Home Blog Page 1388

इफ्फी:अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते 17 व्या चित्रपट बाजाराचे उद्घाटन

गोवा 20 नोव्‍हेंबर 2023

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या शुभारंभ दिनी आज गोव्यातील पणजी येथे आयोजित कार्यक्रमात   केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी  चित्रपट बाजार या सर्वात मोठ्या दक्षिण आशियाई चित्रपट बाजाराचे उद्घाटन केले .

या प्रसंगी बोलताना अनुराग सिंह ठाकूर  म्हणाले की हा चित्रपट बाजार म्हणजे संकल्पनांची गजबजलेली बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील चित्रपट निर्माते, उत्पादक आणि कथाकार यांच्यासाठी हा बाजार म्हणजे स्वर्गासमान आहे. हा चित्रपट बाजार म्हणजे या जोमाने बहरणाऱ्या चित्रपट बाजारपेठेच्या घडणीचे घटक असलेल्या सर्जनशीलता आणि व्यापारी वृत्ती, संकल्पना आणि प्रेरणा या तत्वांचा अपूर्व संगम आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.  

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की वार्षिक 20. टक्के विकासदरासह भारतीय माध्यमे आणि मनोरंजन उद्योग जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक जागतिकीकरण झालेला उद्योग म्हणून नावाजला जात आहे.चित्रपट बाजार या उपक्रमाचे हे 17 वे वर्ष असून हा बाजार म्हणजे इफ्फी महोत्सवाची अविभाज्य कोनशीला झाली असून यातून देशांच्या सीमा ओलांडून हा उपक्रम आशियातील सर्वात मोठ्या चित्रपट बाजारपेठेच्या स्वरुपात उत्क्रांत पावत आहे असे त्यांनी पुढे सांगितले.   

चित्रपट बाजारात प्रदर्शित करण्यासाठी निवड झालेल्या चित्रपटांतून काल्पनिक कथा, माहितीपट वजा लघुकथा, माहितीपट, भयकथा आणि अगदी अॅनिमेटेड चित्रपट यांचे वैविध्यपूर्ण मिश्रण दिसून येत आहे. या चित्रपटांचे विषय विविध समुदाय, पितृसत्ताक पद्धती, शहरी भागातील अस्वस्थता, टोकाचे दारिद्रय, हवामानाशी संबंधित संकटे, राष्ट्रीयत्व, क्रीडा तसेच तंदुरुस्ती यांसारख्या सार्वत्रिक संकल्पनांवर आधारित आहेत.


सह-निर्मिती बाजाराबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्ही सह-निर्मिती बाजार विभागात 7 देशांतील 17 वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या 12 माहितीपट अत्यंत अभिमानाने सादर करत आहोत. चित्रपट निर्मात्यांच्या नजरेतून सत्याच्या हृदयापर्यंतचा हा प्रवास असेल.”

व्ह्यूईंग रुम नामक व्हिडिओ संग्रहालय मंचावरील सादरीकरणासाठी 190 प्रवेशिका आल्या असून चित्रपट बाजार शिफारस (एफबीआर) साठी त्यातील काही चित्रपट निवडले जातील अशी माहिती देखील त्यांनी दिली. “वर्क-इन-प्रोग्रेस प्रयोगशाळेमध्ये चित्रपट निर्माते त्यांच्या कामाचे खरेखुरे सौंदर्य दाखवून देतात. या उपक्रमातील प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट करत यंदा 10 प्रकल्प सादरीकरणासाठी सज्ज आहेत,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

केन्द्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी असेही जाहीर केले की, नवोन्मेषाचा पुरस्कार, आणि पंतप्रधानांचे व्यवसाय सुलभतेचे आवाहन, याला अनुसरून “बुक टू बॉक्स ऑफिस” हा एक नवीन आकर्षक उपक्रम सुरु करण्यात आला असून, यामध्ये पुस्तकांमधून थेट चित्रपटांच्या पडद्यावर झेप घेणाऱ्या 59 सादरीकरणांचे प्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिंदी गुगल कला आणि संस्कृती प्रदर्शनाचे उद्घाटन केले, जे हिंदी चित्रपटांच्या प्रतिमा आणि लघु चित्रफितींचे ऑनलाइन केंद्र आहे.

54 व्या इफ्फी मधील ‘फिल्म बझार’ मध्ये शिफारस करण्यात आलेले माहितीपट, भयपट, हवामान बदलाची समस्या, काल्पनिक कथा, यासारख्या विषयांवरचे विविध शैलीतील 10 चित्रपट प्रदर्शित केले जातील. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंडची भाषा) या भाषांमध्ये आहेत. या वर्षीच्या, फिल्म बझारमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले “VFX आणि टेक पॅव्हेलियन” आहे. चित्रपट निर्मात्यांना नवोन्मेषाची जाणीव करून देणे, तसेच केवळ “शॉट घेण्याच्या” पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर “शॉट निर्माण करून’ गोष्ट सांगण्याची शक्यता आजमावण्याची संधी देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

फिल्म बझारमध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, यूएसए, यूके, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, पोलंड, लक्झेंबर्ग आणि इस्रायलमधील सह-निर्मिती बाजाराने अधिकृतपणे निवड केलेल्या पूर्ण लांबीच्या चित्रपट प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाते. ओपन पीच (खुला मंच) मध्ये, निवडक चित्रपट निर्माते आंतरराष्ट्रीय आणि भारतीय निर्माते, वितरक, महोत्सवाचे आयोजक, अर्थ पुरवठादार आणि विक्री एजंट यांच्यापुढे आपले प्रकल्प सादर करतील.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) सुरु केलेला फिल्म बझार, दक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या चित्रपट बाजारपेठेमध्ये विकसित झाला असून, तो स्थानिक चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट निर्माते आणि वितरकांशी जोडत आहे. 

‘कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने 54 व्या इफ्फीचा प्रारंभ

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते चित्रपट कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार

गोवा 20 नोव्‍हेंबर 2023

चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही  एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे. गोवा येथे आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) “कॅचिंग डस्ट” या चित्रपटाने प्रारंभ झाला, या चित्रपटाने हीच भावना कायम ठेवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चित्रपटाच्या आकर्षक कथानकाने अनोख्या दृश्य कलात्मकतेसह, चित्रपटाचा एक विलक्षण प्रवास दाखवला.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खचाखच भरलेल्या सिनेमागृहात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, डॉ एल मुरुगन यांनी चित्रपटातील कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार केला.

स्टुअर्ट गॅट दिग्दर्शित, या चित्रपटात एरिन मोरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोसे अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फ्युरे या कलाकारांचा समावेश आहे. मिश्र आशियाई संस्कृतीचा वारसा लाभलेले दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट हे  पुरस्कार-विजेते ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आहेत.  ज्यांच्या चित्रपटाचे कथानक  बर्‍याचदा सामाजिक विषयांवर प्रभाव टाकणारे असते.

चित्रपटाचे कथानक: 96 मिनिटांचा हा चित्रपट टेक्सासच्या बिग बेंडच्या दुर्गम  वाळवंटातील नाट्य  आहे. यात    एकाकी आणि दबून  जगणारी  जीना  आणि तिचा गुन्हेगार नवरा क्लॉइड काहीसे अनिच्छेने एकमेकांसोबत या वाळवंटात राहात असतात. पतीच्या वर्तनामुळे वैतागलेली जीना   निघून जाण्याचा निर्णय घेते,तेव्हा  अचानक  न्यूयॉर्कमधून एक दाम्पत्य  तेथे येते. या दांपत्याच्या तिथल्या  उपस्थितीमुळे उद्भवणाऱ्या  धोक्यांकडे दुर्लक्ष करून,  त्यांना तिथे राहू देण्यासाठी क्लॉइडला  पटवून देते. ज्याचे सर्वांसाठी धोकादायक परिणाम होतील असा हा निर्णय असतो.  स्पष्ट निराशा आणि हताश मानसिकतेचा  सामना करताना निराशेच्या पलीकडील समाधान शोधण्याच्या खोलवरच्या पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांना मोहित करतो.

