Home Blog Page 1358

ललित पाटील प्रकरणात कारागृह रक्षकही गजाआड

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातील रक्षकास अटक केली. ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७ ,रा. रक्षकनगर, खडकी) याला मंगळवारी अटक करण्यात आली.त्यानंतर कारागृह रक्षक यास अटक करण्यात आली. मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहेशेवते आणि शेख यांना अटक करुन मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले

ललित पाटील हा ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली..शेखच्या मोबाइल क्रमंकावरुन २ ऑक्टोबर रोजी ललितने ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आराहाना यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणात कांबळे, बलकवडे, आरहाना यांनाही अटक करण्यात आली होती..

नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये झाली चर्चा

0

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे  निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नासाचे प्रशासक  बिल नेल्सन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.

निसार(NISAR) ला भारताच्या जीएस एलव्ही वरून प्रक्षेपित करण्याचे  लक्ष्य आहे.  निसारवरून येणारी माहिती प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील भू परिसंस्था,  पर्वत आणि ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, समुद्रातील बर्फ आणि महासागरांचे किनारे यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतील.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ऐतिहासिक चांद्रयान-3 उतरल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांचे अभिनंदन करताना, नेल्सन यांनी डॉ जितेंद्र सिंह  यांना नासाचे रॉकेटचा  वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) भारताच्या पहिल्या अंतराळविषयक कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केले.

उद्या बेंगळुरू येथे भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांना भेटण्यास उत्सुक  असल्याचे नेल्सन यांनी यावेळी सांगितले .

या बैठकीला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हे देखील उपस्थित होते.

भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी ‘कोसला’ आता झळकणार पडद्यावर

भव्य समारंभात ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस… ‘ चित्रपटाची घोषणा

भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची एका भव्य सोहळयात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होत. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत.

१९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. २०१४ मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘’ साहित्या इतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहाण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कांदबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’

तर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, ‘’ जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियंमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे.’’

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य राठी म्हणतात, ” भालचंद्र नेमाडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मी मेहुल शाह यांचे आभार मानेन की, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गावातील निरुत्साही वातावरण न आवडणाऱ्या, त्याचा तिटकारा वाटत असतानाही गावासाठी काहीतरी थोर स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची ही भावनिक कथा आहे. खरंतर चित्रपटाविषयी काही सांगायची गरजच नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळे आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.’ तर गायत्री पाटील म्हणतात, ‘’ भालचंद्र नेमाडे सर जळगावचे आहेत आणि मी सुद्धा. ‘कोसला’ मला भावण्याचे कारण म्हणजे या कांदबरीत महिलांना दिलेला सन्मान. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली.’’

हा कांतारा टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे: अभिनेते आणि चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी

गोवा28 नोव्‍हेंबर 2023

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी आज गोव्यामध्ये आयोजित  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) आयोजित संवाद सत्रात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. गतिशील आणि दिमाखदार कन्नड चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्त्व करणारे ऋषभ शेट्टी, हे कांतारा या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. कांतारा हा चित्रपट इफ्फी 54 मधील प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यंदाच्या 15 लक्षवेधी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

कांतारा या 150 मिनिटे लांबीच्या कन्नड भाषेतील चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक आणि समीक्षकांना झपाटून सोडले आहे. संस्कृती आणि लोककला प्रकारांना मानवंदना देणाऱ्या कांतारा या चित्रपटात नृत्य आणि भावनांचा अद्भुत मेळ साधत, चित्रित करण्यात आलेला मानव आणि निसर्गामधील गुंतागुंतीचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ रेंगाळत राहतो.    

“प्रेक्षक कांताराशी जोडले गेले कारण ही कथा भारताच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे,” शेट्टी म्हणाले. “प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, आणि खर्‍या अर्थाने आपलासा केला,” ते पुढे म्हणाले. आपला मूळ गाभा कायम ठेवत, कांताराने पारंपरिक कोला नृत्य आणि ते सादर करणाऱ्या समुदायाला व्यक्त होण्याची नवीन संधी दिली.

