Home Blog Page 1415

उर्मिला निंबाळकरच्या आवाजातील प्रचंड लोकप्रिय ‘पेटलेलं मोरपीस’चा तिसरा सिझन स्टोरीटेलवर प्रदर्शित!

गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते, तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो आणि त्यात गावामध्ये निवडणूका येतात आणि त्याचा सर्वच जण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात अशी आगळी वेगळी ऑडिओ कादंबरी नितीन थोरात लिखित पेटलेलं मोरपीस पाच वर्षांपूर्वी स्टोरीटेलवर सादर झाली होती प्रसिध्द अभिनेत्री आणि सध्याची आघाडीची यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांच्या आवाजात. ही ऑडिओ कादंबरी स्टोरीटेलवर सर्वाधिक गाजली त्यामुळे त्याचा दुसरा सिझनही दोन वर्षापूर्वी रिलीज करण्यात आला आणि या आठवड्यात याच कादंबरीचा तिसरा सिझन प्रकाशित झाला आहे. खूप गाजलेल्या वेब सिरीजचे अनेक सिझन ओटीटी प्लॅटफॅार्मवर येत राहतात पण ऑडिओ बुकचेही असे सिझन त्याच्या लोकप्रियतेमुळे येत आहेत. 

या दोघींची प्रेमकहाणी इतकी उत्कट आहे की आपण त्यात इतके गुंतत जातो आणि विसरून जातो की त्या दोघीही मुली आहेत, त्यांचे संबंध समलैंगिक आहेत. म्हणजे ख-या अर्थाने लिंगभेदाच्याही पुढे जाणारी ही प्रेमकथा आहे जी आपल्याला फक्त माणूस म्हणून विचार करायला भाग पाडते. मी स्वतःला भाग्यवान समजते की इतक्या उत्तम कादंबरीचा आवाज मला होता आला. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली असून माझं नववीपर्यंतच शालेय शिक्षण गावात झालं, त्यामुळे ग्रामीण लहेजा खूप चांगल्या प्रकारे पकडता येतो. या कथेतली दोन मुख्य पात्र सोनी आणि माधी रंगवताना खूपच मजा आली. मला आजही सोशल मिडीयावर अनेक मेसेज येतात की ही कादंबरी आम्ही सलग ऐकली म्हणून आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. वेब सिरीजसारखं बिंज लिसनींग करून लोकं कथा संपवत आहेत त्यावरूनच त्याच्या लिखाणाची ताकद समजून येते. असं उर्मिला निंबाळकर सांगते. 

पेटलेलं मोरपीस या कादंबरीच्या तिनही सिझनचं लिखाण प्रसिध्द लेखक नितीन थोरात यांनी केले आहे. नितीन थोरात यांनी आत्तापर्यंत 17 कादंब-यांचे लिखाण केले असून त्यांची पहिली कादंबरी सूर्याची सावली याला राज्यशासनाचा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर त्यांचीच नुकतीच प्रकाशित झालेली खंडोबा कादंबरीही विशेष गाजली. नितीन थोरात यांनी स्टोरीटेलवर सात ओडीओ कादंब-या आणि अनेक ऑडिओ लघुकथांचे लेखन केले आहे. स्टोरीटेलवरच्या मराठी लेखकांमध्ये सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या टॅाप टेन लेखकांच्या यादीतही ते आहेत. पेटलेलं मोरपीसचा तिसरा सिझनही पहिल्या दोन सिझन सारखा श्रोत्यांच्या पसंतीस पडेल असे नितीन थोरात सांगतो.

पेटलेलं मोरपीस ही प्रचंड लोकप्रिय ऑडीओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंक

https://www.storytel.com/in/books/petlela-morpis-se03e01-2531061

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’ उपकरण विकसित

महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन

मुंबई, ०२ गस्ट २०२३सौर ऊर्जेच्या पॅनेलमधून वीज निर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ उपकरणाची (Solar Panel Analysing and Reporting Kit – SPARK) निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये (VNIT) विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे. नागरिकांकडून देखील प्रतिसाद वाढत आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे वि‍जेमध्ये रुपांतर केले जाते. प्रत्येक सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्धारित वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार सौर पॅनेल बसविले जातात. मात्र वीजनिर्मितीच्या क्षमतेत सातत्य राखण्यासाठी साधारणतः २५ वर्षांचे आयुर्मान असलेल्या सौर पॅनेलची देखभाल व दुरूस्ती अतिशय महत्वाची आहे. सौर पॅनेलकडून निर्धारित क्षमतेएवढी वीजनिर्मिती होत नसल्यास त्यासाठी कारणीभूत सौर पॅनेलमधील बिघाड, दोष किंवा विविध प्रकारचे अडथळे याबाबतची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांनी ‘स्पार्क’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलमधील बिघाड त्वरित शोधले जाऊन निर्धारित क्षमतेएवढी सौर ऊर्जा निर्मितीमधील सातत्य कायम ठेवणे आता शक्य झाले आहे.

‘स्पार्क’ उपकरणामध्ये प्रामुख्याने सौर पॅनेलच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पॅनेलच्या आवश्यक सर्व घटकांचा वारंवार आढावा घेतला जातो. तसेच फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलसाठी किमान व्होल्टेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या सेन्सरद्वारे पॅनेलच्या निर्धारित केलेल्या क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीमध्ये काही अडथळे आल्यास ते शोधले जातात व त्याची माहिती दिली जाते. पीव्ही पॅनेल्सच्या आऊटपूट व्होल्टेजचे सातत्याने निरीक्षण, विश्लेषण व रिअल टाईम मॉनिटरींग केले जाते. तसेच निर्धारित व प्रत्यक्ष सुरु असलेली सौर ऊर्जा निर्मिती यांची तुलना केली जाते. सौर पॅनेलमधील ओपन सर्किट व शॉर्ट सर्किटची माहिती दिली जाते. त्यासाठी या उपकरणात खास डिस्प्ले युनिट बसविण्यात आले आहे.

किफायतशिर खर्चात तयार करण्यात आलेले ‘स्पार्क’ उपकरण देखभालमुक्त आहे. वापरासाठी वीजदेखील अत्यंत कमी लागते. तसेच सौर पॅनलमधील दोष हे उपकरण अचूकपणे शोधत असल्याचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या निर्धारित क्षमतेएवढ्या सौर ऊर्जा निर्मितीचे सातत्य कायम ठेवणे या उपकरणाद्वारे शक्य झाले आहे. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ संशोधित या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संशोधनासाठी डॉ. वाठ यांना डॉ. मकरंद बल्लाळ (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.

कोलते- पाटील यांच्यातर्फे मुंबई मेट्रोपोलिटिन रिजनमधील दोन निवासी संकुलांच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पांचे संपादन

विक्रीयोग्य परिसर ४.८ लाख चौरस फुट असून ९५० कोटी रुपयांची एकूण विक्री होण्याचा अंदाज, गोरेगावमध्ये वसलेल्या या प्रकल्पांमुळे कंपनीचे एमएमआरमधील स्थान अधिक बळकट होणार

आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीने पुणे आणि एमएमआरमधे विविध प्रकल्पांचे संपादन केले असून त्यांची एकूण संभाव्य विक्री ३४५० कोटी रुपये

पुणे२ ऑगस्ट २०२३ – कोलते- पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL), या पुणेस्थित रियल इस्टेट कंपनीचा मुंबई व बेंगळुरूमधील विस्तार वाढत असून कंपनीने नुकतेच मुंबईतील पश्चिम उपनगरांतील दोन सोसायटींच्या रिडेव्हलपमेंट करारावर सह्या केल्या. या प्रकल्पांचा एकूण विक्रीयोग्य परिसर ४.८ लाख चौरस फुट असून त्यातून एकूण ९५० कोटी रुपयांची एकूण विक्री होईल असा अंदाज आहे. या दोन नव्या प्रकल्पांमुळे पुण्याबाहेर धोरणात्मक विस्तार करण्याच्या कंपनीच्या योजनेला बळ मिळणार असून मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) स्थान मजबूत होईल. यामुळे आर्थिक वर्ष २४ मध्येही कंपनीचा विकास सुरू राहील.

