Home Blog Page 1190

पर्यावरण बचावासाठी देशातील २३ आयआयटींची वज्रमूठ

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे आणि नाशिकचा युवक पियुष गुळवे यांचा पुढाकार

गुवाहाटी/पुणे/नाशिक – देशातील उच्च शिक्षणसंस्थेत अग्रभागी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्र आल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पुण्यातील ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेंद्र शेंडे आणि नाशिक जिल्ह्यातील युवक पियुष गुळवे यांचा पुढाकार निमित्त ठरला आहे. त्यामुळेच देशातील २३ आयआयटींमध्ये पर्यावरण बचावाची नेट झिरो ही मोठी चळवळ सुरू होणार आहे.

इंजिनिअरींग, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात नामांकीत असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे असंख्य युवकांचे स्वप्न असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये शिक्षणाची संधी मिळते. त्याचे सोने करुन हे विद्यार्थी पुढे भारताचे नाव जगभरात गाजवतात. त्यामुळेच आयआयटीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नेतृत्व करताना दिसत आहेत. आणि आता या सर्व आयआयटी एका कारणासाठी एकवटणार आहेत. हवामान बदल, जागतिक तपमान वाढ या वैश्विक समस्यांना रोखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतातील २३ आयआयटी नेट झिरो या मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत.

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. शेंडे हे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच, त्यांच्या नेतृत्वात ग्रीन तेर फाऊंडेशन कार्यरत आहे. याच संस्थेच्यावतीने गुवाहाटी आयआयटीमध्ये नेट झिरो ही कार्यशाळा संचालक डॉ. राजीव आहुजा आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील पियुष गुळवे हा विद्यार्थी सध्या आयआयटी गुवाहाटीमध्ये केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो शेवटच्या वर्षात आहे. तसेच, तो तेथील जिमखान्याचा उपाध्यक्ष आहे. देशभरातील आयआयटींच्या जिमखाना संघटनेचा पियुष हा पदाधिकारी आहे. त्यामुळे ग्रीन तेर फाऊंडेशन आणि पियुषच्या पुढाकारातून आता नेट झिरो ही मोहिम सर्व आयआयटीमध्ये राबवली जाणार आहे.

शिवजयंतीचे निमित्त
गुवाहाटीतील कार्यशाळा २० फेब्रुवारी रोजी झाली. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येला जगभरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. पियुषच्या पुढाकाराने आयआयटी गुवाहाटीच्या कॅम्पसमध्ये विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्याचवेळी तेथे ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर झाला. त्यात डॉ. शेंडे आणि पियुष यांची भेट झाली. दोघांमध्ये विचारमंथन झाले. त्यानंतर डॉ. शेंडे यांच्या सूचनेनुसार पियुषने नेट झिरो कार्यशाळेत अप्रतिम सादरीकरण केले.

आयआयटीमध्ये नेमके काय घडणार
मानवनिर्मिते कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखून कार्बन न्यूट्रल भारत करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हवामान बदलाच्या समस्येला थोपविण्यासाठी कार्बन न्यूट्रलशिवाय अन्य पर्याय नाही. नेट झिरो म्हणजेच कार्बन उत्सर्जन शून्य करणे. आयआयटीच्या कॅम्पसमध्ये जीवाश्म इंधनांचा वापर कमी करुन पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी अत्यंत कसोशीचा अभ्यास करुन कृती आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर उद्दीष्ट निश्चित केले जाईल. आणि प्रत्यक्ष कृती केली जाईल. वृक्षारोपण, कचऱ्याची निर्मिती न होणे, झाला तरी त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, प्रदूषण होणार नाही अशा तंत्रज्ञान आणि बाबींचा अंगीकार करणे, वस्तूंचा पुनर्वापर, सौर ऊर्जा निर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन यासह अनेक संकल्पनांचा अवलंब केला जाणार आहे. 

हवामान बदल आणि जागतिक तपमान वाढीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पर्यावरणस्नेही कृती असणारी नेट झिरो ही मोहिम अत्यावश्यक आहे.  देशातील शेकडो विद्यापीठे आणि हजारो कॉलेजेसमध्ये नेट झिरोचे जाळे विकसित झाले आहे. आता देशातील २३ आयआयटीही नेट झिरोसाठी पुढाकार घेत आहेत. ही जगभरातील उच्च शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणादायक बाब आहे.

