Home Blog Page 1414

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 2 : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

‘पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित करताना झालेला गैरव्यवहार’ याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, नाना पटोले, राजेश पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या प्रक्रियेत अनेक विभागांचा सहभाग आहे. या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.

जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण,हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक

पुणे: जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह सहा जणांना पौड पोलिसांनी अटक केली. मुळशीतील दारवली गावात ही घटना घडली.याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी धनंजय देसाई याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

याप्रकरणी देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहित यांच्यासह १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला आहे. बलकवडे गावातील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले. जमीन नावावर करुन न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली. बलकवडे यांना श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींकडे काठ्या, गज होते, असे बलकवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी गावातील नागरिकांनी धमकावले. पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

धनंजय देसाई याने बारा वर्षांपूर्वी पौड भागात अतिक्रमण करुन घर बांधले. देसाई हिंदू राष्ट्र सेना चालवित असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल झाले आहेत. मुळशी तालुक्यात देसाई आणि साथीदारांनी दहशत माजविली आहे. गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. देसाईला जाब विचारल्यास तो ग्रामस्थांना धमकावतो. संघटनेच्या नावाखाली तो समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याने दारवलीलीत हुलावळेवाडीतील तरुणांना मारहाण केली होती, असे समस्त ग्रामस्थ दारवलीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, देसाईविरुद्ध कारवाई करण्यासाठी दारवली ग्रामस्थांकडून बुधवारी पौड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

पुणे चक्राकार महामार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा मोबदला वाटप

पुणे, दि.२: पुणे चक्राकार महामार्गासाठी संमतीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला जमीन मालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १२५ एकराचा ताबा घेण्यात आला असून २५० कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासोबत राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. याबाबत जमीन मालकांशीदेखील संवाद साधण्यात येत असून त्यांना विश्वासात घेतले जात आहे. संमती निवाड्याने जमीन घेताना भूधारकांना २५ टक्के अधिक मोबदला देण्यात आला आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीच्या बैठकीत संमतीचा विकल्प सादर करणे व करारनामा करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

चक्राकार महार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित ३५ गावातील एकूण १६ हजार ९४० खातेदारांपैकी ८ हजार ३० खातेदारांनी भूसंपादनासाठी संमती दर्शविली आहे. त्यापैकी २७५ खातेदारांना १२५ एकर जमिनीच्या मोबदल्यात २५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मोबदला वाटपाची प्रक्रिया वेगाने होत असल्याने त्याला भूधारकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रीयेचा आज आढावा घेतला. संमतीने निवाडा करण्याच्या विकल्पास भूधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जमीन ताब्यात देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास अवधी लागत असल्याने संमतीचा विकल्प सादर करण्यासाठी वाढविण्याची विनंती भूधारकांनी केली होती. त्यानुसार २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत विकल्प सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ ऑगस्ट पर्यंत संमतीपत्र आणि करारनामा प्राप्त न झाल्यास उर्वरीत भूधारकांची संमती नाही असे समजून २५ टक्के वाढीव मोबदल्याशिवाय भूसंपादनाचा निवाडा प्राधिकृत भूसंपादन अधिकाऱ्यांकडून घोषीत करण्यात येणार आहे.

भूधारकांनी दिलेल्या मुदतीत संमती विकल्पाद्वारे २५ टक्के अधिक मोबदल्याचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या या प्रकल्पासाठी योगदान देण्याच्या भावनेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.
0000

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा-सेबी फंडातून पैसे काढण्यात आले

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023

सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., लखनौ, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लि., भोपाळ, हमरा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., कोलकाता आणि स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., हैदराबाद या  सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांनी नोव्हेंबर, 2019 ते डिसेंबर, 2020 दरम्यान  सहकारी संस्थांच्या  केंद्रीय निबंधकासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिलेल्या  निवेदनानुसार अँबी व्हॅली लि.मध्ये 62,643 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि सहारा क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मधून  2,253 कोटी रुपये काढण्यात आले आणि सेबीकडे जमा केले आहेत.

