श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा समारोप
पुणे : ब्रह्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक थाटात काढण्यात आली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा अनोखा कार्यक्रम देखील मंदिरात मोठया उत्साहात पार पडला.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, नारायण काबरा, तृप्ती अग्रवाल, रमेश पाटोदिया, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला यांसह विश्वस्त उपस्थित होते.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा झाला. याशिवाय मंदिरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांती समृद्धीकरीता प्रार्थना करण्यात आली. सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप व उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा समावेश होता. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक हे कार्यक्रम देखील ब्रह्मोत्सवात पार पडले.
महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक
श्री स्वामी समर्थ पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा : बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कारपालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त ३ मार्च पर्यंत महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.
यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दिनांक २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांचे सादरीकरण होणार आहे, तर २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट बंद,अंबड तालुक्यात संचारबंदी,जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू
जालना: राज्य सरकारनं जरांगे आणि समर्थकांच्या पवित्र्याची दखल घेत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं आहे.तसेच मनोज जरांगेंचे तीन शिलेदार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत.
जरांगे हे अंतरवली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे सहकारी सक्रीय आहेत. जरांगें यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच आज २६ फेब्रुवारी सकाळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
राज्य सरकारनं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे.
मराठा आंदोलकांनी जालन्यात एसटी बस पेटवून दिली. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर , जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.दुसरीकडे, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवली. घटनेनंतर सध्या तीर्थपूरी मार्केट बंद करण्यात आले आहे. बसला आग लावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. तसंच एसटी जाळल्याच्या घटनेनंतर ‘एमएसआरटीसी’च्या अंबड आगार व्यवस्थापकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र आज सकाळी संचारबंदीमुळे मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या निर्णयावरून माघार घेतली आहे. तसेच मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे.
हे पाप कोणाचे, हे सर्वांना माहिती आहे.. वडेट्टीवारांची बोटे फडणवीसांच्याकडेच
मुंबई-जरांगे यांच्या आंदोलना विषयी बोलताना हे कोणाचे पाप, हे सर्वांना माहिती आहे. कोणाचे ओएसडी आणि पीए त्यांना भेटण्यासाठी जात होते, हे देखील पूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जारेदार हल्हाबोल केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सडकून टीका केली.
जरांगे यांना कोणी तयार केले. त्यांना तयार करणारे कोण? त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण? सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाचे ओएसडी त्यांना भेटण्यासाठी जात होते? कोणाचे पीए जात होते? कोण तडजोडी करत होते? कोण त्यातून मार्ग काढत होते? त्यातून जरांगे यांची हिम्मत कोण वाढवत होते? हे सर्वांना माहिती आहे. हे कोणाचे पाप आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचे पीए थोडीच त्यांना भेटण्यासाठी जात होते. जे पेराल तेच उगवेल अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली.
राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण हवे आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकार आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 जुन्या नाटकांचा अभ्यास करतोय ‘गृह खात्याला जाग येते’ अन् ‘सीमेवरून परत जा’, छगन भुजबळांचा जरांगेंना टोला
मुंबई-मला जरांगे यांच्यावर बोलायचे नाही. सध्या माझा 2 जुन्या नाटकांचा अभ्यास सुरू आहे. एक डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जेव्हा जाग येते आणि दुसरे म्हणजे सीमेवरून परत जा. या 2 नाटकांच्या जुळवाजुळवीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मला या मुद्यावर बोलण्यास वेळ नाही, असे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.आपल्या या वक्तव्याद्वारे त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मनोज जरांगे पाटील यांना टोला हाणला आहे.
मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मु्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका करत तावातावाने मुंबईच्या दिशेने निघाले. पण आता पोलिसांनी संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना सोमवारी पुन्हा आंतरवाली सराटीत परतावे लागले. यामुळे ते काहीसे बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. ते सायंकाळी आपली पुढील दिशा स्पष्ट करतील. दुसरीकडे, मनोज जरांगे यांच्या या स्थितीविषयी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना छेडले असता त्यांनी आपल्याला जरांगेंच्या मुद्यावर बोलण्यास वेळ नसल्याचे स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. पण त्याचवेळी त्यांनी त्यांना उपरोधिक टोलाही हाणला. सध्या अधिवेशन सुरू आहे मला तिकडे पाहू द्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी रविवारीच मनोज जरांगे यांचे पितळ उघडे पडत असल्यामुळे ते आक्रमक होत असल्याचा दावा केला होता. मराठा समाजाला विधिमंडळात एकमताने स्वतंत्र आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता जरांगेंनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे? ता त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात आरोप करत आहेत. कदाचित त्यामुअळेच त्यांनी हे आकांडतांडव सुरू केले आहे. आता त्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे. त्यात त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाची केलेली दिशाभूल, हे सर्व काही उजेडात येत आहेत. यामुळे रक्तदाब वाढल्यामुळे ते असे बोलत असावेत, असे भुजबळ यांनी म्हटले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बदनाम करण्याचा, सलाईनमधून विष द्यायचा व एन्काउंटरमध्ये ठार मारण्याचा कट रचला आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना माझा बळी हवा असेल तर मीच त्यांच्यापुढे जाऊन उभा राहतो, असे म्हणते ते अचानक मुंबईतील फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते. पण सोमवारी राग शांत झाल्यानंतर ते पुन्हा आंतरवाली सराटीत परतलेत.
‘आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण!
मुंबई: आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी ‘जन्मऋण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून ‘आभाळमाया’ या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे.
मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित “जन्मऋण” हा त्यांचा चित्रपट आहे.
‘श्री गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका – चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.
अंबडमध्ये संचारबंदी,मी पुन्हा येईनची भूमिका घेत जरांगे आंतरवालीत दाखल
जालना जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार दिनांक २६ म्हणजेच आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं संचारबंदी लावण्यात आली आहे. सागरची दारं उघडी आहेत, असं सांगितलं पण संचारबंदी लावण्यात आली,
जालना-मराठा आंदोलक मनोज जरांगे आंतरवालीत दाखल झाले आहेत. तिथे उपस्थित मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले असून आपण संध्याकाळी 5 वाजता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर त्यांनी परिसरातील राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईसाठी येण्याचे आवाहन केलेलं होतं. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकारी यांच्या वतीने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे यांनी संचारबंदीचा आदेश आल्यानंतर अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं संचारबंदी लावण्यात आली आहे. सागरची दारं उघडी आहेत, असं सांगितलं पण संचारबंदी लावण्यात आली, असं जरांगे यांनी म्हटलं. मराठ्यांची लाट विरोधात जाऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.
शिवगर्जना महानाट्याला दुसऱ्या दिवशीही शिवप्रेमींची अलोट गर्दी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग भव्य मंचावर सादर
पुणे:- हर हर महादेव, जय जय जय जय जय भवानी जय जय जय जय जय शिवाजी, आम्ही शिवबाची चाकरं.., एक मुजरा भगव्या झेंड्याला एक मुजरा जरी पटक्याला…, युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला या आणि अशा विविध ऐतिहासिक घोषणा, गाणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींनी ‘शिवगर्जना’ या महानाट्याचा आनंदानुभव घेतला.
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी महानाट्याचा अखेरचा प्रयोग सादर होणार आहे.
