पुणे-संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, केपीआयटी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन आणि पुण्यातील सामाजिक संस्था यांच्याद्वारे पर्यावरण सप्ताहात ‘पेहेल-२०२४’ हे शहर स्तरावरील ई-कचरा आणि प्लॅस्टिक संकलन अभियान रविवार 25 फेब्रुवारी रोजी राबविले गेले. या अभियानाचे उद्घाटन संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार,यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे संपन्न झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त संदिप कदम कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या CSR प्रमुख सौ. सौजन्या वेगुरु, केपीआयटीचे CSR प्रमुख तुषार जुवेकर, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मल्हार करवंदे, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक अतुल क्षीरसागर व सीईओ डॉ. राजेश मणेरीकर, मनपा सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. केतकी घाटगे हे यावेळी उपस्थित होते.
वेगवेगळ्या संस्थांच्या, कंपनीच्या तसेच महाविद्यालयाच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांनी १८ ते २४ फेब्रुवारी रोजी, लोकांमध्ये सर्व नागरिकांनी अभियानांतर्गत जनजागृतीचे प्रयोग केले, पथनाट्य, खेळातून जनजागृती, चौकसभा, पत्रक वाटप केले गेले. या अभियानात स्वयंसेवकांकडून उभारण्यात आलेल्या 415 संकलन केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा केले. अभियानातून एकूण सुमारे ७५०० जणांनी आपल्या घरातील कचरा केंद्रावर दिला. यावेळी अंदाजे 53 टन कचरा संकलित झाला असून त्यामध्ये 40 टन ई-कचरा आणि 13 टन प्लॅस्टिक कचरा जमा झाला आहे. जमा झालेल्या ई- कचऱ्यातून दुरुस्त होण्यासारखे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करून गरजू शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. उर्वरित ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे शासनमान्य रिसायकलर्स द्वारे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल.