Home Blog Page 1189

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिन बुडाचे आरोप फेटाळतो

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

मुंबई, दि. 25

मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, या भूमिकेचे भारतीय जनता पार्टीने समर्थनच केले आहे. समाजाने केलेल्या आंदोलनामध्ये अथवा कायदा करताना मराठा समाजाला अधिकचे मिळावे, या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिले आहे. म्हणून समाज जी मागणी मागतो आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केले होते.

मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिन बुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत.

मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांशी जी शपथ घेतली त्याप्रमाणे आता दहा टक्के आरक्षण दिले आहे. समाजाचे अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतून सोडवले जाऊ शकतात आणि सोडवले पाहिजेत.

या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय रंग देणे हे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारण विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतो आहे. आणि म्हणून याबाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकेरी उल्लेख झाला त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलले पाहिजे, देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठे गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारा नाही. संविधान आणि कायदा याच्या पलीकडे कधी ते बोलतच नाहीत. म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे करण्यात आलेले बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो.

मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षाने खेळावं, कोणत्याही राजकीय पक्षाने हा प्रयत्न करू नये की, अशा पद्धतीने समाजामध्ये वितृष्ठ निर्माण होईल, आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली ? याचा विचार मराठा समाज नक्की करतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्यांनी आतापर्यंत टिकणार आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलं, ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर दहा टक्क्याचा आरक्षण दिले, तसेच गृहमंत्री म्हणून सुद्धा आपली जबाबदारी योग्य पध्दतीने बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. आम्ही ते फेटाळतो. याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल, तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

डिफेन्स एक्स्पो:रविवार दुपारपर्यंत एक लाखाहून अधिक नागरिकांची नोंदणी;सोमवारी शेवटचा दिवस

पुणे, दि.२५: इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये प्रदर्शित संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, नागरिक तसेच उद्योजकांनी गर्दी केली. दुपारपर्यंत एक लाख २० हजारापेक्षा अधिक नोंदणी झाली असून संरक्षण विषयक आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यात तरुणाईने विशेष रस दाखविला आहे.

राज्याचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील शासकीय संस्थांसह अनेक मोठ्या खाजगी संस्था आणि एमएसएमईंनी यात सहभाग घेतला असल्याने प्रदर्शन विशेष ठरले आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेच्याच्यादृष्टीने अलौकीक कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी प्रदर्शनामध्ये पन्हाळा, सिंधुदुर्ग, शिवनेरी व रायगड किल्ल्यांच्या नावाने चार भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मंडपामध्ये सुमारे १०० ते १५० दालने आहेत. संपूर्ण परिसरात महाराजांच्या गड-किल्ल्यांची संकल्पना चित्रीत करण्यात आली आहे.

देशाची संरक्षण सिद्धता पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव
प्रदर्शनात एमएसमएईंची ४१८ लहान आणि ३३ मोठी दालने आहेत. भारतीय लष्कराच्या तीन्ही दलांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून अत्याधुनिक संरक्षण सामुग्री प्रदर्शित केली आहे. युद्धात उपयोगता येणारी प्रक्षेपणास्त्रे, रणगाडे, हेलिकॉप्टर, विविध प्रकारच्या गन्स जवळून पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव नागरिकांना घेता येत असल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तज्ज्ञांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजक, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांचा सहभाग असलेली चर्चासत्रेदेखील अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि एमएसएमईंना उपयुक्त ठरत आहेत. या चर्चासत्रांनाही चांगली उपस्थिती लाभली आहे.

युवकांना संरक्षण क्षेत्रातीली संधींची माहिती
राज्यात प्रथमच होत असलेल्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरीलही महाविद्यालयांचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. तरुणांना भारतीय वायुसेनेत सहभागी होण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हवाई दलाने या ठिकाणी माहिती देणारा कक्ष उभारला आहे. वायुसेनेच्या विविध कामांची आणि हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी इंडक्शन पब्लिसिटी अॅण्ड एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) ठेवण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून तसेच अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) म्हणून रुजू होण्याचे फायदे काय आहेत, तसेच रुजू होण्यासाठी नियमांबद्दल माहिती देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर भारताचे दर्शन
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन संस्था (डीपीएसयु) आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण साहित्य निर्मात्या कंपन्या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून त्यांनी प्रदर्शित केलेल्या उत्पादनांद्वारे संरक्षण क्षेत्रात देशाने ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने केलेल्या प्रगतीचे दर्शन होत आहे. भारताने सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

प्रदर्शनात मांडण्यात आलेले आकाश आणि समर क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, बोफोर्स गन, वज्र टॅंक, भिष्म टँक, इन्फँन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल, धनुष, एलएसव्ही, रुद्र, समर-२, जमीनीवरून हवेत मारा करणारे प्रक्षेपास्त्र, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली, अँटी सबमरिन क्षेपणास्त्रे, विविध युद्धनौका, पानबुड्यांच्या प्रतिकृती अशी उन्नत आयुधे खास आकर्षण ठरत आहे. या आुयधांसोबत सेल्फी घेण्याचा आनंदही नागरिक घेत आहेत.

