Home Blog Page 1462

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

दावोस, १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

खास मुंबईकरांना निमंत्रण देण्यासाठी फिरणार ‘संवाद रथ’

मुंबई-ज्यांनी अनेक दशकांपासून मुंबईत रस्ते बांधून भ्रष्टाचार केला त्यांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून त्यांच्या हस्तेच १९ जानेवारीला मुंबईच्या विकासाची पायाभरणी होणार आहे असे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज केले. मुंबईकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संवाद रथाच्या उद्घाटनप्रसंगी ते वांद्रे येथे बोलत होते.

भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील विविध भागात पसरलेल्या ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह अनेक विकासकामांचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईकराना विकासकामांच्या रुपात अमूल्य अशी भेट देण्यासाठीच ते येत आहेत. मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

या संवाद रथाचे नेतृत्व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा आणि कोषाध्यक्ष किरीट भन्साळी करत आहेत. यावेळी मणि बालन, माजी उपमहापौर अलका केळकर, उत्तराखंड सेल भाजपचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, मनोज सिंग, राकेश सिंग आदी उपस्थित होते.

मनमानी वाढीव शुल्क आकारून शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या शाळांवर कारवाई करा, अन्यथा .. :मनसेचा पुण्यातून शिक्षण उपसंचालकांना इशारा

पुणे- मनमानी वाढीव शुल्क आकारून शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या शाळांवर कारवाई करा, अन्यथा ..असा इशारा पुण्यातील मनविसे ने दिला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे याप्रकरणी दाद मागितली आहे. व अमित राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी शहराध्यक्ष अमोल शिंदे , महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रवी बनसोडे, सारंग सराफ, उपशहर अध्यक्ष परिक्षीत शिरोळे , विभाग अध्यक्ष आशुतोष माने, संतोष वरे , पुणे कार्यकारणी सदस्य प्रवीण कदम, अभिजित येनपुरे विभाग सचिव मयुर शेवाळे , निलेश वेल्हाळ व इतर पदाधिकारी यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे .

विभागीय शुल्क नियंत्रण समिती त्वरित गठीत करा

या संदर्भात मनविसेने असे म्हटले आहे कि,’ महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ नुसार विभागीय उपसंचालकांनी त्यांच्या स्तरावर विभागीय शुल्क नियंत्रण समिती गठीत करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात अशा समितीची नेमणूक गतवर्षी शासनामार्फत केली गेली. मे. हायकोर्ट न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीत गतवर्षी समिती अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने गेल्या साधारण ९-१० महिन्यांपासून विभागीय शुल्क नियंत्रण समिती (DFRC) च अस्तित्वात नाही.सदर समिती च अस्तित्वात नसल्याने शाळा परस्पर करत असलेल्या शुल्कवाढीची तक्रार कोणाकडे करायची? नफेखोर शाळांवर कारवाई कोण करणार ? आकारलेल्या शुल्का बदल्यात शाळा त्याप्रकरच्या सुविधा पुरवित आहे का ? नसल्यास दाद कोणाकडे मागायची ? असे अनेक प्रश्न पालक – विद्यार्थ्यांना पडले आहेत.सदर समिती स्थापनेचा शासन निर्णय देखील जुलै२०२२ ला निघाला आहे परंतु अद्याप सुद्धा त्याची अंमलबजावणी न झाल्याने शाळांनी मनमानी पद्धतीने विद्यार्थी पालकांना लुबाडले आहे आणि उपसंचालक कार्यालय याबाबत कोणतीही कारवाई न करता उलट या शाळांना लूट करण्यास मूकसंमतीच देत आहे .

