Home Blog Page 1186

जरांगेंंच्या आंदोलनाची SIT चौकशीचे नार्वेकरांचे आदेश होणार:फडणवीस म्हणाले- जरांगेंचा बोलवता धनी कोण हे शोधणारच

मुंबई-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले आहेत. तसेच जरांगे यांच्या संदर्भात मला घेणंदेणं नाही. मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधणारच असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सभागृहात जरांगे यांच्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर आता जरांगे यांच्या आंदोलनाची आता SIT चौकशी केली जाणार आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, ”मला याविषयी बोलायचे नव्हते. मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केले हे महाराष्ट्राला माहीत आहे. ⁠मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट टिकले. मराठा समाजासाठी काय केले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्याविषयी बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला”, असे फडणवीस म्हणाले.

तसेच ”शिवाजी महाराजांचे नाव घ्याचचं आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं, ⁠त्यांना घरी कोणं भेटलं, हे शोधायला हवं असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच आरोपी सांगत आहे की, दगडफेक करायला कोणी सांगितले. ⁠पोलिस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. ⁠त्यांना पैसे कोण देतेय, ⁠त्यांना मदत कोण करतंय, ⁠हे सर्व बाहेर येईल”, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, ”तुमच्याबदल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. ⁠जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, ⁠मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधल जाईल. ⁠औरंगाबाद याठिकाणी वाॅर रुम कोणी सुरु केली, ⁠याची सखोल चौकशी होईल”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

सभागृहात जरांगेंच्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक :जरांगेंचा बोलविता धनी कोण? शोध घ्या -शेलार

जरांगेंमध्ये धमकी देण्याची हिंमत आली कशी?- शेलार

महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा ही धमकी -यामागे कोण आहे?

मुंबई-अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांच्या मराठा आंदोलनावरून भाजप नेते आशिष शेलार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी झाली. महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगेंनी केली असून त्यांची SIT चौकशी व्हावी अशी मागणी करत आशिष शेलार आक्रमक झाले तर जरांगे यांना चिथवण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यांचे आंदोलन कुणी पेटवले असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.जरांगेंच्या वक्तव्यावरून आणि आंदोलनावरून विधानसभेत आक्रमक झालेल्या आमदारांच्या गोंधळामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभा ५ मिनिटांसाठी तहकूब केली

यावेळी आशिष शेलार म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा केली आहे. ही धमकी आहे का?, यामागे कोण आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यात कट रचला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची भाषा ही अतिशय चुकीचे आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही कट रचला जात आहे का? याबद्दल चौकशी झाली आहे”, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

तसेच ”जरांगेंमध्ये धमकी देण्याची हिंमत आली कशी?, संजय राऊत म्हणाले भाजपला संपवून टाकू, आणि दुसऱ्या दिवशी जरांगे यांचे विधान कसे?. मनोज जरांगे कुठे राहतात, त्यांना कोणत्या कारखान्यातून जेसीबी आणि ट्रॅक्टरसह दगडे मिळाली, असा सवाल करताना संपूर्ण नियोजन एका कारखान्यातून आणि घरातून सुरू आहे”, असा गंभीर आरोप शेलारांनी केला आहे.

यावर विजय वडेट्टीवार यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ”मनोज जरांगे यांनी मला कुत्रा म्हटले पण आम्ही सहन केले. कोण हिरो होण्यासाठी आणि संपूर्ण समाज मागे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत होते हे सर्वांना माहिती आहे. जरांगेसोबत सातत्याने चर्चा कोण करत होते. जरांगेंच्या आंदोलनाबद्दल चौकशी करा ही आमचीही मागणी आहे. आंदोलनाला राजकीय स्वरूप कोणी दिले, त्यांना चिथवण्याचा प्रयत्न कोणी केला आणि त्यांचे आंदोलन कुणी पेटवले?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

७१ व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन

0

मुंबई,: जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’ दिनांक १ ते ३ मार्च दरम्यान होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला. ११२ देशातून आलेल्या विश्वसुंदरींनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईल, अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली,  २०२३ या वर्षाची मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना, जमिल सैदी यावेळी उपस्थित होते.

 मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, “वाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होती, जी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटते, जेणे करून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वाघाच्या संवर्धनासाठी ताडोबा अभयारण्यात झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली म्हणाल्या, “आम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या ॲम्बेसेडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाही, तर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”

या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणे, त्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.

 बिग स्क्रीन्स आणि टेलिव्हिजन स्पेसनंतर, नेहा पेंडसे डिजिटल विश्वात पदार्पण करणार ? 

 ‘मे आय कम इन मॅडम?’ मधून जिने या इंडस्ट्रीत पदार्पण केलं अशी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे आणि ‘भाभी जी घर पर है’ मधल्या तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली तर जाते पण तिच्या अनोख्या फॅशन शैली साठी नेहा कायम चर्चेत असते. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता ती लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत. 

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं तर आहे आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमध्येही ठसा उमटवला आहे. आता नेहा ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश करणार का ? याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सूत्रानुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तिचे चाहते या साठी उत्सुक तर आहेच पण नेहा काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभी जी घर पर है’ साठी मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आणि प्रतिसादामुळे नेहा पेंडसेचे टेलिव्हिजनवरून ओटीटी स्पेसमध्ये होणारी एंट्री नक्कीच उल्लेखनीय असणार आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ च्या सीझन 2 मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री आता तिच्या आगामी प्रोजेक्ट साठी तयारी करत असून लवकरच ती नव्या प्रोजेक्ट बद्दल घोषणा करणार आहे.

94 वर्षीय बाबा आढाव यांच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष.

0

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे दुसऱ्या दिवशीही सुरू.
मुंबई: माथाडी कायद्याचे जनक कै.आमदार अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांनी माथाडी कायद्याचे अस्तित्व सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला बाबा आढाव आजही वयाच्या ९४ व्या वर्षी सातत्याने माथाडी कायद्याचे संरक्षण करण्यासाठी लढत आहेत पण विद्यमान सरकार हा कायदा मोडीत काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळी विधेयके आणून माथाडी कामगारांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा कुटील डाव करत आहे, पण हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही सरकारला वेळोवेळी पत्र व्यवहार करून कामगार मंत्री व कामगार खाते यांना त्याची जाणीव करून दिली आहे. आज आम्ही माथाडी कामगार बचाव कृती समितीच्या माध्यमातून आमरण साखळी उपोषण आयोजित केले आहे, जर का सरकारने या आमच्या उपोषण आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर अन्य मार्गाचा अवलंब करावाच लागेल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या आमरण साखळी उपोषणाच्या सभेत कामगार नेते बाबा आढाव बोलत होते
या सभेला महाराष्ट्रातील विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेला बोलताना बाबा आढाव म्हणाले की, माथाडी कामगार कायद्याची मोडतोड करणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनिमयन) अधिनियम १९२३ मध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली लोकशाहीला संपुष्टात आणणारे सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ ही माथाडी कामगारांना उध्वस्त करणारी विधेयके सरकारने मागे घेतली नाहीत तर आमच्या माथाडी कामगार बचाव कृती समितीचा लढा आम्ही अधिक तीव्र करू आणि सरकारला जेरीस आणू असा इशाराही बाबा आढाव यांनी दिला.
या सभेत बोलताना माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, अण्णासाहेबांच्या माथाडी कायद्याचं अस्तित्व धोक्यात आणणारी विविध विधेयके संमत करून माथाडी कामगारांची रोजी रोटी हिसकाऊ पाहणाऱ्या सरकारला आम्ही कडवा विरोध करू, आज माथाडी कायद्याचा बचाव करण्यासाठी सर्व कामगार संघटनांचे आमरण साखळी उपोषण आम्ही पुकारलं, पण या सरकारने याची योग्य दखल न घेतल्यास यापुढे रस्ता रोको, गाड्या आडविणे, बाजारपेठा बंद ठेवून सरकारचा माथाडी कामगार कायद्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा कुटील डाव हाणून पाडू, पण यासाठी आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे.
यानंतर संघटनेचे कार्याध्यक्ष माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांनी आपल्या भाषणात माथाडी कामगारांच्या विविध समस्यांचा समस्यांचा आढावा घेऊन माथाडी कामगारांवर सरकारतर्फे कशाप्रकारे अन्याय होतोय हे स्पष्ट केले माथाडी कामगार नेते बळवंत पवार यांनी माथाडी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सरकारने आणली तर त्याचे माथाडी कामगारांवर व कायद्यावर कोणकोणते परिणाम होतील व माथाडी कामगार कामापासून वंचित होतील हे स्पष्ट केले. या सभेला कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, शिवाजी सुर्वे, निवृत्ती धुमाळ, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, दत्ता घंगाळे, सतीशराव जाधव आदी उपस्थित होते.
माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक मागे घेणे व माथाडी कामगारांच्या इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरीता माथाडी कायद बचाव कृती समितीच्यावतीने आझाद मैदान येथे सुरू असलेले आमरण व साखळी उपोषण आंदोलन दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील सुरू राहणार असल्याचा निर्णय कृती समितीच्यावतीने माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांच्यामार्फत घेण्यात आला आहे.