पुण्यातील बड्या बिल्डरकडून साडेतीन हजार कोटींचा कथित घोटाळा-किरिट सोमय्या यांची तक्रार


मुंबई- भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने मुलुंड (पूर्व) येथील बैगनवाडी, शिवाजीनगर, चित्ता कॅम्प, गोवंडी तसेच कुर्ला येथील सुमारे साडेसात हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकेने हे काम पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला दिले असून त्या कामासाठी ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, त्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन हजार कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

सोमैय्या यांनी या तक्रारीत महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यावरही आरोप केले आहेत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नेमके काय म्हटले आहे ते पहा …


अकोला जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीची कसून चौकशी करा – डॉ.नीलम गोऱ्हे

0

अमरावतीच्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले निर्देश.

मुंबई-अकोला जिल्ह्यातील गणेश कुमरे या गावगुंडाने १४ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार केल्याच्या घटनेची डॉ.नीलम गोऱ्हे,उपसभापती,महाराष्ट्र विधानपरिषद यांनी दखल घेत अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत.
सदर घटनेत आरोपीने पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करून धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. हा अत्यंत अमानवी असून व माणुसकीला काळीमा फासणारा आहे या शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ श्री संदीप घुगे, अकोला पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सदर आरोपीला अटक केले असून पीडितेला वैद्यकीय मदत मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी डॉ.गोऱ्हे यांनी श्री.जयंत नाईकनवरे,विशेष पोलिस महानिरीक्षक ,अमरावती परिक्षेत्र यांना निर्देश दिले आहेत.

दिलेले प्रमुख निर्देश

  • पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी.तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी तिला सहकार्य करावे.
  • आरोपीला जामीन मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
  • आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे समजते. त्यामुळे या घटनेशी संबंधित आरोपी आणि त्याचे साथीदार व इतर धागेदोरे याबाबत कसून चौकशी करून त्याच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करण्यात यावे.
  • सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्ट मध्ये दाखल करावे.
  • या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा.

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर!


लवकरच ८१८ वा प्रयोग

सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी नाट्यसृष्टी ढवळून निघाली. राष्ट्रपिता समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामची बाजू मांडणाऱ्या या नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार कै. प्रदीप दळवी यांनी केले आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याचे धाडस मराठी रंगभूमीवरील त्यावेळचे डॅशिंग दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आणि नाटकावर बंदी आणण्याचे सत्र सुरू झाले. तरीही माऊली प्रॉडक्शन्सचे संचालक आणि नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक कोर्टाच्या विवादातून मुक्त केले. नाटक सेन्सॉर संमत करावे लागले. त्यानंतरही अनेक वेळा या नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला, नाटकाची बसही सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाले, त्यातील एक यशस्वी ठरला; परंतु तरीही रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारे उदय धुरत नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी सातत्याने प्रयोग सुरूच ठेवले. नाटकावर जेव्हा जेव्हा गंडांतर आले तेव्हा तेव्हा त्यांनी न्यायालयीन लढा दिला. न्यायदेवतेनेही त्यांना योग्य न्याय मिळवून दिला असे म्हणायला हरकत नाही. नवीन कलाकारांना त्यांनी या नाटकात त्यावेळी संधी दिली आणि नाटकाबरोबरच त्यांनाही मोठे केले. मध्यंतरीच्या काळात माऊली प्रॉडक्शन्सने नाटक काही कारणास्तव थांबवले तेव्हा ८१७ प्रयोग धडाडीने पूर्णत्वास नेले होते. मात्र पुन्हा एकदा माऊली प्रॉडक्शन्सच्या ओरिजनल नाटकाचा लवकरच ८१८ वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून कै. विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या वैचारिक आणि कलात्मक बैठकीचा प्रभाव त्यांच्या या नाटकात पाहायला मिळेल. नथुराम यांच्या वयाच्या जवळपास जाणाऱ्या वयाचा अभिनेता त्यांना या नाटकासाठी हवा होता, तो शोध आता पूर्ण झाला आहे.