डिआरडीओनेदेखील आपले उन्नत तंत्रज्ञान येथे प्रदर्शित केले आहे. त्यात पिनाका मिसाईल, रॉकेट, रॉकेट लाँचर, अभ्यास, रॉकेट लाँचींग सिस्टीमचा समावेश आहे. दक्ष डिफ्युजरसारखे उन्नत रोबोटीक्स तंत्रज्ञानही येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. खाजगी संस्थांनीदेखील विविध तंत्रज्ञानांनी सज्ज वाहने, टँक, शस्त्रास्त्रे येथे प्रदर्शित केलेली आहेत. भारतीय वायुदलाने ‘नाविन्यतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना स्पष्ट करणारी विविध उत्पादने येथे प्रदर्शित केली आहेत.

संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच ऑनलाइन नोंदणीची सुविधा असल्याने करणे सुलभ आहे. प्रवेशद्वारापासूनच्या मार्गावर दुतर्फा राज्यातील गड-किल्ल्यांची लावण्यात आलेली छायाचित्रे शालेय विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. उद्या (सोमवार) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून अधिकाधिक उद्योजकांनी प्रदर्शाला भेट द्यावी,असे आवाहन उद्योग विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रीतेश गोळे, अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी- डिफेन्स एक्स्पो पाहून उत्साह वाढला. अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.

ताथवडे येथील विद्यार्थी- एकाच ठिकाणी बऱ्याच उद्योगस्ंस्थांनी तंत्रज्ञान प्रदर्शित केल्याने हे पाहून भविष्यात करिअर निश्चित करताना खूप फायदा होईल. सैन्यदलाची क्षमताही जवळून पाहता आली.

मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही बोलून फडणवीसांचे साताऱ्याहून मुंबईला प्रस्थान

सातारा – आंतरवाली सराटी येथून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दुसरीकडे सातारा दौऱ्यावर असलेले फडणवीस यांनी यावर बोलणे टाळले असून ते मुंबईकडे निघाले आहेत.आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आपला एन्काऊंटर करायचा होता, सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, हे सर्व फडणवीसांचे षड्यंत्र आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा लोक यामध्ये सामील आहेत असे आरोप त्यांनी केले.यावर मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही एवढेच बोलून फडणविसांनी बोलणे टाळले आहे.

जरांगे पाटील यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हाच प्रश्न त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

दरम्यान, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेल्या फडणवीस यांनी सातारा दौऱ्यातून तातडीने मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशाने रवाना झाले आहेत. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला आहे. आंतरवाली सराटीतून निघाले आहेत. भांबेरी गावापर्यंत आले आहेत.

उद्धव ठाकरे किंवा शरद पवार,राहुल गांधी यांचे नावे का घेत नाही फडणवीसांना का टारगेट करताय – नीतेश राणे

सागर बंगल्यांवर पोहचण्यापूर्वी त्यांना आमची भींत भेदावी लागेल

मुंबई- भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सागर बंगल्यावर येणार आणि आम्ही काय गप्प बसणार काय? सागर बंगल्याआधी आमची एक भिंत आहे, आधी ती भिंत पार करा, असं आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिलं आहेमुळात जरांगे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. मुळात त्यांच्या मनात हा द्वेष का निर्माण झाला आहे. अन्य नेत्यांचे नाव का घेत नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार,राहुल गांधी यांचे नावे का घेत नाही, असा आरोप देखील नीतेश राणे यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नये, असं राणे म्हणाले. मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर यायचा इशारा दिल्यानंतर आम्हाला देखील भिंत म्हणून बाहेर उभं राहावं, लागेल, असं राणे म्हणाले.आंदोलन कशासाठी, फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्याचे आहे. मराठा समाजाचे हित राहिले बाजूला त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. जरांगे यांनी लक्षात ठेवावे आम्ही देखील मराठे आहोत, तुम्हाला सागर बंगल्यांला पोहचण्यापूर्वी त्यांना आमची भींत भेदावी लागेल.

वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी “बॉलीवूड थिम”

0

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली माहिती

मुंबई, दि. २४ फेब्रुवारी २०२४
वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान ७ स्टेशन व त्यामधील 355 खांब व त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन बॉलीवूड थिम साकारुन भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढविणारी ठरणार आहेच शिवाय ती पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज वांद्रे पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू आहे त्या ठिकाणीच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन नव्या संकल्पनेची घोषणा केली.

वांद्रे पश्चिम येथे असणारे बॅन्ड स्टँन्ड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्टेशनसह हा संपुर्ण परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरणारा आहे. बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्म स्टार यांना पहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलीवूड थिम साकारण्यात येणार आहे.

प्रवाशांना माहिती देणे, शहराच्या इतिहासाच्या आठवणी जतन करणे, शहराच्या सुशोभिकरणात भर घालणे यासाठी या जागेचा वापर करणे अपेक्षित आहे.

