना केली. “देशाला योगदान देण्यात आपल्या सर्व संस्थांचा गौरवास्पद इतिहास आहे. आता ही परंपरा पुढे नेण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांना यातून प्रेरणा देण्याची वेळ आली आहे,” पंतप्रधान म्हणाले.

पुढच्या 25 वर्षांची ध्येये अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करत असताना, एक सशक्त, आत्मनिर्भर, सर्वसमावेशक आणि विकसित भारत तयार करण्याचे ध्येय आहे. देश 2047 चे ध्येय ठेवून देश मार्गक्रमण करत असताना अधीनामांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, कोट्यवधी देशवासियांना 1947 मध्ये अधिनामांनी बजावलेल्या भूमिकेचा पुन्हा परिचय झाला आहे. “तुमच्या संस्था कायम सेवेचे प्रतीक राहिल्या आहेत. लोकांना एकमेकांशी जोडण्यात, त्यांच्यात समानतेची भावना निर्माण करण्यात आपल्या संस्था कायमच पुढे राहिल्या आहेत,” पंतप्रधान म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारताची शक्ती, देशाच्या एकतेवर अवलंबून आहे. देशाच्या प्रगतीत जे लोक अडथळे आणतात आणि विविध आव्हाने उभी करतात, त्या लोकांबद्दल पंतप्रधानांनी देशाला सतर्क केले. “जे लोक देशाच्या प्रगतीत अडथळे आणतात, ते आपली एकता तोडण्याचा देखील प्रयत्न करतील. मात्र, मला खात्री आहे की आपल्या संस्थांच्या माध्यमातून देशाला मिळत असलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना करू,” पंतप्रधान म्हणाले.

‘राज्याभिषेक संपला! ‘अहंकारी राजा’कडून जनतेचा आवाज चिरडणे सुरू’; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतर मैदानावर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर कठोर कारवाई केली. पोलिसांनी जंतरमंतरहून नव्या संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. त्यांचे तंबूही काढून टाकले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर तिखट टीका केली आहे. ते म्हणाले – ‘राज्याभिषेक संपला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे!’

प्रियंका गांधींचाही ट्विटद्वारे निशाणा

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले. त्या म्हणाल्या – ‘खेळाडूंच्या छातीवरील पदके आपल्या देशाची शान आहेत. त्या पदकांमुळे खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार एवढा वाढला आहे की, सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज पायदळी तुडवत आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. सरकारचा अहंकार व हा अन्याय उभा देश पाहत आहे.’

गत 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. ते हे बॅरिकेड्स ओलांडून पुढे जात असताना त्यांची दिल्ली पोलिसांशी चकमक झाली. यावेळी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. यावेळी अनेक पैलवान अक्षरशः रस्त्यावर पडले होते.

मल्लिकार्जुन खरगेंचाही कुस्तीपटूंना पाठिंबा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईविरोधात ट्विट केले. ते कुस्तीपटूंना पाठिंबा देत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले –

‘नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून हिसकावून घेतला गेला. महिला खेळाडूंना हुकूमशाहीच्या जोरावर रस्त्यावर मारहाण! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे 3 खोटे दावे आता देशासमोर उघड झाले. 1. लोकशाही, 2. राष्ट्रवाद, 3. बालिका वाचवा….मोदीजी लक्षात ठेवा,’

प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदन उटी व मोगरा उत्सव 

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; भारतीय वारकरी भजनी मंडळाचा भजन-कीर्तन कार्यक्रम
पुणे : मोग-याच्या सुवासिक फुलांसह संत्री, आंबा, मोसंबी, अननस, सफरचंदासारख्या ५ हजार ५५५ फळांचा महानैवेद्य प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दाखविण्यात आला. तब्बल १०० किलो मोग-याच्या सुवासिक फुलांनी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. तर, भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या भजन-कीर्तनाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले. 
निमित्त होते, श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित वासंतिक चंदन उटी व मोगरा उत्सवाचे. यावेळी भारतीय वारकरी भजनी मंडळाचा भजन-कीर्तन कार्यक्रम देखील झाला. 
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे मंदिर गाभा-यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत मोग-याची फुले आणि विविध फळांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित मोगरा महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

टिळकांच्या घरात उमेदवारी तर…हा भ्रमच पराभव तर होणार होताच

लोकसभा पोटनिवडणूक :उमेदवारी देतानाच लागणार ज्या त्या पक्षाची कसोटी...