ऋषभ म्हणाले की, त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ते सातत्याने या समाजाच्या संपर्कात आहेत. “ही माझी परंपरा, माझा या विधीवर विश्वास आहे आणि मी या देवाची पूजा करतो. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आणि संस्कृती किंवा समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कांताराच्या यशाचे श्रेय श्रद्धेला देत शेट्टी म्हणाले की, स्वतःवर आणि आपण केलेल्या कामावर श्रद्धा असली, तरच खऱ्या अर्थाने चांगले काम करता येते. ते असेही म्हणाले की आपले काम प्रामाणिकपणे करावे, यशाच्या मागे धावू नये.  

कन्नड सिनेमाबद्दल बोलताना, ऋषभ शेट्टी यांनी ओटीटी माध्यमाच्या आव्हानाबद्दल सांगितले. हे व्यासपीठ अजूनही कन्नड प्रेक्षकांबाबत सावध भूमिका घेत आहे, आणि कन्नड चित्रपटांसाठी अजूनही खुले नाही, ज्यामुळे कन्नड चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले.

आपल्याला जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळायला हवी, असे ते म्हणाले.  “चित्रपटाने आपल्याला खूप काही दिले, आपणही कन्नड सिनेमासाठी काही करायला हवे.” शेट्टी यांनी आवाहन केले. भारतीय चित्रपटातील दर्जेदार आशय आज खर्‍या अर्थाने जगभर पोहोचला आहे, यावर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले. “सध्या मोठी क्रांती घडत आहे. भाषेच्या अडथळ्यावर मात करत चांगल्या आशयाला मोठी स्वीकृती मिळत आहे,” शेट्टी म्हणाले.

इफ्फी बरोबर आपण कसे जोडले गेलो, हे सांगताना ऋषभ शेट्टी यांनी नमूद केले की इफ्फी चित्रपट महोत्सवात येण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. चित्रपट महोत्सव, चित्रपट पाहण्याची आणि शिकण्याची संधी देतात, असे ते म्हणाले.  इफ्फीसारखे महोत्सव आपल्याला एक विस्तारित कुटुंबच वाटते असे ते म्हणाले. त्यांनी चित्रपट महोत्सवांची प्रशंसा केली आणि छोट्या चित्रपटांना ओळख मिळवून देण्यासाठी या व्यासपीठांचा वापर करायला हवा असे आवाहन केले.

शेट्टी यांनी अलीकडेच कांतारा या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित प्रीक्वलची घोषणा केली होती, ज्याचे पोस्टर काल प्रकाशित करण्यात आले. त्यांनी हे स्पष्ट केले की, सुरुवातीपासूनच हा चित्रपट दोन भागांमध्ये असावा, अशी कल्पना होती.  

दिग्दर्शन, लेखन, अभिनय यापैकी सर्वात प्रिय काय, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, “दिग्दर्शन हे माझे पहिले प्रेम आहे.” “मी जीवनाच्या अनुभवांवर विश्वास ठेवतो, मी लोकांशी जोडलेला आहे आणि माझ्या चित्रपटांमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतो”.

कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा –

संविधान रॅलीव्याख्यान आणि ७३ किलोमीटर सायकलिंग करून संविधान दिन साजरा

पुणे – येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने , सहायक समाज कल्याण आयुक्तालय,  बार्टी तसेच इतर संस्थांच्या मदतीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.विनायक कराळे, सचिव एम.शिवकुमार, सदस्य शिल्पा पाठक , प्रभारी संचालिका डॉ. शर्मिला सहदेव, सीएसआर सेलचे  संचालक डॉ. महेश ठाकूर, सीएमएचडीचे अध्यक्ष सहाय्यक प्रा.चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय व बार्टीच्या पुढाकाराने  आयोजित करण्यात आलेल्या भिडे वाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन पर्यंतच्या संविधान जागृती  रॅलीमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच महाविद्यालयामध्ये संविधान जनजागृतीवर आधारित व्याख्यानाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते

विशेष म्हणजे यावर्षी  ७३ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त समाजकार्य प्रथम वर्षाचे विद्यार्थी रितेश भोयर, विशाल ठाकूर व अक्षय खोल्लम या तीन विद्यार्थ्यांनी ७३ किलोमीटर सायकलिंग करून हा संविधान दिन साजरा केलातसेच कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये संविधान जागृतीपर प्रा.मिलिंद माचाळे यांचे व्याख्यान प्रा चेतन दिवाण यांच्या अध्यक्षेताखाली आयोजित करण्यात आले होते यावेळेस संस्थेच्या समुपदेशन व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान शपथ घेतली.व्याख्यानकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल काकडे यांनी केले, सूत्रसंचालन मुकेश सावकारे यांनी केले तर आभार डॉ पद्मश्री पाटील यांनी मानले.ग्रंथपाल मंगेश तळमले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषत: समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन संविधान जनजागृती केली.

विकसित भारत संकल्प यात्रा:पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर सह सोलापूरातूनही झाला शुभारंभ

पुणे, 28 नोव्हेंबर 2023   

देशाच्या आदिवासी तसेच ग्रामीण भागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचल्यानंतर आजपासून शहरी भागातून देखील या यात्रेचा शुभारंभ झाला. केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम दोन महीने सुरू राहणार आहे. लोकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, तसेच अजूनही योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या नागरिकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहचवी असा उद्देश या यात्रेमागे आहे.

आज पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर व सोलापुर शहरांमधूनही ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू झाली.

ग्रामदैवत कसबा गणपती येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा – पुणे शहर मोहीमेचे उद्घाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अति. आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक शहरात यात्रेचा शुभारंभ नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी महिलांचा मोठा सहभाग होता, शासनाच्या आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यावेळी अनेकांनी नावनोंदणी केली. यात्रेच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणीची विशेष मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

सोलापुरात महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर मधील सिध्दार्थ उद्यानामध्ये देवशाली जिने, नजरिन सय्यद रफी, फिरोज खान इब्राहिम खान, सइनाज शेख जावेद या लाभार्थीच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. गरीब – वंचित यांच्यापर्यंत राज्य व केंद्रशासनाच्या योजना पोहचवणे, ही आमची जवाबदारी आहे, असे मत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी विकसित भारत संकल्प यात्राच्या उद्घाटनप्रसंगी मांडले. महानगरपालिकेच्या दहा झोन मधील 47 ठिकाणी ही यात्रा 22 डिसेंबरपर्यंत विविध परिसरात जाणार आहे. शहरासाठीच्या सहा योजनांसह केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय शिक्षण बदलले तर भारत बदलेल – प्रा. डॉ. राकेश भटनागर

एमआयटी डब्ल्यूपीयूत व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना

पुणे,दि.२८ नोव्हेंबर:”देश बदलायचा असेल तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा आराखडा बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण करून शिक्षकांनी त्यांच्यावर कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ. राकेश भटनागर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी युनेस्को चेअर फॉर पीसचे वरिष्ठ सल्लागार प्रा. डॉ. प्रियंकर उपाध्याय हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे , बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे माजी अध्यक्ष ए. जंबूनाथन व वत्सला जंबूनाथन उपस्थित होते.
डॉ. भटनागर म्हणाले,” देशातील शिक्षणाची दिशा बदलणे गरजेचे असून त्यात गुणवत्ता व कौशल्यपूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. प्रगत जर्मनी देशात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. या देशात आज सर्वोत्तम इंजिनियर आहेत. भारतामध्ये आयआयटी सारख्या  शिक्षण संस्थेने सर्वोत्कृष्ट इंजिनियर निर्माण केले परंतू ते इंजिनियर विदेशात जाऊन संशोधन करतात. अशा वेळेस देशातील विद्यापीठांनी उत्तम संशोधक निर्मितीसाठी शिक्षणावर खर्च करावा. संशोधनामुळेच भारत वैक्सीन निर्मितीची राजधानी बनली आहे.”
डॉ. प्रियंकर उपाध्याय म्हणाले,” संपूर्ण जग शांतीच्या शोधात असतांना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी एमआयटीच्या माध्यमातून शांतीची संस्कृती निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठ्या डोमच्या माध्यमातून शांतीचा संदेश पसरविला जात असतांना आंतरिक व सामाजिक शांती अत्यंत महत्वाची आहे. तसेच राष्ट्रीय विधायक परिषद या अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन करून राहुल कराड यांनी देशातील २ हजार आमदारांचे एकत्र विचार मंथन घडवून आणले.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मी, माझे पद आणि मनःशांती’ या विषयावर सांगितले की, पद हे मनुष्याच्या मनात अहंकार निर्माण करते. परंतू जीवनात व्यक्ती म्हणून असलेले पद कायम ठेवा. मन शांती ही अध्यात्मातून नाही तर दैनंदिन जीवनातून, सामाजिक आणि कार्यालयीन स्थळावरून होऊ शकतो. भूमिका ही व्यक्तीनुसार बदलावी जेणे करून शांती निर्माण होईल.”
तसेच डॉ. महेश थोरवे यांनी महाराष्ट्र धर्मावर विचार मांडला तर डॉ.एम.वाय गोखले यांचे ही भाषण झाले.
डॉ. मृदुला कुलकर्णी व पराग खानविलकर यांनी सूत्रसंचालन केले.

