Home Blog Page 1187

राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी आता १०४ टोल फ्री हेल्पलाईन

पुणे दि. २६- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी आणि विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच शंकेचे निरसन करण्यासाठी १०४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू करण्यात आली आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. या हेल्पलाईनद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यंत १ हजार ६९ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून १ हजार ६४ तक्रारींचे निवारण राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

पीसीपीएनडीटी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ हा पूर्वी कार्यान्वित होता परंतू आता हा क्रमांक आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १०४ मध्ये २२ फेब्रुवारी २०२४ रोजीपासून समाविष्ट करण्यात आला आहे. ही सेवा जनतेसाठी २४ तास पूर्ण वेळ उपलब्ध करण्यात आली आहे. आता हे दोन्हीं हेल्पलाईन क्रमांक पीसीपीएनडीटी तक्रार नोंदविण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहेत.

या क्रमांकाद्वारे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीची कक्षातील कार्यरत अधिकारी-कर्मचारी नोंद घेवून संबंधित समुचित प्राधिकारी (जिल्हा शल्य चिकित्सक), वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका (शहरी विभागाकरिता) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे पुढील कार्यवाहीकरिता ईमेलद्वारे दररोज पाठविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १०४ येथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या मार्फत पीसीपीएनडीटी तक्रारींच्या स्वरुपाविषयी २३ फेब्रुवारी रोजी उपसंचालक आरोग्य सेवा (कु.क) डॉ. रेखा गायकवाड आणि सहाय्यक संचालक डॉ. राजश्री ढवळे यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.

दोन्ही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर कोणीही तक्रार दिल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्याची इच्छा असल्यास ते नावदेखील नोंदवू शकतील व पीसीपीएनडीटी कायद्या अतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर त्यावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यास तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपये देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु करण्यासाठीची कार्यवाही सुरु असून ते लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहितीही आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 ला भेट दिली

पुणे-26 फेब्रुवारी 2024

देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज, 26 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे आयोजित महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्रविषयक एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) एक्स्पो 2024 या प्रदर्शनाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई उद्योग, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ)च्या प्रयोगशाळा तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम (डीपीएसयू) यांच्यातर्फे विकसित स्वदेशी क्षमता आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवण्यात आले आहे.

याप्रसंगी जनरल मनोज पांडे यांनी एमएसएमई उद्योगांचे संचालक तसेच विद्यार्थी यांना उद्देशून बीजभाषण केले आणि ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यात महत्त्वाचे योगदान देणारे राज्य असल्याबद्दल महाराष्ट्राला श्रेय दिलेच पाहिजे. संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे, देशातील पहिले राज्य होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्र राज्याने हवाई उड्डाण तसेच संरक्षण विषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेज मधील महत्त्वाचे विषय म्हणून देखील घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये 20% हून अधिक तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या एकूण साठ्यापैकी 30% साठ्याच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र राज्य देत आहे. ही आकडेवारी संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शवते.

भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीवर अधिक भर देत लष्कर प्रमुख म्हणाले की देशात आता अधिक ग्राहकविषयक विपुलता, अधिक उत्तम जीवनशैली, अधिक प्रमाणात साक्षर झालेला वर्ग आणि नागरिकांच्या आकांक्षा उंचावलेल्या दिसत आहेत. धोरणात्मक सुधारणा, कौशल्य मिळवण्यासाठीचे उपक्रम, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, डिजिटल क्षमता, आघाडीची उद्योजकता यांच्या बाबतीत सरकारी संस्था तसेच सशस्त्र दलांनी उचललेल्या पावलांची त्यांनी प्रशंसा केली आणि ते म्हणाले की यातून शाश्वत विकासाप्रती तसेच पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागधारक होण्याप्रती देशाची वचनबद्धता दिसून येते.

“आपल्या क्षमतेच्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून,भारतीय लष्कराने एमएसएमई उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग परिसंस्था या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संरक्षण उत्कृष्टता (iDEX) खरेदी प्रक्रियेअंतर्गत, सर्व प्रकल्प स्टार्ट अप्स उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करणे अनिवार्य आहे, असेही लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.