हे दोन्ही प्रकल्प गोरेगाव (प) येथील बांगूर नगर या लघुबाजारपेठेत मोक्याच्या जागी वसलेले आहेत. यामुळे कंपनीच्या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) प्रकल्पांची एकूण संख्या १४ वर गेली आहे. बांगूर नगर हा निवासी परिसर असून मुंबईतील विविध भागांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. मालाडचे कॉर्पोरेट हब येथून जवळ आहे तसेच येथील सामाजिक पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत. कंपनीने आतापर्यंत आपल्या निवासी रिडेव्हलपमेंट प्रकल्पांद्वारे लघु बाजारपेठांमध्ये यशस्वी कामगिरी केली असून त्यात एकूण २.७७ लाख चौरस फुटांची विक्रीयोग्य जागा असलेल्या वर्व्ह निवासी प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाची पूर्ण विक्री झाली असून एकूण विक्री मूल्य ४९५ कोटी रुपयांवर गेले आहे.

या घडामोडीविषयी कोलते- पाटील डेव्हलपर्स लि.चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल तळेले म्हणाले, ‘या दोन नव्या प्रकल्पांचा समावेश, पुण्याबाहेर वैविध्यपूर्ण व्यवसाय विस्तार आणि विकास करण्याच्या आमच्या ध्येयाच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही एमएमआरमध्ये लक्षणीय आणि वेगाने विस्तार केला असून मुंबईच्या पश्चिम उपनगरांत यशस्वीपणे प्रकल्पांचे लाँच/वितरण केले आहे. ग्राहकांना समाधान मिळवून देण्यावर आमचा प्रमुख भर असतो. त्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी व गरजा जाणून घेत प्रकल्पाच्या नियोजनात त्याचा समावेश केला जातो. प्रकल्पाची वेगाने अमलबजावणी करून ब्रँडचा अनुभव उंचावण्यास आमचे प्राधान्य असते. कंपनीने मिळवलेल्या या प्रतिष्ठेच्या मदतीने एमएमआर परिसरात ब्रँडचे स्थान आणखी बळकट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. निवासी संकुलांचे पुनर्नूतनीकरण कोलते-पाटीलसारख्या विश्वासार्ह, एमएमआरचा दशकभराचा अनुभव असलेल्या सक्षम कंपनीसाठी लक्षणीय संधी आहे.’

एप्रिल- मे २०२३ मध्ये कंपनीने पुण्यात दोन व मुंबईत दोन मिळून एकूण चार प्रकल्पांचे संपादन केले आहे. त्यांची विकास क्षमता २.६ दशलक्ष चौरस फूट आहे, तर संभाव्य विक्री अंदाज २५०० कोटी रुपये आहे. एमएमआर येथे दोन नव्या प्रकल्पांचा समावेश झाल्यामुळे नवीन व्यवसाय विकास व्यवहारांचे एकूण मूल्य ३४५० कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनी सातत्याने वेगवेगळ्या व्यावसायिक विकास व विस्तार प्रकल्पांच्या शोधात असते आणि नाविन्यपूर्ण, भांडवल- सक्षम व्यवहारांच्या माध्यमातून त्यांचे संपादन करत असते.

संभाजी भिडे फ्रॉड माणूस! त्याची डिग्री कोणती? तो कुठे प्राध्यापक होता? त्याची संस्था कोणती? तो सोने का मागतो?

संभाजी भिडेची अटक वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत -सावरकरांच्यावरील टीकेचा आसरा

मुंबई-संभाजी भिडे अत्यंत फ्रॉड माणूस आहे. त्याची त्याची डिग्री कोणती आहे? त्याने कुठे शिक्षण घेतले? हा कुठे प्राध्यापक होता? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा माणूस सोने गोळा करत आहे. कायद्यानुसार, एखाद्या संस्थेला वर्गणी गोळा करायची असेल, तर त्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते. त्याचा हिशेब द्यावा लागतो. पण हा माणूस कितीतरी टनाने सोने गोळा करत आहे. तो सध्या प्रत्येकाकडून 1 ग्रॅम सोने घेत आहे. लोकांची व तरुणांची हेतूपुरस्सर दिशाभूल करत आहे.कॉंग्रेसनेते  पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या कथित संस्थेचा हा विषय सभागृहाच्या पटलावर उपस्थित करत हा माणूस कोणत्या आधारावर सोने गोळा करत आहे, असा सवाल उपस्थित केला.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांच्या मुद्यावर चांगलाच गाजला. काँग्रेस सदस्यांनी या प्रकरणी विधानसभा डोक्यावर घेत, भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना भिडे गुरुजी म्हणण्यावर आक्षेप घेतला. त्यावर फडणवीस यांनी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात तुम्हाला काय हरकत आहे, असा उलटप्रश्न केला. त्यानंतर चव्हाण यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. 

