पुणे, दि . २० साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासोबत लाभ देण्यासाठी मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वा. सांस्कृतिक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पुणे व सातारा जिल्ह्यातील या समाजघटकांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पोहोचण्याकरिता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यामध्ये राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.