मी माझ्या नवऱ्याच्या नावावर मत मागत नाही-नणंदेचा भावजयीला टोला

बारामतीत ‘मराठी टीव्ही सिरियल्स’ रंगणार …? सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला
पुणे-
मी माझ्या नवऱ्याच्या नावावर मत मागत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी नाव न उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लगावला. पुण्यात त्या महिला कार्यक्रमात बोलत होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेत माझा नवरा येत नाही. पण ज्याला उत्साह आहे. त्याने बायको संसदेत गेली की, कॅन्टीनमध्ये बसायचे पर्स घेऊन. संसदेत नोटपॅड लागते पर्स नाही. पर्समधून कोठे पैसे देणार आहात? तिथे नोटपॅड, पेन लागतो. नवऱ्याला त्या एरियामध्ये परवानगी नसते. हे लक्षात ठेवावे, असा टोला लगावत अजित पवारांना डिवचलं.

खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे नवरा बोलणारा पाहिजे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे नवरा बोलणारा पाहिजे? त्यामुळे विचार करुन मतदान करा. सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केले, तरी मलाच संसदेत जाऊन बोलायचं आहे. माझं घर खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय की तुमचे इकडे काम नाही. आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला..खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही तुम्हाला माझ्या नवऱ्याने इथे भाषण केलेले चालेल का? संसदेत मी जाणारे की माझा नवरा जाणार आहे.

महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. 10 विरोधात आहेत आणि 38 त्यांच्या बाजूने आहेत. 38 पैकी एकाने तरी महागाईचा म तरी काढलाय का? तिथे चुपचाप बसतात आणि पीएम मोदींचे कौतुक करत बसतात. त्यांचा महागाई, बरोजगारी आणि कोयता गँगशी काहीही संबंध नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 15 लाख देतो म्हटले. आले का? पैसे आले असते तर माझे भाषण ऐकायला आला नसता. महागाई कमी झाली नाही. हे भ्रष्ट आहेत जुमलेबाज आहेत. 10 वर्षांपासून फसवाफसवी सुरु आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचे आयुष्य भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी गेलं. भ्रष्ट अशोक चव्हाणांना तुम्ही पदं देतात. मात्र, पंकजा मुंडेंना काहीच मिळत नाही, असा आरोप सुळे यांनी केला.

मुंबई भाजपाकडून महालक्ष्मी, धोबी घाट परिसरातील आशा आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान

0

मुंबई दिनांक २६ फेब्रुवारी २०२४

मुंबई भाजपच्या वतीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ मोहिमेंतर्गत वरळी विधानसभेतील महालक्ष्मी, धोबी घाट परिसरातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुंबईच्या संयोजिका प्रा. आरती पुगांवकर यांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.

महालक्ष्मी, सातरस्ता, प्रभादेवी-शिवडी विभागातील बिट क्र. ३ धोबीघाटात १५ अंगणवाडी सेविका, १५ मदतनीस आणि पाच आशासेविका कार्यरत आहेत. याप्रसंगी बोलताना प्रा. आरती पुगावकर म्हणाल्या, लहान मुलांना आईनंतर कोणाचीही ओढ वाटत असेल तर ती पहिली शिक्षिका म्हणजे अंगणवाडी सेविका. एक आई फक्त आपल्या मुलाची काळजी घेते, परंतु अंगणवाडी सेविका एकाच वेळी ३० ते ४० मुलांची काळजी घेतात. त्यांना शिक्षण देतात. आशासेविका गर्भवती महिलांसाठी दुसऱ्या मातेप्रमाणे असतात. घरोघरी जाऊन त्यांचे आरोग्य, औषधे आणि पोषण याबाबत जागरुकता निर्माण करून आवश्यक मदत पुरवत असतात. त्यांच्या सेवाकार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेही त्या म्हणाल्या.

या अभियानात दुर्गा विजय सेवा मंडळ यांचेही सहकार्य लाभले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दर्शन पुगावकर, पदाधिकारी अशोक सुतार, मनीषा रेवसकर, मीना कदम, प्रीती खामकर-पुगावकर, सचिन सोनटक्के, मनस्वी चांदोरकर, दीपा कांबळे, दिव्या पुगावकर, संकल्प जाधव, भाजप प्रभाग १९९ चे सरचिटणीस दीपक निकम, सकल मराठा समाजाचे संदीप खवरे, भरत घेवडे, सुनील दळवी उपस्थित होते.

तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा प्रकार उपयुक्त – ना. चंद्रकांतदादा पाटील

नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर कोथरूड श्री विजेता

पुणे-तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे व निरोगी आयुष्य जगावे यासाठी नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचे ही मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात “कोथरूड श्री” ह्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भाजयुमो चे क्रीडा आघाडी चे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे यांचा विशेष सत्कार केला व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, भाजप नेते धनंजय जाधव,कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, युवा मोर्चा चे कोथरूड मंडल अध्यक्ष अमित तोरडमल,क्रीडा आघाडी चे योगेश कंठाळे, अनिश अगरवाल, मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे, राजेंद्र येडे, नितीश बराटे,सुमित दिकोंडा, स्वप्नील राजवाडे, सायंदेव देहाडराय, सूचित देशपांडे यांच्यासह महिला मोर्चा प्रभारी व कोथरूड च्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे,महिला मोर्चा सरचिटणीस विद्याताई टेमकर,पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझीरे,उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर, कविता सदाशिवे इ मान्यवर उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगलेल्या ह्या स्पर्धेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
“कोथरूड श्री” हा मुख्य किताब वर्ल्ड जिम च्या गणेश बनकर ने पटकवला तर मोस्ट इम्परुव्हडं बॉडी बिल्डर चा विजेता मोहम्मद एहराज ठरला,बेस्ट पोझर चा विजेता ठरला अतुल साळुंके तर अतिक शेख ने अप कमिंग बॉडी बिल्डर चा ‘किताब पटकवीला.
राजेंद्र नांगरे, नंदू कळमकर,मुस्तफा पटेल,दिलीप धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा संयोजन प्रतीक खर्डेकर यांनी केले.

हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा : नाना पटोले.

मराठा आरक्षण उपसमितीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाणच होते मग खापर दुसऱ्यावर कसे फोडता?

महाराष्ट्रात फोफावणाऱ्या ड्रग्जच्या काळ्या धंद्याची जबाबदारी गृहमंत्री फडणवीसांची, गुजरात कनेक्शन तपासा.

राज्यातील सर्व घटकांना रस्त्यावर आणण्याचे पाप ट्रिपल इंजिन सरकारचेच.

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी
मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे? हे सरकारला स्पष्ट करावे लागेल आणि हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? ते जाहीर करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा आरक्षण मविआ सरकारने टिकवले नाही असा आरोप सरकारमधले लोक करत आहेत परंतु मविआ सरकार असताना मराठा आरक्षण उपसमितीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण होते, अजित पवारही त्या सत्तेत होते. मराठा आरक्षण मविआ सरकार टिकवू शकले नाही तर त्याला हे लोकही जबाबदार नाहीत का? आज हेच एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत व खापर मात्र मविआ सरकारवर फोडत आहेत. “मराठ्यांची बाजू मांडू नये असे देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते” असे तत्कालीन महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी सांगितले आहे, त्यामुळे झारीतला शुक्राचार्य कोण, हे समोर आले आहे. आता आरोप प्रत्यारोप, जाहिरातबाजी बंद करा, जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करा आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळिमा फासण्याचे काम केले त्यावर स्पष्टीकरण द्या. वस्तुस्थिती काय आहे, हे सांगण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी सरकारला धारेवर धरु.
आंतरवली सराटीत सौम्य लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले होते हे त्यांनी मान्य केले पण जरांगे पाटलांवर लाठीचार्ज करण्याचे कारण काय?, त्यांना उपोषणाला कोणी बसवले होते?, जरांगे पाटील यांच्याशी नेमके काय बोलणे झाले ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, उत्तर देणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे म्हणून या प्रश्नावर आम्ही अटळ आहोत. महाराष्ट्र पेटवण्याचे काम झाले त्यावेळी सरकार गप्प का बसले होते. सरकारचा यात सहभाग किती, हे मुख्यमंत्र्यांनी एकदा सदनामध्ये सांगावे. या सरकारचा पोलिसांवर दबाव आहे, मागासवर्गीय आयोगावर दबाव होता, या दबावामुळेच आयोगाच्या अध्यक्षासह सदस्यांना राजीनामे द्यावे लागले. शुर्के आयोगातही मेश्राम नावाच्या सदस्यांनी राजीनामा दिला. सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर आहे. खोटे अहवाल सादर करुन निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रात फोफावणाऱ्या ड्रग्जच्या काळ्या धंद्याची जबाबदारी फडणवीसांची..

महाराष्ट्रात ड्रग्जचा काळा बाजार जोरात सुरु आहे त्यात गृहमंत्रालयाचा मोठा सहभाग दिसत आहे. तरुण पिढीला ड्रग्जचे विष देऊन बरबाद केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज कुठुन येते? हे सांगितले जात नाही पण गुजरातच्या मुंद्रा बंदरातून येत आहे हे स्पष्ट आहे. मुंद्रा बंदर कोणाचे आहे हे जगजाहीर आहे, या बंदरात हजारो टन ड्रग्ज अनेकदा सापडले आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणही आम्ही उचलून धरले होते. तरुण पिढीमध्ये ड्रग्जचे जहर पसरवले जात आहे यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले पाहिजे.

ट्रिपल इंजिन सरकारने सर्वांनाच रस्त्यावर आणले..

राज्यात सध्या डॉक्टर संपावर आहेत, तरुणमुले रस्त्यावर आहेत, पेपरफुटीला सरकारी अधिकारी जबाबदार आहेत याचे पुरावे मुलांनी दिले, शेतकरी रस्त्यावर आहे, निर्यातबंदी उठवली म्हणून बातम्या पसरवल्या पण कांदा अजून सडत आहे, शेतकरी रस्त्यावर आहे. सरकारी कर्मचारी रस्त्यावर आहेत. शिंदे-फडणीस-पवारांच्या ट्रिपल इंजिन सरकारने राज्यातील जनतेला रस्त्यावर आणले आहे. भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत त्याचेच परिणाम देश भोगत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

अनाधिकृत होर्डिंग आणि जाहिरातींनाअभय: भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा


न्यायालयाच्या आदेशाला पुणे महानगरपालिकेने दाखवली केराची टोपली
पुणे: महानगरपालिका हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जागेत असणारे तब्बल ४ अनाधिकृत होर्डिंग काढण्यासाठी न्यायालयाने २०२१ मधे ऑर्डर करूनही महानगरपालिकेच्या वतीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने १९ जानेवारी २०२४ रोजी सहायक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभाग यांना पत्र काढून सदर अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी पत्र पाठविले होते. मात्र सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई केली नाही. सामान्य माणसाने रस्त्यावर भाजी विक्री केली तरी तत्परतेने कारवाई करणारे हे प्रशासन धनदांडग्यांना अभय देते हे यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जर प्रशासनाने हे होर्डिंग हटविले नाही तर शिवसेना स्टाईलने दणका दिला जाईल असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी सांगितले.

अंनत घरत म्हणाले की, कायद्याच्या पळवाटा काढून पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभाग हे होर्डिंग धरकाला अभय देत असल्याचा प्रकार सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून चालू असल्याचे उघड झाले आहे. संबंधित धनदांडग्यांना पाटबंधारे खात्याने जी परवानगी दिली होती ती निविदा न करता परवानगी दिल्यामुळे आलेल्या तक्रारीवरून पाटबंधारे खात्याने ती दिलेली परवानगी रद्द केली. त्यामुळे त्या होर्डिंगधारकाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचा निकाल पाटबंधारे विभागाच्या बाजूने लागला. पण काही पुणे महापालिकेचे अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी संबंधित बेकायदेशीर होर्डिंग धारकाला मदत करत आहेत. निकाल २०२१ साली लागला तेंव्हापासून आजपर्यंत त्या होर्डिंगधारकांनी बेकायदेशीरपणे तिथे होर्डिंग वापरणे सुरूच ठेवले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने त्या होर्डिंग धारकारकाला दंड करून आजपर्यंतची रक्कम वसूल केली जावी. कोर्टाने दिलेल्या आदेशाला पुणे महानगरपालिकेच्या वतीने केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुण्यातील सर्व अनधिकृत फलकांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे घरत म्हणाले.

आता राज्यातील  सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे-केअर सेंटर

0

हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा – आरोग्य मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत

मुंबईदि. २६: हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले.

हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे आज (दि. २६ फेब्रुवारी) आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर उपस्थित होते. तर  सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारी, रुग्ण दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधला. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ  उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली.

हिमोफिलिया डे- केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले,  सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा.  याबाबत समाज माध्यमे तसेच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची  उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी.  या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलिया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायू, सांध्यांमध्ये, दातामधून, नाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तिव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित सर्व जिल्ह्यांत नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत.

रायगड, पालघर, धुळे, बीड, पुणे, सोलापूर, नंदुरबार, कोल्हापूर, जळगांव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, सांगली, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, लातुर, धाराशीव, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत व वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

0

मुंबईदि. २६ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी २० हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम सन २०२३-२४ मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील. खरीप पणन हंगाम सन २०२३-२४ मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम सन २०२३-२४ साठी धान, भरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.

हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे.  किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोदंणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पहाणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील. शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा. प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. ई-पीक पहाणी ॲपद्वारे संकलीत माहितीच्या आधारे सात बारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोस्ताहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल. एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर अनुदान देय राहील.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे प्रकाशन

0

मुंबई, दि. 26 – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या 39 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यन्त 666 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मागील वर्षभरात छपाई झालेल्या 39 पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉ.अरुणा ढेरे लिखित ‘भारतीय विरागिणी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या ग्रंथामध्ये भारतीय पातळीवरील काव्यविश्वातील कवयित्रींची- संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमी, त्यांनी निवडलेले भक्तिमार्ग, त्यांचा परमार्थविचार, लौकिकाविषयीची त्यांची दृष्टी, त्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष, त्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन होते. तर, ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ संजीव भागवत यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. मातृदेवता आणि त्यांचे अस्तित्व सर्वसामान्यांमध्ये अजूनही कसे अबाधित आहे याचा दाखला हा ग्रंथ देतो. लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ दिशादर्शक असा आहे.