सहकार मंत्रालयाने WP (C) क्रमांक 191/2022 – पिनाकपानी  मोहंती वि. युनिअन ऑफ इंडिया  प्रकरणामध्ये दाखल केलेल्या IA क्रमांक 56308/2023 वर,  सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 29.03.2023 च्या आदेशाद्वारे निर्देश दिले की –

“(i)  “सहारा-सेबी रिफंड अकाउंट” मध्ये पडून असलेल्या 24,979.67 कोटी रुपये या एकूण रकमेपैकी  5000 कोटी रुपये सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांकडे हस्तांतरित केले जातील, जे सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची कायदेशीर देय रक्कम म्हणून  वितरित करतील, आणि ते खऱ्या  ठेवीदारांना सर्वात पारदर्शक पद्धतीने आणि योग्य ओळख पटवून  आणि त्यांच्या ठेवींचा पुरावा आणि त्यांच्या दाव्यांचा पुरावा सादर केल्यावर  थेट त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा केले जातील.

ii. या वितरणावर या न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ति आर. सुभाष रेड्डी हे देखरेख ठेवतील आणि यात अधिवक्ता गौरव अग्रवाल त्यांना योग्य सहाय्य करतील. सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांना रक्कम वितरित करण्यासाठी  न्यायमूर्ति आर. सुभाष रेड्डी तसेच केंद्रीय निबंधक यांच्या मदतीसाठी अग्रवाल यांना एमिकस क्यूरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय सहकारी संस्थांचे  निबंधक न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि अधिवक्ता गौरव अग्रवाल यांच्याशी सल्लामसलत करून पैसे परत  करण्याची पद्धत आणि मार्ग  ठरवतील.

iii. सहारा समुहाच्या सहकारी संस्थांच्या खर्‍या ठेवीदारांना उपरोक्त 5,000 कोटी रुपयांमधून लवकरात लवकर मात्र आजपासून नऊ महिन्यांच्या आत रक्कम अदा करावी असे आम्ही निर्देश देतो.  त्यानंतर उर्वरित रक्कम पुन्हा “सहारा-सेबी रिफंड खात्यात” हस्तांतरित केली जाईल.

वरील आदेशाचे पालन करून सहारा-सेबी रिफंड खात्यातून सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांकडे 5000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. सहारा समूहाच्या चार बहु-राज्य सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांकडून दावे सादर करण्यासाठी “सहारा-CRCS रिफंड पोर्टल” हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.  18.07.2023 रोजी पोर्टल सुरू करण्यात आले आहे आणि सहकार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  https://cooperation.gov.in आणि https://mocrefund.crcs.gov.in. च्या माध्यमातून ते पाहता येईल.

या संस्थांचे खरे ठेवीदार पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज भरून त्यांचे परतावा संबंधी दावे सादर करू शकतात तसेच त्यांच्या ठेवी आणि दाव्यांचे पुरावे यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे दाखल केलेल्या दाव्यांचीच दखल घेतली जाईल. निधी उपलब्धतेनुसार  खऱ्या ठेवीदारांचे पैसे त्यांनी ऑनलाइन दावे दाखल केल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्यांच्या आधार संलग्न  बँक खात्यात जमा केले जातील आणि त्यांना एसएमएस/पोर्टलद्वारे  सूचित केले जाईल.

सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.   

कृषी विस्तार सेवा अभ्यासक्रमाचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे दि.2: कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाचा (डीएईएसआय- देसी) 2021-2022 या वर्षातील पदविका प्रदान सोहळा वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था (वामनीकॉम) येथे नुकताच संपन्न झाला.

कृषी मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैद्राबाद, वनामती नागपूर तसेच कृषी विभाग आत्मा यांच्या मान्यतेने हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या पदवीप्रदान सोहळ्यास वामनीकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, कृषी प्रशिक्षण उपसंचालक हनमंत शिंदे, वामनीकॉमचे सहयोगी प्राध्यापक महेश कदम, ‘मॅनेज’चे सल्लागार महेश माने, शाश्वत शेती विकास प्रतिष्ठानचे प्रमुख अवधूत कदम, कार्यक्रम सन्मवय अतुल खुडे आदी उपस्थित होते.