सई तापकीर ठरल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती पर्व आठ च्या मानकरी

लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा
महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम

पुणे (दि. २८ नोव्हेंबर २०२३) महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने करण्यात येते.
या संस्थांच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” पर्व ८ अंतर्गत महिलांच्या खुल्या गटाच्या आणि लहान मुले आणि मुलींच्या सौंदर्य स्पर्धा रविवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत झालेल्या विविध फेऱ्यांमध्ये सई तापकीर या प्रथम क्रमांक मिळवित “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” चा मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. नेहा निकाळजे द्वितीय क्रमांक मुकुट आणि रोख बारा हजार रुपये, तृतीय क्रमांक सानिका जवंजाळ यांनी मुकुट आणि रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ कर सल्लागार शाळिग्राम तायडे प्रा. विजय रामाने यांच्या हस्ते सोन्याची नथ, पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लहान मुलांच्या गटात प्रथम क्रमांक अंशिका कदम, द्वितीय क्रमांक अनविका मोरे आणि तृतीय क्रमांक अनिकेत साळुंखे यांनी मिळवला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नैना वेदपाठक, डॉ. दुर्गा लकडे, सुहास ढवळे आणि प्रा. सूमीता काटकार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि इशा राजे यांनी केली. आऊटफिट तृप्ती पवार, वेशभूषा, केशरचना रिया आदमाने आणि प्रिया कानडे यांनी केली. शिल्पा मगरे-गाडेकर, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंटचे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रुचिका भोंडवे आभार कावेरी तांबे यांनी मानले.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, दि.२८: राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.

चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा
चाकण शहरातील विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे, ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या चाकण, राजगुरूनगर, आळंदी येथील एमआयडीसीमधून १० रस्ते जातात, यापैकी तीन रस्ते मंजूर आहेत, तर चार रस्ते एमआयडीसी क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती करावी, त्यांची रूंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड (रिंग रोड) तयार करताना मरकळ ते गोलेगावदरम्यान सर्विस रोड ९० मीटरऐवजी ११० मीटर करावा. त्यापुढे तो लोणीकंदपर्यंत वाढविण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल.

चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबविण्यात यावेत. देशात नावीण्यपूर्ण कल्पना वापरून घनकचरा प्रकल्प उभारले जात आहेत, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन यापुढील नवीन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी राजगुरूनगर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जलसंपदा विभागाची ८० गुंठे जागा देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा कृष्णा खोरे महामंडळाची असून २० लाख रूपये महामंडळाकडे भरून शासनाला जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली.