– डॉ. राजेंद्र शेंडे, संस्थापक संचालक, ग्रीन तेर फाऊंडेशन

आयआयटी जिमखान्यांचे प्रकृती क्लब आहेत. त्याद्वारे आम्ही नेट झिरो मोहिमेला चालना देणार आहोत. तसेच, स्टुडंटस लीडरशीप कॉन्क्लेव्हचे आयोजनही आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून केले जाते. यंदाच्या कॉनक्लेव्हमध्ये नेट झिरो मोहिमेचा अजेंडा मी निश्चित केला आहे. त्यामुळे आगामी काळात देशभरातील आयआयटींमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पना राबविल्या जातील.  
– पियुष गुळवे, उपाध्यक्ष, आयआयटी गुवाहाटी जिमखाना

फडणवीसांना माझा बळी हवाय,सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतोय’:मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप

 मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरअत्यंत गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर निघाल्याने आंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी संताप गोंधळ अशा वातावरणात मुंबईकडे जरांगे निघाल्याचे दिसले .

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी माध्यमांशी बोलतानाच माईक ठेवला आणि उठून सागर बंगल्याकडे जायला निघाले. यावेळी मराठी बांधवांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस ते निघाले .

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असा इशारा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सरकारला शिव्या दिल्या त्याचा त्यांना राग आहे. त्यामुळे मला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे जे त्यांच्याविरोधात गेले त्यांना ते संपवत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी लागत असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो, तिथे माझा बळी घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो. ते माझं उपोषण सोडायला येणार होते, मात्र मी त्यांना येऊ दिले नाही, याचा त्यांना राग आहे. ते माझ्याविरोधात ब्राम्हणी कावा रचत आहे. पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

अजय बारसकर यांच्यासह अनेक लोक हे फडणवीसांनी माझ्याविरोधात सोडले आहे. यात एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि अजित पवार यांचे दोन आमदार देखील सहभागी असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की मला बदनाम करण्यासाठी त्यांचे षडयंत्र चालू आहे.एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजप सोडावी लागली. एकनाथ शिंदे हे कधीही शिवसेना सोडू शकत नाही, त्यांना शिवसेना सोडावी लागली. अजित पवार कधीही राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नाही, त्यांना देवेंद्र फडणवीसांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल कधीही शरद पवारांना सोडू शकत नाही, त्यांना तुरुंगाची भीती दाखवण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली.
अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाही, त्यांनी फडणवीसांच्या काव्यामुळे काँग्रेस सोडली.

देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना संपवले आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात भागवत कराडांचा पर्याय उभा केला. महादेव जानकर धनगर समाजाचे नेते होत होते तर गोपीचंद पडळकरांचा पर्याय उभा केला. प्रकाश आंबेडकरांविरोधात रामदास आठवले त्यांनी भाजपमध्ये घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काव्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी भाजपाला दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे औंध रुग्णालयात नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण; अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

पुणे, दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नवीन ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि ‘पीएम-अभिम’अंतर्गत नवीन १०० खाटांच्या अतिदक्षता रुग्णालय (क्रिटिकल केअर) इमारतीचे रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. दूरदृष्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी दिली.

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

औंध येथील ३० खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ८ कोटी ९९ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या रुग्णालयात तळमजल्यावर योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्य कक्ष तसेच पी.जी.एम. आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, होमियोपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, मड बाथ नॅचेरोपॅथी, नॅचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पंचकर्म, क्षारसूत्रा व इतर आयुष उपचार मोफत केले जाणार आहेत.

पहिल्या मजल्यावर गर्भसंस्कार कक्ष, बैठक सभागृह, विशेष कक्ष, स्वच्छता गृह, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष, स्क्रब रुम, शस्त्रक्रिया गृह, रिकव्हरी रुम, शस्त्रक्रियापूर्व दक्षता कक्ष, पुरुष व महिला कक्ष, प्रतिक्षालय कक्ष, शुश्रुषा कक्ष अशा सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