नव्या नाटकात संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम, जाहिरात संकल्पना अक्षर कमल शेडगे अशी तंत्रज्ञांची चांगली फळी काम करीत आहे. नाटकाच्या मागे उभे असणारे आणि गेली ५० वर्षे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते उदय धुरत, निर्मिती सूत्रधार श्रीकांत तटकरे, निर्मिती प्रशासक चैतन्य गोडबोले, तसेच निर्मिती सहाय्यक प्रणित बोडके, सूत्रधार भगवान गोडसे यांचे योगदान महत्वाचे आहे.

या नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर विविध व्यक्तिरेखा साकारत असून नथुराम गोडसेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले झळकणार आहे. नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून नव्या तंत्रांसह, नव्या ढंगात, तितक्याच ताकदीचा आणि वेगळ्या धाटणीचा ‘दुसरा नथुराम’ ८१८ वा प्रयोग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अपहरण,खंडणी,जबरी चोऱ्या करणाऱ्या अंकुश थोरात आणि टोळीवर मोक्काची कारवाई

पुणे- अपहरण करून जबरी चोऱ्या करणा-या अंकुश थोरात (टोळी प्रमुख) व त्याचा साथीदार याचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती येथे पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणातील एका गुन्ह्याची माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे कि,’ एक फिर्यादी हे दिनांक २६/१०/२०२३ रोजी पवळे चौक कसबा पेठ पुणे जवळील मेट्रो स्टेशन येथील बांधकाम साईटवर काम करतात फिर्यादी त्यांचे मित्र अमोल राजेंद्र गुजर, जनार्दन यादव यांचे सह ते चहा पिण्यासाठी पवळे चौक येथे गेले असता चहा पिऊन पुन्हा साईटवर चालत जात असतांना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना धक्का दिला त्यानंतर त्या दोन अनोळखी इसमापैकी एकाने मला “तु धक्का का दिला त्यामुळे माझी चप्पल तुटली असे म्हणून ते दोघे फिर्यादी बरोबर भांडण करू लागले. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्या दोन इसमांना खुप समजवण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांची आम्ही माफी मागीतली तरी देखील ते दोघे हे माझ्या बरोबर भांडण करत होते. त्यावेळी फिर्यादी यांचे मित्रांना फोन आल्याने ते दोघेही फोनवर बोलत आमच्या पासून थोडे अंतर पुढे चालत गेले त्यावेळी अनोळखी इसमांनी एक रिक्षा थांबवली व जबरदस्तीने फिर्यादी यांना रिक्षा मध्ये बसवून डांबून ठेवले. त्यानंतर त्या इसमांनी रिक्षामध्ये त्यांचे जवळील चाकु दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मोबाईल फोन व गुगल-पे किंवा फोनपे चा पासवर्ड विचारून फोन-पे अॅपद्वारे २०,३००/- रुपये ट्रान्सफर केल्याने. यांचे विरुध्द फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने फरासखाना पोलीस ठाणे गुरनं. २१६/२०२३, भा. द. वि. कलम ३६४ (अ),३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी १) अंकुश सुर्यकांत थोरात, वय-२९ वर्षे रा. गल्ली नं.२०, ताडीवाला रोड, पुणे, मुळ रा. गल्ली नं.६, मुकुंदवाडी, आंबिकानगर, औरंगाबाद (टोळी प्रमुख) २) मिथुन शिवदास कांबळे, वय-३० वर्षे, रा. १३, ताडीवाला रोड, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
गुन्ह्याचे तपासा मध्ये सदर आरोपी अंकुश सुर्यकांत थोरात (टोळी प्रमुख) याने प्रत्येक गुन्हयात वेग- वेगळे साथीदारांसह गुन्हे करुन, त्याव्दारे त्याचे टोळीच्या अवैद्य आर्थिक फायदयासाठी सदरचे गुन्हे केलेले आहे असे आढळून आले , सदर टोळीचे पुणे शहरात, पिंपरी व औरंगाबाद शहर हे गुन्हेगारी कार्यक्षेत्र असल्याने त्यांच्या गुन्हेगारी कारवायामुळे तेथे दहशत निर्माण झालेली आहे.सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांचेविरुध्द जबरी चोरी, अपहरण करुन खंडणी मागणे असे गुन्हे दाखल असून तो त्याचे टोळीची दहशत निर्माण करुन परिसरात त्याचे वर्चस्व निर्माण करीत आहे. तसेच स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना टोळीतील सदस्याचे मदतीने अपहरण करुन खंडणी मागणे दहशत निर्माण करणे असे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
नमुद गुन्हयाच्या तपासा दरम्यान टोळी प्रमुख व त्याचे साथीदार याने संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आलेने दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब चुडाप्पा यांनी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१ श्री. संदिपसिंह गिल यांचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून फरासखाना पोलीस ठाणे गुरनं.२१६/२०२३, भा.द.वि.कलम ३६४(अ),३९२,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास फरासखाना विभागाचे सहा. पोलीस आयुक्त, अशोक धुमाळ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे, संदिपसिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक, (गुन्हे),मंगेश जगताप, श्रीमती अनिता हिवरकर, सहा. पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक, निलेश मोकाशी, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, तुषार खडके, अजित शिंदे, पंकज देशमुख व शशिकांत ननावरे यांनी केलेली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ८७ वी कारवाई आहे.