सध्या iDEX अंतर्गत भारतीय लष्कराचे 400 कोटी रुपये किंमतीचे 55 प्रकल्प निर्माणाधीन अवस्थेत असून यासाठी एकूण 65 स्टार्ट अप्स उपक्रम काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष युद्ध भूमीतील वापरासाठी मर्यादित प्रमाणात उपकरणे खरेदी करण्यासाठी 70 कोटी रुपयांचे चार करार झाले आहेत. असे ते म्हणाले.

लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्कराच्या अभिनव कल्पना आणि नवोन्मेष उपक्रमाचा उल्लेख केला आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)वर आधारित जनरेटर संरक्षण प्रणाली विद्युत रक्षक आणि जैव वैद्यकीय उपकरण या दोन नवीन कल्पनांची आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उद्योगांना हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

भारतीय लष्कराने नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगाच्या सहकार्याने विकसित केलेल्या उत्पादनांसाठी बौद्धिक संपदा अधिकारांचा पाठपुरावा करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय लष्कराने आतापर्यंत 66 बौद्धिक संपदा अधिकारांसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 13 पेटंट, 05 कॉपीराइट आणि 05 डिझाइन नोंदणी मंजूर करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

लष्करप्रमुखांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योग प्रमुखांशी देखील संवाद साधला आणि त्यांनी त्यांची उत्पादने आणि सेवा, भारतीय लष्कराच्या भविष्यातील गरजांनुसार निर्माण कराव्यात यासाठी प्रोत्साहित केले. तसेच आत्मनिर्भरता या संकल्पनेला साकारण्यासाठी वचनबद्धता दर्शवून उदयोन्मुख भारताच्या आकांक्षा, ध्येय आणि उद्दिष्ट पूर्तीमध्ये एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन केले.

श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन


पुणे : जागतिक दर्जाच्या गाय रुग्णालय, नागौर येथील पीडित गायी व सजीवांच्या हितासाठी पुण्यात 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आय माता मंदिर गंगाधाम चौकात संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजस्थानहून आलेल्या 12 वर्षीय बालव्यास पं. अक्षय अनंत गौड यांनी कथा वाचून दाखवली.
आई माता मंदिरात 21 फेब्रुवारी 2024 पासून ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत  नागौर येथील जागतिक दर्जाच्या गाय रूग्णालयात पीडित गायींना उपचार व मदत मिळावी या उद्देशाने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी रोजी मंगलाचार-गोकर्ण उपाध्यायभव्य कलश यात्रा काढण्यात आली.22 फेब्रुवारी रोजी महाभारत घटना, श्रीहरी सृष्टी, ब्रह्मा उत्पती,23 फेब्रुवारी भरत मिलाप, भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार, 24 फेब्रुवारी रोजी समुद्र मंथन, रामजन्म, कृष्णजन्म, 25 फेब्रुवारी रोजी कृष्णाचे बालनाट्य, गोवर्धन, 26 फेब्रुवारीला रास लीला, कंसाचा वध आणि कृष्ण-रुक्मिणीचा विवाहचे कथा वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष कथा पठण होणार असून 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.15 वाजता हवन करून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता होणार आहे.
सत्यनारायण मुंदडा, जगदीप्रसाद मुंदडा, रवींद्र राजेश राठी, जितेंद्र मालू, रामावतार तापडिया, बद्रीनारायण मेघराज झंवर, घनश्याम मुंदडा, गोविंद मुंदडा, वसंत राठी, रमेश राठी, नंदकिशोर सोमणे, बाबूलाल जोशी, रमेश राठी, रमेश राठी, रमेश राठी, रमेश राठी, गोविंद मुंदडा, वसंत राठी आदी उपस्थित होते. , गोपीकिशन चांडक, गोपाल लड्ढा, रमेश मंत्री, संतोष खंडेलवाल, श्रीकिशन बंग, गोपाल राठी, लक्ष्मीनारायण राठीश्रीमद यांनी भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कोथरुड येथे दिव्यांग मतदार जन जागृती यात्रा संपन्न

पुणे, दि.२५: कोथरूड विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते अंध मुलींच्या शाळेदरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दि पूना ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक मतदानाद्वारे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध घटकांसाठी मतदार जागृती अभियान राबविले जात असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, कोथरूड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, प्रशासकीय अधिकारी तथा पूर्णवेळ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुरेश उचाळे, पुणे महानगरपालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, नायब तहसीलदार स्वप्निल खोल्लम आदी उपस्थित होते.