वास्तविकता जुनी समिती बरखास्त झाल्या झाल्याच त्वरित उपसंचालक यांनी शासनाकडून सदर समिती गठीत करून सर्व शाळांचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच शुल्क निर्धारित करणे आवश्यक होते. परंतु सदर प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही. सरकारी दिरंगाईमुळे व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शाळा चालक मनाला वाटेल तसे शुल्क आकारणी करून शिक्षणाचे बाजारीकरण करत आहेत.ज्या शाळांनी गतवर्षीपेक्षा दुपटीने फी वाढविले आहे आणि ज्या शाळा लाखोंनी शुल्क आकारत आहे अशा शाळांचे आम्ही म न वि से ने सर्वेक्षण करून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात संबंधितांना माहिती दिलेली आहे

तरी अध्यक्षांची नेमणूक करून विभागीय शुल्क नियंत्रण समिती त्वरित पुनर्स्थापित करून सर्व शाळांचे शुल्क समितीमार्फत च ठरविण्यात यावे व त्याचप्रमाणे शुल्काची आकारणी शाळांकडून व्हावी अशी आग्रही मागणी आज १७ जानेवारी रोजी सदर पत्रा अन्वये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण आयुक्त , महाराष्ट्र राज्य व शिक्षण उपसंचालक यांजकडे केली करीत आहे. तसेच प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे आणि शाळांच्या नफेखोरीला देखील वाव मिळाला आहे . सदर समितीची स्थापना न होण्यामागे कुठल्या लॉबी चा हात आहे का ? व त्यातून शैक्षणिक भ्रष्टाचार होत आहे अगर कसे ? याबाबत देखील तपास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली

जावा येझदी मोटरसायकल्स ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त एनसीसी बरोबर भागीदारी करत ‘दांडी से दिल्ली’ मोटरसायकल रॅली

        १३०० किलोमीटरच्या राइडला गुजरातचे अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई मोहनलाल देसाई यांनी दाखवला हिरवा झेंडा

·         रॅलीचा समारोप  २८ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्लीत होईल

पुणे: जावा-येझदी मोटरसायकल्सला ‘दांडी से दिल्ली’ मोटरसायकल रॅली मध्ये  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) बरोबर भागीदारी केल्याचा अभिमान आहे. ही मोटारसायकल रॅली म्हणजे एनसीसी संचालनालय गुजरातने त्यांच्या ‘पचत्तर वर्ष’ (७५ वर्षे) साजरे करण्याच्या सोहळ्याचा एक उपक्रम आहे. १३०० किलोमीटरच्या राइडला गुजरातचे अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई मोहनलाल देसाई यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी 2023 रोजी दांडी येथे हिरवा झेंडा दाखवला.

‘मीठ काढणारे’ ते ‘सॉफ्टवेअर बनवणारे’ असा झालेला भारताचा प्रवास दर्शविण्यासाठी २५ एनसीसी कॅडेट्सची टीम नॅशनल सॉल्ट सत्याग्रह मेमोरियल (NSSM), दांडी येथे बनवलेले मिठाचे भांडे आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स (BISAG) ने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रामची एक सीडी घेऊन जाईल. २८ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली येथे  होणाऱ्या पंतप्रधानांच्या एनसीसी डे रॅलीमध्ये भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे या दोन्ही विशेष गोष्टी सुपूर्द केल्या जातील.

या प्रसंगाच्या स्मरणार्थ जावा-येझदी मोटरसायकल्सने खाकी आणि ग्रे या मर्यादित आवृत्तीतील प्रत्येकी एक मोटारसायकल अशा दोन जावा मोटारसायकली एनसीसी संचालनालयाला सादर केल्या आहेत. सशस्त्र दलातील जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी जावा खाकी सादर करण्यात आली होती. याशिवाय २५ जावा-येझदी मोटारसायकली कॅडेट्स त्यांच्या या प्रवासात चालवतील.

रॅलीमध्ये रायडर्स नवी दिल्लीत राइडचा समारोप करण्यापूर्वी वडोदरा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, अजमेर, जयपूर आणि अलवर यांसारख्या शहरांमधून प्रवास करतील. या शहरांमधील जावा येझदी डीलरशिपमध्ये सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे रायडर्स पिटस्टॉप घेतील आणि या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना नावाजण्यात येईल.