एमएमआरडीएने या कामासाठी बॉलीवूडची माहिती असणाऱ्या तज्ञ व सर्वोत्कृष्ट सल्लागारांची नियुक्ती केली असून एक विस्तृत मास्टरप्लॅन तयार केला आहे. बॉलीवूडमधील 1913 ते 2023 या मोठया कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार, व प्रसंगावर या थिमची रचना करण्यात येणार आहे. फिल्म इंडस्ट्रीत योगदान असलेले स्ट्युडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. ज्यातून बॉलीवूडचा १०० वर्षांचा इतिहास उलघगणार आहे. याची संपुर्ण उभारणी ही अद्ययावत तंत्रज्ञानाने करण्यात येणार असून जेणे करुन त्यामध्ये रंजकता व जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
प्रकल्प कार्यान्वयीत झाल्यावर लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व योग्य प्रक्रियांचे पालन करून, रविवारी सकाळी रस्त्याचा काही भाग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल आणि बॉलीवूड थीम हॅपी स्ट्रीट कार्यक्रम सुरू केला जाईल. या जागेवर चित्रपट प्रमोशनसह बॉलिवूडशी संबंधित अनेक उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्नही वाढू शकते. अशा पध्दतीने याची रचना करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या प्रकल्पामुळे शहरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ तर वाढेलच, शिवाय मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे लक्षवेधी ठिकाण म्हणून ही जागा ठरेल. असा विश्वास आमदार ॲड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या कामाला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होणार असून उर्वरित काम मेट्रोच्या पायाभूत सुविधांसोबतच सुरू राहणार आहे.

जरांगेंनी आता नौटंकी बंद करावी – प्रसाद लाड

मुंबई-मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर भाजप नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आता जरांगे यांनी नौटंकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ वर्षात स्वत:चा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जो जरांगे राजकीय वरदहस्त करण्याचा जो प्रय्त्न करत होते, यामागचा बोलविता धनी कोण आहे? सिल्वर ओक आहे की जालन्यामधील भैय्या फॅमिली आहे. हे आता लोकांसमोर यायला लागलं आहे .

तुम्हाला दहा वेळा सांगितलं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. ज्या फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. फडणवीसांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय, आता हे पुढे आलंय. पुन्हा एकदा फडणवीसांनी आरक्षण दिल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली. हे आज लक्षात येतंय. समाजाच्या नावावर लेकरु लेकरु करुन ढेकरु देण्याचं बंद करा. आरक्षणामुळे मराठा समाज खूष आहे. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.

दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

सातारा दि.२५ : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जीहे कठापूर )चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहूल कूल, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याधिकारी याशनी नागराजन,पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा सिंचन मंडळ अधिक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे . त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार .

माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गुरुवर्य काही लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर ) योजनेला फेर मान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील 27 गावे व खटाव तालुक्यातील 40 गावी अशी एकूण 67 गावे व त्यातील एक लाख 75 हजार 803 लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या योजनेसाठी जवळपास 1331 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे..
जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेर वाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्याच्या समर्पित भावनेने आमदार जयकुमार गोरे यांनी काम केल्याचे सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर, सोळशी धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी विविध पाणी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुष्काळी भागामध्ये उद्योग उभे राहावे यासाठी कॉरिडॉरचा विषय लवकर तडीस न्यावा, असे आवाहन केले.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे २७ फेब्रुवारीपासून आयोजन !

पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक, मीडिया यांच्या १६ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते !!

पुणे, २५ फेब्रुवारीः पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेचे उद्धघाटन पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते सकाळी ८:३० वाजता होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती आणि नवरात्र मंडळ यांच्यासह वाद्य पथक आणि मीडिया समावेश असलेली ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचा हा सलग तिसरा मौसम आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या ‘मीडिया’ असे १६ निमंत्रित संघ या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्‍वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरूड गणपती मंडळ या गणपती मंडळांसह नवरात्र मंडळातील श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर तसेच ढोल ताशा वाद्य या पथकांमधील युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म या सर्ववादक तसेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा मीडिया संघ, अशा गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, वाद्य पथक आणि मीडिया क्षेत्रातील क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.

या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या स्पर्धेत १६ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.

गुरूजी तालिम टायटन्स्, महालक्ष्मी मारव्हिक्स्, मंडई मास्टर्स, कसबा सुपर किंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, साई पॉवर हिटर्स, दगडुशेठ वॉरीयर्स, रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स, नादब्रह्म ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ढोल ताशा, युवा योद्धाज् आणि मिडीया रायटर्स असे १६ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक असे घसघशीत पारितोषिक मिळणार आहे.

या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात येणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. फेअर प्ले पुरस्कार जिंकणाऱ्या संघाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार्‍या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.२०२२ वर्षीच्या स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने विजेतेपद तर, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

पुणे दि.२५ : इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, इंदापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

नविन बांधकाम ७ हजार ३९२ चौ. फुट जागेत करण्यात येणार आहे. बांधकामाला एकुण अंदाजे खर्च १ कोटी ८३ लाख ४६ हजार ९२६ रूपये येणार आहे.

पुढील सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते अनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

अनगर:- राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अgनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री यशवंत माने, बबनदादा शिंदे, राजेंद्र राऊत, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, दीपक साळुंखे, अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, अभयसिंह शेळके पाटील, प्रकाश चवरे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा सुरू केल्याने या योजनेचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सलोखा योजनेच्या माध्यमातून शेती विषयक अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. शेत रस्ते, पाणंद रस्ते निर्माण केले जात आहेत. पशुसंवर्धन विभागाने गोसेवा कायदा आणल्याने देशी गाईंच्या संवर्धनाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच लंपी आजार आल्यानंतर राज्यातील सर्व गोवांशिय जनावरांचे लसीकरण मोफत करण्यात आले. देशात मोफत लसीकरण फक्त आपल्या राज्यातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे त्वरित निकाली निघणार आहेत. अद्यावत तंत्रज्ञाने मोजणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 25 ते 30 रोव्हर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात रोव्हर कमी पडत आहेत त्या जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून रोव्हर खरेदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली.