४२% भारतीय घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक समारंभ अर्धवट सोडून येतात

मुंबई, २४ नोव्हेंबर, २०२३: भारतात घर हे लोकांच्या जीवनाचे केंद्र असते. भारतीय हे उत्सव प्रिय असल्याने सातत्याने बाहेर सार्वजनिक समारंभ, उपहारगृह, थिएटर किंवा मैफिलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र घराबाहेर असताना आपल्या घराच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या मनात कायम एक पुसटशी भीती देखील असते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसचा एक व्यवसाय गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सने केलेल्या ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या नवीन संशोधनानुसार हे समोर आले आहे. मोकळेपणाने व निर्भयतेने राहता यावे म्हणून घराच्या सुरक्षिततेसाठी भारतीय करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल आणि भारतीयांची जीवनशैलीबद्दल हा अभ्यास नवीन माहिती देतो.

     या संशोधनातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती म्हणजे, सर्वेक्षणातील ४२% प्रतिसादकांनी सांगितले की, ते एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्या घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा किल्ल्यांसंबंधी काही समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परत आले आहेत. यावरून हे दिसून येते की, घरात जाण्यासाठी लोकांना बऱ्याचवेळा इतरांवर अवलंबून रहावे लागते आणि त्यासाठी कधीकधी अगदी कार्यक्रम सोडून घरी  जाणे देखील त्यांना भाग पडते.

     एका लोकप्रिय इव्हेंट टिकिट पोर्टलनुसार, साल २०२२ मध्ये जवळपास १९,००० मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून सुमारे ८ दशलक्ष लोक बाहेर पडले. ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या अभ्यासाने दिलेली माहिती या पोर्टलच्या   माहितीशी पूरक आहे; कारण या संशोधनानुसारदेखील ५४% प्रतिसादकांनी रात्री

उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मध्यरात्री अतिरिक्त किल्ली घेण्यासाठी त्यांना त्रास देण्याच्या कल्पनेबद्दल  अस्वस्थता व्यक्त केली. याशिवाय, ४१% प्रतिसादकांनी सांगितले की, घरात नसताना जर अचानक त्यांच्या लक्षात आले की गॅस किंवा गिझर चालू आहे तर ते ताबडतोब घरी परत येतील.

     गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सनेचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांच्या मते, ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या संशोधनातून समोर आलेली ही प्राथमिक माहिती, ग्राहकांच्या त्यांच्या घरासंबंधी असलेल्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या पैलुबाबत म्हणजेच घरच्या सुरक्षिततेबाबत  काय भावना आहेत या विषयावर प्रकाश टाकते. या संशोधनातील माहितीने  घराच्या सुरक्षेबाबत लोकांचे काय प्रश्न आणि काय अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांना कसे पूर्ण करू शकतो हे आम्हाला स्पष्टपणे दाखवले आहे. भारतीय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अजूनही बाह्य घटकांवर अवलंबून आहेत हे जरी स्पष्ट दिसून येत असले तरी आता ते आजच्या धावपळीच्या जगात शांत, चिंतामुक्त आणि मनमोकळे जगता यावे म्हणून विश्वसनीय तांत्रिक उपाय सुद्धा शोधत आहेत. ‘विश्वास’ या शब्दाचा जणू समानार्थी शब्द म्हणजे गोदरेज लॉक्स. या गोदरेज लॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार घराच्या सूरेक्षेचे नवीन, अत्याधुनिक, डिजिटल उपाय विकसित करतो; जे आमच्या ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देतात आणि त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्त मनमोकळे जगण्याची मुभा देखील देते.

     सुविधा आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी माणसे स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करताना नेमके कसे विचार करतात आणि कसे वागतात हे समजून घेणे हे ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि भोपाळ या ५ शहरांमधील २००० लोकांना घेऊन करण्यात आले आहे.