सभागृहात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे यांच्याकडून सोने मागण्यात येते. त्यांच्या संस्थेची सरकार दरबारी नोंदणी आहे का? मी भिडेंच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर मला फोन व ई-मेलवरुन धमक्या मिळाल्या. या धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. पण तो जामिनावर सुटला.

ते पुढे म्हणाले की, समाजासाठी काम करत असताना आम्हाला अशा धमक्या येतात. आम्ही त्याला भीक घालत नाही. पण, आमच्या अन्यही काही नेत्यांना धमक्या देण्यात आल्यात. त्यामुळे या धमकावणाऱ्या लोकांना धमकी देण्यासाठी कुणीतरी प्रवृत्त करत आहे का? यामागील खरे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घेण्याची गरज आहे.

मेट्रोसाठी ‘पीएमपीएमएल’ फिडर सेवेचा शुभारंभ

पुणे-

महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लि. पुणे यांचे मार्गिका वनाज ते रुबी हॉल मेट्रो स्टेशन पिंपरी-चिंचवड
महानगरपालिका ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो दि. ०१/०८/२०२३ पासुन सुरू करण्यात आली
आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोईकरीता दि. ०२/०८/२०२३ पासुन मेट्रो
फिडर बससेवा सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय
संचालक मा. सचिन्द्र प्रताप सिंह, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते मेट्रोच्या शिवाजीनगर
सिव्हिल कोर्ट रुम स्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी पुणे मेट्रोचे वर्क्स संचालकअतुल गाडगीळ, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय
संचालक तीन नार्वेकर, मेट्रोचे सिस्टम्स अ‍ॅन्ड ऑपरेशनचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, मेट्रोचे जनता संपर्क
अधिकारी हेमंत सोनवणे, मेट्रोचे डि.जी.एम मनोज डॅनियल, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर
(ऑपरेशन) सतिश गव्हाणे, चीफ इंजिनिअर रमेश चव्हाण, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वाहतूक
नियोजन संचलन अधिकारी नारायण करडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पीएमपीएमएल कडून सुरु करण्यात येत असलेल्या या मेट्रो फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशन्स
पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. तरी सदरच्या मेट्रो फीडर बससेवांचा लाभ प्रवाशी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन
पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची २७ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार कार्यशाळा

मुंबई येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारणी, विभागीय कार्यकारणी व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची एक दिवसीय कार्यशाळा, पुणे येथे रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी दिली.
राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्य सचिव नंदकुमार सुतार, राज्य संघटक श्यामल खैरनार ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य सहसचिव संजय कदम ,कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण ,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील ,राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य समन्वयक चंद्रकांत भुजबळ, राज्य समन्वयक केतन महामुनी ,राज्य सल्लागार मयूर गलांडे,प्रशांत माने,अमित इंगोले, रोहन नलावडे यांची उपस्थिती होती.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्वात मोठी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून प्रसार माध्यमातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या या शासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या .यामधील काही मागण्या मान्य करून त्यावर कारवाई देखील सुरू आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी योग्य ती दिशा मिळावी यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी राजा माने यांनी दिली यावेळी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी ,सदस्य विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

“संभाजी भिडेला उचलून कधी जेलमध्ये टाकणार ? नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल” -वडेट्टीवार