श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. या रॅलीच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सामाजिकरणासाठी उचललेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. दिव्यांग विद्यार्थीनी इतक्या हिरीरीने या प्रक्रियेत भाग घेत असून यापासून सर्व मतदारांनी प्रेरणा घ्यावी. मतदानाच्यावेळी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व लोकशाही सुदृढ करण्यात हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती पवार म्हणाल्या, आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. दिव्यांग हे सक्षमपणे काम करू शकतात हे दाखविण्यासाठी दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

श्री. कोरगंटीवार म्हणाले, समाज कल्याण विभागामार्फत सर्व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

यावेळी प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रावर मतदानाच्या प्रात्यक्षिकाचा सुमारे 50 दिव्यांग व्यक्तींना लाभ घेतला. तसेच उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापक दामोदर सरगम, अंध मुलींच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र कार्यशाळा संचालक राजू नंदाल, कोथरूड मतदार दिव्यांग समन्वय अधिकारी सविता वाघमारे, विजय पाटोळे, महेश टेमगिरे, अप्पा गुंडाळ, सुनंदा बामणे, अमोल शिंगारे आदी उपस्थित होते.

५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे

0

मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या  निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०२४ मध्ये नमूद  केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करा-विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि.२६: राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास गोरे, संचालक, औद्यागिक सुरक्षा विभाग, मुंबई, डॉ अविनाश ढाकणे सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त पुणे शहर, प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड मनपा, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, रमेश चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प पुणे, कैलास केंद्रे मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद, संतोष वारीस संचालक फायर ब्रिगेड सेवा महाराष्ट्र, कळसकर उपायुक्त परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महानगर पालिका, औद्योगिक सुरक्षा विभाग, गृह विभाग, पर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेऊन होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्य अंतर्गत भागात सी.सी.टी.व्ही बसवावेत, उद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोहचेल असे असावेत. ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात,लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत. सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्य प्रणाली वेबसाईटवर प्रसिध्द करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १०८ रुग्णवाहिका धर्तीवर अग्निशमन यंत्रणा उभी करण्याबाबत आराखडा तयार करावा. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात यावे. सुरक्षेबाबत महिला कामगारांमध्ये जनजागृती करावी. महिला बचक गटही अनेक प्रकारचे उत्पादन घेत असतात. त्यांच्यामध्येही जनजागृती करावी. मोठ्या गृहनिर्माण संस्था, मोठे उद्योग यांनी आपल्या परिसरासाठी अग्नी शमन यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या यंत्रणांचा आपत्कालीन परिस्थिती मध्ये नक्की फायदा होऊ शकतो. राज्यातील असुरक्षित औद्योगिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून बेकायदेशीर कारखान्यांची माहिती संकलित होईल. याध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग कोणत्या क्षेत्रात जास्त आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते याची परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणातून तयार होईल. त्याचा फायदा कृती आराखडा तयार करता होणार आहे. वाढत्या शहरांमध्ये तसेच विकास प्राधिकरणांमध्ये उद्योगांच्या नियमनासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही समावेश कृती आराखड्यामध्ये असावा.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडीट करावे, सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा सरंक्षण पुरविण्यात यावा, अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी. अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर ‘जागर’

