Home Blog Page 1413

‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर !

  • ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
  • पुणे लोकसभेअंतर्गत सहा विधानसभा मतदार संघांचेही मोहोळ समन्वयक

पुणे- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे महत्वाकांक्षी अभियान असलेल्या ‘महाविजय २०२४’ साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत त्या अंतर्गत येणाऱ्या कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे ‘महाविजय २०२४’चे समन्वयकपद म्हणूनही मोहोळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणूनही मोहोळ हेच काम पाहणार आहेत.

नव्या जबाबदाऱ्यांबद्दल मोहोळ म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या आपण पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेतून पार पाडणार आहोत. संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन ‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न असेल. विश्वासाने या जबाबदाऱ्या सोपविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून धन्यवाद पक्ष श्रेष्ठींचा विश्वास निश्चितपणे आपण सार्थ करून दाखवू’.

राज्यातील प्रत्येक घरावर तिरंगा दिसेल : मोहोळ

स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत असून शासकीय पातळीबरोबर पार्टीच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षी या अभियानाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. यंदाही या अभियानाबाबत जनजागृती करुन राज्यातील प्रत्येक घरावर तिरंगा दिसेल, यासाठी आमचे सामूहिक प्रयत्न असणार आहेत.

भाजप काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर मीठ चोळत आहे, सत्य लपवू पाहत आहे : हिंदू महासंघ

पुणे :जम्मू-काश्मीर विधानसभेत ‘काश्मिरी स्थलांतरितां’साठी दोन जागा आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या विस्थापितांसाठी एक जागा राखीव ठेवण्यासाठी ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019’मध्ये केंद्र सरकार दुरुस्ती करीत असून हिंदू महासंघाने, ‘युथ ऑफ पनून काश्मीर ‘ ने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्राच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.भाजपच्या काश्मीर धोरणात ‘ ट्रस्ट डेफिसिट ‘ असून काश्मिरी पंडितांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या पुनर्वसन करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप राहुल कौल यांनी केला.

काश्मीरची समस्या नियंत्रणात येण्याऐवजी देशात विविध ठिकाणी काश्मीरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आनंद दवे यांनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ३ ऑगस्ट रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेला हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे , ‘ युथ ऑफ पनून काश्मीर ‘ संघटनेचे अध्यक्ष राहुल कौल तसेच राहुल आवटी हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

काश्मीरबाबतचे आमचे निवेदन राष्ट्रपती, तसेच सर्व खासदारांना पाठवणार आहोत, हिंदूच्या भावना समजून घेण्यात, आणि या भावनांना न्याय देण्यास भाजप सरकार कमी पडले आहे, असेही आनंद दवे यांनी सांगीतले. या आणि समकक्ष मुद्यांना मांडण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी न्यू इंग्लीश स्कुल सभागृहात ५ वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

काश्मीर पुनर्रचना विधेयक 26 जुलै रोजी लोकसभेत या सरकार ने मांडले आहे
यात 1989-90 रोजी काश्मीर मधील ज्या हिंदूंनी स्थलांतर (Migration ) केले असा उल्लेख आहे.हिंदूंचे ते स्थलांतर नव्हते,तर निष्कासन (Genocide ) होते,हे संपूर्ण जगाला ज्ञात असून सुद्धा केंद्र सरकार हे सत्य टाळत आहे.सरकार ने यात केलेल्या उल्लेख नुसार 46000 परिवार आणि 158900 नागरिकांनी स्थलांतर केलेआहे.
2 दिवसात असे घडलेले नाही, त्यामुळे ते स्थलांतर नसून जाणीवपूर्वक केलेले निष्कासन आहे.
तसेंच स्थलांतर चा उल्लेख करत असताना 1947/ 1965 आणि 1971 च्याच स्थलांतर चा उल्लेख आहे पण दुर्दैवी अशा 1989/90 चा मात्र उल्लेख पण नाही , हे संतापजनक आहे.याचा अर्थ स्पष्ट असून केंद्र सरकार हे १९८९-९० चे निष्कासन लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

विस्थापित लोकांसाठी 2 जागा राखीव ठेवणार आहे, ही निव्वळ फसवणूक आहे.