‘पीएम-अभिम’ अंतर्गत औंध जिल्हा रुग्णालयात नवीन १०० खाटांच्या अतिदक्षता (क्रिटिकल केअर) रुग्णालयासाठी ४० कोटी ५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या रुग्णालयात तळमजल्यावर प्रतिक्षा, वैद्यकीय, मुख्य वैद्यकीय, तपासणी, भांडार, प्रयोगशाळा, नवजात शिशु, वेलनेस, प्रसाधन, तसेच पहिल्या मजल्यावर विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) वैद्यक आणि परिचारिका कक्ष, दुसऱ्या मजल्यावर ओटी कॉम्पलेक्स, एचडीयू, अतिदक्षता विभाग आणि इतर सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. येमपल्ले यांनी दिली आहे.
००००

तुतारी कुठे ,किती, कशी वाजते ते बघू — देवेंद्र फडणवीस


पुणे: अजित पवारांमुळे शरद पवारांना अखेर रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे आणि किती वाजते हे येणाऱ्या काळात दिसेल, असा उपरोधित टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात. महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला ते भेट देण्यासाठी आले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन त्यांनी केले. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या लॉंचिंगच्या कार्यक्रमावर देखील टोला लगावला.


शरद पवार गटाच्या चिन्ह लॉचिंगवर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की शेवटी 40 वर्षानंतर का होईना पण पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजित दादांना एका गोष्टीचा तर क्रेडिट द्यावाच लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात आमची एक बैठक झालेली आहे. ती समाधानकारक झाली आहे. या संदर्भात आणखी एक बैठक आम्ही करू आणि लवकरच आम्ही जागावाटप करू. राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी यांच्या चर्चेवर नाव निश्चित होत नसतात. यामागे एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर ज्यांची नावे पुढे येतील ती निश्चित तुम्हाला सांगण्यात येईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांना 25 लाखांचे बक्षीस

जे काम बंदूक आणि मिसाईल करु शकत नाही ते काम ड्रग्ज करत आहे

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 600 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषीक जाहीर केले आहे. तसेच पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेली कारवाई ही नजकीच्या काळातील देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी , पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, आर.राजा, संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, राजेंद्र लांडगे, अजय वाघमारे आणि पोलिस हवालदार विठ्ठल साळुंके यांचा सत्कार केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे पोलिसांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुणे पोलिसांनी एक प्रचंड मोठी कारवाई अंमली पदार्थ विरोधात केली आहे. नजीकच्या काळातील ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा एमडीचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मागिल काही महिन्यापासून सातत्याने ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ ही मोहिम राबवली जात आहे. ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ची मोहिम देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात देशात राबवली जात आहे. ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स अवलंबला जात आहे. ड्रग्ज समाजाला उद्धवस्त करण्याचं काम करत आहे. जे काम बंदूक आणि मिसाईल करु शकत नाही ते काम ड्रग्ज करत आहे, म्हणून हे नष्ट करायचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा साठा जर पोहोचला असता, तर किती घरे उद्ध्वस्त झाली असती. कारखाने टाकून एमडी ड्रग्ज बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पैशांची देवाण-घेवाण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही जी कारवाई झाली ती महत्त्वाची आहे. आपल्या समोर काय आव्हान आहेत ते लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. या कारवाईमधून खूप काही शिकवलं आहे. आता अशाच लिंक शोधा असे आवाहन त्यांनी पुणे पोलिसांना केले. याचे रुट शोधणे महत्त्वाचं असल्याचे फडणवीस म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्यांना एकत्रित सूचना दिल्या आहेत आणि मदत करण्याचं आवाहन केलं आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या समोर काय आव्हानं आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हि कारवाई करुन थांबता येणार नाही.
अशा प्रकारचा छोटाही साठा मिळाला तरी बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ते पुणे पोलिसांनी केलं म्हणून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात साठा मिळाला. नाहितर एक गुन्हेगार सापडला तर त्या आनंदात त्याच्या पुढे गेलो नसतो तर कदाचीत हे कधीच शक्य झाले नसते. ड्रग्ज पेडलर पकडलेच पाहिजेत. परंतु त्यांच्याकडे हे ड्रग्ज कुठून आले, कसं येतं, त्याचा रुट काय आहे, हे कुठे तयार होते हे शोधून काढणं अत्यंत महत्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले.या प्रकरणाचे धागेदोरे परदेशात आहेत. परदेशात काही प्रमाणात ड्रग्ज पाठवण्यात आला आहे.
त्यामुळे कॉर्डिनेशन असणे आवश्यक आहे. नवीन ज्या पद्धती आहेत, कुरिअरचा वापर करणे, डार्कनेटचा वापर करणं,
सोशल मीडिया साईटचा वापर करणं, त्याठिकाणी कॉन्टिटी छोटी असल्याने पकडणं कठीण आहे.
अशा या जागा शोधून काढाव्या लागतील आणि त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल.
पुणे पोलीस आणि महाराष्ट्रातील युनिट्स यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बारामती मतदार संघात कोणाचे पारडे जड..माजी खासदार संजय काकडेंचे मत..

