न्यायालयाच्या आदेशाला पुणे महानगरपालिकेने दाखवली केराची टोपली
पुणे: महानगरपालिका हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जागेत असणारे तब्बल ४ अनाधिकृत होर्डिंग काढण्यासाठी न्यायालयाने २०२१ मधे ऑर्डर करूनही महानगरपालिकेच्या वतीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने १९ जानेवारी २०२४ रोजी सहायक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभाग यांना पत्र काढून सदर अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी पत्र पाठविले होते. मात्र सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई केली नाही. सामान्य माणसाने रस्त्यावर भाजी विक्री केली तरी तत्परतेने कारवाई करणारे हे प्रशासन धनदांडग्यांना अभय देते हे यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जर प्रशासनाने हे होर्डिंग हटविले नाही तर शिवसेना स्टाईलने दणका दिला जाईल असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी सांगितले.
अंनत घरत म्हणाले की, कायद्याच्या पळवाटा काढून पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभाग हे होर्डिंग धरकाला अभय देत असल्याचा प्रकार सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून चालू असल्याचे उघड झाले आहे. संबंधित धनदांडग्यांना पाटबंधारे खात्याने जी परवानगी दिली होती ती निविदा न करता परवानगी दिल्यामुळे आलेल्या तक्रारीवरून पाटबंधारे खात्याने ती दिलेली परवानगी रद्द केली. त्यामुळे त्या होर्डिंगधारकाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचा निकाल पाटबंधारे विभागाच्या बाजूने लागला. पण काही पुणे महापालिकेचे अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी संबंधित बेकायदेशीर होर्डिंग धारकाला मदत करत आहेत. निकाल २०२१ साली लागला तेंव्हापासून आजपर्यंत त्या होर्डिंगधारकांनी बेकायदेशीरपणे तिथे होर्डिंग वापरणे सुरूच ठेवले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने त्या होर्डिंग धारकारकाला दंड करून आजपर्यंतची रक्कम वसूल केली जावी. कोर्टाने दिलेल्या आदेशाला पुणे महानगरपालिकेच्या वतीने केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुण्यातील सर्व अनधिकृत फलकांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे घरत म्हणाले.