उच्चभ्रू भोसलेनगरमध्ये पुन्हा साडेसतरा लाखाची घरफोडी

पुणे- काल साडेबत्तीस लाखाची घरफोडी एका बिल्डरची झाली असताना आज पुन्हा त्याच भोसलेनगर साडेसतरा लाखाची घरफोडी झाली .यावेळेस देखील पोलिसांनी फिर्यादीचे नाव जाहीर न करण्याचा पवित्र घेतला आहे. सीसी टीव्ही चे जाळे , सुरक्षा व्यवस्था असताना उच्चभ्रू वसाहतीत होणाऱ्या या घरफोड्या आता चर्चेचा विषय बनला नाही तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.भोसलेनगर मधील अशोकनगर मधील फाईवसेन्साई बिल्डींग मधील फलॅट कुलूप बंद असताना फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून वॉक इन वाॅड्रोबच्या तिजोरीचे दार कशाने तरी उचकटून तिजोरीतील सोन्याचे तसेच हिऱ्यांचे साडेसतरा लाखाचे दागिने चोरट्याने लंपास केले .सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील ९०११७१९१०० हे अधिक तपास करत आहेत.

कीर्तनातून चरितार्थाच्या पलीकडे अर्थ देण्याचे काम : सुश्रुत वैद्य

पुणे:महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सव चे उद्घाटन दि २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाले.

या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसचे उपाध्यक्ष सुश्रुत वैद्य, ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर, संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे , भारतीय विद्या भवन बंगळूरु केंद्राच्या सहसंचालक नागलक्ष्मी राव,भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे,मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत झाले.

भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा उद्घाटन सोहळा पारंपारिक उत्साहात पार पडला.

भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने(विठ्ठल रुक्मिणी कथा) प्रारंभ झाला .
दि. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य ‘कथा कीर्तन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना सुश्रुत वैद्य म्हणाले, ‘माणसाच्या जीवनाला चरितार्थाच्या पलीकडे अर्थ देण्याचे काम कीर्तन माध्यमातून केले जाते. महाराष्ट्राला कीर्तन प्रबोधनाची मोठी परंपरा आहे.म्हणुन या कीर्तन महोत्सवाला प्रोत्साहन देण्याचे काम इन्फोसिस फाऊंडेशनने केले आहे. मानवी जीवनाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात योगदान इन्फोसिस फाउंडेशन च्या वतीने केले जात आहे.कीर्तन महोत्सवातून या सर्व उपक्रमांना बळ मिळेल’.

डॉ.गो. बं.देगलूरकर म्हणाले, ‘शैक्षणिक संस्थेत कीर्तन, वारकरी परंपरेचा उपक्रम चालतो आहे , ही कौतुकाची बाब आहे. ब्रम्हानंद मिळावा हा कीर्तनाचा उद्देश असतो. नीती कल्पनांवर आधारित संत कार्य सर्वांसमोर ठेवणे हा कीर्तनाचा उद्देश असतो. कीर्तनाला तरुण पिढी येते , ही देखील चांगली गोष्ट आहे. भारतीय तत्त्वज्ञान चा सखोल अभ्यास कीर्तनकारांनी केलेला असतो. त्यातून अमृतानुभव आपण घेतला पाहिजे. ‘

डॉ सदानंद मोरे म्हणाले,’ आपली संस्कृती घडविण्यामध्ये आणि टिकविण्यामध्ये कीर्तनाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा वर्धिष्णू होत राहिले पाहिजे.इहलोकाचे रूपांतर वैकुंठामध्ये करण्याचे सामर्थ्य कीर्तनात आहे ‘.

भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नाग लक्ष्मी राव यांनीही मनोगत व्यक्त केले. लीना मेहेंदळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले.

सप्ताह भर कथा कीर्तन

मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांचे पारंपरिक वारकरी कीर्तन(भक्त प्रल्हाद कथा ) होणार आहे. बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन स्वर मंजुषा श्रीमती अंजली कऱ्हाडकर व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर या माय – लेकींच्या “कीर्तन संवादाद्वारे ” (पुरंदर दास कथा )तिसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे. गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यम तज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.

आरोग्याच्या हिताकरीता पाच पटींनी अधिक विमा संरक्षण मिळण्याची तरतूद

·         चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुटुंबाला विमायोजना खरेदी करतेवेळी प्रीमियममध्ये ५ टक्क्यांची सूट. ही सूट नूतनीकरणाच्या वेळीही राहणार कायम.

