पुणे, दि. २० : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी ०८/२०० येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. ४८ जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. ४२/१०० येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येईल. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला अत्याधुनिक असा α६७०० कॅमेरा बाजारात आणण्याची सोनी इंडियाची घोषणा
आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या वस्तूची प्रतिमा टिपायची आहे ते अतिशय स्पष्ट आणि निश्चितपणे ओळखणे आणि स्थिर फोटो व चलचित्रांची नवीनतम व आधुनिक प्रस्तुती करणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच एका आटोपशीर व नेटक्या एपीएस-सी कॅमेऱ्यामध्ये संक्षेपित केले गेले आहे.
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर, २०२३: सोनी इंडियाने आज एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला, अत्याधुनिक असा त्यांचा सर्वात नवीन α६७०० (ILCE-6700) कॅमेरा बाजारात आणण्याची घोषणा केली. फूल फ्रेम अल्फाटीएम आणि सिनेमा लाइन मालिकेच्या आधुनिक कॅमेऱ्यांमधील फोटो आणि व्हिडीओ टिपण्याची अग्रगण्य क्षमता आणि त्याचबरोबर α६७०० मालिकेतील कॅमेऱ्यांचा नेटका व आटोपशीरपणा आकार व वजनाने हलके असणे हे सर्व या नवीन कॅमेऱ्यामध्ये एकत्रित आल्याने सोनीचा हा α६७०० (ILCE-6700) आतापर्यंतचा सर्वात प्रगत असा एपीएस-सी मिररलेस कॅमेरा आहे. सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह २६.० प्रभावी मेगापिक्सेलचा एपीएस-सी बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (APS-C back-illuminated Exmor R® CMOS image sensor) यांना एकत्र करून α६७०० कॅमेरा अपवादात्मक अश्या अप्रतिम प्रतिमा टिपतो आणि त्याचबरोबर हा कॅमेरा वजनाने हलका व नेटका असल्याचा फायदाही वापरकर्त्याला मिळतो.
१२०एफपीएस१ पर्यंत चित्रीकरण करणाऱ्या उच्च रिसोल्युशनच्या ४के व्हिडिओंना हा कॅमेरा पूरक आहे. अवघड परिस्थितीमध्ये किंवा कमी उजेडामध्ये बारकाईने तपशील टिपण्यासाठी व्यापक अक्षांशाच्या १४पेक्षा जास्त स्टॉप्स२ यात असून या कॅमेऱ्यामध्ये एस-सिनेटोनटीएम (S-Cinetone™) पिक्चर प्रोफाइल आहे; जे कलर ग्रेडिंगची गरज नसलेले व त्रुटीविरहित, उत्कृष्ट मूव्ही इमेजरी मिळविण्यासाठी सोनीच्या खास व्यावसायिक सिनेमालाइनमध्ये असते. हे माणसाच्या त्वचेच्या टोनचे अचंबित करणारी प्रस्तुती देते.
१. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्याची प्रतिमा टिपायची आहे ती वस्तू किंवा व्यक्ती अतिशय अचूकपणे ओळखते:
या कॅमेऱ्यामध्ये अतुलनीय अशा प्रतिमा मिळविण्यासाठी सोनीच्या प्रगत बिऑन्झ एक्सआर® प्रोसेसिंग इंजिनच्या (BIONZ XR® processing engine) गती आणि शक्तीसह नवीन एपीएस-सी (APS-C) आकार, अंदाजे २६.० प्रभावी मेगापिक्सेल असलेले बॅक इल्युमिनेटेड एक्समोर आर® सीमॉस इमेज सेन्सर (back-illuminated Exmor R® CMOS image sensor) आहे. स्थिर चित्र आणि चलचित्र या दोहोंसाठी स्टँडर्ड आयएसओ (ISO) संवेदनशीलता १०० पासून ते ३२,००० पर्यंत आहे, ज्यामुळे चित्रीकरणात उच्च संवेदनशीलता आणि आजूबाजूचा कमी गोंगाट येतो. समृद्ध रंगछटांमुळे झाडे आणि व्यक्ती जास्त नैसर्गिक रंगात चित्रित होतात.