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली. त्याचा फटका भाजपला बसला.सातत्याने राखला जाणारा मतदारसंघ हातातून निसटला.असा प्रचार हा भ्रमाचा भोपळा आहे.टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर भाजपाला विजय प्राप्त झाला असता हाही भ्रमच आहे,भाजपचा कसब्यात पराभव निश्चित होताच.ज्याला महापालिकेच्या ५ वर्षाची कारकीर्द कारणीभूत होती आणि राज्य आणि केंद्रातील घडामोडी देखील त्यामागे होत्याच.राज्यातल्या नेतृत्वाने बापटांच्या नेतृत्वाला कायम शह देण्याचा प्रयत्न केला.कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा यांना पुणेकरांच्या मागणीवरून पुण्यात आणले नाही तर पुण्यातल्या भाजपच्या बापटांच्या सारख्या प्रस्थ बनत चाललेल्या नेत्यांचे खच्चीकरण हे हि चंद्रकांत दादांना पुण्यात आणण्या मागचे कारण होते. राज्यातल्या नेतृत्वाने मुळात पुण्यातल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांवर दाखविलेला हा अविश्वासच होता.ज्यांच्यावर पुण्याची धुरा सोपविली अशांतील महापालिका पदाधिकारी यांनी बापटांच्या नेतृत्वाला कायम खेचण्याचे प्रयत्न केले त्याचाच परिणाम बापटांना स्वतः महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात घुसून तेथील पाण्याचे प्रेशर तपासण्याचे आंदोलन करावे लागले होते.त्यामुळे कसब्यात पराभव तर होणार होताच ‘देवदूत’ नावाच्या अग्निशामक दलासाठीच्या गाड्यांच्या खरेदीचा भ्रष्टाचार,कात्रज कोंढवा रस्त्याच्या निविदेतील कोट्यावधींची अफरातफर आणि २४ तास पाणी पुरवठा योजनेतील निविदा किती कोट्यवधींची लुट होत्या त्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळोवेळी स्पष्ट करून पुणेकरांच्या समोर मांडण्यात यश मिळविले होते. ५ वर्षात कॉंग्रेसने घरगुती गैस,इंधन दरवाढीवर जेवढी आंदोलने केली जेवढा आवाज उठविला तेवढा कोणीच उठविला नाही.हे जनता जाणून होतीच.कॉंग्रेस,राष्ट्रवादीने मतांची विभागणी होणार नाही यासाठी दक्षता घेतली त्यामुळे कसब्यात तर भाजपचा पराभव निश्चित होताच.

पण जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर विजय झाला असता असा प्रचार केला जातो आहे.आणि त्यापासून भाजपच्या राज्य नेतृत्वाने धडा घेतल्याने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरामध्येच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.बापट यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पाेटनिवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे. कर्नाटक येथील निवडणुकीत वापरलेल्या ४२०० ईव्हीएम मशीन पुण्यात दाखल झाल्या आहेत. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्राची जागानिश्चिती कामे प्रशासनाकडून सुरू आहेत. नियमानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पद रिक्त ठेवता येत नसल्याने पाेटनिवडणूक हाेईल अशी शक्यता वर्तवली आहे.आता खरी कसोटी भाजपची लोकसभेला उमेदवारी देण्यावरच लागणार आहे.त्यात भ्रमाच्या भोपळ्याना स्थान मिळाले तर लोकसभा भाजपच्या हातून जाणार हे निश्चितच आहे.जातीय राजकारणापलीकडे आता पुणे आणि येथील कार्यकर्ते जाऊन पोहचले आहेत. सर्वांना जनहित चांगले समजते आहे.

खासदार होण्यासाठी बॅनर लाऊन आणि जाहिराती करून कोणी खासदार होत नाही पण असे प्रयत्न भाजपमध्ये नऊ-दहा महिने सुरु आहेत.पण यात भाजपला विजयाकडे कोण नेऊ शकेल हाच प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे.बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट,माजी आमदार मेधा कुलकर्णी,माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याचे चित्र रंगविले जात आहे. संपूर्ण शहर,उपनगरे आणि त्याबाहेरही आपले प्राबल्य आणि निवडणुकीचे तंत्र,रणनीती ची ज्यांना चांगली अवगत आहे ते माजी राज्यसभा सदस्य संजय काकडे हे देखील इच्छुक आहेत.एकूणच उमेदवार देतानाच भाजपची कसोटी आणि जय पराजय निश्चित होईल असे चित्र आहे.

कॉंग्रेसमधील गटबाजी कॉंग्रेसचा मुळ शत्रू..