अनगर येथील नागरिकांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 1 येथे निर्माण करण्यात आलेले असून त्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाल्याची घोषणा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली. तर अनगरला अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर करत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

प्रारंभी माजी आमदार राजन पाटील यांनी प्रास्ताविक केले. मोहोळ तालुक्यात 104 गावे असून अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय करण्याबाबत लोकांची मागणी होती व ते लोकांसाठी आवश्यक होते असे सांगून हे कार्यालय येथे दिल्याबद्दल त्यांनी शासन व महसूल मंत्री यांचे आभार मानले. यावेळी आमदार यशवंत माने यांनी महसूल भवन इमारतीसाठी पंधरा कोटीच्या निधीची मागणी केली तसेच मोहोळ येथे प्रशासकी इमारतीसाठी 25 कोटीचा निधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. तर आमदार राजेंद्र राऊत यांनी पशुखाद्य व दुधाच्या दरात खूप मोठी तफावत असून दुधाला जादा दर देण्याची मागणी केली.

दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन-

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनगर येथे नव्याने निर्माण केलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाचे उद्घाटन फित कापून व नामफलक अनावरण करून करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी करून या कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे निर्देश दिले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एयर इंडियातर्फे भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्याच्या माध्यमातून नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच

गुरुग्राम – एयर इंडिया या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने आज सेफ्टी मुद्राज हा कंपनीचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच केला. या व्हिडिओमध्ये भारताच्या समृद्ध संस्कृतीच्या माध्यमातून सुरक्षेशी संबंधित सर्व सूचना मांडण्यात आल्या आहेत. मॅककॅन वर्ल्डग्रुपचे प्रसून जोशीशंकर महादेवन आणि भारतबाला या प्रख्यात त्रयीच्या कल्पनेतून साकारलेला हा व्हिडिओ प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संस्कृतीचे वैविध्य दर्शवत सुरक्षेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.

प्राचीन काळापासूनच भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोककलेचे प्रकार कथाकथन तसेच मार्गदर्शनासाठी  वापरले गेले आहेत. एयर इंडियाच्या या नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओमध्ये मुद्रा किंवा नृत्याभिनयातून सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी भरतनाट्यमबिहूकथककथकली, मोहिनीअट्टमओडिसीघूमर आणि गिद्ध अशा देशाच्या विविध भागातील आठ नृत्यप्रकारांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक नृत्यप्रकारातून सुरक्षेशी संबंधित सूचनामहत्त्वाची माहिती आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न पद्धतीने मांडण्यात आली आहे.

एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय कॅम्पबेल विल्सन विल्सन म्हणाले, ‘देशातील प्रमुख विमानवाहतूक कंपनी आणि भारतीय कला व संस्कृतीची पाईक या नात्याने एयर इंडियाला सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून जगभरातील प्रवाशांपर्यंत पोहोचवताना आनंद होत आहे. आमच्या प्रवाशांना हे इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ जास्त लक्षवेधक आणि माहितीपूर्व वाटतील. त्याचप्रमाणे विमानात प्रवेश केल्या क्षणापासून ते भारतीयत्वाची प्रचिती देतील.’

ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचे संगीत लाभलेला हा व्हिडिओ प्रवाशांना सुरक्षा व सेवा यांचा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी देईल. सहा महिने चाललेल्या या प्रकल्पादरम्यान क्रिएटर्सनी विविध ठिकाणी प्रवास करत दृश्य अनुभव घेत या व्हिडिओसाठी प्रेरणा घेतली.

हा सेफ्टी व्हिडिओ सुरुवातीला एयर इंडियाच्या नुकत्याच दाखल झालेल्या A350 विमानात उपलब्ध केला जाणार असून त्यात अत्याधुनिक इनफ्लाइट मनोरंजक स्क्रीन्सचा समावेश असेल. त्यानंतर एयर इंडियाच्या ताफ्यातील इतर विमानांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल.

एयर इंडियाचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ इथे डाउनलोड करता येईल – : https://bit.ly/AirIndiaSafetyVideo

प्रतिक्रिया

प्रसून जोशीअध्यक्ष मॅककॅन वर्ल्डग्रुप एशिया पॅसिफिक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीओओ मॅककॅन वर्ल्डग्रुप इंडिया आणि प्रसिद्ध लेखक व गीतकार

‘प्रवाशांचे लक्ष गुंतवून ठेवणारी, भारतीय संस्कृतीची अनुभूती देणारी आणि जागतिक पातळीवर एयर इंडियाचा ब्रँड उंचावणारी संकल्पना तयार करणं आव्हानात्मक होतं. अत्यावश्यक माहिती देण्यासाठी व भावनांना साद घालणारं काहीतरी शोधण्यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न केले. भारतीय शास्त्रीय नृत्याला कथाकथनाचा अनोखा आयाम लाभलेला आहे. त्यातूनच मला भारतीय नृत्यप्रकारांच्या मदतीने विमानप्रवासात सुरक्षेविषयक सूचना देणारा व्हिडिओ तयार करण्याची संकल्पना सुचली.’

एयर इंडियाच्या सक्षम टीमला ही संकल्पना आवडली याबाबत मी स्वतःला सुदैवी समजतो. माझे जुने मित्र आणि अतिशय बुद्धीमान भारतबाला यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला. एयर इंडियासह काम करण्याची संधी मिळणं हे मॅककॅनसाठी अभिमानास्पद आहे.’