भव्य मंचावर शिवप्रेमींनी अनुभवला शिवकालीन इतिहास
देखण्या आणि भव्य मंचावर शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. वेरुळ, विजयनगर साम्राज्यांवर परकीयांचे आक्रमण, बाल शिवाजींचा जन्म, पन्हाळा किल्ला वेढा, आग्र्याच्या दरबारातील प्रसंग, कोंढाणा किल्ला झुंज, स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती, राज्याभिषेक यासह स्वराज्य निर्मितीच्या विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसरात जणू साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ अवतरला होता. जय भवानी… जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय आसवले तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शिवगर्जना’ महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मंदिर,घाट,कॅनाल,डॅम,नदी,तळे निरंकारी स्वयंसेवकांनी केले स्वच्छ
पाणी ही देवाने दिलेली देणगी आहे, या अमृताची काळजी आपणच घेतली पाहिजे.– सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
पुणे , २६ फेब्रुवारी २०२४:- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सानिध्यामध्ये , ‘अमृत प्रकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छ जल , स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे यमुना नदीच्या छठ घाटावर उद्घाटन करण्यात आले.बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन, हा प्रकल्प भारतातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५३३ हून अधिक ठिकाणी ११ लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला.सतगुरु माताजींनी अमृत प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वादात सांगितले की, पाण्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि ते अमृतासमान आहे. पाणी हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे.देवाने दिलेल्या या स्वच्छ आणि सुंदर सृष्टीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाला आपल्या कृतीतून प्रेरित केले पाहिजे, केवळ शब्दांनी नाही. जेव्हा आपण प्रत्येक कणात असलेल्या भगवंताशी नाते जोडतो आणि त्याचा आधार घेतो, तेव्हा त्याच्या सृष्टीच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करू लागतो.आपला प्रयत्न असा असावा की जेव्हा आपण हे जग सोडू तेव्हा या पृथ्वीला अधिक सुंदर रूपात सोडून जाऊ. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी श्री.ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी,मुळा,मुठा,भीमा,भामा,घोडनदी,पवना,वेळू,कुकडी,मीना,कऱ्हा,आनंदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा ४३ ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट ,कात्रज तलाव ,आळंदी-देहू येथील इंद्रायणीनदी घाट ,मोरया गोसावी येथील पवना नदी घाट,झुलेलाल घाट,खडकवासला धरण परिसर , नाझरे धरण,पाषाण तलाव इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत.त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच ठिकठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी ८००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते.. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित पाहुण्यांनी मिशनचे भरभरून कौतुक केले आणि निरंकारी सतगुरु माताजींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की जलसंधारण आणि जल स्वच्छता या कल्याणकारी प्रकल्पाद्वारे मिशनने निसर्ग संवर्धनासाठी नक्कीच योगदान देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे :- श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान, श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमिअर मैदान,डोंबिवली (पूर्व) येथे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे , कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज येथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन,पवित्र, मंगलमय झाला आहे. तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी-समाधान- आनंद आणतात. मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात, त्याला दुःखातून सुखात आणतात.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावो,या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले, प्रसादाचा लाभ घेता आला.
या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून श्री.शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झाले. त्यांच्या हस्ते अबूधाबीतही मंदिराचे लोकार्पण झाले. देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले व प्रसादाचाही लाभ घेता आला. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद. तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे, त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो, या सदिच्छा. या महोत्सवासाठी तिरूपती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी, विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
फडणवीसांचा अपमान सहन करणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे
जरांगेंकडून सुसंस्कृत. महाराष्ट्राला गालबोट; बोलविता धनी कोण?
नागपूर:मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे. जातीवरून टीका करतानाच त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला, हे महाराष्ट्र व भाजपा सहन नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नागपूर येथे माध्यमांना त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकविले. मनोज जरांगे यांचा जीव वाचायला हवा आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या निष्कलंक माणसावर आरोप करणे हा महाराष्ट्रासाठी वाईट दिवस आहे.
पुढे ते म्हणाले, जरांगे सागर बंगल्यावर जात आहेत; यात फडणवीसांची काय चुक आहे. ज्यांनी ४० वर्षे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण घालविले, अशा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन प्रश्न विचारायला हवा. फडणवीसांवर केलेले असे वक्तव्य मराठा समाजाला मान्य नाहीं आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेतृत्त्व आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे आवाहन
पुणे, दि. २५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येरवडा, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या ठिकाणी मराठी कला, नाट्य, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहेत.