मुंबई- विरोधी पक्षांनी संभाजी भिंडेवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता संभाजी भिडेंचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या विधानांवर विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आगपाखड केली. “जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही, अशा गलिच्छ शब्दांमध्ये या नालायक माणसाने वक्तव्य केलं आहे. त्यांचे शब्द ऐकले, तर असेल तिथून त्यांना उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रपित्याचा अपमान करणं, त्याहीपलीकडे जाऊन जिथे स्वत: या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, त्या साईबाबांचा अपमान केला जात आहे. या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांचाही अपमान या नालायक माणसानं केला आहे. यावरूनच या माणसाची लायकी दिसते”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“त्याची जागा कोठडीत आहे. त्याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या देशातली जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलमध्ये टाकणार आहात? नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल”, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, मराठी तरुणांना भुरळ घालण्यासाठी संभाजी हे टोपणनाव वापरत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी कला. “संभाजी कसला हा? टोपणनाव वापरून मराठी मुलांना भुरळ घालण्याचं काम तो करतोय. त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? तो नेहमीच विष का ओकतोय? जातीय तेढ निर्माण व्हावी, मतांचं विभाजन व्हावं व सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. समाजात, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, महापुरुष, राष्ट्रपुरुष, महात्म्यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे ते सातत्याने करत आहेत”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या; कर्जतच्या स्टुडिओत घेतला गळफास

नितीन देसाई यांच्यावर होते 249 कोटींचे कर्ज, ND स्टुडिओवर होती जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट

कर्जत -सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. अशा प्रकारे त्यांनी आत्महत्या केल्यामुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते ५८ वर्षांचे होते.

नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला होता. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. यासारख्या अनेक चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.

दरम्यान, नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.

नितीन देसाई यांच्यावर होते 249 कोटींचे कर्ज, ND स्टुडिओवर होती जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

नितीन देसाई यांच्यावर तब्बल 249 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.नितीन देसाई यांचा मृतदेह बुधवारी सकाळी एनडी स्टुडिओतील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यानंतर तातडीने ही खबर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कर्जत व खालापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी सर्वच अंगाने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.यासंबंधीच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांनी काही वित्तीय संस्थांकडून ठराविक मुदतीचे कर्ज घेतले होते. यामुळे त्यांचा जीव की प्राण असणाऱ्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाइस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने यासंबंधी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजुरी दिली नव्हती.

रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एनडी स्टुडिओच्या जप्तीसंबंधीचा अर्ज आपल्या कार्यालयाला मिळाल्याची पुष्टी केली आहे.

काय आहे प्रकरण?

नितीन देसाई यांनी काही कारणास्तव CFM नामक वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 व 2018 या 2 वर्षांत या कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी 3 वेगवेगळ्या अशा 40 एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर CFM ने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. पण त्यानंतरही कर्जाची वसुली होत नव्हती.

यादरम्यान 180 कोटींचे कर्ज व्याजासह 249 कोटींच्या घरात पोहोचले. त्यामुळे देसाई प्रचंड आर्थिक तंगीत सापडले. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भात चर्चाही केली होती.

स्वरदा आणि गौरव बापटांनी घेतली पीएम मोदींची भेट

पुणे- अरविंद लेले यांच्या परिवाराच्या भेटी समवेत पीएम नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यावर आलेले असताना स्वर्गीय गिरीश बापट यांचा मुलगा गौरव आणि सून स्वरदा बापट या दोघांची भेट घेऊन,त्यांची विचारपूस केली आणि चर्चा केली . काही आठवणी त्यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांच्या सांगितल्या आणि त्यांच्या मुलाचे आणि सुनेच्या बाबत काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला .

कॉंग्रेसने यापासून काही शिकावे …..

पीएम मोदी पुण्यात आल्यावर आपल्या पक्षातील सहकाऱ्यांच्या, आणि नागरिकांच्या कसे समोर जातात याबाबत कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी खास याबाबतची दखल घेतली पाहिजे असे राजकीय वर्तुळात बोलले गेले . राहुल गांधी पुण्यात आले होतेउजाळा मिळाला तेव्हा विश्वजित कदम यांनी राहुल गांधींना भारती विद्यापीठात शिकायला आलेल्या बहुसंख्य अमहाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांपुढे नेले होते .मागणी असूनही शहरातून त्यांची फेरी निघू दिली नव्हती कि कार्यकत्यांच्या भेटीगाठी होऊ दिल्या नव्हत्या आणि पत्रकार परिषद देखील होऊ दिली नव्हती .या घटनेला पुन्हा उजाळा दिला गेला .राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावंडांचे पुण्यात कार्यक्रम ठेऊ पाहणाऱ्यांना कॉंग्रेसच्याच नेत्यांनी सातत्याने विरोध केला .पीएम मोदी, तसेच अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावर यांचा अनुभव मात्र याहून एकदम विरोधी जाणवला , एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीत देखील असेच चालते असेही यावेळी म्हटले गेले.