२. ४के१२०पी ला सुसंगत असलेला हा कॅमेरा उत्कृष्ट व्हिडीओ देतो:
जवळपास ६के एवढ्या डेटाचा वापर करून α६७०० कॅमेरा ४के १२०एफपीएसवर
उच्च फ्रेम रेटच्या चित्रीकरणासाठी अत्यंत उच्च दर्जाचे ४के व्हिडिओ प्रदान करतो. यामध्ये एस-लॉग३ वैशिष्ठ्य आहे. जे शानदार ग्रेडेशनसाठी १४+२ च्या वरील अक्षांश देते. याशिवाय, एस- सिनेटोनने सुसज्ज असलेला α६७०० कॅमेरा त्वचेच्या टोनचे चित्रण आणि सब्जेक्ट हायलाइटिंग उत्कृष्टपणे करतो.
३. लहान नेटका आकार आणि कमी वजन यामुळे एक ठिकाणाहून दुसरीकडे नेणे, हाताळणे व जोडणे हे अद्वितीयपणे होते:
अतिशय नेटका आकार (अंदाजे ४ ७/८*२३/४*३ इंच आणि जवळपास १एलबी १.४oz५ वजन) असल्याने α६७०० कॅमेरा कोठेही सोबत घेऊन जाण्यास अत्यंत सोईस्कर आहे. यामध्ये वापरकर्त्यास अनुकूल असे टच करून वापरता येण्याजोगे व्हॅरी-अॅंगल एलसीडी मॉनिटर आणि सहज काम करता यावे म्हणून आधुनिक टच मेन्यू आहे.
किंमत आणि उपलब्धता:
α६७०० कॅमेरा संपूर्ण भारतभर सर्व सोनी कॅमेरा लॉन्जमध्ये, सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.
| मॉडेल | किंमत (रुपयांमध्ये) | उपलब्धता |
| ILCE-6700 (केवळ कॅमेरा) | १३६,९९०/- | २० नोव्हेंबर,२०२३ पासून |
| ILCE-6700L (कॅमेरा + 16–50 एमएम पॉवर झूम लेन्स) | १४७,४९०/- | २० नोव्हेंबर,२०२३ पासून |
| ILCE-6700M (कॅमेरा + 18–135 एमएम झूम लेन्स) | १७२,९९०/- | २० नोव्हेंबर,२०२३ पासून |
वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा; महावितरण
पुणे, दि. २० नोव्हेंबर २०२३: पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी ७८७५४४०४५५, कोल्हापूर- ७८७५७६९१०३, सांगली- ७८७५७६९४४९ आणि सातारा जिल्ह्यासाठी ७८७५७६८५५४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
महावितरणची वीजतार तुटलेली आहे. तारेचा झोल किंवा तार जमिनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्राचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे.
व्हॉटस् अॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच दुरूस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजूरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
महावितरणचे रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिकटवू नयेत. पोस्टर्स किंवा पत्रके चिकटवताना विद्युत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारचे पत्रके किंवा पोस्टर्स वीजयंत्रणेवर लावू नयेत किंवा चिकटवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवस थंडीचे ; किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज
पुणे-दिवाळीपासून हवेतील गारव्यात वाढ झाली असून सध्या (Maharashtra) राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहील.
सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल.
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
राज्यात रविवारी सर्वांत कमी 14 अंश सेल्सिअस तापमान जळगावात नोंदवले गेले, तर रत्नागिरीत सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस (Maharashtra) तापमान होते.
चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये कुठून आले, चौकशी करा?