·         विम्याची रक्कम पुनर्संचयित करण्यासाठी ‘रिस्टोर इन्फिनिटी’सारखा पर्याय

·         अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी (प्री-एक्झिस्टिंग डिसीज – पीईडी) विशिष्ट परिस्थितीत प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३० दिवसांपर्यंत कमी करण्याचा पर्याय.

मुंबई२८ नोव्हेंबर २०२३ : ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ या नावाची एक विशेष आरोग्यविमा योजना सादर केली आहे. त्यात विमाराशीच्या पाच पटींनी अधिक एवढे विमाकवच ग्राहकांना मिळणार आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या खर्चावर ग्राहकांना मात करता यावी, याकरीता ही विशेष योजना कंपनीने आणली आहे. मोठ्या महानगरांपासून लहान गावांपर्यंत सर्व कुटुंबांच्या आरोग्यसेवांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ योजना काळजीपूर्वक रचण्यात आली आहे.

‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या पॉलिसीमध्ये पाच लाख ते वीस लाख रुपयांपर्यंतचा आरोग्यविमा काढता येतो. कुटुंबाच्या हितांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही एक समग्र स्वरुपाची पॉलिसी आहे. ग्राहकांना त्यांच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर या पॉलिसीचे दोन पर्याय (व्हॅल्यू प्लॅन आणि जिओ प्लॅन) उपलब्ध असतील. आपापल्या गरजांनुसार ते या योजनेंतर्गत उपलब्ध असलेले इतर पर्यायी लाभही निवडू शकतात. टाटा एआयजीचे देशभरात १० हजारांपेक्षा जास्त रुग्णालयांचे विस्तृत नेटवर्क आहे. त्यांतून ग्राहकांना आपल्या वैद्यकीय गरजांनुसार उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळू शकेल.

‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या नवीन आरोग्यविमा पॉलीसीबद्दल अधिक माहिती देताना ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.’चे आरोग्य उत्पादने व प्रक्रिया विभागाचे वरिष्ठ उपप्रमुख डॉ. संतोष पुरी म्हणाले, टाटा एआयजीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर देतो. ग्राहकांना कोणताही तडजोड न करता नाविन्यपूर्ण आरोग्यविमा योजना मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. हेल्थ सुपरचार्ज सादर करून आम्ही पॉलिसीधारकांना त्यांच्या आरोग्यासाठी ५ पटींनी अधिक कव्हरेज प्रदान करू शकू. जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होत असलेल्या सध्याच्या जगातही विमा पॉलिसी म्हणजे ग्राहकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. सर्वांचे आरोग्य ५ पट अधिक कव्हरेजसाठी पात्र असल्यामुळे आम्ही ही योजना त्या दृष्टीने डिझाइन केली आहे. ती सानुकूलितपरवडणारी असून निरोगीपणा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांच्यावर भर देणारी आहे.

‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ची प्रमुख वैशिष्ट्ये :

·         पाच पट सुपरचार्ज बोनस : या विमा योजनेमध्ये पाच पट सुपरचार्ज बोनसच्या माध्यमातून ग्राहकांना वाढीव कव्हरेज मिळते. त्यातून ग्राहकांच्या कुटुंबांसाठी सर्वसमावेशक विमासंरक्षण सुनिश्चित होते. या पॉलिसीच्या प्रत्येक नूतनीकरणावर पॉलिसीच्या मूळ विमाराशीच्या ५० टक्के इतका बोनस मिळतो, तसेच पॉलिसी वर्षात ग्राहकाने कितीही वेळा क्लेम दाखल केला, तरीही मूळ विमाराशीच्या ५०० टक्क्यांपर्यंतचा जास्तीत जास्त बोनस पॉलिसीधारकाच्या नावावर जमा होतो.

·         तरुण कुटुंबाना विशेष सवलत, जी कायम मिळत राहते : पॉलिसीच्या खरेदीवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्या कुटुंबाला अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळू शकते. संबंधित कुटुंबाने कितीही वेळा क्लेम दाखल केले, तरी ही सवलत पॉलिसीच्या नूतनीकरणावरदेखील लागू होते. तरुण व्यक्तींनी आरोग्यविम्याचे लाभ अधिक संख्येने मिळवावेत, याकरीता ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

·         परवडणारे प्रीमियम : ‘टियर-थ्री’ व ‘टियर-फोर’ शहरांतील लोकसंख्या, तसेच परवडणारी पॉलिसी घेऊ इच्छिणारे ‘टियर-वन’ व ‘टियर-टू’ शहरांतील ग्राहक, यांना योग्य ठरेल असे प्रीमियमचे स्वरूप.

