अमरावतीच्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले निर्देश.
मुंबई-अकोला जिल्ह्यातील गणेश कुमरे या गावगुंडाने १४ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार केल्याच्या घटनेची डॉ.नीलम गोऱ्हे,उपसभापती,महाराष्ट्र विधानपरिषद यांनी दखल घेत अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत.
सदर घटनेत आरोपीने पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करून धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. हा अत्यंत अमानवी असून व माणुसकीला काळीमा फासणारा आहे या शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ श्री संदीप घुगे, अकोला पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सदर आरोपीला अटक केले असून पीडितेला वैद्यकीय मदत मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी डॉ.गोऱ्हे यांनी श्री.जयंत नाईकनवरे,विशेष पोलिस महानिरीक्षक ,अमरावती परिक्षेत्र यांना निर्देश दिले आहेत.
दिलेले प्रमुख निर्देश
- पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी.तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी तिला सहकार्य करावे.
- आरोपीला जामीन मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
- आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे समजते. त्यामुळे या घटनेशी संबंधित आरोपी आणि त्याचे साथीदार व इतर धागेदोरे याबाबत कसून चौकशी करून त्याच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करण्यात यावे.
- सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्ट मध्ये दाखल करावे.
- या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा.