संभाजी भिडेची अटक वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कसरत -सावरकरांच्यावरील टीकेचा आसरा
मुंबई-संभाजी भिडे अत्यंत फ्रॉड माणूस आहे. त्याची त्याची डिग्री कोणती आहे? त्याने कुठे शिक्षण घेतले? हा कुठे प्राध्यापक होता? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा माणूस सोने गोळा करत आहे. कायद्यानुसार, एखाद्या संस्थेला वर्गणी गोळा करायची असेल, तर त्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते. त्याचा हिशेब द्यावा लागतो. पण हा माणूस कितीतरी टनाने सोने गोळा करत आहे. तो सध्या प्रत्येकाकडून 1 ग्रॅम सोने घेत आहे. लोकांची व तरुणांची हेतूपुरस्सर दिशाभूल करत आहे.कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या कथित संस्थेचा हा विषय सभागृहाच्या पटलावर उपस्थित करत हा माणूस कोणत्या आधारावर सोने गोळा करत आहे, असा सवाल उपस्थित केला.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांच्या मुद्यावर चांगलाच गाजला. काँग्रेस सदस्यांनी या प्रकरणी विधानसभा डोक्यावर घेत, भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना भिडे गुरुजी म्हणण्यावर आक्षेप घेतला. त्यावर फडणवीस यांनी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात तुम्हाला काय हरकत आहे, असा उलटप्रश्न केला. त्यानंतर चव्हाण यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
सभागृहात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे यांच्याकडून सोने मागण्यात येते. त्यांच्या संस्थेची सरकार दरबारी नोंदणी आहे का? मी भिडेंच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर मला फोन व ई-मेलवरुन धमक्या मिळाल्या. या धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. पण तो जामिनावर सुटला.
ते पुढे म्हणाले की, समाजासाठी काम करत असताना आम्हाला अशा धमक्या येतात. आम्ही त्याला भीक घालत नाही. पण, आमच्या अन्यही काही नेत्यांना धमक्या देण्यात आल्यात. त्यामुळे या धमकावणाऱ्या लोकांना धमकी देण्यासाठी कुणीतरी प्रवृत्त करत आहे का? यामागील खरे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घेण्याची गरज आहे.