श्री. तांबाळे यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे कृषी विस्तार सेवेतील महत्व, जबाबदारी आणि योगदान याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. यादव यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सहकारी क्षेत्रातील विविध व्यवसाय संधींच्या अनुषंगाने माहिती दिली. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
0000

“सरकार आणखी किती खोटं बोलणार?” आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच ट्विटर वर सादर

शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधींचे वडील हे करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत. त्यांचं पालनपोषणही मुस्लीम जमीनदारानेच केलं, अशा अर्थाचं विधान संभाजी भिडेंनी केलं. भिडेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली.

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गदारोळ झाला. राज्य सरकारने संभाजी भिडेंची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण संभाजी भिडे यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवलीच नाही, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पुरावाच सादर केला. संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरून शेअर केला.

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, सरकार म्हणतंय, मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडीओ बघा. हे पुरावे आहेत. गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते. सरकार किती खोटं बोलणार? असा सवालही आव्हाडांनी विचारला.सध्या महाराष्ट्र विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षेबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मनोहर कुलकर्णीला पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांना संरक्षण असेल तर ते संरक्षण काढून घेणार का? महापुरुषांचा अवमान करून स्वत: संरक्षणात राहायचं, हे योग्य नाही, आपण त्यावर काय निर्णय घेणार? असा सवाल जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडेंना अशी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. जयंत पाटलांची माहिती चुकीची आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत थेट पुरावाच सादर केला आहे. या व्हिडीओंमध्ये संभाजी भिडे हे पोलीस सुरक्षा व्यवस्थेत वावरताना दिसत आहेत.

गळफास घेण्यापूर्वी नितीन देसाईंनी रेकॉर्ड केली व्हॉइस क्लीप, 4 उद्योगपतींचा उल्लेख; रेकॉर्डर जप्त, चौकशी सुरू

मुंबई-

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत स्थित एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी सुसाइड करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली. या क्लीपमध्ये 4 उद्योगपतींची नावे असल्याचा दावा केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.यासंबंधीच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते कर्जतच्या एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉइस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले.

त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजरने बुधवारी रेकॉर्डर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी मेगाहॉलजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यावेळी हा व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच पडला होता. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या व्हॉइस नोट्समध्ये 4 व्यावसायिकांची नावे आहेत. त्यांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याचा उल्लेख आहे.त्यामुळे आता हे चारही व्यावसायिक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती आहे. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन देसाई यांनी दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच आत्महत्या केल्यामुळे त्यांनी विमान प्रवासात आत्महत्या करण्याची मानसिक तयारी केली असावी, असा दावा केला जात आहे.दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकासह श्वान पथकालाही पाचारण्यात आले आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी दापोली येथे झाला. कलादिग्दर्शन, दिग्दर्शन वअभिनय या तिन्ही माध्यमांत त्यांनी जोरदार काम केले. त्यांना त्यांच्या कामासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. परिंदा, डॉन, माचिस, वजूद, 1942 अ लव्ह स्टोरी, अकेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलाम बॉम्बे, लगान, मिशन कश्मीर, हम दिल दे चुके सनम आदी अनेक गाजलेल्या सिनेमांशी त्यांचा संबंध होता. त्यांनी 2005 मध्ये एन.डी. स्टुडिओची स्थापना केली होती. स्टुडिओ आगीत भस्मसात झाल्यानंतरही नितन यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी पुन्हा मोठ्या कष्टाने हा स्टुडिओ उभा केला.

राज्यात डोळ्यांचे लाखभर रुग्ण! डोळ्यांच्या बाह्य पडद्याला जंतूसंसर्ग; काय आहेत लक्षणे? कशी घ्याल काळजी?

सध्या महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ सुरू आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक जणांचे डोळे आलेत. विशेषतः ही साथ झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनानेही जनतेला डोळ्यांसंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

डोळे येण्याला इंग्रजीत conjunctivitis म्हटले जाते. हा एक वेगाने पसरणारा आजार आहे. हा आजार फार गंभीर स्वरुपाचा मानला जात नाही. पण हा एक संसर्गजन्य आजार असल्यामुळे तथा त्याचा थेट डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर परिणाम होत असल्यामुळे तो होणार नाही याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

महाराष्ट्रात सध्या व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण प्रचंड वाढलेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे व्हायरसला फोफावण्याची पुरती संधी मिळते. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो. यामुळे आपण सातत्याने स्वतःचा चेहरा पुसत राहतो. असे करताना आपण डोळ्यांनाही हात लावतो. यामुळे आपसूकच संसर्ग होऊन डोळे येतात. 31 जुलैपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख रुग्ण डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत.