प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि गायक शंकर महादेवन –

एयर इंडियाच्यासुरक्षा सूचना देणाऱ्या व्हिडिओसाठी संगीत तयार करण्याची संधी मिळाल्याचा मला आंद वाटतो. एयर इंडियाच्या प्रवासात नवा अध्याय सुरू होत असताना त्यांचा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ क्रांतीकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठरणारा आहे. या व्हिडिओमध्ये भारतातील विविध नृत्यप्रकारांची सांगड घालण्यात आली असून नृत्य कलाकारांनी मुद्रांच्या माध्यमातून सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. नृत्यप्रकाराबरोबर संगीतही बदलत जातं. अशाप्रकारे काहीतरी अनोखं तयार केल्याबद्दल एयर इंडियाचं कौतुक करायला हवं. या प्रकल्पाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.

भारतीय सिने दिग्दर्शकनिर्माते आणि स्क्रीनरायटर – भारतबाला

भारतातीलसांस्कृतिक वैविध्य दर्शवणाऱ्या प्रकल्पांवर पूर्वी काम केलेलं असल्यामुळे एयर इंडियाकडून आलेल्या या संधीनं मला अभिजात शास्त्रीय आणि लोककला आधुनिक दृष्टीकोनातून मांडणं शक्य केलं. आपला भारत प्रगत धोरण असलेला प्राचीन देश आहे. एयर इंडियासारख्या भारताच्या जागतिक दर्जाच्या विमानवाहतूक कंपनीसाठी अशाप्रकारे सुरक्षेच्या सूचना मांडण्याची ही संधी काहीतरी भव्यतयार करण्याची जबाबदारी वाढवणारी होती. निसर्गरम्य ठिकाणं आणि डोंगराळ प्रदेशात शूटिंग करणं आणि प्रत्येक नृत्यप्रकार तितक्याच अभिमानानं सादर करणंसमृद्ध करणारं होतं. या व्हिडिओमुळे प्रवाशांना भारत दृश्य, सांगीतिक, भावनिक स्वरुपात आणि मोठ्या पटावर समजून घेता येईल. ही फिल्म माझ्या सगळ्यात खास निर्मितींपैकी एक आहे आणि मला आशा आहे, की त्यामुळे एयर इंडियाच्या समृद्ध वारशामध्ये मानाचा तुरा खोवला जाईल. या हवाई प्रवासात तुमचे स्वागत आहे.

एयर इंडियाच्या नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओविषयी

सुरक्षा मुद्रामुद्रा या हिंदी शब्दाचा अर्थ होतो, हातांनी दर्शवलेले भाव. हा भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांचा महत्त्वाचा पैलू असून तो नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.


व्हिडिओविषयी: या व्हिडिओच्या सुरुवातीला एयर इंडियाचे केबिन क्रु सदस्य एका तरुण स्त्रीचे स्वागत करताना दिसतात व तिचे लक्ष एयर इंडिया व्हिस्ता (सोनेरी विंडो फ्रेम जी गेल्या वर्षी एयर इंडियाच्या नव्या जागतिक ब्रँड प्रतिमेचा महत्त्वाचा भाग म्हणून लाँच करण्यात आली होती) ती उत्सुकतेनं ‘व्हिस्ता’मध्ये डोकावून पाहाते आणि एक जादुई सांस्कृतिक खजिना तिच्यापुढे उलगडतो.

पहिल्या दृश्यात भरतनाट्यम नृत्य समोर येतं आणि सीट बेल्ट व केबिन बॅगेजसाठी सूचना देतं. त्यानंतर ही कथा अभिरूचीपूर्ण पद्धतीने पुढे सरकते आणि समुद्रकिनार्यावर ओडिसीचं दर्शन होतं. ओडिसीच्या माध्यमातून सीट्स व ट्रे टेबल्सच्या सुरक्षेबद्दल सूचना दिल्या जातात.

त्यानंतर केरळच्या बॅकवॉटर्सच्या पार्श्वभूमीवर कथकली आणि मोहिनीअट्टमद्वारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स न वापरण्याच्या व विमानात धूम्रपान न करण्याच्या सूचना देतात. कथ्थकद्वारे इमरजन्सी एक्झिट व ऑक्सिजन मास्कविषयी सांगितलं जातं.

सेफ्टी जॅकेटच्या सूचना आसामच्या बिहू नृत्य कलाकारांच्या रसरशीत सादरीकरणातून दिल्या जातात व त्यानंतर जयपूरचं घूमर सुरक्षा व संस्कृतीच्या या मिलाफाला आकर्षक आयाम देतं.

अखेर प्रवाशांना थेट पंजाबच्या शेतात गिद्द नृत्यकलाकारांचं सादरीकरण पाहायला मिळतं आणि त्यातून सेफ्टी कार्डचं महत्त्व सांगितलं जातं.