सशस्त्र दलांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी ही भागीदारी जावा येझदी मोटरसायकलच्या #ForeverHeroes उपक्रमांतर्गत आहे. देशाला सुरक्षित, शांत आणि समृद्ध ठेवण्यास मदत करणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच कंपनी मूल्यसंस्कृती विकसित करत आहे. २०१९  मध्ये, कंपनीने सशस्त्र दलातील कर्मचारी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता या उपक्रमाची औपचारिक घोषणा केली. तेव्हापासून कंपनीने कारगिल विजय दिवस, स्वर्णिम विजय वर्ष आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  यांसारख्या ऐतिहासिक आणि विजयी टप्पे दर्शविणाऱ्या राइड्समध्ये योगदान आणि समर्थनाद्वारे आपला पाठिंबा सुरू ठेवला आहे.

आपल्या दैनंदिन कामकाजातही कंपनी आपल्या नेटवर्कद्वारे आणि इतर योग्य प्रसंगी सशस्त्र दल  देशासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल आदर निर्माण करण्यात मदत करण्यासाठी सशस्त्र दलाच्या कर्मचार्‍यांसह आपले कर्मचारी आणि ग्राहकांच्या परस्परसंवादाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत आहे.

G20 सौंदर्यीकरण: दक्षिण पुण्याने काय घोडं मारलंय ?

पुणे- G 20 अंतर्गत ज्या पुण्याच्या भागांत पंचतारांकित हॉटेल्स आहेत त्या भागांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. पण ज्या दक्षिण पुण्याने इतिहासात खडकवासला होण्या पूर्वी पुण्याची तहान भागविली , ज्या दक्षिण पुण्याने निसर्गाची मुबलक संपदा शहराला पुरविली त्या दक्षिण पुण्यात सौंदर्यीकरणकरण्याचे नाव महापालिका प्रशासकांनी का घेतले नाही , काय घोडं मारलंय दक्षिण पुण्याने तुमचे ?असे सवाल या भागातील नागरिकांनी केले असल्याचे आशिष भोसले यांनी कळविले आहे .दक्षिण पुण्यात बेन्लोर महामार्गाला जोडणारे २ बोगदे आहेत , २ ऐतिहासिक असे पेशवेकालीन धरणे आहेत , राजीव गांधी उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे .कात्रज हून शनिवार वाड्यावर नेणारी भुयारी मार्गाने पेशवेकालीन पाणीपुरवठा योजनेचे अवशेष आहेत .असे असताना पुण्याचे दक्षिण द्वार सुशोभित करावे असे प्रशासकांना का वाटले नाही ? असा सवाल आशिष भोसले यानी केला आहे.

आपण उद्याचे वाहन चालक आहात,वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा- सौ. रहीमा मुल्ला


पुणे-रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे व पुणे पोलिस वाहतूक शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना आपण उद्याचे वाहन चालक आहात,वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे प्रतिपादन मोटार वाहन निरीक्षक. सौ.रहीमा मुल्ला यांनी केले.
पुणे शहराची लोकसंख्या पहाता सरासरी प्रती व्यक्ती 1 वाहन आढळून येते ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.वाहनाची वाढ होणे हे वाहतुकीवर ताण येण्याचे मुख्य कारण असल्याचेही सौ. रहीमा मुल्ला म्हणाल्या “आजचे विद्यार्थी उद्याचे वाहन चालक या व्याख्यानावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
या प्रसंगी सेंट हिल्डाज प्रशालेचे प्रमुख आशिष जेम्स,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयंत काटे,व सौ.श्रध्दा कंदापुरे , चंद्रकांत रघतवान पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा पुणे शहर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या विविध शाखांच्या मुख्याध्यापिका सौ.विनिता राठोड,सौ.संगीता कदम,सौ.सुनीता ठोंबरे या प्रसंगी उपस्थित होत्या.
आदर्श वाहन चालक म्हणून संतोष क्षिरसागर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील वंजारे, विशाल शर्मा, महेश शिळीमकर व कृष्णा दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक संजय ढमाले,तर संजय रसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विठ्ठल मेहता यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या उत्पादनात रुची

बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हातकागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.

वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगड मधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.

भारतीय आदिवासी सहकारी विपणन संस्थेच्या दालनामध्ये आदिवासी करागिरांमर्फत निर्मित हिमाचल प्रदेशातील पश्मीना शॉल, याकुल शॉल, आसामचे मुगा सिल्क, लाकूड व नैसर्गिक उत्पादनापासून निर्मित सौंदर्य आभूषणे, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग, टसर रेशीम पासून बनवलेल्या साड्या, वूलन जॅकेट, खादी, लिनेन कुर्ता, धातू वरील नक्षिकाम, ज्युटच्या वस्तू, बांबू उत्पादने तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत युनिव्हर्सल ट्राईब संस्थेने वारली पेंटिंग, वारली कलाकुसर यातून होणारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना भावले.

महिला बचत गटांच्या उत्पादने, हस्त निर्मित साबण, बांबूच्या ज्वेलरी याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी निर्मित खाद्य पदार्थांनी परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पदार्थ आरोग्यास पोषक असल्यामुळे त्यांना जगभरात मागणी वाढत असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

अनुभवले भविष्यातील सुंदर नदीकिनारे
पुणे महानगरपालिकेने मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प, जायका अर्थसहाय्यित प्रकल्पाची व्हर्चुअल रियालिटी हेड सेटच्या माध्यमातून आभासी सादरीकरण केले. हा हेडसेट परिधान करून प्रत्यक्ष भविष्यातील सुशोभित नदीकिनाऱ्यावर संचार करण्याचा अनुभव घेता येत होता. ही माहितीही प्रतिनिधींनी जाणून घेतली.

पुण्यातील गुप्ता टोळीवर मोकाची कारवाई ;मार्केटयार्डात भरदिवसा गोळीबार करत २८ लाखाची लुट करणारी टोळी

पुणे- आंदेकर ;माळवदकर अशा टोळ्यांची नावे ऐकलेल्या पुण्यात आता शर्मा , गुप्ता अशा गुन्हेगारांची नावे ऐकायला येऊ लागली आहेत .मार्केड यार्डात गोळीबार करत २८ लाखाची रोकड नोव्हेंबर महिन्यात लुटून नेणाऱ्या गुप्ता टोळीवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मोकांतर्गत कारवाई केली आहे. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर पदाचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी विरूध्द केलेली ०५ वी मोका ची कारवाई आहे.
मोक्का लावलेल्या या टोळीचा म्होरक्या अवघ्या २० वर्षाचा असून त्याचे नाव अविनाश रामप्रताप गुप्ता असे आहे तो व त्याचे १२ साथीदार यांचेविरूध्द मोका ची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली .

या संदर्भात पोलिसांनी असे म्हटले आहे कि,’आरोपी नामे अविनाश रामप्रताप गुप्ता, वय २० वर्षे, रा. वेदगौरव सोसा. फ्लॅट नं. १३, शिंदे पुल, शिवणे, पुणेयाने आपल्या इतर १२ साथीदारां सोबत संघटित टोळी तयार करुन, दिनांक १२/११/२०२२ रोजी फिर्यादी व त्यांचे भागिदार असे दोघेजण मार्केटयार्ड मधील ऑफिसमध्ये कामकाज करीत असताना, सदरच्या ऑफिसमध्ये
साथीदारांसह येवुन, फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन २८ लाख रुपये व त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावुन घेतला. तसेच काऊंटरवरील मोबाईल घेऊन ते सर्वजण निघुन गेले. त्याबाबत त्यांचेवर मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १७३/२०२२, भादविक ३९५,३९७, १२०(ब) आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५), मपोकाक ३७(१)(३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचेविरूध्द शरिराविरूध्द व मालाविरूध्द गुन्हे दाखल आहेत.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे अविनाश रामप्रताप गुप्ता, वय – २० वर्षे, रा. वेदगौरव सोसा. फ्लॅट
नं. १३, शिंदे पुल, शिवणे, पुणे ( टोळी प्रमुख) २. आदित्य अशोक मारणे, वय – २८ वर्षे, रा. कामगार विकास
सोसायटी,दत्तनगर,वारजे माळवाडी, पुणे, ३. अजय बापु दिवटे, वय २३ वर्षे, रा. रामनगर, वारजे, पुणे निलेश बाळु
गोठे, वय २० वर्षे, रा. मंगळवार पेठ पुणे . विशाल सतिश कसबे, वय २० वर्षे, रा. २३०, मंगळवार पेठ, पुणे, ६.
दिपक ओमप्रकाश शर्मा, वय १९ वर्षे, रा. राहुल नगर, शिवणे, पुणे,. गुरुजन सिंग सेवासिंग विरग, वय २२ वर्षे,
रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे ८. संतोष बाळू पवार, वय २३ वर्षे, रा. पानशेत रोड, खानापूर, हवेली, जि. पुणे ९ )
साई राजेंद्र कुंभार, वय १९ वर्षे, रा. मु. पो. खानापुर, ता. हवेली, जि. पुणे १० एक विधीसंघर्षित बालक व पाहिजे(wanted) इतर
तीन आरोपी यांचेसह अन्य सदस्यांसाठी
अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने धमकी देवुन,धाकदपटशा जुलुम जबरदस्तीने किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा बेकायदेशीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, जाळपोळ, दरोडा करणे या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक करवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिर आर्थिक फायदया करीता प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आल्याने वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीमती. अनघा देशपांडे यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून दाखल असलेल्या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii),३ (२), ३ (४) अंतर्भाव करण्याची अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मायांनी मान्यता दिली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा पोलीस आयुक्तवानवडी विभाग पुणे श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा
देशपांडे,पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्रीमती सविता ढमढेरे, सहा. पोलीस निरीक्षक, रामदास मुंढे, पोलीस उप-निरीक्षक, चेतन भोसले, तसेच सर्व्हेलन्स पथकातील अंमलदार, विरेंद्र ढवाण व अमरनाथ लोणकर यांनी केलीआहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर
हे करीत आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर
बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे
सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर
देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली
मोक्का अंतर्गत केलेली ही ०५ वी कारवाई आहे.

कॉंग्रेस भवनाच्यामागे एकाच्या खुनाचा प्रयत्न ,नाचविले कोयते अन तलवारी;एकाला अटक,तिघे फरार

पुणे -एका १९ वर्षीय तरुणाला कॉंग्रेस भवनाच्या मागच्या परिसरात एका नागरिकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आणि याच ठिकाणी कोयता आणि तलवार नाचवीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे.त्याचे अन्य ३ साथीदार फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दीपक काकाराम शर्मा (रा. मगर पट्टा ,हडपसर ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सतीश काळे (वय ४१ रा. जुना तोफखाना ,शिवाजीनगर) यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.पोलिसांनी सांगितले कि फिर्यादीचे घर कॉंग्रेस भवनाच्या बाजूला असून काल रात्री ते घरासमोर झोपले सतना आज ००.४५ वाजता हा प्रकार घडला .पूर्वीच्या भांडणाचा राग धरून शर्मा आपल्या ३ साथीदारासह तिथे आला आणि फिर्यादी यांच्या डोक्यावर डाव्या हाताच्या दंडावर वार केले .आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.फिर्यादी यांची पत्नी आणि मुलगी पुढे आली तेव्हा त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली .आणि हवेत चौघांनी कोयते ,तलवारी नाचवून आरडाओरडा करत या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला .फौजदार एस.व्ही तरडे (मोबाईल -९५०३५६७३२२ ) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