महोत्सवाअंतर्गत २८ फेब्रुवारी रोजी उदघाटन सभारंभात अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे ढोल ताशा पथक, गणेश वंदना व वारसा संस्कृतीचा, गदिमा सभागृह बारामती येथे गरजा नाट्य छटांचा, हास्य विनोद आणि कीर्तन व सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात लावणीचा कार्यक्रम होणार आहे.
२९ फेब्रुवारी रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात भजन मंडळ स्पर्धा, पारितोषिक वितरण व अभंगरंग, गदिमा सभागृह बारामती येथे ‘यदा कदाचित नाटक’, तर सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात एकांकिका व ‘सोबतीचा करार’ हे नाटक होईल.
१ मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात एकांकिका, कविता वाचन आणि यदा कदाचित नाटक, गदिमा सभागृह बारामती येथे एकांकिका व ‘तुझी आठवण’ हे नाटक तर सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
२ मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात
एकांकिका, बोक्या सातबंडे व देशभक्तीपर संगीत, गदिमा सभागृह बारामती येथे बोक्या सातबंडे, एकांकिका व गीत रामायणाचा कार्यक्रम होईल.
३ मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात, एकांकिका, संस्कृती जत्रा व नक्षत्रांचे देणे आणि नदीकाठीच्या मार्गाने पुणे विद्यापीठतर्फे लहान मुलांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येईल. गदिमा सभागृह बारामती येथे एकांकिका, स्वराज्य गाथा शिवदर्शन, एकांकिका हे कार्यक्रम होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी हा या महासंस्कृती महोत्सवामागचा उद्देश आहे.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मुंबई भाजपा महिला मोर्चा आणि आ. मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने ‘नारी शक्ती वंदन’ अभियान यशस्वी
मुंबई दिनांक २५ फेब्रुवारी २०२४
मुंबई भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने नारीशक्ती वंदन अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. यानिमित्ताने आज दहिसर येथील गणपत पाटील नगरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल गंभीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मनीषा चौधरी म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात महिलांसाठी अनेकविध योजना यशस्वीरित्या राबवण्यात आल्या त्याचा फायदा महिला सक्षमीकरणासाठी झाला. भारतातील महिला संपूर्ण देशाला दिशा देत आहेत. देशातील पहिली व्यक्ती म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्व महिला शक्तीचा अभिमान वाढवत आहेत.
मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल गंभीर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची महिला शक्ती जगात झेंडा फडकवत आहे. भाजप सरकारच्या काळात देशातील महिला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत असेही त्या म्हणाल्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही; सरकारचा संयम पाहू नका – जरांगे आणि आंदोलकांना सरकारचा इशारा
मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून यासाठी शासन कटिबद्ध असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, गृह निर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्व सामान्य कामगार, कष्टकरी, महिला, युवा याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारे निर्णय घेतले जातील. या दिड वर्षात अनेक योजना सुरू केल्या. त्यामध्ये शेतकरी, महिला यांचा आयुष्यात बदल घडवणारे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. अवकाळी, गारपीट, महापूर मध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. शेतकऱ्यांसाठी 45 हजार कोटींची मदत केली. तसेच शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरु केली. एस.टी महामंडळाच्या बस प्रवासात महिला सन्मान योजना सवलत देण्यात आली आहे.
राज्यात 8 लाख कोटी रुपयाचे पायाभूत सुविधा, अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे विविध उपक्रमाला चालना देण्याचे काम सरकार करीत आहे. दावोस येथे 3 लाख 73 हजार कोटी रुपयांचे सामजंस्य करार करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीपथावार आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे याला प्राधान्य देण्यात येत आहे. शासन आपल्या दारी असा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. सरकार गतीमान आहे. सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.स्वच्छाता मोहिम राज्यात राबविण्यात येत असून यामुळे प्रदुषण कमी होत आहे. राज्याला प्रगतीपथावर नेत असतांना सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्यात येत असल्याचे, श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने राज्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदींचा डेटा बेस करुन कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणे सुकर झाले. कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याकरीता दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशना विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथीमार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी ९ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले. इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्ती करण्यात आले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा वितरीत करण्यात आला. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली.
एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय. अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यरत असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करत आहे – देवेंद्र फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात विकासाची कामे वेगात सुरू आहेत दुष्काळ, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो बोनस घोषित झाला आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आहे.हे सरकार लोकांचे जीवन सुकर होईल असे काम करते आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये – अजित पवार
याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील. महानंद प्रकल्प राज्याचा असून गोरेगाव येथे मुख्यालय आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे देशपातळीवर कार्य करणारी संस्था असून यापूर्वी देखील जळगाव जिल्हा दूध संघाचे त्यांच्याकडे हस्तांतर केले होते परंतु त्या दूध संघाची आर्थिक सुधारणा झाल्याने सुस्थिती आलेला दूध संघ जळगाव जिल्हा कडे हस्तांतरित करण्यात आला. दूध उत्पादकांसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
ते पुढे म्हणाले, ड्रग्जच्या गुन्ह्याचे तपास करताना पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पंजाब व परदेशापर्यंत धागेदोरे शोधले आहेत या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 25 लाखाचे रोख पारितोषिक देखील जाहीर केले आहे. मराठा आरक्षण बाबत शासनाने मार्ग काढण्याचे धोरण स्वीकारून ते पूर्ण केले आहे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही झाली होती . बिहारचे 50% पेक्षा अधिक आरक्षण मध्ये मर्यादा असून राज्यांमध्ये त्याच धर्तीवर 50% पेक्षा अधिक आरक्षण झाले आहे. ते टिकणारे असून या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था चांगली रहावी हे गरजेचे आहे सर्वसामान्यांसाठी सरकार काम करीत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.
पुणेकरांनी 4 तासात 53 टन कचरा शास्त्रीयदृष्ट्या प्रक्रियेला पाठवला.
पुणे-संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, केपीआयटी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन आणि पुण्यातील सामाजिक संस्था यांच्याद्वारे पर्यावरण सप्ताहात ‘पेहेल-२०२४’ हे शहर स्तरावरील ई-कचरा आणि प्लॅस्टिक संकलन अभियान रविवार 25 फेब्रुवारी रोजी राबविले गेले. या अभियानाचे उद्घाटन संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार,यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे संपन्न झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त संदिप कदम कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या CSR प्रमुख सौ. सौजन्या वेगुरु, केपीआयटीचे CSR प्रमुख तुषार जुवेकर, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मल्हार करवंदे, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक अतुल क्षीरसागर व सीईओ डॉ. राजेश मणेरीकर, मनपा सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. केतकी घाटगे हे यावेळी उपस्थित होते.
वेगवेगळ्या संस्थांच्या, कंपनीच्या तसेच महाविद्यालयाच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांनी १८ ते २४ फेब्रुवारी रोजी, लोकांमध्ये सर्व नागरिकांनी अभियानांतर्गत जनजागृतीचे प्रयोग केले, पथनाट्य, खेळातून जनजागृती, चौकसभा, पत्रक वाटप केले गेले. या अभियानात स्वयंसेवकांकडून उभारण्यात आलेल्या 415 संकलन केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा केले. अभियानातून एकूण सुमारे ७५०० जणांनी आपल्या घरातील कचरा केंद्रावर दिला. यावेळी अंदाजे 53 टन कचरा संकलित झाला असून त्यामध्ये 40 टन ई-कचरा आणि 13 टन प्लॅस्टिक कचरा जमा झाला आहे. जमा झालेल्या ई- कचऱ्यातून दुरुस्त होण्यासारखे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करून गरजू शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. उर्वरित ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे शासनमान्य रिसायकलर्स द्वारे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल.