काय आहेत डोळे येण्याची लक्षणे?

  • डोळे लाल होणे.
  • डोळ्यांना पाणी येणे.
  • डोळ्यांना सूज येणे.
  • डोळ्यांतून चिकट द्रवपदार्थ स्त्रावणे.
  • डोळ्यांना खाज सुटणे.
  • डोळे जड वाटणे.
  • डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे.

डोळे आल्यास कशी घ्यावी काळजी?

  • डोळे स्वच्छ पाण्याने धुणे.
  • इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नये.
  • डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
  • घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
  • संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
  • सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
  • डॉक्टरांच्या सल्यानेच औषधे डोळ्यात टाकावी.

डॉक्टरांच्या मते, शाळा, वसतीगृहे, अनाथालय आदी संस्थात्मक ठिकाणी डोळ्यांची साथ आली असेल, तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला विलगीकरणात ठेवावे. डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला झपाट्याने होतो. त्यामुळे नियमीत हात धुण्याची गरज आहे. डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा. रुग्णांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

रुग्णांची जिल्हावार आकडेवारी

  • बुलडाणा -13,550
  • पुणे- 8,808
  • अकोला-6,125
  • अमरावती- 5,538
  • धुळे -4,743
  • जळगाव-4,717
  • गोंदिया 4,209

याशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही हजारो रुग्ण आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते, डोळे आल्यानंतर त्याचा परिणाम 3 दिवस राहतो.

महिलांवर अत्याचार,वाढत्या आत्महत्या,आदर्श नेत्यांची नालस्ती मग हे रामराज्य कसे ? सरकार चालवण्यात भाजप असमर्थ- उद्धव ठाकरे

मुंबई-मणिपूर, हरियाणात ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहेत. जिथे राज्यपाल महिला आहेत. राष्ट्रपती महिला आहेत. तरी देखील ठोस पावले उचलली जात नाहीत. देशाचे पंतप्रधान त्यावर संसदेत बोलण्यास तयार नाही. मग हे हिंदुराष्ट्र, रामराज्य कसे असू शकते, या दोन्ही राज्यात भाजप सरकार असून ते चालवण्यात असमर्थ आहे, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध विषयाला हात घालत भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली.

ठाकरे म्हणाले की, ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘इंडिया’ ची बैठक मुंबईत पार पडेल. त्यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल, असे माहिती ठाकरे यांनी माध्यमांना दिली.

नितीन देसाईंचा मृत्यू ही घटना अतिशय वेदनादायी आहे. दुर्दैवी आहे. त्यांना अशी श्रद्धांजली वाहावी लागेल असे वाटले नव्हते. नितीन देसाई नेहमी म्हणायचे की, कोणतेही काम होऊन जाईल. नाट्य, सिने क्षेत्रातील मोठा व्यक्ती गेल्याची खंत आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्या मृत्यूवरून आत्ताच काही बोलणे उचित नाही. परंतू मृत्यूनंतर काही गोष्टी समोर येत असल्याचे वाईट वाटते.

समृद्धी महामार्गाच्या अपघातावर उद्धव ठाकरे म्हणाले की, काल ठाणे जिल्ह्यात झालेल्या कामगाराच्या मृत्यूची माहिती अतिशय भयानक आहे. त्यातील त्रुटी अशा राहू शकतात. त्या अतिशय धक्कादायक आहेत.

‘ते भिडेंना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे’
संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते जे आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे असं म्हणत संभाजी भिडेंच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. पत्रकारांनी विचारले की, फडणवीस भिडेंना गुरूजी म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत, हीच अपेक्षा आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महिलांबद्दल शिवसेनेची भूमिका ठाम राहिली आहे. शिवसेनेने विधानपरिषदेच्या उपसभापती किंवा सभापती पदावर महिलेला बसविले होते. हा सर्वोच्च मान मला वाटते प्रथम किंवा दुसऱ्यांदा शिवसेनेना दिला आहे. त्याच महिला आता शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू देत नसतील तर ते किती धक्कादायक आहे. एवढा काय बदल झाला त्यांच्यामध्ये त्यांनाच माहिती, अशी टीका ठाकरे यांनी निलम गो्रहे यांच्यावर केली.