श्रेय:

·        संकल्पना – प्रसून जोशी, मॅककॅन वर्ल्डग्रु इंडिया

·        संगीत – शंकर महादेवन

·        दिग्दर्शक – भारतबाला

·        फोटोग्राफी दिग्दर्शक – मार्क कोनिनक्स

·        नृत्यदिग्दर्शक – वृंदा मास्तर

शिकत राहिल्यास उत्कर्ष नक्की-प्रा.डाॅ.मंगेश कराड

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात कौशल्य विकास कार्यशाळेचा समारोप

पुणे ः सहाय्यक कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने संस्थेचा गाडा हाकत असतात. असे असले तरी या कर्मचाऱ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, व त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती त्यांनी अंगी जोपासायला हवी. कारण शिकत राहिल्यास आयुष्यात प्रत्येकाचा उत्कर्ष नक्की होतो, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे सहाय्यक कर्मचारी  कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व दोन महिने चाललेल्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ. अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.मोहन मेनन, विठ्ठल चालीकवार, प्रा.श्रीकांत गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाले, १९८३ प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड सरांनी महाराष्ट्रातील पहिल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापन केली. तेव्हा, कोणालाही कल्पना नव्हती की, कराड सर लावत असलेल्या छोट्याशा रोपट्याचा भविष्यात मोठा एवढा मोठा वटवृक्ष होईल. आज एमआयटी शिक्षण समुहांत हाजारों कर्मचारी अत्यंत निष्ठेने काम करतात. त्यांची निष्ठा व कराड कुटूंबियांवरील प्रेमामुळे भविष्यातही एमआयटीच्या बाहू आणखी विस्तारत राहतील यात कुठलीही शंका नाही, असेही डाॅ.कराड यावेळी म्हणाले.  याप्रसंगी प्र.कुलगुरू डाॅ.चक्रदेव, डाॅ.चोपडे, डाॅ.निलवर्ण यांनी देखील भाषण करताना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यासह वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला.  विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली. 
चौकट कर्मचाऱ्याच्या सर्वांगीन विकासावर भर
एमआयटी एडीटी संकुलात कुठल्याही पदावर रुजू होणारा कर्मचारी स्वावलंबी बनेल व तो त्याच्यातील आवडी-निवडी ओळखून सातत्याने नव-नवीन कौशल्य आत्मसात करेल यासाठी आम्ही बांधील आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात शिपाई, क्लर्क, स्वच्छता कर्मचारी म्हणून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील सर्वांगीन विकासावर लक्ष केंद्रीत केले जाते ज्यामुळे ते वैयक्तिक तसेच कार्यालयीन आयुष्यात प्रगती साधतात, असेही प्रा.डाॅ.कराड यावेळी बोलताना म्हणाले.

शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात

पुणे, दि.२४: मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण…. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप….जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला. निमित्त होते ‘शिवगर्जना’ महानाट्याचे…..

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार रामभाऊ मोझे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, माजी विशेष पोलीस महनिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवगर्जना महानाट्याच्या आयोजनाबाबत  संदेश यावेळी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  कार्याची माहिती होण्यासोबत त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला  प्रेरणा मिळावी यासाठी शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात आपण प्रदूषण, रोगराई, दारिद्र्य, बेरोजगारी विरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकंडवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले.  ते म्हणाले, पुढच्या पिढीच्या मनावर छत्रपतींचा विचार आणि कार्याचा आदर्श बिंबविण्यासाठी सर्वांनी हे महानाट्य अवश्य पहावे आणि हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास
देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.

महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय  छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमला. नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

‘शिवगर्जना’ महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
००००

पाण्याचा ताळमेळ लावला पाहिजे: तुकाराम मुंडे

पुणे :‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘ या संस्थेतर्फे आयोजित ‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाचे विभाग सचिव तुकाराम मुंडे, माजी कुलगुरु डॉ.अरुण जामकर,जलसंपदा विभागाचे माजी सचिव डॉ.दि.मा.मोरे, ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘ चे अध्यक्ष शशिकांत पाटील, पुण्याचे आयकर आयुक्त संग्राम गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले.व्यासपीठावरील रोपाला पाणी अर्पण करून परिषदेचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले.

रविवार, दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे सभागृह, पुणे येथे ही परीषद पार पडली.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे,सादरीकरणे,खुली चर्चा असे या एकदिवसीय परिषदेचे स्वरूप होते.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक,अधिकारी सहभागी झाले.’पाणीसमस्येवर धोरणात्मक बदल,जलजागृतीची गरज आहे. शासनासह सर्व संबंधित घटकांनी एकत्रित विचार आणि प्रयत्न केले पाहिजेत’ असा सूर या परिषदेत उमटला.

परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता झाले .उद्घाटन सत्रात संग्राम गायकवाड यांनी ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘ या संस्थेच्या कामाची माहिती दिली.प्रकाश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. समीर शिपुरकर यांनी सूत्रसंचालन केले.उद्घाटन सत्रात तुकाराम मुंडे,डॉ. दि. मा. मोरे( निवृत्त सचिव,जलसंपदा विभाग ), माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी विचार मांडले.

तुकाराम मुंडे म्हणाले, ‘पाण्याचा ताळमेळ, किंमत आणि गुणवत्ता याबाबत शासन आणि नागरीक स्तरावर विचार झाले पाहिजेत.उपलब्ध पाणी,त्याचा खरा उपयोग,नासाडी याचा ताळमेळ लावला पाहिजे.’वॉटर अकाउंट’ झाले पाहिजे. पाण्याबाबत भयावह चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी महिन्यातून दोनदाच पाणी मिळते. ही विसंगती दूर करावी लागेल. जनजागृती ,जल साक्षरता वाढली पाहिजे. १९९० पूर्वी टॅंकर नव्हते,आता बारा महिने टँकर लागतात. अनेक योजनांची नीट अंमलबजावणी होते का हे तपासले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविल्या शिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही.चर्चा घडवून,सुधारणा सुचवणे आणि त्या सुधारणांचा पाठपुरावा करण्याचे ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘ संस्थेचे काम चांगले आहे.त्यासाठी या एकदिवसीय परिषदेचा उपयोग होईल.’.