जम्मू -काश्मीरच्या विधानसभेमध्ये भाजपचे 25 आमदार होते… सत्ता होती तेव्हा त्यांनी या विस्थापित हिंदूंसाठी काय केल ? असाही प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.या पूर्ण विधेयका मधे या विस्थापित लोकांच्या पुनर्वसन साठी केंद्र काय करणार आहे , त्यांची बळकावलेली घरे, जमिनी त्यांना परत देण्यासाठी केंद्र काय करणार आहे हे याचा एका शब्दाने सुद्धा उल्लेख नाही , हे संतापजनक आहे.जर 370 कलम काढलं होतं, तर डोमिसाईल लॉ(Domicile law )आणून पुन्हा मागच्या दाराने पुन्हा 370 का आणलं गेलं ? असाही प्रश्न पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला विचारण्यात आला.काश्मीरच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सोडविण्याची केंद्र सरकार कडे इच्छा शक्ती नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली

“दादा कोंडके खरे असे होते” शक्ती कपूर यांनी सांगितली दादा कोंडके यांची एक खास आठवण

मराठी सिनेमातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलीवूडच्या भल्याभल्या निर्मात्यांनाही धडकी भरायची. दादांचा सिनेमा एकदा का थिएटरला लागला की तो किमान २५ आठवडे काही उतरायचा नाही हे समीकरणच होते. बॉलीवूडमधील नायकच नव्हे तर खलनायकही दादांच्या अभिनयावर फिदा होते. दादांविषयी भरभरून बोलणाऱ्यांच्या यादीत हिंदी कलाकारांचीही कमी नव्हती. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती आहे. यानिमित्ताने झी टॉकीज या वाहिनीवर “ज्युबिली स्टार दादा” हा दादांच्या ६ सुपरहिट सिनेमांचा सीझन ६ ऑगस्टपासून दर रविवारी सुरू होत आहे.

दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे तर कौतुक केले आहेच पण दादा एक माणूस म्हणून किती दिलदार होते यावरही त्यांनी मोहर उमटवली आहे. शक्ती कपूर या व्हिडिओत असं सांगत आहेत की, “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं. मीदेखील यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या सिनेमात काम केलं. या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक् झालो. दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता. आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते. आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं आणि माझं मन तृप्त केलं . गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही. ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय . एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी सिनेसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे.”

मराठी सिनेमाचे “शो मॅन” अशी ख्याती असलेल्या दादा कोंडके यांनी दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या सिनेमांची मेजवानी दिली. त्यापैकी ६ सुपरहिट सिनेमातून हास्याचे धबधबे ६ ऑगस्टपासून दर रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीजद्वारे प्रेक्षकांच्या घरात कोसळणार आहेत.

चित्रपटांचे वेळापत्रक ( दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता )

६ ऑगस्ट ‘येऊं का घरात’
१३ ऑगस्ट ‘सासरचं धोतर’
२० ऑगस्ट ‘राम राम गंगाराम’
२७ ऑगस्ट ‘ह्योच नवरा पाह्यजे’
३ सप्टेंबर ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’
१० सप्टेंबर ‘आली अंगावर’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ : मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेती, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सर्व ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ :  ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,  ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कवीवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 3 :- “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

बांगलादेश मुक्ती युद्धात सहभागी माजी सैनिकांच्या नातवांसाठी ‘मुजीब शिष्यवृत्ती’ योजना

पुणे, दि.३: बांगलादेश सरकारने १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पूर्व विभागामध्ये सहभागी झालेल्या भारतीय सेनेतील शहीद व जखमी सैनिक, सैन्य अधिकारी यांच्या नातवांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ व २०२२-२३ करीता सुरू केलेल्या ‘मुजीब शिष्यवृत्ती’साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी ते बारावी आणि पदवी अभ्यासक्रमात या दोन शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या नातवांसाठी बांगलादेश सरकारद्वारे एकवेळ शिष्यवृत्ती योजना ‘मुजीब शिष्यवृत्ती’ नावाने सुरु केली आहे. जिल्ह्यातील बांगलादेश युद्धात सहभागी शहीद, जखमी सैनिक व सैन्य अधिकारी यांच्या नातवांनी, अवलंबितांनी सर्व संबंधित कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) एस. डी. हंगे यांनी केले आहे.