मंडळामार्फत प्रकाशित होत असलेल्या अन्य महत्त्वपूर्ण पुस्तकांमध्ये महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा, साहित्य, कलाकल्पना, वस्त्रप्रारणे, खाद्याभिरुची, नितीसंकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास मांडणारा ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ (खंड-2) 1901-1950 (भाग-1 व भाग-2) हा रमेश वरखेडे यांनी लिहिलेला ग्रंथ, कै.प्राचार्य रामदास डांगे व कार्यकारी संपादक श्रीमती सुप्रिया महाजन यांनी संपादित केलेल्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ हे पुस्तक, श्रीमती मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या ‘अक्षरबालवाङ्मय’ या प्रकल्पातील तिसरा खंड ‘भ्रमणगाथा’ हा खंड, श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून डॉ.विश्वास पाटील यांनी संपादन केलेल्या या प्रकल्पातील खंड-3 आणि खंड-4 चा समावेश आहे.

‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत यापूर्वी प्रकाशित झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुनर्मुद्रित चरित्र, गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र, यापूर्वी प्रकाशित झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुनर्मुद्रित चरित्र, ‘कस्तुरबा गांधी जीवन चरित्र’, जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे चरित्र, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, डॉ.पतंगराव कदम यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारे चरित्र, ‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ या त्रिखंडात्मक प्रकल्पांतर्गत भाग-2 ‘अष्टांगांचा अभ्यास’ व भाग-3 ‘गोदा संस्कृती’ हे दोन महत्त्वपूर्ण खंड, याचबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेली ‘माणसाचा मेंदू व त्याचे कार्य’, खगोलशास्त्राचे विश्व, स्वातंत्र्याविषयी, अभिनय साधना, बोस्तान, यशोधन, मराठी शब्दकोश, पोर्तुगीज-मराठा संबंध, तमिळ भाषा प्रवेश, गजाआडच्या कविता व उर्दू-मराठी शब्दकोश इत्यादी अशी मुद्रित व पुनर्मुद्रित मिळून 39 मौलिक पुस्तके वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मंडळाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून एकूणच मौलिक ग्रंथऐवज वाचकांना उपलब्ध होत असल्याची भावना डॉ.मोरे यांनी व्यक्त केली आहे.

डिफेन्स एक्स्पोमध्ये १ हजार ३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

पुणे, दि. २६: पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी राज्यशासन आणि मॅक्स एरोस्पेस, एसबीएल एनर्जी, म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन सामंजस्य करार झालेत. या करारामुळे राज्यात १ हजार ३५८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मुख्य म्हणजे दोन कंपन्या नागपूरमध्ये तर दोन कंपन्या पुण्यात गुंतवणूक करणार असून भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

मॅक्स एरोस्पेस आणि एव्हिएशन प्रा. लिमिटेड ही एक विमानचालन अभियांत्रिकी कंपनी आहे, जी लष्करी विमानांतील सुधारणा, उन्नतीकरण आणि देखभाल संबधी काम करते.

नागपुरातील उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी राज्यशासन आणि मॅक्स एरोस्पेस यांच्यात 558 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. असॉल्ट रायफल्स, कार्बाइन्स, मशीन गन, ऑटोमॅटिक पिस्तूल, ग्रेनेड्स, एअर लाँच गाईड बॉम्ब (प्रिसिजन म्युनिशन्स) आणि दारुगोळा निर्मितीसाठी ही पहिली गुंतवणूक असून राज्यातील संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी मोठी घडामोड आहे.