0

मुंबई, दि. २६: रस्ता सुरक्षा अभियान यावर्षी १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणारे उमेदवार, रिक्षा व टॅक्सी चालक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन, विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप, वाहन चालकांना रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद आदी उपक्रम राबविण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयाच्यावतीने शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन, दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्ट वापरणे, गरज नसताना हॉर्न न वाजवणे यासाठी सुमारे ८३० उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्की अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या १२४१ उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानादरम्यान रस्ता सुरक्षेविषयी सुमारे ३ हजार इतक्या रिक्षा व टॅक्सी चालकांस मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच नवीन तरुण वर्गामध्ये वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीसाठी परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व मे. युनायटेड वे, मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या व्हाया सेफ मोबीलीटी प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा संवाद कार्यक्रम राबविण्यात आला.  हा कार्यक्रम मे. नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटी वडाळा, मे. पीस पब्लिक स्कूल ट्रॉम्बे, गुरूनानक सेकंडरी स्कूल जीटीबी नगर, ऑक्झीलम काँन्व्हेट हायस्कूल वडाळा, विवेक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज गोरेगांव, एएफएसी इंग्लिश स्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय, सिताराम प्रकाश हायस्कूल वडाळा, सरस्वती विद्यालय चेंबूर या विविध शाळेत आयोजित करण्यात आला. यामध्ये सुमारे 1345 विद्यार्थी व 225 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे एकूण 1570 विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन थ्री डी मॉडेल चित्रीकरणाद्वारे  करण्यात आले.

रिक्षा व टॅक्सी चालकांची 17 व 24 जानेवारी रोजी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रूग्णालय सायन व मुंबई टॅक्सीमेन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ वेळा, मे. लायन्य क्लब व डॉ. अग्रवाल आय हॉस्पीटल चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 556 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासलेल्या वाहन चालकांमध्ये 42 मोतिबिंदू, 38 रेटीना संबंधीत व्याधी, 58 जणांमध्ये निकट व दूर दृष्टीदोष, दूर किंवा निकट दृष्टीदोष 109 वाहन चालकांमध्ये आढळून आला.  यावेळी 159 वाहन चालकांना विनामूल्य चष्मे वितरीत करण्यात आले. के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व वाणिज्य, कला महाविद्यालय विद्याविहार येथे आयोजित कार्यक्रमात 560 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 100 विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आला.

या कालावधीत 55 दोषी दुचाकी वाहन चालकांवर तपासणीअंती कारवाई केली. जनजागृती शिबिरात सुमारे 414 पेक्षा जास्त उमेदवार, चालकांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 95 उमेदवारांनी अपली नावे अवयव दान करण्यासाठी नोंदविली आहे.  ताजमहाल हॉटेल येथील व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स लिमिटेड चेंबूर येथे 29 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येकी 100 पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते. भारत पेट्रोलियम कंपनी लिमीटेड माहूल, ट्रॉम्बे यांच्या संशोधन प्रशिक्षण केंद्र येथे धोकादायक मालाचे वहन करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत 340 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली असून  वायुवेग पथकामार्फत 11 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.

मोहिम काळात 75 वाहनांच्या तपासणीतून 22 वाहनांना रिफ्लेक्टर टेप बसविले तर 40 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सिटबेल्ट न वापरण्याबाबत 40 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 7 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच बसेसमध्ये वाहनातील अग्नीप्रतिरोधक सुरक्षेसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन, अपघात ग्रस्तांना मदत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सुमारे 7500 पेक्षा जास्त सुरक्षा सुरक्षेबाबत माहिती पत्रिकांचे वाटप करण्यात आले, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

ऋणानुबंध जपत मंतरलेल्या आठवणींना उजाळा-विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा ३५ वा मेळावा उत्साहात


पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी… जडलेले परस्परांतील ऋणानुबंध… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगत, समितीसाठी काही नवे संकल्प करत, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेत मंतरलेल्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित ३५ व्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी नंदकिशोर गोतमारे, तर अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी सुधीर मोकाशे होते. गोखलेनगर जवळील लजपत भवनमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मंडळाचे अध्यक्ष गणेश बबन काळे आदी उपस्थित होते.

मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते रमेश घोटिकर , कर्मचारी वसंत नगरकर, ताराबाई शिंदे यांना, तसेच देणगीदार भाऊसाहेब जाधव यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  अरुण कोंडेजकर, ऍड. दौलत इंगवले, रत्नाकर मते व अरविंद औताडे पुरस्कृत आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले. गायक मंगेश बोरगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व मराठवाडा विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाचे उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस, सचिव मनीषा गोसावी, खजिनदार ऍड. देविदास टिळे, मंडळाचे सदस्य जिभाऊ शेवाळे, दिनकर वैद्य, डॉ. अभय व्यवहारे, मनोज गायकवाड, शंकर बारवे, संभाजी सातपुते, राजू इंगळे, पुष्पा थोरात, अलकनंदा चौधरी- पाटील, संतोष घारे, संदीप इंगवले, समन्वयक बालाजी शिंदे, कार्यालयीन सहायक गणेश ननवरे तसेच ओंकार वाघमारे  यांनी मेळावा यशस्वी करण्यात परिश्रम घेतले.