मुंबई, दि. २० नोव्हेंबर
महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भिषण आहे, शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करत आहे. राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाहीतर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अशांतता निर्माण करुन ‘जळता महाराष्ट्र’ करुन ठेवला आहे, हे अत्यंत निषेधार्ह असून राज्य जळत असताना सरकार मात्र मजा बघत आहे. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चितावणीखोर विधाने करत आहेत, या मागे सरकारच आहे, राज्यपाल महोदयांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे. आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजपा व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली व मागील ९ वर्षात भाजपाने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस पक्ष जर राज्यात व केंद्रात सत्तेत आला तर आरक्षण प्रश्नावर मार्ग काढू. आरक्षण प्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली आहे, जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे, शेतकऱ्यांना सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली त्याला भाजपा सरकारच जबाबदार आहे. त्यांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, अंमलबजावणी मात्र काही होत नाही. खरेदी केंद्रे सुरु करण्याची घोषणा केली पण तीही अजून कागदावरच आहे. मुठभर व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकार खरेदी केंद्रे सुरु करण्यास टाळाटाळ करत असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.
बावनकुळेंकडे जुगारासाठी कोट्यवधी रुपये कोठून आले?
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे.
शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’..
भाजपाचे तिघाडी सरकार काँग्रेस सरकारच्याच योजना शासन आपल्या दारी म्हणून राबवत आहे. ही योजना म्हणजे महानौटंकी आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, एका कार्यक्रमाला तीन ते चार कोटी रुपये खर्च गेले जातात व ते पैसे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केला जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे कंत्राट हे ठाण्यातील एका व्यक्तीला दिले आहे, जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबवली पाहिजे.
मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ…
वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, नरेंद्र मोदी व भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंच्या ग्लासात कोणत्या ब्रँडची व्हिस्की?:BJP चा संजय राऊत यांना सवाल; बावनकुळे केव्हाच जुगार खेळले नसल्याचा दावा
मुंबई-शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जुगार खेळत असल्याचा फोटो शेअर केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्यात आता भाजपनेही आदित्य ठाकरेंचा एक ‘ड्रिंक’ घेत असल्याचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे?’ असा सवाल भाजपने या प्रकरणी केला आहे.
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx
संजय राऊत यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये बावनकुळे कथितपणे जुगार खेळताना दिसून येत आहेत. अवघा महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे राऊत यांनी या प्रकरणी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झालेत.
ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की?
भाजपने या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा कथितपणे मद्य सेवन करतानाचा एक फोटो ट्विट करत ठाकरे गटाला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये आदित्य ठाकरे सुप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम यांच्यासोबत आदित्य ठाकरे दिसून येत आहेत. त्यात ते काहीतरी पित असल्याचे दिसून येत आहे. भाजपने हा फोटो ट्विट करताना म्हटले की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी थांबलेत, हा तेथील परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरे यांच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे?
एसएफए चॅम्पियनशीप्स पुणेच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी १२,००० खेळाडूंची नोंदणी
● २१ नोव्हेंबर रोजी सुरू होत असलेल्या या चॅम्पियनशीपमध्ये पुण्यातील शालेय खेळाडू श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि विमान स्केटिंग रिंग येथे स्पर्धा करतील
● ६०० शाळांतील १२,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज
पुणे, २० नोव्हेंबर २०२३ – एसएफए चॅम्पियनशीप्स, पुणेची दुसरी आवृत्ती २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यामध्ये ६०० शाळांतील १२,००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहे. हे खेळाडू फुटबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, धनुर्विद्या, बॅडमिंटन, कबड्डी, थ्रोबॉल, स्पीडक्युबिंग आणि इतर विविध खेळांत सहभागी होतील. एसएफए चॅम्पियनशीप विविध शाळांतील अद्याप समोर न आलेल्या गुणवान खेळाडूंना पुढे आणणार असून हे खेळाडू ३० क्रीडा विभागांमध्ये सहभागी होऊन पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ हा किताब मिळवण्यासाठी स्पर्धा करतील.