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

0

मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, जुन्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पांढरे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आंबेगाव पठारावरील २३ वर्षीय तरुणाचा खून, नऱ्हेतील तरुणाला अटक

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रुपेश (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या खून प्रकरणी अनिकेत मुकुंद परदेशी, वय २८ वर्षे रा. अभिनव कॉलेज रोड नंदनवन सिटी, न-हे, पुणे यास पोलिसांनी पकडले असून त्यास अटक करण्यात आली आहे

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. सौरभच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे कारण समजू शकले नाही. सहा.पो.निरी.राहूल यादव ९५५२१६०७२०.याप्रकरणी तपास करत आहेत .

अजित गटाने खोटे शपथपत्र सादर केल्याचा अभिषेक मनु सिंघवींचा आरोप; पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी सुरू झाली आहे. आजची सुनावणी सुमारे पाऊन तास झाली. तर पुढील सुनावणी शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अजित गटाने चुकीची शपथपत्रे दाखल केले आहेत.अजित पवार गटानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी ९ हजार प्रतिज्ञापत्र बोगस आहेत. मृत व्यक्ती, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, एलआयसी एजंट, जिल्ह्यात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्र दिली आहेत, हा गैरप्रकार असल्याचं सिंघवी म्हणाले. एकाही प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना नेता मानताना शरद पवार यांना नेता मानत नसल्याचं म्हटलेलं नाही. अजित पवार गटाची याचिका ही चुकीची असल्यानं फेटाळली जावी, असा युक्तिवाद केल्याचं सिंघवी यांनी सांगितलं. आता या प्रकरणी २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचं सिंघवी म्हणाले.अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांना प्रताप चौधरी यांची ओळख करुन दिली. अजित पवार गटानं २६ ऑक्टोबरच्या सुनावणीत प्रताप चौधरी हे त्यांना समर्थन करत असल्याचं म्हटले. त्यांना हे माहिती मिळाल्यानंतर ते निवडणूक आयोगात आले आणि शरद पवार यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं. प्रताप चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत, असं अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं. शरद पवार हे माझे नेते असल्याचं प्रताप चौधरी म्हणाले.अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की निवडणूक आयोगानं अजित पवार गटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, त्यांना ते अधिकार आहेत, असं सांगितलं आहे. अजित पवार गटाची याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद केल्याचंही ते म्हणाले.

देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान

मुंबई : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र शासना कडून राबविण्यात येत असून या मोहिमेचे उढ़घाटन माननीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा खूंटी, झारखंड येथे जनजाति गौरव दिना चे औचित्य साधुन करण्यात आले.

देशातील खतनिर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य  नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायज़र्स लिमिटेड सह विविध खत उत्पादक कंपन्या या मोहीमेत सहभागी आहेत. कृषि क्षेत्रात अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे नॅनो यूरिया, नॅनो डीएपी आणि अन्य सूक्ष्म पोषक खतांची फवारणी प्रात्यक्षिका बरोबर रासायनिक खतांचा अनावश्यक दुरुपयोग टाळुन मातीचे योग्य आरोग्य राखण्यासाठी खतांचा संतुलित वापर यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. आरसीएफ़च्या वतीने यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व शेतकर्यांसाठी मृदा परिक्षण, कृषि प्रदर्शन व मेळावे, पीकप्रात्यक्षिक वगैरे कार्यक्रम नेहमी राबवले जातात.