डॉ.अरूण जामकर म्हणाले, ‘सुरक्षित पाणी हा महत्वाचा विषय आहे. अनेक रोगांना दूषित पाण्यामुळे निमंत्रण मिळते.आपण बाटलीतील पाणी विकत घेवुन पितो कारण, इतर पाणी आपल्याला सुरक्षित वाटत नाही. पाण्याबाबत सर्वंकष विचार करण्यासाठी पाण्यावर, पाण्याशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी एक विद्यापीठ काढण्याची गरज आहे. आर ओ फिल्टर मुळे क्षार, कॅल्शियम वगळले जाते. त्यामुळे हाडांची हानी होते. पाण्याची नासाडी होते. आर ओ फिल्टर चा वापर कमी करण्याची गरज आहे’.

निवृत्त जलसंपदा सचिव डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, ‘ पाण्याबाबत आपला हव्यास वाढत चालला आहे. इमारती वाढत आहेत, पाणी दुर्मीळ होत आहे.उदाहरणार्थ सोलापूर ला 3 टीएमसी पाणी पुरविण्यासाठी नदीत २५ टी एम सी पाणी सोडावे लागते. ते कोणीही बंद करू शकले नाही. त्या जिल्ह्यात पाण्याची कमतरता असूनही ४० साखर कारखाने आहेत. अशा विसंगती वर बोलले जात नाही.उजनी हा राष्ट्रीय सेप्टिक टँक मानला जातो.अनेक धरणाशेजारी शहर , वसाहतीचे सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळते आहे. दवाखान्यांना जत्रेचे स्वरूप आले आहे. पाणी आले की विकास होतो, हा भ्रम आहे . ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘ ने पाण्याबाबतची वस्तुस्थिती शासनासमोर स्पष्टपणे मांडली पाहिजे.’.

उदघाटन सत्रानंतर ‘जलयुक्त शिवार / पाणलोट विकास कार्यक्रम – सद्यस्थिती, उपयुक्तता आणि मर्यादा’ या विषयावर सकाळी 10.35 ते 12.00 या वेळॆत चर्चासत्रात राजेंद्र भोसले(संचालक, मृदसंधारण व पाणलोट विकास व्यवस्थापन, पुणे), डॉ. अविनाश पोळ(मुख्य सल्लागार, पाणी फांऊडेशन, सातारा),हे सहभागी झाले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार हे होते . रवींद्र जायभये यांनी स्वागत केले.डॉ भोसले म्हणाले, ‘पाणलोट क्षेत्रात काम करताना निसर्ग रचना बदलणे भाग पडते.ते करावे की करू नये अशी द्विधा मनस्थिती होते. देशाला पणलोटाची दिशा देणारा महाराष्ट्र आता या क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडला आहे, हे मान्य केले पाहिजे पाणलोट विकासासाठी सक्षम यंत्रणा नाही. तांत्रिक प्रशिक्षण नाही. धोरणात्मक बदल करण्यात आले पाहिजेत ‘.डॉ. पोळ म्हणाले, ‘ कोणतीही शासकीय योजना वाईट नसते, अंमलबजावणी वर बरेच काहीं अवलंबून असते. प्रकल्पांपेक्षा नागरीक प्रशिक्षणामध्ये भावनिक गुंतवणूक होणे गरजेचे आहे’.

पोपटराव पवार म्हणाले, ‘पाणलोट क्षेत्र विकास क्षेत्रात सकारात्मक विचार केला पाहिजे.प्लॅस्टिक आच्छादन चे शेत तळे हे मोठे संकट ठरणार आहे .पार्टी फंड, निवडणुकांचा वाढता खर्च पाहता टेंडर आधारित विकासावर विसंबून चालणार नाही. ग्राम राज्य आल्याशिवाय राम राज्य येणार नाही. पाणी आले तरी सद्सद्विवेक बुद्धीही आली पाहिजे डॉ पोळ म्हणाले, ‘ कोणतीही शासकीय योजना वाईट नसते, अंमलबजावणी वर बरेच काहीं अवलंबून असते’.

चर्चासत्रातून मंथन, उपाय योजनाची चर्चा

दुपारी 12.10 ते 01.35 या वेळेत ‘नदीजोड / नदी वळण प्रकल्प-गरज, संधी आणि आव्हाने’ या चर्चासत्रात विनय कुलकर्णी(निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग), रजनीश शुक्ल(निवृत्त मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग), गणेश सावळेश्वरकर हे सहभागी झाले .व्ही.एम.रानडे (निवृत्त सचिव,जलसंपदा विभाग) हे अध्यक्षस्थानी होते.

दुपारी 02.15 ते 03.40 या वेळेत ‘महाराष्ट्रातील साध्य सिंचन क्षेत्र आणि प्रत्यक्ष भिजणारे क्षेत्र यातील तफावतीची कारणमीमांसा आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात प्रदीप पुरंदरे(माजी प्राध्यापक,वाल्मी,छत्रपती संभाजीनगर),डॉ.राजेश पुराणिक(प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर)सहभागी झाले.जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे हे अध्यक्षस्थानी होते.