श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (बालेवाडी) विमान नगर स्केटिंग रिंग आणि गंगा लीजंड्समध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश असून ३ ते १८ वर्ष वयोगटातील शालेय खेळाडू एसएफए चॅम्पियनशीपमध्ये आपली गुणवत्ता दर्शवतील. या खेळाडूंमध्ये ६६ टक्के मुले व ३४ टक्के मुलींचा समावेश असून त्यांची फुटबॉल, अथलेटिक्स, स्केटिंग, पोहणे आणि बास्केटबॉलला पसंती आहे.
या वर्षी पहिल्यांदाच एसएफए चॅम्पियनशीपच्या पुणे आवृत्तीमध्ये जिमनॅस्टिक्सचा समावेश करण्यात आला असून मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिमनॅस्टिकमधील मुलींची संख्या तसेच त्यांचे कौशल्य मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. दुसरीकडे स्केटिंगमध्ये यावर्षी ८०० जणांनी भाग घेतला असून कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी ही चांगली सुरुवात आहे. २०२३- २०२४ एसएफए चॅम्पियनशीपच्या पुणे आवृत्तीत फुटबॉल, अथलेटिक्स, बास्केटबॉल, बुद्धीबळ या क्रीडाप्रकारांना मुलांचा सर्वाधिक सहभाग लाभला आहे, तर मुली खेळाडूंची अथलेटिक्स, पोहणे, बास्केटबॉल, स्केटिंग आणि फुटबॉल या क्रीडाप्रकारांना जास्त पसंती मिळाली आहे.
खेळाडूंना सर्वोत्तम अनुभव मिळवून देण्यासाठी एसएफए चॅम्पियनशीपमध्ये व्यावसायिक पायाभूत सुविधा आणि उपकरणे, क्रीडा संघटनांचे मान्यताप्राप्त सामना अधिकारी आणि पंच, सर्वसमावेशक वैद्यकीय स्टेशन्स, ऑन- साइट फिजिओथेरपिस्ट, क्लिनिक्स आणि वर्कशॉप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल इंटिग्रेटेड यंत्रणेमुळे खेळाडूंना तपशीलवार आकडेवारी, कामगिरीचे विश्लेषण आणि सामन्याची व्हिडिओग्राफी मिळणार आहे. या मल्टी- स्पोर्ट प्लॅटफॉर्मकडे ऑलिंपिक्सप्रमाणे पाहाता येईल, जिथे प्रत्येक शाळेला त्यांच्या खेळाडूला क्रीडाप्रकारात स्पर्धा करण्यासाठी पाठवता येईल.
एसएफएने २०२३-२०२४ मधील चार महिन्यांत १० एसएफए चॅम्पियनशीप्सच्या माध्यमातून २ लाख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची बांधिलकी ठेवली आहे. यातून या चॅम्पियनशीपने शाळांना केंद्रस्थानी ठेवणारा क्रीडा- तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म उभारण्याच्या, खेळाडूंना आघाडीवर ठेवण्याच्या आणि भविष्यातील चॅम्पियन बनण्यासाठी मार्ग आखून देण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊल टाकले आहे.
सामन्यांच्या अद्ययावत माहितीसाठी आणि शालेय स्कोअरबोर्डसाठी www.sfaplay.com वर ट्यून इन करा. पहिल्या दिवशी शालेय खेळाडू श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धनुर्विद्या आणि स्केटिंग स्पर्धेत सहभागी होतील.
संत नामदेव महाराज जयंती निमित्त “बहुरूपी भारूड” कार्यक्रम
नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त डाॅ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत ‘बहुरूपी भारुड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात अवधूत गांधी, अभय नलगे यांसाह ३५ हून अधिक कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार असून डॉ. भावार्थ देखणे यांचे प्रमुख सादरीकरण होणार आहे, अशी माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष संदीप लचके व पिंपरी चिंचवड शहर शाखेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सचिव सुभाष मुळे, कार्याध्यक्ष रणजीत माळवदे, खजिनदार विजय कालेकर, उपाध्यक्ष कैलास नेवासकर, सचिव रेखा गाडेकर उपस्थित होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
संदीप लचके म्हणाले, सध्याची तरूण पिढी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या विळख्यात गुरफटलेली असून संतसाहित्य व लोककला लोप पावत चालली आहे. हीच सामाजिक बांधिलकी ओळखून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त बहुरूपी भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यासह संत नामदेव महाराज व पांडुरंग यांची भेट, वासुदेव, सत्वर पाव ग मला कडकलक्ष्मी, गोंधळ आदीचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांचे सहकार्य व नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे, अशी माहिती पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.