ही मोहीम भारत सरकार अंतर्गत येणारया विविध मंत्रालयांमार्फत राबविण्यात येत असून माहिती व प्रसारण मंत्रालय, कृषि मंत्रालय व उर्वरक विभाग यांच्या विशेष सहभागातून होत आहे. सदर मोहिमेचा उद्देश्य हा केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत असणारया विविध लोकाभिमुख योजनांची माहिती जनसामान्या पर्यंत पोहोचविणे हा आहे. या उपक्रमाची सुरुवात भारतातील सर्व आदिवासी जिल्ह्यातुन करण्यात आली असून दिनांक २४ जानेवारी, २०२४ पर्यंत हा उपक्रम देशभर राबवला जाणार आहे.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे 70 वा सहकार सप्ताह साजरा

पुणे, 20 नोव्हेंबर 2023

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे ने 14 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 70 वा सहकार सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला आणि संपूर्ण आठवडाभर सहकार केंद्रित उपक्रम राबवले. या वर्षी सहकार सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना “भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास उद्दिष्टे बनवण्यात सहकारी संस्थांची भूमिका” होती. 14 नोव्‍हेंबर 2023 रोजी सहकार चळवळीतील दिग्गज वैकुंठ मेहता यांना श्रध्दांजली अर्पण करून सहकार सप्ताह सोहळा सुरू झाला आणि त्यानंतर सहकारी संस्थेचे निबंधक श्री आर.के. मेनन यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण झाले.

“सहकारातील अलीकडील विकास” या सादरीकरणाने पहिल्या दिवसाच्या उपक्रमाची सुरुवात झाली. डॉ. ए.के. अस्थाना, सहयोगी प्राध्यापक यांनी देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी सहकार मंत्रालयाने घेतलेल्या 54 प्रमुख उपक्रमांवर सादरीकरण केले. डॉ. ए.के. अस्थाना यांनी सहकार मंत्रालयाने आतापर्यंत पूर्ण केलेल्या 28 प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला. बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था, नवीन सहकार धोरण, राष्ट्रीय सहकारी डेटा बँक, निर्यात क्षेत्रातील 3 नवीन बहुराज्यीय सहकारी संस्था, बियाणे आणि सेंद्रिय उत्पादनांची तपशीलवार माहिती ठळक करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला ज्यामध्ये आमच्या  पंतप्रधानांनी सांगितलेल्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या जीडीपी  साध्य करण्यासाठी त्यांचे योगदान देण्यासाठी सहकारी क्षेत्रातील सर्व क्षेत्रांचे संरेखन चिन्हांकित केले.  गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी नागरी सहकारी बँका, साखर सहकारी संस्थांना दिलेला दिलासाही अधोरेखित करण्यात आला. डॉ. हेमा यादव, वामनीकॉमच्या संचालिका यांनी सहकाराच्या पुनरुज्जीवनावर सर्वसमावेशक सादरीकरण केले आणि विविध प्रमुख पैलूंचा समावेश केला. तिने सहकारी मॉडेलचा अभ्यास करून, सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करून सुरुवात केली. सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी या समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी नवीन धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सादरीकरणामध्ये सहकारी उपक्रमांच्या प्रस्तावनेची अंतर्दृष्टी समाविष्ट आहे आणि उदयोन्मुख क्षेत्रांवर प्रकाश टाकला आहे जेथे सहकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. उल्लेखनीय म्हणजे, 8.5 लाख सहकारी संस्था आणि 29 कोटी सभासदांची धक्कादायक आकडेवारी सांगून डॉ. यादव यांनी सहकारी संस्थांच्या विकासाचे मॉडेल अधोरेखित केले, ज्यामुळे सदस्यसंख्येच्या बाबतीत ते जगातील सर्वात मोठे आहे. सहकारी संस्थांच्या परिसंस्थेचे अन्वेषण करताना, डॉ. यादव यांनी एक विभाग उघड केला जेथे 20% क्रेडिट-आधारित आणि 80% गैर-क्रेडिट आधारित आहेत. त्यांनी अमूल च्या उदाहरणाचा वापर करून सहकारी संस्थांमधील भांडवल व्यवस्थापन प्रक्रिया स्पष्ट केली. पुनरुज्जीवनाची गरज असलेल्या कार्यक्षेत्रांवर प्रकाश टाकून सादरीकरणाने सहकारी संस्थांच्या 54 उपक्रमांवर भर दिला. 16 नोव्हेंबर 2023 रोजी कॉसमॉस बँकेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री नचिकेत पोहेकर यांना या विशिष्ट दिवसाच्या थीमवर “सहकाराच्या डिजिटलायझेशनसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उन्नतीकरण” या विषयावर   आमंत्रित करण्यात आले होते. श्री निखिल यादव, कृषीशास्त्र अॅग्रोटेकचे संस्थापक आणि सीईओ श्री सर्वेश घंगाल्ले, द फार्म्सचे सीईओ आणि सह-संस्थापक आणि एसएनआरएएसएसईएसटीईएमएस स्टार्टअप व्हेंचरिस्टचे सीईओ श्री सुवो सरकार यांना दिवसाच्या “इझ ऑफ डुइंग बिझनेस’ या थीमवर त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.  20 नोव्हेंबर 2023 रोजी श्री किशोर कुमार, मुख्य प्रकल्प समन्वयक यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते ज्यांनी मेळाव्याला संबोधित केले. श्री किशोर कुमार यांच्या सादरीकरणाने शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशिक्षण आणि शिक्षण, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि सरकारी सहकार्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

