सातारा – आंतरवाली सराटी येथून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दुसरीकडे सातारा दौऱ्यावर असलेले फडणवीस यांनी यावर बोलणे टाळले असून ते मुंबईकडे निघाले आहेत.आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आपला एन्काऊंटर करायचा होता, सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, हे सर्व फडणवीसांचे षड्यंत्र आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा लोक यामध्ये सामील आहेत असे आरोप त्यांनी केले.यावर मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही एवढेच बोलून फडणविसांनी बोलणे टाळले आहे.
जरांगे पाटील यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हाच प्रश्न त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
दरम्यान, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेल्या फडणवीस यांनी सातारा दौऱ्यातून तातडीने मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशाने रवाना झाले आहेत. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला आहे. आंतरवाली सराटीतून निघाले आहेत. भांबेरी गावापर्यंत आले आहेत.