सुधीर मोकाशे म्हणाले, “समितीने कामाची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृतीतील विविधता अनुभवली. त्यातून मला माझा लेखन व साहित्य व्यवसाय अधिक व्यापक करण्यास मदत झाली.” नंदकिशोर गोतमारे म्हणाले, “समितीने माझे आयुष्य घडवले. जीवनमूल्यांची शिकवण दिली. समितीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेऊन समितीचे हे काम पुढे न्यायला हवे.”
तुषार रंजनकर यांनी समितीच्या प्रकल्पांविषयी व आव्हानांविषयी सांगत नवीन वसतिगृहाच्या उभारणीसाठी निधी संकलनाचे आवाहन केले. ज्यांचा आपले आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा आहे अशा तांबोळी सरांचे खरे स्मारक करायचे असेल तर पुण्यात होणाऱ्या नवीन वसतिगृहातील एका हॉल साठी ५ कोटी निधी माजी विद्यार्थ्यानी संकलित करावा, असे आवाहन मनोज गायकवाड यांनी केले.

 मंडळाचे अध्यक्ष गणेश बबनराव काळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी, तसेच माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी विभागीय स्तरावर संपर्क केंद्र उभारण्यासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले. अनिता सावंत-देशपांडे व लक्ष्मण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा गोसावी यांनी मंडळाच्या कार्यअहवालाचे, तर ऍड. देविदास टिळे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. सुनील चोरे, निसार चौगुले यांनी समन्वयन केले. गणेश पाटीलबा काळे यांनी आभार मानले..

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी इच्छूकांची नोंदणी वाढवावी, मेळाव्याची जनजागृती करावी

0
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, दि. २६ :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, राज्य नाविन्यता व कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळसिंग राजपूत, रोजगार आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, कौशल्य विकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप हिरवाळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, विविध जिल्ह्यांचे व विभागांचे क्षेत्रीय अधिकारी, बारामती येथील स्थानिक अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, बारामतीत २ मार्चला नमो महारोजगार मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन, बारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय महसूल आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, एसटी महामंडळ, नगरपालिका आदी संस्थांनी या सर्व कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, बारामती येथे २ मार्च रोजी एकदिवशीय नमो महारोजगार मेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, इतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामती येथील पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आता २ आणि ३ मार्च असा दोन दिवस आयोजित करण्यात यावा. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छूक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी आणि औद्योगिक संस्थांनी आजच नोंदणी करावी. या मेळाव्यामध्ये युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी (for candidate registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी (For Employer registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

रोहन कवडे;ठरला देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीयवक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या वारजे येथील संस्कार मंदिर महाविद्यालयाचा रोहन कवडेहा याने देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी ठरला. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचा तेजस पाटील याने द्वितीय तर कमिन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंगची तन्वीकांबळे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

शुक्रवारपेठेतील शिवाजी मराठा सोसायटीत ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सदानंद भोसले यांच्याहस्ते तर पारितोषिक वितरण टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्याडॉ.राधिका इनामदार यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप,सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, सदस्य डॉ.सुनील जगताप,कमलताईव्यवहारे रघुनंदन जाधव, पद्माकर पवार, महादेव पवार,प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली पाटील उपस्थित होते.

डॉ.पांडुरंगकंद,डॉ.विजय लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यश पाटील (बीके बिर्ला महाविद्यालय मुंबई),यशफुलवरे (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे), शुभम राऊत (ए.एस.एम. महाविद्यालयचिंचवड), चैतन बावधाने (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे),वृषभचौधरी (के. टी.एच.एम. कॉलेज नाशिक) यांनी अनुक्रमे ५ उत्तेजनार्थ पारितोषिकेपटकाविली. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११ हजार, द्वितीय क्रमांकाला ७ हजाराला, तृतीय क्रमांकाला ५ हजार आणि ५ उत्तेजनार्थक्रमांकाना प्रत्येकी १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात  आले. 