भाजप सरकार चालवू शकत नाही. हे मणिपूर, हरियाणामध्ये सिद्ध झाले. महाराष्ट्रात सुद्धा सरकार आले नव्हते. हे त्यांनी फोडाफोडी करून राज्य आणले. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल एवढेच म्हणेन, असा टोला ठाकरे यांनी मोदी,शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर केला आहे.

नितीन देसाईंनी असा आत्मघातकी विचार का केला?, ही वेळ कशामुळे असेल ह्याचा छडा लागला पाहिजे – राज ठाकरे

मुंबई-

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब बुधवारी उजेडात आली. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मृत्यूपूर्वी त्यांच्यावर तब्बल 249 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहली आहे.

हे अनाकलनीय – राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झाले. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासे आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे.असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.

धक्कादायक बातमी – आदित्य ठाकरे

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक आहे. भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि ह्या धक्क्यातून, दुःखातून लवकर सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना !

संभाजी भिडेंच्या माध्यमातून राज्यात दंगली घडवायच्या आहेत का?, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा सरकारला सवाल

मुंबई-संभाजी भिंडे यांनी महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबांसह इतर महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली. त्यांच्या विधानांमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, मात्र सरकार त्यांना अटक करायला तयार नाही. सरकारला त्यांच्या माध्यमातून राज्यात दंगली घडवायच्या आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला

अशोक चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे पोलिस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत. भिडे यांच्यावर कारवाईची मागणी करत विरोधकांनी आज सभागृहात सरकारला जाब विचारला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

अशोक चव्हाण म्हणाले की, सामाजिक- धार्मिक भावना दुखावत आहेत, राज्यात आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही? मनोहर भिडे यांनी अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आज विरोधी पक्षांनी याबाबत विधानसभेत दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही.

अशोक चव्हाण म्हणाले की, पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही. ते अजूनही मोकाट फिरत आहेत आणि भाषणे देत आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक वाद निर्माण करायचे, दंगली घडवायच्या आणि त्याचा राजकीय फायदा मिळवायचा, हे राज्य सरकारचे धोरण आहे का ? असा सवाल देखील चव्हाण यांनी यावेळी केला.

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

पुणे, दि.2: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता केंद्र शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

महाविद्यालयासंबंधीची मान्यता, नोंदणी अभ्यासक्रमाची मान्यता, महाविद्यालयांची मान्यताप्राप्त विद्यार्थी क्षमता, अभ्यासक्रमाची मान्यता प्राप्त शुल्क रचना आदी बाबींची पडताळणी व खातरजमा महाविद्यालयांनी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष हजेरीबाबतची अट अवलंबिणे, एक अभ्यासक्रम एक शिष्यवृत्ती धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षांचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल राज्य शासनास सादर करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ केवळ राज्य शासनाची मान्यता प्राप्त विद्यापीठे किंवा केंद्रीय विद्यापीठातर्गंत सलग शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय राहील. योजनेच्या लाभाचे वितरण प्राधान्याने आधार संलग्नीकृत बँक खाते असलेल्या लाभार्थ्यांनाच अनुज्ञेय राहील.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये व त्यापेक्षा कमी असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क अनुज्ञेय राहील.

योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाच्या निर्वाह भत्याचे दर हे केंद्र शासनामार्फत वेळोवेळी निर्धारित केलेल्या दरानुसार अद्ययावत करण्यात येतील. योजनेकरिता ऑनलाईन प्रणालीवर केवळ नोंदणीकरिता शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही मुदत कालावधीचे बंधन नाही. लाभार्थ्याला चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत प्रणालीवर प्राथमिक नोंदणी करता येईल.

या सूचनांचे महाविद्यालयांकडून काटेकोरपणे पालन करण्यात यावे. महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी कळविले आहे.
0000

संपदा सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा रविवारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ; ‘अर्थ साक्षरता अभियानाला’ होणार प्रारंभ
पुणे : संपदा सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी ‘संपदा’ शुभारंभ सोहळा रविवार, दिनांक ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते.

