● २१ नोव्हेंबर रोजी सुरू होत असलेल्या या चॅम्पियनशीपमध्ये पुण्यातील शालेय खेळाडू श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि विमान स्केटिंग रिंग येथे स्पर्धा करतील
● ६०० शाळांतील १२,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज
पुणे, २० नोव्हेंबर २०२३ – एसएफए चॅम्पियनशीप्स, पुणेची दुसरी आवृत्ती २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यामध्ये ६०० शाळांतील १२,००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहे. हे खेळाडू फुटबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, धनुर्विद्या, बॅडमिंटन, कबड्डी, थ्रोबॉल, स्पीडक्युबिंग आणि इतर विविध खेळांत सहभागी होतील. एसएफए चॅम्पियनशीप विविध शाळांतील अद्याप समोर न आलेल्या गुणवान खेळाडूंना पुढे आणणार असून हे खेळाडू ३० क्रीडा विभागांमध्ये सहभागी होऊन पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ हा किताब मिळवण्यासाठी स्पर्धा करतील.
श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (बालेवाडी) विमान नगर स्केटिंग रिंग आणि गंगा लीजंड्समध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश असून ३ ते १८ वर्ष वयोगटातील शालेय खेळाडू एसएफए चॅम्पियनशीपमध्ये आपली गुणवत्ता दर्शवतील. या खेळाडूंमध्ये ६६ टक्के मुले व ३४ टक्के मुलींचा समावेश असून त्यांची फुटबॉल, अथलेटिक्स, स्केटिंग, पोहणे आणि बास्केटबॉलला पसंती आहे.
या वर्षी पहिल्यांदाच एसएफए चॅम्पियनशीपच्या पुणे आवृत्तीमध्ये जिमनॅस्टिक्सचा समावेश करण्यात आला असून मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिमनॅस्टिकमधील मुलींची संख्या तसेच त्यांचे कौशल्य मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. दुसरीकडे स्केटिंगमध्ये यावर्षी ८०० जणांनी भाग घेतला असून कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी ही चांगली सुरुवात आहे. २०२३- २०२४ एसएफए चॅम्पियनशीपच्या पुणे आवृत्तीत फुटबॉल, अथलेटिक्स, बास्केटबॉल, बुद्धीबळ या क्रीडाप्रकारांना मुलांचा सर्वाधिक सहभाग लाभला आहे, तर मुली खेळाडूंची अथलेटिक्स, पोहणे, बास्केटबॉल, स्केटिंग आणि फुटबॉल या क्रीडाप्रकारांना जास्त पसंती मिळाली आहे.
खेळाडूंना सर्वोत्तम अनुभव मिळवून देण्यासाठी एसएफए चॅम्पियनशीपमध्ये व्यावसायिक पायाभूत सुविधा आणि उपकरणे, क्रीडा संघटनांचे मान्यताप्राप्त सामना अधिकारी आणि पंच, सर्वसमावेशक वैद्यकीय स्टेशन्स, ऑन- साइट फिजिओथेरपिस्ट, क्लिनिक्स आणि वर्कशॉप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल इंटिग्रेटेड यंत्रणेमुळे खेळाडूंना तपशीलवार आकडेवारी, कामगिरीचे विश्लेषण आणि सामन्याची व्हिडिओग्राफी मिळणार आहे. या मल्टी- स्पोर्ट प्लॅटफॉर्मकडे ऑलिंपिक्सप्रमाणे पाहाता येईल, जिथे प्रत्येक शाळेला त्यांच्या खेळाडूला क्रीडाप्रकारात स्पर्धा करण्यासाठी पाठवता येईल.
एसएफएने २०२३-२०२४ मधील चार महिन्यांत १० एसएफए चॅम्पियनशीप्सच्या माध्यमातून २ लाख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची बांधिलकी ठेवली आहे. यातून या चॅम्पियनशीपने शाळांना केंद्रस्थानी ठेवणारा क्रीडा- तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म उभारण्याच्या, खेळाडूंना आघाडीवर ठेवण्याच्या आणि भविष्यातील चॅम्पियन बनण्यासाठी मार्ग आखून देण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊल टाकले आहे.
सामन्यांच्या अद्ययावत माहितीसाठी आणि शालेय स्कोअरबोर्डसाठी www.sfaplay.com वर ट्यून इन करा. पहिल्या दिवशी शालेय खेळाडू श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धनुर्विद्या आणि स्केटिंग स्पर्धेत सहभागी होतील.