अजित पवारांनी घेतला थेट CM शिंदेंच्या खुर्चीचा ताबा

मुंबई-अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यातच गुरुवारी एका कार्यक्रमात ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.मुंबईत मनोरा आमदार निवासात 40 व 28 मजल्याच्या 2 इमारती बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही इमारतीत प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस फुटांचा असणार आहे. त्यावर जवळपास 1300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी एक किस्सा घडला अन् त्यावर काही वेळातच संपूर्ण राज्यात चर्चेची झोड उठली.

मनोरा आमदार निवास भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे तथा अन्य आमदार उपस्थित होते. यावेळी अजित पवार स्टेजवर आले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले.

नेमके काय घडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी हजर राहणार होते. पण ऐनवेळी ते आले नाही. यामुळे शिंदेंची गैरहजेरी आणि अजित पवारांनी थेट त्यांच्या खुर्चीचा घेतलेला ताबा या दोन्ही गोष्टींची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगली आहे.अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचले तेव्हा ते व्यासपीठावरील आपल्या खुर्चीच्या दिशेने निघाले. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना मध्येच अडवून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण पवारांनी त्यास नकार दिला. त्यानंतर नार्वेकरांनी खुर्चीवरील मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाचे स्टिकर काढून टाकले. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाले.या प्रसंगाची गरमागरम चर्चा रंगल्यानंतर राहुल नार्वेकरांनी माध्यमांना निरर्थक चर्चेला प्रोत्साहन न देण्याची विनंती केली. आज राज्यासाठी गौरवशाली कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री वैयक्तिक अडचणीमुळे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यामुळे आपण निरर्थक गोष्टींना प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे, असे ते म्हणाले.

अंबादास दानवेंनी काढला चिमटा

या प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. ‘मला असं वाटतं की, त्यांच्याकडेच सर्व निर्णय आहेत, त्यांच्या मनात काही असू शकतं’, अशी मिश्किल प्रतिक्रीया दानवेंनी दिली आहे.

मुख्यमंत्री का अनुपस्थित ..

याविषयी शिंदे यांचे समर्थक भरत गोगावले याना छेडले असते त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हा कार्यक्रम उरकून घेण्याचे सांगितले होते, असे सांगितले. गोगावले यांनी सांगितले की, अंगात ताप व कणकण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. पण चौकशी केली, तेव्हा त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रम उरकुन घेण्यास सांगितले.

नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांनी युक्त ४० व २८ मजली इमारती

मुंबई, दि. ३ : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.

असे असेल नवीन आमदार निवास :

या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.

प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस फुटांचा

मनोरा आमदार निवासात 40 व 28 मजल्यांच्या 2 इमारती बांधण्यात येणार आहेत. दोन्ही इमारतीत प्रत्येकी 1000 चौरस फुटांची सदनिका असेल. या इमारतींच्या बांधकामावर 1300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवाससाठी या इमारती बांधण्यात येणार आहेत.

कसे असेल नवे आमदार निवास?

  • नव्या आमदार निवासाचे 2 मोठे टॉवर असतील.
  • 1 इमारत 28 मजली, तर दुसरी इमारत 40 मजली असेल.
  • 13 हजार 429.17 चौरस मीटर भूखंड क्षेत्र आहे.
  • मनोरा आमदार निवासासाठी तब्बल 5.4 एफएसआय देण्यात आला आहे.
  • प्रस्तावित बांधकाम बिल्टअप 7 लाख 21 हजार 956.06 चौरस मीटर एवढे असेल.
  • नव्या आमदार निवासात प्रत्येक आमदाराला 1 हजार चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे.
  • नव्या आमदार निवासात सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ खोल्या असतील.
  • एकूण ८०९ वाहने पार्क करण्याची क्षमता असणार आहे.

कोणकोणत्या सुविधा असणार?

  • स्वयंपाकगृहे
  • बहुपयोग हॉल
  • प्रत्येक मजल्यावर कॉन्फरन्स हॉल
  • व्हीआयपी लाऊंज
  • फिटनेस सेंटर
  • कॅफेटेरिया
  • बिझनेस सेंटर
  • कॅफेटेरिया
  • बुक स्टोअर
  • लायब्ररी
  • मिनी थिएटर

मोहिनीअट्टम आणि कर्नाटकी संगीत यावर विनामूल्य कार्यशाळा

प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. दीप्ती भल्ला यांचे मार्गदर्शन : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यावतीने आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने मोहिनीअट्टम नृत्यशैली आणि कर्नाटकी संगीत या विषयावर विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता, एरंडवण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सेमिनार हॉल मध्ये ही कार्यशाळा होणार आहे. अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक शारंगधर साठे यांनी दिली.

डॉ. दीप्ती भल्ला या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. दीप्ती भल्ला या मोहिनीअट्टमच्या प्रख्यात नर्तक, संशोधक आणि शिक्षिका आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्या प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ असून पारंपारिक कर्नाटक संगीतावर सखोल संशोधन करत आहेत.  त्यांनी  संशोधन निष्कर्षांचे नृत्यदिग्दर्शन करून मोहिनीअट्टम नृत्य शैलीचा विस्तार आणि वाढ करण्यात मोठे योगदान दिले आहे.

कार्यशाळेसाठी विनामूल्य प्रवेश असून सहभागी होण्यासाठी ०२०२९९९९६९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत ५६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्ष  2022-23 करिता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना 5 हजार 654 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून  लागू करण्यात आली  आहे. या योजनेअंतर्गत, दर वर्षी 6000 रुपयांचा आर्थिक निधी तीन समान भागांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. आतापर्यंत देशभरातील 11 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेतून 2 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना  आतापर्यंत 24093.431 कोटी रुपये  हस्तांतरित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना  आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 436.815 कोटी, वर्ष 2019-20 मध्ये 4,898.806 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 6671.801 कोटी ,  वर्ष  2021-22  मध्ये 6431.384 कोटी तर वर्ष 2022-23 मध्ये 5654.625 कोटी रुपये  इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. तोमर यांनी लोकसभेत दिली.

सातारा जिल्ह्यातील पीएम-किसान सन्मान निधी लाभार्थ्यांना 1295.95 कोटी रुपयांचे वितरण

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) पात्र लाभार्थ्यांची संख्या 5,49,385 आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना 1,252.95 कोटी रुपये वितरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. तोमर यांनी  लोकसभेत दिली.

स्वातंत्र्य लढ्यातील शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे- डॉ. शरद कुंटे

पुणे–देशातील गरिबी, अज्ञान, रूढिप्रियता यातून तत्कालीन समाजाला बाहेर काढण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे होते, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ( डीईएस ) नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. शरद कुंटे यांनी काल येथे व्यक्त केले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, विज्ञान भारती, आझादी का अमृत महोत्सव आणि फर्ग्युसन महाविद्यालय ( स्वायत्त ) यांच्या वतीने लोकमान्य टिळक आणि शास्त्रज्ञ आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र राय यांच्या जयंतीनिमित्ताने ‘ स्वातंत्र्य लढ्यातील शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावर डॉ. कुंटे बोलत होते. ‘

विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्राचे सचिव श्री. श्रीप्रसाद, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, प्रा. नारायण कुलकर्णी, शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, ‘ केवळ स्वातंत्र्य मिळवून गरिबी दूर होणार नाही. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, निर्यात वाढ या मार्गाने देशापुढचे आर्थिक प्रश्न सुटतील याची शास्त्रज्ञांना जाणीव होती. त्यासाठी विज्ञानातील ज्ञान उपयुक्त ठरले.

कुंटे पुढे म्हणाले, ‘ भारत हा मागासलेला देश आहे हा ब्रिटिशांनी निर्माण केलेला गैरसमज धुवून काढण्याचे काम शास्त्रज्ञांनी केले. इंग्रज येण्यापूर्वी भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, औषधशास्त्र, आरोग्य सुरक्षा किती प्रगत होत्या हे शास्त्रज्ञांनी जगाला पटवून दिले. त्यासाठी डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे कार्य महत्त्वाचे आहे. ‘

श्रीप्रसाद म्हणाले, ‘ भारतात राज्य करण्यासाठी इंग्रजांनी आधुनिक विज्ञानाचा माध्यम म्हणून उपयोग केला. त्याला विज्ञानानेच प्रत्युत्तर देण्याची गरज लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी ओळखली. टिळकांनी ‘ गीता रहस्य ‘ या ग्रंथात आणि विवेकानंदांनी पाश्चात्य देशात हिंदू धर्म समजावून सांगण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला असल्याचे दिसून येते. ‘

या वेळी ‘ सृष्टिज्ञान ‘ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मानसी माहेगावकर यांनी सूत्रसंचालन आणि प्राचार्य कुलकर्णी यांनी स्वागत केले.
स्वातंत्र्य लढ्यात वैज्ञानिक आणि विज्ञान संस्थांचे योगदान

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि विज्ञान भारतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘ स्वातंत्र्य लढ्यात वैज्ञानिक आणि विज्ञान संस्थांचे योगदान ‘ या विषयांवर परिसंवाद, ग्रंथ प्रकाशन, प्रदर्शन आणि ब्लॉग लिहिणे, कोडी सोडविणे, लघुचित्रफित तयार करणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्रीप्रसाद यांनी सांगितले.

ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जळगाव-

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

ना. धों. महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीते आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध करणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.

नामदेव धोंडो महानोर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होय.

मराठी कवितेच्या प्रांतातला भावशील कवी..
ना.धों. महानोर म्हटलं की, रानातल्या, शेतातल्या निसर्ग सौंदर्याचा आविष्कार व्यक्त करणारा भावकवी. आपल्या जगण्याचं सूत्र निसर्गाच्या कलात्मकतेत शोधणारा संवेदनशील मनाचा कवी.
‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’, ‘नांगरून पडलेली जमीन’, ‘नदीचा काठ’, ‘पक्षांचे लक्ष थवे’, ‘झाडे झाली हिरवीशी’ आणि ‘मन चिंब पावसाळी’ या त्यांच्या निसर्गकविता आपल्या मनाला खूप भावतात.
तर ‘चवळीची शेंग’, ‘विस्तीर्ण नदीचा काठ’, ‘पोर तोऱ्यात ऐन भरात’, ‘नुकत्या न्हालेल्या केसांना’ आणि ‘माळ्याच्या मळ्यात’ या प्रेमभावनेच्या कविता प्रेमातील विविध भावछटा दाखवितात. लोकपरंपरेतल्या लोकधारेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडणारा हा कवी जात्यावरची ओवीशी नातं जोडणारा होता.
महानोरांच्या गीतात्म कविता तर आमच्या विद्यार्थीदशेतपासून हृदयात ठाण मांडून आहेत मांडून आहेत. मराठीतल्या अनेक चित्रपटातील त्यांची गाणी म्हणजे मनाला भावणारी लोकगीतेच. ‘ हिरव्या पानात पानात’, ‘ घन ओथंबून येती’, ‘आज उदास उदास’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘दूरच्या रानात’, ‘चिंब पावसानं रान’ या त्यांच्या गीतात्म कविता आजही आपले भान हरपून टाकतात.
शिवाजी विद्यापीठाने याचवर्षी बी.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमात महानोरांच्या कविता आणल्या आहेत. या कवितेवर बोलण्याची संधी आली आणि आज अचानक महानोर गेले. खूप दुःखदायक घटना.
त्यांना भावपूर्ण आदरांजली..

अजित पवार मुख्यमंत्री होणार का? फडणवीस म्हणाले – आम्ही तिघेही आहे त्याच पदावर राहणार

मुंबई- काही दिवसांपासून राज्यात अजित पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी आहे त्याच पदावर राहणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणालेत.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.

2019 हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचे ठरले. यात अनेकांनी विक्रम केलेत. आमचे पहिले हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले. ते आता मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवत आहेत. त्यानंतर अजित पवार हे आमचे दुसरे हिरो आहेत. प्रथम ते माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांसोबत उपमुख्यमंत्री झाले. नंतर ते विरोधीपक्षनेते झाले. आता आमच्यासोबत पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.

त्यांच्या खालोखाल माझा क्रमांक आहे. अगोदर मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. पण आता यात कोणताही बदल होणार नाही. आता आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार आहोत. आम्ही आमच्या जबाबदारीवर समाधानी आहोत, असे फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे – फडणीस सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. यावर फडणवीस यांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. पण गुरुवारी विधानसभेत बोलताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील नेतृत्वबदलाची चर्चा फेटाळली होती. ते म्हणाले होते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. मी व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांनी स्वतःचे समाधान करण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असतील.

भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाटा मेमोरियल सेंटरच्या “प्रत्येकाला आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग चिकित्सा आणि शुश्रूषा” केंद्रांची महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने, राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सुरुवात

मुंबई, 2 ऑगस्ट 2023

कर्करोग रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात आणि सहज उपलब्ध अशी उपचार सुविधा, हे मोठेच आव्हान असते. मात्र, कर्करोग चिकित्सा परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध व्हावी, तसेच कर्करोग प्रतिबंधक काळजी घेऊन, कर्करुग्णांचे प्रमाण कमी करता यावे, या दृष्टीने, टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने  महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने, “प्रत्येकाला आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग चिकित्सा आणि शुश्रुषा” असा प्रकल्प सुरू केला होता, जेणेकरून, जिल्हा स्तरावरील आरोग्य संस्थांमधे, कर्करोग शुश्रूषा सेवा अधिक मजबूत केली जाऊ शकेल.

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमधे जून 2016 पासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात, सहा जिल्ह्यात प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमधे देखील त्याचा विस्तार करण्यात आला आहे.

डॉ. राजेंद्र बडवे, (टीएमसीचे संचालक), डॉ. श्रीपाद बाणावली, (शैक्षणिक संचालक, टीएमसी), डॉ. विजय बाविस्कर (सहसंचालक, एनसीडी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र) आणि डॉ. पंकज चतुर्वेदी (उपसंचालक, केंद्र) कॅन्सर एपिडेमियोलॉजीसाठी, प्रोफेसर, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी सर्जन, टीएमसी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेड अँड नेक ऑन्कोलॉजिक सोसायटीजचे संचालक) यांनी सोमवारी, म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी  या प्रकल्पाचा दुसरा टप्पा उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे, अशी अधिकृत घोषणा केली.

या प्रकल्पाअंतर्गत, दरवर्षी 27 जुलै रोजी येणाऱ्या वर्ल्ड हेड अँड नेक कॅन्सर डे (डोके आणि मानेच्या कर्करोग जागतिक दिन)चे औचित्य साधत,  मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दंत शल्यचिकित्सकांसाठी एका वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अंतरिम प्रकल्प अहवालाचे प्रकाशन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, जिल्हा स्तरावर मुखाच्या कर्करोगाच्या सेवा बळकट करण्यासाठी, महाराष्ट्र ओरल कॅन्सर वॉरियर्सचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स (MCWs) हा कर्करोग तज्ञांचा एक स्वयंसेवी गट आहे ज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी विद्यार्थी असून ते त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये सेवा देत आहेत. वैद्यकीय आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये जिल्हा सिव्हिल रुग्णालयात मोफत सेवा देण्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्सनी एक अभिनव पुढाकार घेतला आहे.

कर्करोग प्रतिबंध आणि सामान्य कर्करोगाचे लवकर निदान, तपासणी आणि प्रतिबंध यासाठी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी आणि महाराष्ट्राच्या जिल्हा सिव्हिल रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी कौतुक केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एनसीडीचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या कर्करोग नियंत्रण उपक्रमांची माहिती दिली.

टीएमसीचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बाणवली यांनी आपल्या बीजभाषणात एनसीडी स्क्रीनिंगचे महत्त्व आणि कर्करोग प्रक्रियेचा अभ्यास करून जिल्हा स्तरावर कर्करोग उपचार सेवा कशी सुधारता येईल याबद्दल माहिती दिली.

डॉ. पंकज चतुर्वेदी (उपसंचालक, कॅन्सर एपिडेमिओलॉजी सेंटर, प्राध्यापक, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी सर्जन, टीएमसी, आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेड अँड नेक ऑन्कोलॉजिक सोसायटीचे संचालक) यांनी “सर्वांसाठी परवडणाऱ्या कॅन्सर केअरमध्ये प्रवेश” अंतर्गत महाराष्ट्र ओरल कॅन्सर वॉरियर्स आणि कर्करोग नियंत्रण उपक्रम सुरू करण्यामागील संकल्पना स्पष्ट केली.

या वैज्ञानिक कार्यशाळेत महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय दंत महाविद्यालयांचे डॉक्टर आणि इतर खासगी संघटनांचे 200 प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुखाच्या कर्करोगाच्या सामान्य आणि घातक स्थितीचे निदान आणि डोके व मान कर्करोगतज्ज्ञ सर्जनद्वारे मुखाच्या बायोप्सी तंत्रांचे प्रात्यक्षिक हे कार्यशाळेचे ठळक वैशिष्ट्य होते.