बावनकुळेंनी कॅसिनोत 3 तासांत 3.50 कोटी उडवले:माझ्याकडे 27 फोटो अन् व्हिडिओ; ..तर भाजपला दुकान बंद करावे लागेल – संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई-मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण सुरुवात केली आहे. म्हणून मी ही पोस्ट केली. तुमच्याकडे येथील ईडी, सीबीआय आहे. तर आमच्याकडे मकाऊ मधील ईडी, सीबीआय आहे. त्यामुळे जेवढे खुलासे कराल, तेवढे तुम्ही फसाल, असा इशारा राऊतांनी केला आहे. कारण माझ्याकडे 27 फोटो अन् व्हिडिओ आहेत. ती मी शेअर केले तर भाजपला दुकानं बंद करावे लागेल, असा हल्ला संजय राऊतांनी केला.
ते म्हणे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला. त्यात बावनकुळे कथितपणे जुगार खेळताना दिसून येत आहेत. अवघा महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे राऊत म्हणालेत. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू झालेत.
त्यानंतर आता भाजपनेही आदित्य ठाकरेंचा एक ‘ड्रिंक’ घेत असल्याचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे?’ असा सवाल भाजपने या प्रकरणी केला आहे. त्यानंतर मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले की, आमच्याशी खेटू नका, माझ्याकडेही कसिनोतील 27 फोटो अन् व्हिडिओ आहेत. त्यात तर तीन चार व्हिडिओ एवढे खतरनाक आहेत की, भाजपला त्यांचे दुकानं बंद करावं लागेल, असा घणाघात राऊतांनी नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला.
राऊत पुढे म्हणाले की, मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण सुरुवात केली आहे. म्हणून मी ही पोस्ट केली. तुमच्याकडे येथील ईडी, सीबीआय आहे. तर आमच्याकडे मकाऊ मधील ईडी, सीबीआय आहे. त्यामुळे जेवढे खुलासे कराल, तेवढे तुम्ही फसाल, असा इशारा राऊतांनी केला आहे. कारण माझ्याकडे 27 फोटो अन् व्हिडिओ आहेत. ती मी शेअर केले तर भाजपला दुकानं बंद करावे लागेल, असा हल्ला संजय राऊतांनी केला.
नाना पटोले यांच्या भूमिकेशी सहमत
महाराष्ट्रातील एक बडा नेता मकाऊमध्ये जाऊन साडे तीन तासात साडे तीन कोटी रुपय उडवत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, पटोले यांच्या मागणीशी मी पूर्णपणे सहमत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे. आपण काय करतोय. कुटुंबाच्या गोष्टी तुम्ही करू नका, मला संस्कार देखील कळतात. त्यामुळे अजिबात मला कोणीही शिकवू नये.
मकाऊत 3.50 कोटी उडवले
राज्यातील एक बडा नेता जाऊन साडे तीन कोटी रुपये उडवतो. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यावर आमच्यावर भाजपचे संस्कार नाहीत. बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे अजिबात माझ्याशी कोणीही खेटू नका. माझ्याकडे चांगले व्हिडिओ आहे.
मोदींचा जो ब्रॅंड तो आदित्य ठाकरेंचा ब्रॅंड
संजय राऊत म्हणाले की, मोदी जे परदेशात जाऊन पितात ना, तोच ब्रॅंड आदित्य ठाकरेंचा आहे. त्यामुळे त्यांच्या हातात काय आहे. ते तुम्ही समजून घ्या, कोणीही व्यक्तीगत टीका करू नका, एवढाच इशारा मी त्यांना देईल.
