एमआयटी डब्ल्यूपीयूत व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना
पुणे,दि.२८ नोव्हेंबर:”देश बदलायचा असेल तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा आराखडा बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण करून शिक्षकांनी त्यांच्यावर कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ. राकेश भटनागर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी युनेस्को चेअर फॉर पीसचे वरिष्ठ सल्लागार प्रा. डॉ. प्रियंकर उपाध्याय हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे , बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे माजी अध्यक्ष ए. जंबूनाथन व वत्सला जंबूनाथन उपस्थित होते.
डॉ. भटनागर म्हणाले,” देशातील शिक्षणाची दिशा बदलणे गरजेचे असून त्यात गुणवत्ता व कौशल्यपूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. प्रगत जर्मनी देशात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. या देशात आज सर्वोत्तम इंजिनियर आहेत. भारतामध्ये आयआयटी सारख्या शिक्षण संस्थेने सर्वोत्कृष्ट इंजिनियर निर्माण केले परंतू ते इंजिनियर विदेशात जाऊन संशोधन करतात. अशा वेळेस देशातील विद्यापीठांनी उत्तम संशोधक निर्मितीसाठी शिक्षणावर खर्च करावा. संशोधनामुळेच भारत वैक्सीन निर्मितीची राजधानी बनली आहे.”
डॉ. प्रियंकर उपाध्याय म्हणाले,” संपूर्ण जग शांतीच्या शोधात असतांना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी एमआयटीच्या माध्यमातून शांतीची संस्कृती निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठ्या डोमच्या माध्यमातून शांतीचा संदेश पसरविला जात असतांना आंतरिक व सामाजिक शांती अत्यंत महत्वाची आहे. तसेच राष्ट्रीय विधायक परिषद या अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन करून राहुल कराड यांनी देशातील २ हजार आमदारांचे एकत्र विचार मंथन घडवून आणले.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मी, माझे पद आणि मनःशांती’ या विषयावर सांगितले की, पद हे मनुष्याच्या मनात अहंकार निर्माण करते. परंतू जीवनात व्यक्ती म्हणून असलेले पद कायम ठेवा. मन शांती ही अध्यात्मातून नाही तर दैनंदिन जीवनातून, सामाजिक आणि कार्यालयीन स्थळावरून होऊ शकतो. भूमिका ही व्यक्तीनुसार बदलावी जेणे करून शांती निर्माण होईल.”
तसेच डॉ. महेश थोरवे यांनी महाराष्ट्र धर्मावर विचार मांडला तर डॉ.एम.वाय गोखले यांचे ही भाषण झाले.
डॉ. मृदुला कुलकर्णी व पराग खानविलकर यांनी सूत्रसंचालन केले.