मुंबई-ज्यांनी अनेक दशकांपासून मुंबईत रस्ते बांधून भ्रष्टाचार केला त्यांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून त्यांच्या हस्तेच १९ जानेवारीला मुंबईच्या विकासाची पायाभरणी होणार आहे असे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज केले. मुंबईकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संवाद रथाच्या उद्घाटनप्रसंगी ते वांद्रे येथे बोलत होते.
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील विविध भागात पसरलेल्या ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह अनेक विकासकामांचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईकराना विकासकामांच्या रुपात अमूल्य अशी भेट देण्यासाठीच ते येत आहेत. मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारचेही त्यांनी यावेळी आभार मानले.
या संवाद रथाचे नेतृत्व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा आणि कोषाध्यक्ष किरीट भन्साळी करत आहेत. यावेळी मणि बालन, माजी उपमहापौर अलका केळकर, उत्तराखंड सेल भाजपचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, मनोज सिंग, राकेश सिंग आदी उपस्थित होते.