मकाऊमध्ये आमची ईडी आणि सीबीआय
संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर किती लोकांनी टीका केली, पण आम्ही त्या पातळीवर जाऊ शकतो पण जात नाही असं सांगत संजय राऊत म्हणाले की, जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. प्रति आरोप नको उत्तर द्या. बावनकुळे त्या ठिकाणी नसतील तर त्यांनी मी तो नव्हेच असं स्पष्ट सांगावं. भाजपकडे देशात ईडी आणि सीबीआय आहे, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे. बावनकुळेंनी तीन तासांमध्ये साडे तीन कोटी रुपये उधळले, बाकी किती खर्च झाला याचा तपास करावा. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, कुटुंबासोबत आहोत याचं त्यांनी भान ठेवावं.
राऊत पुढे म्हणाले की, मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरझण घालू इच्छित नाही. पण महाराष्ट्रात काय चाललंय? सामाजिक वातावरण काय? नुसते आरोप-प्रत्यारोप करुन चालणार नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी द्या. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत. पण आमच्यात थोडी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत आहे. ते 27 फोटो आणि व्हिडीओ टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल. पण मी ते करणार नाही. ते दुकान 2024 पर्यंत चाललं पाहिजे”, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली.
मध्यरात्री पाठलाग करत तरुणाची कोयत्याने हत्या
पुणे: पाठलाग करत कोयत्याने एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने मध्यवर्ती भागात एकच खळबळ उडाली आहे.पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला.
बाणेर महाबळेश्वर हॉटेलजवळ गोळीबार: एक जखमी
पुणे : मित्राला कामावरून काढल्याचा राग धरून बाणेर महाबळेश्वर चौक जवळ बंदुकी मधून झालेल्या फायरिंग मध्ये एक जण जखमी झाला असून या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आदित्य दीपक रणवरे व सागर लक्ष्मण बनसोडे रा. बाणेर या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीचा मित्र रोहित याला कामावरून काढल्याचा राग मनात धरून निलेश पिंपळकर याला 45 एवेन्यू बिल्डिंग बाणेर जवळ भेटण्यासाठी बोलवून मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली. या फायरिंग मध्ये आकाश बाणेकर वय 28, राहणार लवळे मुळशी यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान पोलिसांनी एक जिवंत काढतूस, दोन खाली केस ताब्यात घेतले असून कलम 307, 506 (2),34, आर्म ऍक्ट 3 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1), सह 135 कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास चतु:शृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.
मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही – मनोज जरांगे पाटील
पुणे : मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. प्रत्येकाचा सुख, दुःखात माझा मराठा धावून गेला. मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं. मराठा सढळ हाताने इतरांना देत राहीला. आरक्षण देताना ही, कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातील खराडी येथे सभा झाली. यावेळी त्यांनी भर उन्हात बसलेल्या मराठा बांधवांना संभोधित केले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का असा सवाल कधीच केला नाही. स्वतःच्या हक्कच आरक्षण दुसऱ्याला दिलं. पण घेऊ नका, असं म्हटलं नाही. आरक्षण सागक्यांना देऊ दिलं. सगळ्यांसाठी माझ बांधव उभा राहिला.”
“आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितलं नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिला नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबली. कधीच कुणाला कमी लेखलं नाही. जातीवाद न करण्याचा संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत”, असेही यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.
