मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली माहिती
मुंबई, दि. २४ फेब्रुवारी २०२४
वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान ७ स्टेशन व त्यामधील 355 खांब व त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन बॉलीवूड थिम साकारुन भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढविणारी ठरणार आहेच शिवाय ती पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.
आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज वांद्रे पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू आहे त्या ठिकाणीच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन नव्या संकल्पनेची घोषणा केली.
वांद्रे पश्चिम येथे असणारे बॅन्ड स्टँन्ड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्टेशनसह हा संपुर्ण परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरणारा आहे. बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्म स्टार यांना पहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलीवूड थिम साकारण्यात येणार आहे.
प्रवाशांना माहिती देणे, शहराच्या इतिहासाच्या आठवणी जतन करणे, शहराच्या सुशोभिकरणात भर घालणे यासाठी या जागेचा वापर करणे अपेक्षित आहे.
एमएमआरडीएने या कामासाठी बॉलीवूडची माहिती असणाऱ्या तज्ञ व सर्वोत्कृष्ट सल्लागारांची नियुक्ती केली असून एक विस्तृत मास्टरप्लॅन तयार केला आहे. बॉलीवूडमधील 1913 ते 2023 या मोठया कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार, व प्रसंगावर या थिमची रचना करण्यात येणार आहे. फिल्म इंडस्ट्रीत योगदान असलेले स्ट्युडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. ज्यातून बॉलीवूडचा १०० वर्षांचा इतिहास उलघगणार आहे. याची संपुर्ण उभारणी ही अद्ययावत तंत्रज्ञानाने करण्यात येणार असून जेणे करुन त्यामध्ये रंजकता व जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
प्रकल्प कार्यान्वयीत झाल्यावर लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व योग्य प्रक्रियांचे पालन करून, रविवारी सकाळी रस्त्याचा काही भाग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल आणि बॉलीवूड थीम हॅपी स्ट्रीट कार्यक्रम सुरू केला जाईल. या जागेवर चित्रपट प्रमोशनसह बॉलिवूडशी संबंधित अनेक उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्नही वाढू शकते. अशा पध्दतीने याची रचना करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या प्रकल्पामुळे शहरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ तर वाढेलच, शिवाय मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे लक्षवेधी ठिकाण म्हणून ही जागा ठरेल. असा विश्वास आमदार ॲड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या कामाला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होणार असून उर्वरित काम मेट्रोच्या पायाभूत सुविधांसोबतच सुरू राहणार आहे.