बोपदेव घाटात रात्री साडेदहा वाजता दोघांना मारहाण करून लुटले

पुणे-काल रात्री पुण्यातील दोघा तरुणांना बोपदेव घाटात तिघांनी मारहाण करून लुटमार केल्याची घटना घडली आहे , चुडामण तालीम येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे . पोलिसनी सांगितले कि, फिर्यादी आणि त्याचा सहकारी असे दोघे मोटारसायकल वरून फिरायला गेले असताना हि घटना घडली .३१ हजार रूपांचा ऐवज तिघांनी जबरदस्तीने मारहाण करून लुटून नेल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात तिघा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.फिर्यादी याच्या कडील मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख तसेच त्याचा मित्र याह्या खान याच्याकडील ६ हजार रुपये रोख आणि मोबाईल ,घड्याळ असा ऐवज तीन चोरट्यांनी लुटून नेला. फौजदार रत्नदीप बिराजदार याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

ससूनमधील रुग्णाच्या नातेवाईक झोपल्या अन चोरट्यांनी सव्वालाखाची पिशवी लांबविली..

पुणे-ससून मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कुरकुंभ येथील एका रुग्णाच्या अटेंडंट म्हणून थांबलेल्या पत्नीचे ती झोपल्यावर सुमारे सव्वा लाखाचे दागिने असलेली पिशवी वाॅर्ड नंबर १२ मधून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे . पोलिसांना मोटारसायकल वरून आलेल्या दोघांविषयी याबाबत संशय आहे .२२ डिसेंबर रात्री ते २३ डिसेंबर सकाळी या दरम्यान हि चोरी झाली अशी माहिती पोलिसांनी दिली .रुग्णाच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली असून ,फिर्यादीच्या वडिलांना ८ डिसेंबर रोजी ससून मध्ये उपचारासाठी अॅड मिट केले आहे. फिर्यादीची आई त्यांच्या समवेत रुग्णालयात राहते , झोपताना तिने आपल्या कानातील झुमके ,फुले, व गळ्यातील गंठन असे सव्वा लाखाचे दागिने पेशंट चे साहित्य ठेवलेल्या बैगमध्ये ठेऊन त्या झोपल्या होत्या .या चोरी प्रकरणी पोलीस नाईक शंकर संपते (मोबाईल -७७१०१२१२१२ ) शोध घेत आहेत.

आपले विकास पॅनल’च्या माध्यमातून पुणे जिल्हामाध्यमिक शिक्षक पेढीवर ७६ वर्षांनी परिवर्तन


७६ वर्षांनी घडले परिवर्तन; १३-० ने मिळवला ऐतिहासिक विजय

पुणे : शहरातील प्रमुख माध्यमिक शाळांची सहकारी पतपेढी असलेल्या पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘आपले विकास पॅनल’ने प्रतिस्पर्धी ‘आपले पॅनल’चा १३-० असे निर्भेळ यश मिळवले. तब्बल ७६ वर्षांनी ऐतिहासिक परिवर्तन घडले आहे. म.ए.सो. च्या भावे हायस्कुलमध्ये मतदान पार पडले. 

माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १९४५ मध्ये स्थापन झालेल्या या पतपेढीचे दर पाच वर्षांनी निवडणूक होते. गेली ७६ वर्षे एकाच विचाराच्या पॅनेलची सत्ता होती. यंदा प्रथमच सत्तापालट होत माजी आमदार मोहन जोशी, शिवाजी खांडेकर, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, नरेंद्र नागपुरे, प्रथमेश आबनावे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपले विकास पॅनल’ने एकतर्फी विजय मिळवला आहे.
सुभाष ताकवले, विठ्ठल भरेकर, विठ्ठल रणसूर, हरिश्चंद्र गायकवाड, अरुण कामठे, शशिकांत शिंदे, सचिन दुर्गाडे, विद्या पवार, संजीव यादव, राजेंद्र गाढवे, बापूसाहेब पवार, सुजित जगताप, प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे यांनी मेहनत घेतली. पॅनेलला मुख्यतः शिक्षक लोकशाही आघाडी, मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटना, कलाशिक्षक संघ, शारीरिक शिक्षण संघासह शहरातील प्रमुख संघटनांनी पाठिंबा दिला होता. दिवंगत डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतींना वंदन म्हणून ‘आपले विकास पॅनल’ या नावाने यंदा पॅनल उतरवण्यात आले.
‘आपले विकास पॅनल’चे विजयी शिलेदारधोंडिबा तरटे, डॉ. कल्याण वाघ, महादेव माने, डॉ. मंगल शिंदे, हर्षा पिसाळ, दत्तात्रय हेगडकर, संदीप घोलप, संजय लोंढे, शिवाजी कामथे, राज मुजावर, पुष्पक कांदळकर, दत्तात्रय नाईक, विजय कचरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवत संचालपदी विराजमान होण्याचा मान मिळवला.

दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

दावोस दि. १६ : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये  सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली.

यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

१.      Greenko energy Projects Pvt.Ltd १२००० कोटींची गुंतवणूक

२.      Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक

३.      ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक

४.      Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक

५.      Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक

२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि.17 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 27 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छुकांनी 20 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून कामगार कबड्डी स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दरवर्षी राज्यभरातून 100 पेक्षा अधिक कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतात. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळवण्यात येतील.

पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु.50 हजार, उपविजेत्या संघांना रु.35 हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी 2 उपांत्य उपविजेत्या संघांना 20 हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील.

मुंबई व ठाणे व्यतिरिक्त बाहेरुन येणाऱ्या सर्व संघांना प्रतिदिन रु.4000/- प्रवास व निवास भत्ता दिला जाणार आहे. मुंबई व ठाण्यातील महिला संघांना प्रति दिन रु.1000/- भत्ता दिला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या महाकल्याण या यू-ट्यूब चॅनलवर तसेच sportvot.com या क्रीडा संकेतस्थळावर केले जाईल. तरी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी https://public.mlwb.in/public या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन श्री. इळवे यांनी केले आहे.

सेक्सटॉर्शनमधील आरोपीस अटक करण्यास सहकारनगर पोलीसांना यश


पुणे – आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याने काही दिवसापूर्वी धनकवडीतील तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.त्या संदर्भात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहकारनगर पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत होते. अखेर त्यांना आरोपीस पकडण्यात यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महिलेचा व्हॉटसअॅप डिपी असलेला मो.क्र मयत मुलासोबत व्हॉटसअॅपवर चॅटिंग व व्हिडीओ कॉलींग करून त्याचा न्युड व्हिडीओ बनवुन तो न्युड व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, मॅसेंजर, ट्विटर, यु ट्युब, फेसबुक टॅग फ्रेंड या सोशल मिडीया साईटवर अपलोड करण्याची धमकी देवुन, मयत इसमाकडुन वेळोवेळी एकुण ४,५००/- रूपये जबरदस्तीने फोन पे वर पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर देखिल वारंवार मयत इसमास त्याचे न्युड व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भिती दाखवुन त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने मै सुसाईड कर रहा हूं” असा मॅसेज केला,तरी सुध्दा त्यास करो मै व्हिडीओ ऑनलाईन करता हूं” असे म्हणुन सतत पैशाची मागणी करुन आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणेस गु. रजि. नं. २१७ / २०२२ भा.दं.वि. कलम ३०६,३८४ व माहिती तत्रंज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी), ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास चालू असताना आरोपीने गुन्हयात वापरलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीचे राहते ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सहकारनगर पोलीस ठाणे कडील तपास टिम स्थापन करून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजीवडे व सागर कुंभार यांना वरिष्ठांचे आदेशाने रायपुर सुकेती ता. सिकरी जि. भरतपुर, राजस्थान येथे पाठवली. व तेथे जावुन संशयीत आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती घेवुन तेथील स्थानिक पोलीसांचे मदतीने सलग ८ दिवस व रात्रीची रेकी करुन अखेर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवर दगड फेक सुद्धा केली पोलिसांनी आरोपीस पकडून त्याला न्यायालयात हजर केले.न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी सुनावली आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह- आयुक्त, संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त, परि-०२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग,श्रीमती सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस ठाणे सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक खोलात तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर,सहकारनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.