दिवाळी फराळ आणि लोकसभेसाठी संजय काकडेंची कँटोन्मेंटमध्ये फिल्डिंग
पुणे- पुण्याची लोकसभा निवडणूक भाजपच्या वतीने लढविण्यास इच्छुक असलेले माजी राज्यसभा सदस्य खासदार संजय काकडे यांनी हर घर मोदी घोषणेप्रमाणे PM मोदींच्या कार्याचा अहवाल स्वहस्ते कानाकोपऱ्यातील व्यक्ती व्यक्ती कडे पोहोचविल्यानंतर आता ते दिवाळी फराळाच्या निमित्ताने विविध विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी राजकीय फिल्डिंग मजबूत करत असल्याचे वृत्त आहे.त्यांनी काल येथे भारतीय जनता पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री सुनील कांबळे यांच्या वतीने आज दिवाळी फराळ आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी असंख्य मान्यवर आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी जवळीक साधली , यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त खेमनार , पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश पुंडे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, राहुल भंडारे भाजपा माथाडी कामगार संघटनेचे तुषार पाटील, माजी नगरसेविका अर्चना पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने मतदार संघातील विकास प्रकल्प, पुण्याचे राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा केली..
राष्ट्रवादी काकाची की पुतण्याची ? निवडणूक आयोगात आजपासून सलग सुनावणी
शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीलाच अजित पवार यांचा आक्षेप-वास्तविक मी पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरुनच दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्तीलाच अजित पवार यांच्या गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडत आहेत.
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादी वरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून सलग सुनावणी होणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे जमा करण्यात आली असून आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी साहेबांना म्हणजेच काकांना मिळणार की दादांना मिळणार? असा प्रश्न आहे. या संदर्भात पुढील काळी दिवस सलग सुनावणी होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार हे देखील आज दिल्लीत आहेत. त्यामुळे सुनावणीच्या वेळी ते आयोगात उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका शरद पवारांना भेटणार की, अजित पवारांना भेटणार? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संदर्भातील सुनावणी आता दररोज होणार आहे. आज दुपारी चार वाजेपासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह नेमके कोणाचे, याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रके दाखल करण्यात आल्याचा आरोप मागील सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाने केला होता. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला होता. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट पडले असले तरी शरद पवार यांनी तसे मानण्यास नकार दिला आहे. वास्तविक सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीसाठी पोहोचले आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत आहेत. त्यामुळे शरद पवार हे देखील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संवर्धन संस्थेस (मोतीबाग) एक कोटींचा निधी प्रदान
समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची : सुहासराव हिरेमठ
पुणे : “निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेला (मोतीबाग) जेष्ठ उद्योजक जयंत नातू आणि अश्वमेध परिवाराच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी हिरेमठ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, उद्योजक जयंत नातू आदी उपस्थित होते.
सुहासराव हिरेमठ म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही मिळेल; पण दानशूर आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा असणाऱ्या दात्यांची कमी आहे. आजच्या या कार्यक्रमातून समाजालाही प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्यातील संवेदना जागृत होण्यास मदत होणार आहे. प्रत्येकाने समाजासाठी, सेवा प्रकल्पासाठी संकल्प करायला हवा. दरवर्षी विशिष्ट रक्कम, वेळ सेवा प्रकल्पासाठी द्यावी. घरातील मंगलप्रसंगी सेवा प्रकल्पासाठी गरजूंना मदतीचा हात द्यावा.”
प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्व हा महत्वाचा गुण आहे. हा गुण जपण्याबरोबरच विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज हे स्वतंत्र नाही तर एकरुप असे आहेत. समर्पण भावनेने काम करण्याची गरज आहे. ही भावना अशा कार्यक्रमामुळे वाढीस लागणार आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समर्पणाचे दर्शन घडवत आहे.
जयंत नातू यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते संघाच्या माध्यमातून तयार झाले आहेत. देशासाठी अनेक प्रचारक घडविले आहेत. समाज आणि संघाने आयुष्यात जे दिले त्याची परतफेड करता येत नाही; पण कर्तव्य भावनेतून हा निधी प्रदान करत आहे.
राजीव जोशी यांनी संघ कार्याची आणि मोतीबाग संस्थेच्या नवीन बांधकाम प्रकल्पाबाबत माहिती सांगितली. अशोक वझे यांनी स्वागत केले. ऍड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मेधावी नातू यांनी स्वागत संघ गीत सादर केले. डॉ. पुष्पा रानडे यांनी वंदे मातरम् सादर केले.
