पुणे,: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व संबंधित विभागांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त चेतना केरुरे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार दिपक आकडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी आदी उपस्थित होते.
श्रीमती कदम म्हणाल्या, पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृह येथे हा महोत्सव होणार आहे. गीत रामायण, कीर्तन, भारुड, अभंग, भजनी मंडळ स्पर्धा, अशा सामाजिक जीवनाशी अध्यात्माचा मेळ घालणाऱ्या बाबींबरोबरच यदा कदाचित रिटर्न्स, बोक्या सातबंडे आदी प्रसिद्ध नाटके, एकांकिका, कवितावाचन, गझलांचा प्रसिद्ध कार्यक्रम सोबतीचा करार आदी विविध कार्यक्रमांचा आस्वाद नागरिेकांना घेता येणार आहे.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार असून अधिकाधिक नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था करावी आणि कार्यक्रमाची माहितीदेखील नागरिकांपर्यंत पोहोचवावी. ‘बोक्या सातबंडे’सारखे नाटक शालेय विद्यार्थ्यांना पाहता येईल अशी व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवादरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी बचत गटांची उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी दालनाची व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदार जागृतीच्या अनुषंगाने माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.