पुणे हा काँग्रेसचा परांपरागत मतदारसंघ आहे.अण्णा जोशी,प्रदीप रावत,आणि गिरीश बापट हे भाजपचे येथे खासदार होतेच पण त्या त्या वेळी कॉंग्रेस विषयी देशपातळीवर असलेली नाराजी त्यांच्या विजयात महत्वाचे कारण होती.आता परिस्थिती उलटी आहे. काँग्रेसमधून माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार माेहन जाेशी,अरविंद शिंदे , राेहित टिळक यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.धंगेकर यांचे नाव विनाकारण यात काही मंडळी चालवीत असल्याचीही चर्चा आहे.पण तरीही कॉंग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लढाई ला उतरणारा उमेदवारच नाही असा सामिक्षकांचा दावा आहे. आणि त्यात आता कॉंग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी सुरु आहे.ज्यामुळे पुण्यातील कॉंग्रेसचे भवितव्य तोंडापर्यंत आलेला घास हिरावून घेतला जाईल कि काय अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी चे माजी उपमहापाैर दीपक मानकर यांच्या नावाकडे मात्र लोकसभेसाठी तगडे उमेदवार म्हणून पाहिले जाते,पण त्यांची धुरा सारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निर्णयावर आहे.शिवाय कॉंग्रेसचा हा मतदार संघ आहे हि त्यांची अडचण आहे. खुद्द कॉंग्रेस मधून कार्यकर्ते त्यांना ‘भाऊ तुम्ही कॉंग्रेसमध्ये येऊन लढा’ असे सांगत आहेत.आणि म्हणूनच त्यांची सर्व मदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चे नेते यांच्या एकत्रित जिंकण्यासाठी येणाऱ्या वैचारिक शक्तीवर अवलंबून आहे. शिवाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापाैर प्रशांत जगताप यांनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कात्रज घाटात एसटी बस पडली बंद, सुप्रिया सुळे यांनी पहा काय केले …

पुणे- कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली.त्यांच्यासोबत त्यांचा मयूर होताच ,जाताना शेवटी म्हणाल्या बारामती मतदार संघात तुमचे स्वागत आहे…

एसटी महामंडळाच्या गाडीला फास्टटॅग नाही म्हणून जवळपास अर्धातास टोलनाक्यावर थांबचिण्यात आल्याची तक्रार प्रवाशांनी केली. तर दुसरीकडे एक तासापासून कात्रज घाटात गाडी खराब झाल्याने आम्ही इथे अडकल्याचे बसमधील महिलास प्रवाशी सांगत होते. यात सुप्रिया सुळे यांनी ज्यांच्याकडे लहान बाळ आहे, त्यांनी माझ्यागाडीत चला असे म्हणत तेथील महिलांना मदत केली आहे. भोरपर्यंत सुप्रिया सुळे यांनी या महिलांना लिफ्ट देत मदत केली आहे. सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले.

पुण्याहून सांगलीकडे निघालेली शिवशाही बस शिंदेवाडीजवळ बंद पडली होती. त्याबस मधील सर्व प्रवाशी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा उन्हाच्या काहिलीने हैराण होत बसजवळ उभे होते. भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याठिकाणी पोहोचला, त्यावेळी रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली आणि स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडल्याने ते सर्वजण थांबल्याचे कळताच सुळे यांनी तातडीने हालचाल करत काही प्रवाशांना स्वतःच्या गाडीत घेतले, काहींना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसवून घेण्याच्या सूचना दिल्या. तर काही जणांना सांगली जिल्ह्यातील पेठ येथे निघालेल्या एसटीचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांच्या बसमध्ये बसवून घेतले. त्यानंतर काही वेळाने बंद पडलेली शिवशाही बस दुरुस्त होऊन पुढे आल्यानंतर तीत बसून सर्व प्रवाशी पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे कामगार विषयक तक्रारींचा ओघ

पुणे: महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला कामगारांचे जिवन असुरक्षित असून घरेलु कामगार, बांधाकाम कामागर, कंत्राटी सफाई महिला कामगार यांना पर्यवेक्षक, मालक , प्रशासकीय यंत्रणेतून छळ, मारहाण, देय वेतन नाकारणे असे अन्याय थांबवावेत अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघ, पिंपरी तर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, महासंघाच्या महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार, अनिता जाधव, बालाजी लोखंडे, उमेश डोर्ले, पांडुरंग शेळवणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिखली येथे फळ विक्री करणाऱ्या मनीषा शेळवणे यांच्यावर महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

चिखलीतील घटनेप्रमाणे विविध ठिकाणी कष्टकरी महिला कामगार काम करत असताना किमान व समान वेतन न देणे, कामगार अपघात प्रसंगी भरपाई न देणे, छेडछाड असे अनेक प्रकार घडत असून कष्टकरी महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. यावर सकारात्मक विचार करू असे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी दिले.

गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.२७: जिल्ह्यातील होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा; त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

कै. बाबुराव सणस मैदानावर तयार करण्यात आलेल्या ४०० मीटर ८ लेन सिंथेटिक ट्रॅकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त राजीव नंदकर, हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, अभय छाजेड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, खेळाडूंनी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत न थांबता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची जिद्द बाळगावी. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना राज्य शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यशस्वी खेळाडूंना शासनसेवेत अधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. खेळाडूंनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. प्रशिक्षकांनी त्यांच्याकडून उत्तम सराव करून घ्यावा. खेळाडूंना सरावासाठी काहीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे यांनी सिंथेटिक ट्रॅकविषयी माहिती दिली. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पाचवा सिंथेटिक ट्रॅक आहे. या ट्रॅकमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील खेळाडूंना सरावाची चांगली सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.खेडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला नागरिक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑईल इंडिया या कंपनीने प्रथमच 6810.40 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला

ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा आर्थिक ताळेबंद जाहीर केला असून त्यात कंपनीचे कार्य सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात प्रथमच सर्वात उच्चांकी असलेला 6810.40 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे दिसते आहे. कंपनीच्या कामकाजातून वाढलेले उत्पन्न आणि तेल तसेच वायू उत्पादनात झालेली वाढ यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या नफ्यामध्ये 75.20% वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या सहा दशकांमध्ये ओआयएलने त्यांच्या परिपक्व आणि गेल्या आर्थिक वर्षात नुकत्याच नव्याने शोधलेल्या तेल क्षेत्रांतून अधिकाधिक तेल तसेच वायू उत्पादन करण्यात सातत्य ठेवले आहे. कंपनीने तेल उत्पादनात 5.5% वाढ नोंदवत 3.18 दशलक्ष टन तेल उत्पादन केले असून वायू उत्पादनात 4.4%ची वाढ नोंदवत 3.18 अब्ज घनमीटर वायूचे उत्पादन केले आहे. कंपनीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात कंपनीने केलेले हे सर्वाधिक वायू उत्पादन असून हाही एक विक्रम कंपनीच्या खाती जमा झाला आहे.

ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीची थोडक्यात माहिती:

ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) ही अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातील संपूर्णपणे एकात्मिक, संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. ओआयएल ही नवरत्न दर्जाची आणि भारत सरकारची मालकी असणारी कंपनी आहे. या कंपनीचे प्रशासकीय नियंत्रण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे असून ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय तेल आणि वायू निर्मिती कंपनी आहे.

***

पोलीसचौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर हवालदाराकडून बलात्कार

पुणे- पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मद्देल हडपसर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वडगाव शेरी भागातील शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तेथे तिची पोलीस हवालदार मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला जाळ्यात ओढले. मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. पोलीस उपनिरीक्षक मुळूक तपास करत आहेत. दरम्यान, मद्देल यानेही महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे.

महिलने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी; तसेच अन्य कारणांसाठी वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितल्यानंतर महिलेने बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले, असे पोलीस हवालदार राहुल मद्देल याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सदस्यांनी ‘एमआयटी’ आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याचे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापतींचे आवाहन

मुंबई : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे या संस्थेतर्फे दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान “राष्ट्रीय विधिमंडळ सदस्य (विधायक) संमेलना”चे (1st NATIONAL LEGISLATORS’ CONFERENCE) – २०२३ आयोजन करण्यात आले असून या उपक्रमामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या अधिकाधिक सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. आज यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आणि उप सभापती मा.डॉ. नीलम गोऱ्हे “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे”चे संस्थापक आणि या उपक्रमाचे आयोजक श्री. राहुल कराड यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे पत्रकार परिषद (ऑनलाईन) आयोजित करण्यात आली. यावेळी दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान या परिषदेत आयोजित करण्यात आलेले विविध विषयांवरील सत्र तसेच उद्घाटन सोहळ्याला लाभणारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती याबाबत राहुल कराड यांनी माहिती दिली.

“जीओ कन्व्हेंशन सेंटर – बीकेसी, मुंबई” येथे ही तीन दिवसीय परिषद “एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे” तर्फे आयोजित करण्यात आली असून देशातील सर्व राज्य विधानमंडळांच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या विधिमंडळाचे कामकाज आणखी प्रभावी होणे, लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न आणखी सुयोग्यरित्या सभागृहात मांडता यावेत यादृष्टीने प्रबोधन, विकासोन्मुख धोरणनिश्चितीमध्ये सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा विकास, यादृष्टीने या परिषदेतील विचारमंथन यापुढील काळात सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या पत्रकार परिषदेत बोलतांना विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती  डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन,  डॉ. मीरा कुमारी, अध्यक्ष  श्री. शिवराज पाटील-चाकुरकर, श्री. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन देखील या तीन दिवसीय परिषदेत लाभणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी-मार्च, २०२३ मध्ये दोन्ही सभागृहात पीठासीन अधिकारी यांनी यासंदर्भातील घोषणादेखील केली आहे. या पत्रकार परिषदेत (ऑनलाईन) विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,  कपिल पाटील, वि.प.स., विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार)  जितेंद्र भोळे, सचिव- २ (कार्यभार) डॉ. विलास आठवले, मा. उप सभापती यांचे खाजगी सचिव  रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक  निलेश मदाने, एमआयटीचे अण्णासाहेब टेकाळे आणि पत्रकार सहभागी झाले. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरात परिषदेतील विविध सत्रांचे विषय आठ दिवस अगोदर सर्वांना उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले.

शुटिंगसाठी निघालेल्या ज्युनिअर आर्टिस्टना लुटले

पुणे-हिंदी चित्रपटामध्ये सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या चार जणांना चित्रीकरणासाठी जाताना अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटल्याचा प्रकार पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर घडला आहे.याबाबत इम्रान खान (वय- 21, रा. सय्यदनगर, महंमदवाडी रस्ता, हडपसर,पुणे) याने याप्रकरणी आरोपी विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार इम्रान खान हिंदी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम करत आहे. खान आणि त्याचे सहकारी हर्ष नाथे, जिशान पटणी चित्रीकरणासाठी मुंबईला जात होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते बी. टी. कवडे रस्त्यावर बसची वाट पाहत रस्त्यावर थांबले होते.

त्यावेळी तेथील एका टपरीवर ते चहा पित उभे होते. त्याचवेळी तिथे एक अनोळखी व्यक्ती आला. त्याच्याबरोबर त्याचे साथीदारही होते.अचानक त्यांनी खान, नाथे, पटणी यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. चोरट्यांनी त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. खान याचे सहकारी नाथे आणि पटणी यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल फोन हिसकावून चोरटे अंधारात पसार झाले आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस सोनवणे करत आहेत.

अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर-प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी

पुणे : “भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेला सक्षम बनविण्याचे व त्यात पारदर्शीपणा आणण्याचे दायित्व सनदी लेखापाल यांच्यावर आहे. त्यामुळे सनदी लेखापाल म्हणून काम करताना सखोल ज्ञान आणि समर्पण भावनेने काम करावे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षांत सोहळ्यात डॉ. उमराणी बोलत होते. खराडी येथील मेफील्ड इस्टेटमध्ये झालेल्या सोहळ्यात आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, उपाध्यक्ष सीए रणजित कुमार अग्रवाल यांच्या ऑनलाईन उपस्थित जवळपास ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
हा दीक्षांत समारंभ पुण्यासह दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, जयपूर, इंदोर, गाजियाबाद, अहमदाबाद, लुधियाना, हैद्राबाद आदी ठिकाणी पार पडला. या प्रसंगी सीए प्रमोद शिंगटे, दीक्षांत समारंभाचे समन्वयक आणि केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समितीचेसदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार ऋषीकेश बडवे आदी उपस्थित होते.
डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, “सनदी लेखापाल (सीए) यासारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि त्याना पाठींबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून, त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात योगदान द्यायचे आहे. मानवी विकास निर्देशांक उंचवण्यासाठी आपण करावे. शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी सनदी लेखापालांनी प्राधान्य द्यावे.”
जागतिक तापमानवाढीसह इतर अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्याचा फटका शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे भवतालच्या बदलांबद्दल सतर्क राहून, त्याला अनुषंगिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. उमराणी यांनी नमूद केले. 
सीए प्रमोद शिंगटे म्हणाले, “आर्थिक क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. ऑडिटसह अन्य गोष्टींसाठी बँका सनदी लेखापालांवर अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण योगदान देण्याची संधी आहे. लोकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आपण करायला हवे.”
सीए चंद्रशेखर चितळे यांनी ‘आयसीएआय’कडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांविषयी सांगितले. तसेच सनदी लेखापालांना शपथ दिली. सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए समीर लड्डा आणि सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री ग.दि.माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ

पुणे, दि.२७: पुणे महानगरपालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, गीतरामायणामुळे समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील. महापालिकेने स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाचे स्मरण होणे आणि पुढील पिढीला यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

सुमित्र माडगूळकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ग.दि.माडगूळकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. गदिमांच्या स्मारकाच्या माध्यमातून मराठी भाषेतील त्यांचे लेखनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन, चित्रपट दालन, साहित्य दालन, डिजिटल दालन, कॅफेटेरिया आदी विविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
0000