चायनीज गणेश मूर्तीवर बंदी आणा-मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

गणेशोत्सव मंडळांकडून 1000 ऐवजी 100 रुपये अनामत रक्कम

मुंबई, दि. 1 आँगस्ट
बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिका झालेल्या गणेशोत्सवा बाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे सर्वच स्तरावर तयारीची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. अश्विनी भिडे व गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व अन्य
पदाधिकारी मूर्तिकार संघाचे पदाधिकारी, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी सर्व उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेने केला होता, त्याला आमचा विरोध होता, त्याबाबत चर्चा केल्यानंतर यावर्षी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम घेण्याचे पालिकेने मान्य केले आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.
तसेच सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती त्यालाही आमचा विरोध होता. याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांयना काही वेळ द्यावा लागेल ,त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमुर्त्या येत असून त्यावर सरसकट बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, त्याबाबत महापालिकेने तयारी दाखवली आहे. तसेच काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जुने खटले सुरू आहेत ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली. तर गणेशोत्सव साजरा करताना, गणपती आणताना व विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावे, रस्त्यावर खड्डे असू नये, अशी मागणी आम्ही केल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काळ असल्याने गणेशोत्सव विसर्जन स्थळी गणेश भक्तांना मोदक अथवा पेढा प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन करावे असेही पालिकेला सूचविल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

आजच्या बैठकीतील सविस्तर मुद्दे

१. गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु.१०००/- असलेली अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्यात आली.
२. गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येईल.
३. विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील.
४. चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी पाउले उचलली जातील.
५. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई केली जाईल.
६. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील.
७. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढाव घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
८. गत वर्षी विसर्जन मिरवणुकितील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर / गणेश मिरवणुकितील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
९. शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवली जाईल.
१०. पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल.
११. गणेश विसर्जनावेळी काही अडथळे आल्यास त्याकडे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट!

पुणे-आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी भेट घेतली. श्रीमती अनुराधा लेले, मिलिंद लेले, प्रमोद लेले, हेमंत लेले, सुवर्ण लेले, अंजली लेले यांचा यावेळी समावेश होता.ते म्हणाले ,’आजचा दिवस आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरला.माझे वडील कै. डॉक्टर अरविंद लेले यांचा चरित्र ग्रंथ “कृतार्थ” आज त्यांना सस्नेह सादर केला. तसेच तळजाई शिबिरामध्ये कै. बाबूजींनी गायलेल्या आणि माझ्या वडिलांनी लिहिलेल्या हिंदू सारा एक या गीताची एक सुंदर फ्रेम करून त्यांना भेट दिली. पीएम केअर्स फंड या प्रधानमंत्री कोशामध्ये आम्हा सर्व कुटुंबीयांतर्फे दोन लक्ष समर्पण केले.
भारताच्या भविष्याची दिशा बदलणारे आणि हिंदू संस्कृतीला जगात मानाचे स्थान पुन्हा मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या वडिलांच्याआणि त्यांच्या जुन्या स्नेहाची आठवण ठेवून आम्हा सर्व कुटुंबीयांना त्यांनी आज भेटीचे वेळ दिले. त्यांच्यासारख्या अत्यंत तेजस्वी व्यक्तीला भेटून आज आम्हाला कृतकृत्य झाल्याचा अनुभव येतो आहे.
आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची त्यांनी वैयक्तिक चौकशी देखील केली. “पक्षाचे काम करताना पूर्ण समर्पण भावनेने कर. आपल्या विचारांपासून आणि तत्वांपासून फारकत घेऊ नकोस. सामाजिक कार्य करताना अंत्योदय हेच आपले ध्येय असले पाहिजे” असे त्यांनी आवर्जून सांगितले.


पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख यांची नियुक्ती

पुणे | एकटा व्यक्ती, एकटा व्यावसायिक फार काळ टिकू शकत नाही. एकत्र नाही आलात आणि असच पुढे चालू राहिले तर, येणाऱ्या काळात ४०-५०% रिटेलर सुद्धा टिकणार नाहीत. त्यामुळे एकता ठेवा आणि संघटनेवर विश्वास ठेवून एकत्र या, असे प्रतिपादन ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.

पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या पदग्रहण सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ऑनलाइन फार्मसी जवळ जवळ बंद करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि आता आपण डीप डिस्काउंट सारख्या गोष्टींवर सुद्धा आळा घालू. केमिस्ट व्यावसायिकांच्या भविष्याचा अचूक वेध घेत संघटना काम करत असल्याचे त्यांनी संगितले.

यावेळी पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख, सचिवपदी अनिल बेलकर, खजिनदारपदी रोहित करपे, संघटक सचिवपदी रोहित जोशी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख अजित पारख यांच्यासह पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केमिस्टच्या उपस्थित ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे.

नवनियुक्त अध्यक्ष संदीप पारख यांनी सर्वांचे आभार मानले. २० वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, यापुढे सुद्धा चांगले काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

केमिस्ट असोसिएशन डिस्ट्रिक्ट पुणेचे सचिव अनिल बेलकर यांनी २०१८-२३ या वर्षांचा अहवाल सादर केला. कोरोना काळात पुणे जिल्ह्यात सर्वात प्रभावी काम झाल्याचे त्यांनी संगितले.

विजय पाटील आणि अनिल नावंदर यांनी केमिस्ट व्यवसायाचे बदललेले स्वरूप तसेच भविष्यामध्ये येणार्‍या ऑनलाइन फार्मसी आणि डीप डिस्काउंट सारख्या समस्यांची पूर्वकल्पना दिली. याचसोबत अडचणींवर मात कशी करता येईल हे सुद्धा संगितले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.

मधकेंद्र योजनेच्या लाभासाठी व्यक्ती व संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली असून योजनेच्या लाभांसाठी जिल्ह्यातील व्यक्ती व संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

या योजनेमध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान मिळणार असून ५० टक्के स्वगुंतवणूक करणे आवश्यक आहे. शासनाच्या हमी भावाने मधखरेदी / विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती साठी सहभाग ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता: वैयक्तिक माधपाळासाठी अर्जदार हा साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य राहील. वय १८ वर्षापेक्षा जास्त नसावे. १० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य राहील. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळासाठी किमान १० वी उत्तीर्ण, वय २१ वर्षेपेक्षा जास्त नसावे. व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन तसेच लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्थासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच एक एकर शेतजमीन स्वमालकीची अथवा भाड्याने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

अटी व शती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४ ब, जुना पुणे मुंबई रस्ता, शासकिय दुध डेअरी समोर, पुणे-३ दूरध्वनी क्रमांक ०२०-२५८११८५९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.
0000

एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गैव्यवहारप्रकरणी महाज्योतीतर्फे चौकशीचे आदेश

पुणे, दि. १: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी ३० जुलै रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गैव्यवहारप्रकरणी संस्थेने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाज्योतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी ३० जुलै रोजी घेतली होती. परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रशिक्षण संस्थांच्या पुस्तकातील प्रश्न विचारल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे महाज्योतीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी कळविले आहे.

त्यादृष्टीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी प्राप्त तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये तसेच मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, असेही महाज्योतीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी गणेश बोतालजी

सातारा/प्रतिनिधी

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कोरेगाव येथील संपादक पत्रकार गणेश बोतालजी यांची आज बिनविरोध झाल्याची घोषणा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.राज्यातील ५ हजारहून अधिक युट्युब चॅनेल व वेब पोर्टलचे संपादक पत्रकार सभासद असलेल्या देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेने डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.ज्येष्ठमध्यमतज्ञ संपादक राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ही संघटना मोठ्या ताकतीने कार्यरत आहे.
आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत गणेश बोतालजी यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीसाठी विकास भोसले ,संजय कदम ,सचिन जाधव, सचिन भिलारे ,सोमनाथ साखरे ,संतोष शिराळे, राहुल ताटे पाटील, धनंजय पानसांडे ,संदीप माने , फिरोज तांबोळी,लिंगराज साखरे बापूसाहेब मिसाळ, धनंजय, सचिन शिंगाडे यांची उपस्थिती होती.