आमदार तापकीर आयोजित छटपूजेच्या सोहळ्याला प्रचंड गर्दी..

पुणे-उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा असलेला छटपूजेच्या सोहळा हजारोंच्या भाविकांच्या उपस्थितीत शिवणे येथील मुठा नदी किनारी रंगला होता. रविवारी मावळत्या सूर्याला अर्घ्य तर सोमवारी उगवत्या सूर्याला नमन करीत छटपूजेच्या सोहळ्याची सांगता आज झाली.आमदार भीमराव तापकीर म्हणाले, राज्यात विविध सण साजरे केले जातात. कुटुंबात समाजात सुख, शांती, दीर्घायुष्य, परिवाराची भरभराट होण्यासाठी छट मातेची पुजा केली जाते. कार्यक्रमाचे नियोजन करताना सचिन दांगट हा पूर्णपणे उत्तर भारतीय होतो. एवढ्या प्रामाणिक तो प्रयत्न करतो. तुमच्या सोबत तो असतो. तर ‘मागील दहा वर्षापासून हा उपक्रम आम्ही सर्वजण मिळून करतो. विविध सोई असल्याने येथे भाविक गर्दी करतात.’ असे सचिन दांगट यांनी सांगितले.

दिवाळीच्या नंतर तिसऱ्या दिवसापासून छटपूजेच्या व्रत सुरु होते. सहाव्या दिवशी सकाळी याची समाप्ती होते. कुटुंबात सुख, शांती, भरभराटीसाठी व्रत केले जाते. नदीच्या पाण्यालगत मातीचा चौथरा करून छटमातेची प्रतिमा ठेवली जाते. केळीचे खुटे, ऊस उभे केले होते. दिवा, उदबत्ती लावली जाते.अस्ताला जाणाऱ्या सूर्याला विविध फळे, टोपली किंवा सुपात घेऊन महिला वाहत्या पाण्यात उभे राहून नैवद्य दाखविला. यानिमित्ताने २४ तास निरंक उपवास केला जातो. भोजपुरी, बिहारी, उत्तर प्रदेश, झारखंड, मधील अनेक कुटुंब येथे जमले होते. तसेच भोजपुरी व बिहारी, हिंदी गाण्याचा कार्यक्रम येथे उत्सव समितीने आयोजित केला होता.

