पुणे :एका तरुणाला लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले. तरुणाला धमकी देऊन लुटल्याची घटना आंबेगाव बु. येथे घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) दुपारी एक ते सव्वा एकच्या दरम्यान वडगाव पुल ते इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल दरम्यान घडला आहे.
याबाबत उमेश बाळासाहेब सोनवणे (वय-33 रा. सिंहगड कॅम्पस आंबेगाव बु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विशाल कांबळे (वय-34 रा. साईबाब मंदिर, वेताळनगर रोड, आंबेगाव बु.) याच्यावर आयपीसी 394, 506, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी उमेश सोनवणे रविवारी दुपारी एकच्या सुमारास वडगाव पुलाखालून दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी विशाल कांबळे याने फिर्य़ादी यांच्याकडे लिफ्ट मागितली. उमेश यांनी लिफ्ट दिली असता आरोपी विशाल याने ‘मी आत्ता एकाला मारुन आलो आहे, मला पैसे दे नाहीतर तुला पण मारीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने स्प्रिंग फिल्ड सोसासायटीच्या आतमध्ये नेऊन लाकडी फळीने मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी उमेश सोनवणे यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील लोक त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.