महेश लेले म्हणाले, या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक सुरेश ऊर्फ नाना जाधव, अम्ब्रेला आॅर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वर्ष बोधचिन्ह अनावरणासह अर्थ साक्षरता अभियानांतर्गत पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.

गिरीश सरदेशपांडे म्हणाले, अर्थ साक्षरता अभियानांतर्गत बँकेच्या सर्व ८ शाखांच्या परिसरातील वस्त्यांमध्ये जावून तेथील नागरिकांना बँकिंग व्यवहार बद्दल विविध नियमांची माहिती, खात्यांचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहारांमधील धोके, घ्यावयाची काळजी आदी माहिती देण्यात येणार आहे. आजपर्यंत याचे ८ कार्यक्रम देखील झाले आहेत. येत्या वर्षभरात जास्तीत जास्त कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.  

मुकुंद भालेराव म्हणाले, बँकेच्या ८ शाखांमध्ये मिळून १७०. १८ कोटींच्या ठेवी असून १०१.०८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण ०.०० % असून यावर्षी १.३२ कोटी इतका नफा झाला आहे. बँकेने नुकतेच सभासदांना ८ टक्के लाभांश देखील जाहीर केला आहे. सन २०२२-२३ साठी वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस अ आॅडिट वर्ग दिला आहे. तसेच बँकेने ग्राहकांसाठी डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, युपीआय आदी सुविधा दिल्या आहेत. धायरी व कात्रज येथे बँकेची दोन एटीएम मशीन असून डेटा सुरक्षिततेसाठी बँकेने क्लाऊड कम्प्युटिंग तंत्रज्ञान अवलंबिले आहे.

वन विभागाची पदभरती मानवी हस्तक्षेप विरहित!

तोतयांपासून सावध राहण्याचे तरुणांना आवाहन

मुंबई, दि. 2 : राज्यात वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वनरक्षक व तत्सम पद भरतीसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून ही प्रक्रिया टीसीएस या संगणक क्षेत्रातील तज्ञ कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. टीसीएसमार्फत राबविली जाणारी वनविभागाची ही पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकृत असून या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपास अजिबात वाव नाही, हे युवकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. उमेदवारांना भरतीसाठी निहित पद्धतीने सर्व परीक्षा आणि मुलाखती पार पाडणे बंधनकारक आहे, अशी माहिती वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

वन विभागाच्या पद भारतीत नोकरी लावून देतो असे सांगून, काही तोतया व्यक्ती आपण अमुक तमुक अधिकारी आहोत किंवा कुणाचे तरी नातेवाईक आहोत असे भासवून उमेदवारांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत; त्याची उच्च पातळीवरून तातडीने दखल घेतली गेली आहे. यासंदर्भात युवकांनी सावध राहावे आणि मानवी हस्तक्षेपास वाव नसलेल्या या भरती प्रक्रियेत कुणीही अशाप्रकारे वन विभागात नोकरी लावून देतो, असे सांगत असेल तर तातडीने स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्याची तक्रार दाखल करावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

डॉ. कलाम प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची उपस्थिती :

महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांना पुरस्कार प्रदान

पुणे : भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फउंडेशन व डॉ. अब्दुल कलाम कौशल्य विकास केंद्र द्वारा आयोजित डॉ. कलाम प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले होते.  महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महा एनजीओ फेडरेशनचे  मुकुंद शिंदे राहुल जगताप आदी उपस्थित होते.  

शेखर मुंदडा म्हणाले, आयुष्यात कधीही तुम्ही अपयशी झालात तर हार मानू नका, कारण अपयशाचा अर्थ तुम्ही यश मिळविण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न असतो. दुसऱ्याला पराभूत करणे तर फार सोपे आहे. कठीण तर दुसऱ्याचे मन जिंकणे आहे.

ते पुढे म्हणाले, कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते, सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात. ही शिकवण भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी दिली आहे ती आपण अंगिकारली पाहिजे. येत्या काळात आपल्याला  ५ जी  वर काम करावे लागणार आहे ते म्हणजे गीता, गंगा, गोमाता , गुरु व गोविंद, असेही त्यांनी सांगितले. काशिनाथ भातगुणकी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.