पुणे, 28 नोव्हेंबर 2023
देशाच्या आदिवासी तसेच ग्रामीण भागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचल्यानंतर आजपासून शहरी भागातून देखील या यात्रेचा शुभारंभ झाला. केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम दोन महीने सुरू राहणार आहे. लोकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, तसेच अजूनही योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या नागरिकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहचवी असा उद्देश या यात्रेमागे आहे.
आज पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर व सोलापुर शहरांमधूनही ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू झाली.
ग्रामदैवत कसबा गणपती येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा – पुणे शहर मोहीमेचे उद्घाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अति. आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक शहरात यात्रेचा शुभारंभ नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी महिलांचा मोठा सहभाग होता, शासनाच्या आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यावेळी अनेकांनी नावनोंदणी केली. यात्रेच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणीची विशेष मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
सोलापुरात महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर मधील सिध्दार्थ उद्यानामध्ये देवशाली जिने, नजरिन सय्यद रफी, फिरोज खान इब्राहिम खान, सइनाज शेख जावेद या लाभार्थीच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. गरीब – वंचित यांच्यापर्यंत राज्य व केंद्रशासनाच्या योजना पोहचवणे, ही आमची जवाबदारी आहे, असे मत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी विकसित भारत संकल्प यात्राच्या उद्घाटनप्रसंगी मांडले. महानगरपालिकेच्या दहा झोन मधील 47 ठिकाणी ही यात्रा 22 डिसेंबरपर्यंत विविध परिसरात जाणार आहे. शहरासाठीच्या सहा योजनांसह केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.