दुपारी 03.50 ते 05.25 या वेळेत ‘बिगर शासकीय घटकांद्वारे पाणी व्यवस्थापनः धोरण आणि अंमलबजावणी’ या चर्चासत्रात डॉ. एस. ए. कुलकर्णी(निवृत्त सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण), शहाजी सोमवंशी(वाधाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था), रविंद्र उलंगवार(उपाध्यक्ष व प्रमुख -पाणी व्यवस्थापन विलो म्यँथर व प्लॅट पंप्स),प्रांजल दीक्षित(टाटा समाज विज्ञांन संस्था, मुंबई) सहभागी झाले. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी होते.

संध्याकाळी 05.25 ते 6.20 या वेळेत समारोप सत्र झाले त्यात संतोष तिरमनवार(कार्यकारी संचालक,गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ),प्रसाद नार्वेकर(सहसचिव,जलसंपदा विभाग),शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स),राज्य शासनाच्या महानगरपालिका प्रशासन विभागाचे सहसचिव समीर उन्हाळे सहभागी झाले.

स्वतःला नियमांमध्ये बंधिस्त करा – किशोर राजे निंबाळकर

पुणे-स्वता:मधील न्यूनगंड बाजूला ठेवा. आधुनिकतेच्या युगात सोशल मीडियाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढा. संगत चुकली की जगण्याची दिशा बदलते. बुद्धीचा विकास हा एकांतात होतो तर चारित्र्याचा विकास हा संगतीत होतो. त्यामुळे इतरत्र वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला काही एक नियम घालून द्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. कारण मेहनतीशिवाय फळ नाही. रोज आपण काय करणार आहोत. याची दैनंदिनी तयार करा. आपण या क्षेत्रात का आलो आहोत याचे भान ठेवा. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या जगात स्वतःला नियमांमध्ये बंधिस्त करा.असे मत महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सर्धा परीक्षा : संधी आणि आव्हाने या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ.व्ही.बी.गायकवाड आणि विद्यार्थी उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले, उमेदवारांनी स्‍पर्धा परीक्षेची तयारी करताना काही नियम स्‍वत:ला घालून घ्यावेत, चौथ्या परीक्षेची खात्री वाटत असेल तर तयारी करा. त्‍यानंतर यश न मिळाल्‍यास प्‍लॅन बीचा अवलंब करावा. हा दुसरा पर्याय म्‍हणजे न्‍यूनगंड न बाळगता ती एक संधी म्‍हणून समजायला हवे. त्‍यातून ही अनेक जणांनी यश मिळविले आहे,

निंबाळकर पुढे म्हणाले, स्‍पर्धा परीक्षेच्‍या तयारीसाठी खासगी क्‍लासेस, मुलाखतीसाठी स्‍वतंत्र क्‍लासेस या सर्वांची आवश्यकता आहे का याचा विचार करावा. स्‍पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्‍या उमेदवारांना शहरी वातावरणाशी मिळवून घेण्यासाठी वेळ लागतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्‍वरुपावरुन अभ्यासाची तयारी आपल्‍या गावीही करता येणे शक्‍य आहे. याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.

निंबाळकर पुढे म्हणाले, बुद्धिचा विकास एकांतात आणि चारित्र्याचा विकास संगतीत होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण प्रशासकीय सेवेत का जात आहोत, त्‍याचे उद्दिष्ठ ठेवून ध्येयाप्रती प्रयत्‍न करा. इंस्‍टाग्राम, फेसबूक आणि व्‍हाॅट्स अॅपचा वापर करणे बंद करा. त्‍यातून नकळतपणे किती वेळ जातो, याचे भानही राहत नाही. अनावश्यक ग्रुपमधून बाहेर पडा. हुशार मित्रांचे समूह तयार करा. त्‍यात आज केलेल्‍या अभ्यासाचे सविस्‍तर मांडणी प्रत्‍येकांनी समूहात मांडा. त्‍यावर प्रत्‍यक्षरीत्‍या चर्चा करा. त्‍याच पद्धतीने मुलाखतीची तयारी करा. दैनंदिनी लिहून ठेवा, याकडे निंबाळकर यांनी लक्ष वेधले. तसेच, २०२५ पासून वर्णनात्‍मक पद्धतीने होणाऱ्या परीक्षेची मानसिकता आतापासून तयारी ठेवावी.

कुलगुरुपदाचा प्रवास हा प्‍लॅन बीमधून झाला आहे, असे सांगून डाॅ. संजीव सोनवणे म्‍हणाले, नित्‍य नियमाने व्‍यायाम, वाचन व चिकीत्‍सक अभ्यास करणे आवश्यक आहे. स्‍वत:ला ओळखा आाणि त्‍यादृष्टीने आयुष्याकडे वाटचाल करा.

संयोजक राजेश पांडे म्‍हणाले, स्‍पर्धा परीक्षेच्‍या उमेदवारांसाठी मुक्‍त विद्यापीठाच्‍या सहकार्याने भविष्यात अनेक योजना करण्याचा प्रयत्‍न आहे. त्‍यातून मदत करण्याची भूमिका आहे. त्‍याच उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार व्ही. बी. गायकवाड यांनी मानले.