एसबीएल एनर्जी लिमिटेड ही भारतातील खाण/औद्योगिक स्फोटके उत्पादकांपैकी एक प्रमुख कंपनी आहे. औद्योगिक आणि संरक्षण उद्देशांसाठी स्फोटकांच्या निर्मितीसाठी या कंपनीसोबत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. एसबीएल एनर्जी लि.आपला विस्तार करणार असून पुढील उत्पादन सुविधा नागपूरमध्ये स्थापन करणार आहे. हा सामंजस्य करार राज्यातील खाण आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रांच्या वाढीचे द्योतक आहे, कारण स्फोटकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रस्तावित गुंतवणूक विदर्भात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि स्फोटक निर्मिती क्षेत्रात दुर्मिळ कौशल्य विकासासाठी सज्ज आहे.

म्युनिशन इंडिया लिमिटेड ही पुणेस्थित मुख्यालय असलेली कंपनी केंद्र सरकारच्या मालकीची संरक्षण कंपनी आहे. लष्कर, नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलांसाठी सर्वसमावेशक दारुगोळा आणि स्फोटकांचे उत्पादन, चाचणी, संशोधन, विकास आणि विपणनामध्ये गुंतलेली ही भारतातील सर्वात मोठी उत्पादक आणि बाजारपेठेतील अग्रणी कंपनी आहे. निर्यातीच्या उद्देशाने 120 mm, 125 mm आणि 155 mm दारुगोळा उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उत्पादन सुविधेमुळे उच्च कुशल रोजगार निर्माण होईल आणि 300 कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यात होईल. राज्यातील संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासोबतच, ही भागीदारी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनला साकार करण्यास मदत करेल. शिवाय, ही गुंतवणूक सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.

एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील राज्याच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा म्हणजे पहिल्याच दिवशी झालेली ही गुंतवणूक आहे. 2018 मध्ये नूतनीकरण केलेल्या एरोस्पेस आणि संरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. या धोरणाने राज्याला एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात अग्रेसर बनण्यास सक्षम केले असून देशाच्या संरक्षण उत्पादनात 20 टक्के आणि निर्यातीत 16 टक्के योगदानही दिले आहे.

राज्य शासनाचा उद्योग विभाग महाराष्ट्रातील या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लवकरच नवीन एरोस्पेस आणि संरक्षण धोरण जाहीर करणार आहे. तसेच, 500 कोटी रुपयांचा संरक्षण उपक्रम निधी (डिफेन्स व्हेंचर फंड) असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या क्षेत्रातील 15 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना या उपक्रमातून निधी दिला असून यापैकी काही स्टार्टअप्सने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. नवीन धोरणामध्ये हा निधी आणखी वाढवला जाईल.

महासंस्कृती महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा-ज्योती कदम

पुणे,: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व संबंधित विभागांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त चेतना केरुरे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार दिपक आकडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी आदी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृह येथे हा महोत्सव होणार आहे. गीत रामायण, कीर्तन, भारुड, अभंग, भजनी मंडळ स्पर्धा, अशा सामाजिक जीवनाशी अध्यात्माचा मेळ घालणाऱ्या बाबींबरोबरच यदा कदाचित रिटर्न्स, बोक्या सातबंडे आदी प्रसिद्ध नाटके, एकांकिका, कवितावाचन, गझलांचा प्रसिद्ध कार्यक्रम सोबतीचा करार आदी विविध कार्यक्रमांचा आस्वाद नागरिेकांना घेता येणार आहे.

हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार असून अधिकाधिक नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था करावी आणि कार्यक्रमाची माहितीदेखील नागरिकांपर्यंत पोहोचवावी. ‘बोक्या सातबंडे’सारखे नाटक शालेय विद्यार्थ्यांना पाहता येईल अशी व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.

महोत्सवादरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी बचत गटांची उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी दालनाची व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदार जागृतीच्या अनुषंगाने माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.