दांगट पाटील नगर येथील शिवणे छटपूजा सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार भीमराव तापकीर यांनी येथे येऊन छट मातेचे पूजन केले. यामध्ये सचिन विष्णुपंत दांगट- पाटील, खडकवासला भाजपच्या सरचिटणीस ममता दांगट, अध्यक्ष रामसिंह गौतम,उपाध्यक्ष रामनवमी सहानी, महासचिव रामधनी यादव, कोषाध्यक्ष धर्मेंद्र सिंह, सचिव श्रीनाथ साळुंखे, संजय सहानी, मदन शर्मा, मनोज सिन्हा, रमेश सहानी, सुरेंद्र यादव, राम शर्मा, महेंद्र सहानी, अतुल सहानी, विजय पांडे, मीना सहानी, मीरा यादव, दुर्गावती सिंह, अनिता सहानी, शिखा यादव यांचा नियोजनात सहभाग होता.माजी नगरसेवक वृषाली चौधरी, मारुती किंडरे, अभिजित धावडे, निखील दांगट, यज्ञेश पाटील, उद्धव सुरवसे, दत्तात्रेय मुंडलिक यावेळी उपस्थित होते. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे व एनडीए, कर्वेनगर, वारजे येथील हजारो महिला व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.छटपूजा करण्यासाठी जागेचे सपाटीकरण, जाण्यासाठी रस्ता, पूजेला बसण्यासाठी लाल गालिचा अंथरला होता. मातीचा चौथरा करण्यासाठी माती उपलब्ध करून दिली होती. महिलांसाठी कपडे बदलण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्टेज लाईटची व्यवस्था माजी स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी केली होती.

लिफ्ट देणाऱ्या तरुणाला धमकी देऊन लुटले,दक्षिण पुण्यातील प्रकार

पुणे :एका तरुणाला लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले. तरुणाला धमकी देऊन लुटल्याची घटना आंबेगाव बु. येथे घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) दुपारी एक ते सव्वा एकच्या दरम्यान वडगाव पुल ते इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल दरम्यान घडला आहे.

याबाबत उमेश बाळासाहेब सोनवणे (वय-33 रा. सिंहगड कॅम्पस आंबेगाव बु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विशाल कांबळे (वय-34 रा. साईबाब मंदिर, वेताळनगर रोड, आंबेगाव बु.) याच्यावर आयपीसी 394, 506, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी उमेश सोनवणे रविवारी दुपारी एकच्या सुमारास वडगाव पुलाखालून दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी विशाल कांबळे याने फिर्य़ादी यांच्याकडे लिफ्ट मागितली. उमेश यांनी लिफ्ट दिली असता आरोपी विशाल याने ‘मी आत्ता एकाला मारुन आलो आहे, मला पैसे दे नाहीतर तुला पण मारीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने स्प्रिंग फिल्ड सोसासायटीच्या आतमध्ये नेऊन लाकडी फळीने मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी उमेश सोनवणे यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील लोक त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि . २० साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासोबत लाभ देण्यासाठी मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वा. सांस्कृतिक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पुणे व सातारा जिल्ह्यातील या समाजघटकांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पोहोचण्याकरिता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यामध्ये राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.

धनकवडीच्या राजाराम बापू बॅंकेच्या व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा;घेतलेल्या पैशापेक्षा जास्त रकमेसाठी तगादा लावल्याने एकाची आत्महत्या

पुणे-घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशासाठी तगादा लावल्याने एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी धनकवडी येथील राजाराम बापु बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बजरंग शिंदे यांच्या आत्महत्ये प्रकरणी प्रेमला बजरंग शिंदे (47, रा. शिवदर्शन अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बँकेच्या व्यवस्थापकासह रामभाऊ नामदेव कोंढरे, सोमनाथ कोंढरे यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपआपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती बजरंग शिंदे यांनी आरोपींकडून घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेसाठी शिवीगाळ करत तगादा लावला होता. त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याने दि. 10 नोव्हेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहा. पो. निरी. स्वप्निल पाटील ९०२१७४७३३६ अधिक तपास करत आहेत .