डॉ. संतोष यादव, डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी जरांडे, डॉ,दीपक सुरवसे यांनी आभार मानले.

विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरी शिबिर ९ व १० मार्चला

पुणे : अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट व सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅन्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (९ मार्च) आणि रविवार (१० मार्च) या दोन दिवशी हे शिबीर सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे येथे होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्डसर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसंगी ‘सिम्बायोसिस’च्या डॉ. जयश्री गोरडे, अगरवाल ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान, राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते. शिबिराचे हे तेरावे वर्ष आहे. आतापर्यंत जवळपास ५००० व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. डॉ. पंकज जिंदल यांच्यासह प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम, डॉ. स्वप्ना आठवले, डॉ. नोएल ब्रिट्टो, डॉ. संजय देव, डॉ. ज्योती देशपांडे, डॉ. पंकज बनसोडे या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. 
वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे, न पसरणारे कोड, अपघाताने आलेल्या विकृती, स्पास्टिक पॅरालिसिस आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहेत. या सर्जरीसाठी स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. सिम्बायोसिसने आजवर गरिबांसाठी रुग्णसेवा केली आहे. या शिबिरामुळे अनेकांना लाभ होईल, असा विश्वास डॉ. गोरडे यांनी व्यक्त केला.

गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उपाशी पोटी हजार राहावे. तसेच ७ मार्च २०२४ रोजी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्जरीसाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, जुने रिपोर्ट गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी रेवती (७६६६३८१८२७), विनोद (८३२९६४९८१६) किंवा अनिल (७२६२००३२४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

डॉ. रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालय विजयी

पुणे –

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. रा. ना. दांडेकर चषक संस्कृत एकांकिका’ स्पर्धेत स. प. महाविद्यायाच्या चपेटिका या एकांकिकेने प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे हे 24 वे वर्ष होते.

“मनोरंजक प्रहसन, संस्कृत व्याकरणासारख्या अनेकांना क्लिष्ट वाटणाऱ्या विषयावर आधारित प्रेक्षकांच्यात हशा पिकवणारी एकांकिका, सायकॉलॉजिकल थ्रिलर ह्या विषयाच्या जवळ जाणारी एकांकिका, मर्डर मिस्टरी, लोकांना विचार करायला प्रेरित करणाऱ्या आशयसंपन्न एकांकिका सादर केल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –

प्रथम पारितोषिक- ‘चपेटिका’ – स. प. महाविद्यालय

द्वितीय पारितोषिक- ‘त्यागादेव तु कैवल्यम् ‘ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

तृतीय पारितोषिक- ‘प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम्’ – फर्ग्युसन महाविद्यालय

उत्तेजनार्थ पारितोषिक- ‘द्वन्द्वम्’ डेक्कन महाविद्यालय (अभिमत विद्यापीठ)

डॉ. गौरी मोघे, तन्मय भोळे आणि अमोघ प्रभूदेसाई यांनी परीक्षन केले.

उपप्राचार्या डॉ. राधिका जाधव, डॉ. सविता केळकर, संस्कृत विभागप्रमुख प्रा. अंकित रावल यांनी मार्गदर्शन केले. 

फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

पुणे -स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोलीत अभिवादनासाठी नागरिकांची रीघ लागली होती.

डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, संचालक मिलिंद कांबळे, अनिल भोसले, प्रा. प्राजक्ता प्रधान, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. प्रकाश पवार, प्रा. सुभाष शेंडे, प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. आनंद काटिकर, श्रध्दा कानेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आला होता. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेला झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू आकर्षण ठरत होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते.

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

0

आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas Passed Away) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.  ते 72 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.  पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

पंकज उधास यांना प्रसिद्ध गझल चिठ्ठी आयी है मधून ओळख मिळाली होती.

चिट्ठी आयी है’ गाणे ऐकून राज कपूर रडले
राजेंद्र कुमार आणि राज कपूर खूप चांगले मित्र होते. एके दिवशी त्यांनी राज कपूर यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. रात्रीच्या जेवणानंतर पंकज उधास यांच्या आवाजात त्यांनी ‘चिठ्ठी आयी है’ ही गझल ऐकवली आणि राचज कपूर रडले. या गझलमुळे पंकजला खूप प्रसिद्धी मिळेल आणि ही गझल त्यांच्यापेक्षा चांगली कोणीही गाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

ज्या चित्रपटाच्या गाण्याने लोकप्रियता मिळवली, त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता
गायनाच्या कलेतून पंकज यांना परदेशात खूप प्रसिद्धी मिळाली. यावेळी अभिनेता आणि निर्माते राजेंद्र कुमार यांनी त्यांची गाणी ऐकली आणि ते खूप प्रभावित झाले. पंकज यांनी गाणे आणि चित्रपटासाठी कॅमिओही करावा अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांचा सहाय्यक पंकजशी बोलला मात्र त्यांनी नकार दिला.राजेंद्र कुमार यांनी याचा आणि पंकजच्या वृत्तीचा भाऊ मनहरशी उल्लेख केला. मनहरने पंकजला हे सांगितल्यावर त्याला खूप वाईट वाटलं. त्यांनी राजेंद्र कुमारच्या सहाय्यकाला बोलावून बैठक निश्चित केली. या भेटीनंतर त्यांनी ‘नाम’ चित्रपटात काम केले आणि ‘चिठ्ठी आयी है’ या गझलला आवाज दिला. ही गझल त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गझलांपैकी एक आहे. ही गझल डेव्हिड धवन यांनी संपादित केली होती.

पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे कुटुंब राजकोटजवळील चरखाडी नावाच्या गावातील एका कसब्यात राहत होते. त्यांचे आजोबा जमीनदार आणि भावनगर संस्थानाचे दिवाणही होते. त्यांचे वडील केशुभाई उधास हे सरकारी कर्मचारी होते, त्यांना इसराज वाजवण्याची खूप आवड होती. त्यांची आई जितुबेन उधास यांना गाण्याची खूप आवड होती. यामुळेच पंकज उधास आणि त्यांच्या दोन्ही भावांचा संगीताकडे नेहमीच कल होता.

पंकज यांनी कधीच विचार केला नव्हता की ते गाण्यातून आपलं करियर करतील. त्या काळात भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू होते. यावेळी लता मंगेशकर यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे रिलीज झाले. पंकज यांना हे गाणं खूप आवडलं. त्यांनी हे गाणे कोणाच्याही मदतीशिवाय त्याच ताल आणि सुरात रचले.एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळाले की ते गाण्यात चांगले आहेत, त्यानंतर त्यांना शाळेच्या प्रार्थना संघाचे प्रमुख बनवण्यात आले. एकदा माता राणीची चौकी त्यांच्या कॉलनीत बसली होती. रात्री आरती-भजनानंतर तिथे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा. या दिवशी पंकज यांच्या शाळेतील शिक्षकांनी येऊन त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात गाण्याची विनंती केली.पंकज यांनी ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले. त्यांच्या गाण्याने तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनाही भरभरून दाद मिळाली. श्रोत्यांमधून एक माणूस उभा राहिला आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना 51 रुपये बक्षीस म्हणून दिले.

पंकज यांचे दोन्ही भाऊ मनहर आणि निर्जल उधास ही संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. या घटनेनंतर पालकांना वाटले की पंकजही आपल्या भावांप्रमाणे संगीत क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करू शकतो, त्यानंतर पालकांनी त्यांना राजकोटमधील संगीत अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला.

काम न मिळाल्याने दुखावले आणि ते परदेशात गेले
तिथे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पंकज अनेक मोठ्या स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे. त्यांना आपल्या भावांप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करायचे होते. यासाठी त्यांना तब्बल 4 वर्षे संघर्ष करावा लागला. या काळात त्यांना कोणतेही मोठे काम मिळाले नाही. कामना या चित्रपटातील त्यांच्या एका गाण्याला त्यांनी आवाज दिला, पण तो चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. काम न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी परदेशात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

0

मुंबई, दि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.