·         सानुकूल करण्याजोगे पर्याय : ‘व्हॅल्यू प्लॅन’ आणि ‘जिओ प्लॅन’ अशा दोन लवचिक स्वरुपाच्या प्रकारांमध्ये ही पॉलिसी उपलब्ध आहे. अमर्यादित पुनर्संचयन, तसेच अगोदरपासून असणाऱ्या काही विशिष्ट आजारांसाठीचा (पीईडी) प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासारखे पर्यायी लाभ मिळविण्याची सोय.

·         अंगभूत स्वरुपातील निरोगीपणाच्या सेवा व निरोगीपणासाठीचे उपक्रम : आमच्या ग्राहकांना आरोग्य आणि हित कायम चांगले राखता यावे व स्वतःची देखभाल करता यावी, याकरीता विशेष सुविधा.

·         प्रतिबंधात्मक वार्षिक आरोग्य तपासणी : ग्राहकाने पॉलिसीच्या वर्षभरात कितीही क्लेम दाखल केले, तरी अतिरिक्त प्रीमियम भरून एकदा आरोग्य तपासणी करून घेण्याची सोय.

 वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक, माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

पुणे : मुलीला अनिवासी भारतीय विद्यार्थी (एनआयए) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लष्करातील निवृत्त जवानची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत निवृत्त जवानाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (दोघे रा. चिखली), माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपी शिंदे, सूर्यवंशी आणि तुपेरे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना तुमच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले होते. अनिवासी भारतीय विद्यार्थी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून रोख, तसेच ऑनलाइन स्वरुपात गेल्या वर्षभरात २७ लाख २६ हजार रुपये उकळले.पैसे दिल्यानंतर आरोपींकडे प्रवेशाबाबत त्यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने देशभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला विमाननगर परिसरातून अटक करण्यात आली होती. पुणे शहरात मोठ्या संख्येने परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पालकांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. राहुल तुपेरे हे मनसेचे माजी नगसेवक आहेत. पानमळा भागातून ते निवडून आले होते.

देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू करण्याचा प्रयत्न -प्रकाश आंबेडकर

येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही …प्रकाश आंबेडकर यांनी केले अलर्ट

पुणे-ज्यांनी ब्रिटीश काळात धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी लढा दिला. तेव्हा धार्मिक स्तंवात्र्यासाठी लढणाऱ्यानी सामाजिक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना ब्रिटीशांचे हस्तक ठरवले आज पुन्हा तीच परिस्थिती दिसते ,ज्यांनी त्यावेळेस धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होतोय असा कांगावा केला होता त्यांनीच आता नवा कांगावा सुरु केला आहे ,कि या देशात हिंदूंचे राज्य असूनही या देशाला हिंदूंचे राष्ट्र असे संबोधित करावे असा लढा चाललेला आहे मी दुर्दैवाने असे म्हणेन या लढ्याचे गांभीर्य लोकांसमोर आलेले नाही ,आणि पुन्हा वैदिक परंपरा या देशात सुरु व्हावी यावरती संविधानावर बदलणार अशी घोषणा आहे , संघ ,हिंदू परिषद बोलत नाही ,पण फडणवीस हेच म्हणतात आम्ही संविधान बदलणार नाही , आमचे आवाहन आहे हेच

जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही, तोवर आम्ही हे मान्य करणार नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही होऊ शकतात राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलिस स्टेशन्सला तसा अलर्ट आला आहे,असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशी पोलिसांना सूचना आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.सध्या देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. तर देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केले जात आहे. असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना केला आहे देशातलं वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकतं. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. ते थांबण्याएवजी त्याला खतपाणी घातले जाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.