पुणे, दि. २९ मे २०२३: विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी लोणीकंद उपकेंद्र अतिभारित होण्याचा व संपूर्ण उपकेंद्र बंद पडण्याचा धोका टाळण्यासाठी महापारेषणच्या काही १३२ व २२० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील नगररोड, खराडी, लोहगाव, वडगाव शेरी, येरवडा आदींसह चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, दिघी, लोणीकंद, थेऊर, उरळीकांचन आणि चाकणमधील काही भागात सोमवारी (दि. २९) दुपारी एक ते दोन तासांसाठी नाईलाजास्तवर विजेचे भारनियमन करावे लागले.
याबाबत माहिती अशी, की विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महापारेषण कंपनीचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच या अतिरिक्त भारामुळे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआयएल) ते लोणीकंद या अतिउच्चदाब ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड झाला. लोणीकंद उपकेंद्रामधील विजेच्या अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नसल्याने तसेच संपूर्ण लोणीकंद उपकेंद्र ओव्हरलोडींगमुळे बंद पडू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून स्वयंचलित यंत्रणेद्वारे महापारेषणच्या खराडी, थेऊर, यवत, चिंचवड, चाकण या अतिउच्चदाब उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे या सर्वच अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वीजवाहिन्यांवर नाईलाजाने आज दुपारी एक ते दोन तासांसाठी विजेचे भारनियमन करावे लागले.
यामध्ये पुणे शहरात प्रामुख्याने नगररोड विभाग अंतर्गत खराडी, नगररोड, चंदननगर, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, लोहगावचा काही भागामध्ये दुपारी २.२५ ते ३.२७ पर्यंत विजेचे भारनियमन करावे लागले. भोसरी विभाग अंतर्गत भोसरी एमआयडीसी, भोसरी गावठाण, दिघी या परिसरात दुपारी ३.०५ ते सायंकाळी ५.०५ पर्यंत तसेच पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागात दुपारी ३.०५ ते ४.४३ पर्यंत आणि मुळशी विभाग अंतर्गत पेरणे, उरळीकांचन, कोरेगाव मूळ, लोणीकंद, थेऊर या गावांमध्ये दुपारी २.२४ ते ३.५० वाजेपर्यंत भारनियमन करावे लागले. तसेच राजगुरुरनगर विभाग अंतर्गत चाकणमधील औद्योगिक पट्टा असलेल्या कुऱ्हळी, नाणेकरवाडी, चिंबळी, निघोजे, खालुंब्रे, आळंदी फाटा या परिसरात दुपारी ३.३३ ते ४.१६ वाजेपर्यंत विजेचे भारनियमन करावे लागले.