पुणे- बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मोठं वजन आहे,अजितदादा स्वतः तिथे लीड घेतील,मागील लोकसभा निवडणुकीत खडकवासला भागात भाजपाला चांगले मताधिक्य मिळालं होतं. तर भोर, पुरंदर आणि दौंड मध्ये देखील भाजपा उमेदवाराला सुप्रिया सुळेंपेक्षा अधिक मतं मिळाली होती.तरुण मतदारांचे आकर्षण अजित पवार आहेत. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. हे दोन्ही नेते आता आमच्याबरोबर आहेत. ते लोकसभेला काम करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच मोठे नेते आमच्याबरोबर आहेत. केवळ काँग्रेसचे संजय जगताप, संग्राम थोपटे आणि स्वतः सुप्रिया सुळे हे तीनच नेते महाविकास आघाडी कडे आहेत. यामुळे बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांचा पराभव करतील असे मत माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.

संजय काकडे म्हणाले,अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे यांची मतं देखील सुनेत्रा पवार यांना मिळतील. त्यामुळे अजित पवार ज्याला उमेदवारी देतील तोच उमेदवार जिंकेल असं आत्ता तरी वाटतंय. यासह भाजपाची चार लाख पारंपरिक मतं अजित पवारांच्या उमेदवाराला मिळतील. अजित पवारांची स्वतःची तीन ते साडेतीन लाख मतं आहेत. पुरंदरचे संजय जगताप, विजय शिवतारे यांची मतंदेखील आमच्याकडे आहेत. या सर्वांचा विचार केला तर बारामतीत सुनेत्रा पवारांचे पारडं जड आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय व्यासपीठांवर दिसू लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमत्री अजित पवार हे सातत्याने बारामतीत सभा, बैठका, कार्यक्रम घेत आहेत. बारामतीतल्या लहान – मोठ्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.अजित पवार हे आगामी निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्फे निवडणूक लढवतील असे सध्या वातावरण दिसते आहे.सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.


काकडे म्हणाले, महायुतीतली नेत्यांची फळी पाहिली तर लक्षात येईल की, सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभा निवडणूक जिंकतील. त्यांच्यासाठी वातावरण खूप चांगलं आहे. त्याच्या जोडीला अजित पवारांनी मतदारसंघात केलेलं कामही आहे. आमच्या पक्षाचा पारंपरिक मतदार अजित पवारांबरोबर आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जो फरक होता तो तोडून सुनेत्रा पवार आघाडी घेतील. उदाहरण म्हणून २०१४ च्या निवडणुकीकडे पाहता येईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार महादेव जानकर ५७ हजार मतांनी पडले होते. २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे १.४७ लाख मतांनी निवडून आल्या होत्या.परंतु सुप्रिया सुळेंकडे जी लाख-दिड लाख मतं अधिक होती ती अजित पवारांमुळे त्यांना मिळाली होती.आता अजित पवार आमच्याबरोबर असल्याने युतीचं पारडं जड आहे.

आफ्रो-एशियन विद्यार्थ्यांना पीसीयू चा जागतिक संधी साठी ‘गेट फ्युचर रेडी’ उपक्रम उपयुक्त

पिंपरी, पुणे (दि. २४ फेब्रुवारी २०२४) जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या उद्योग व्यवसायाच्या संधी ‘गेट फ्युचर रेडी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास उपयोग होईल. अशा उपक्रमातून विविध देशांतील संस्कृती, परंपरा तसेच शैक्षणिक, औद्योगिक विकास याबाबत उपयुक्त माहिती मिळते. या तंत्रज्ञान व शैक्षणिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय घडामोडी विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी फायदेशीर ठरतील असे पीसीयूच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आणि साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये वैश्विक व्यावसायिक विकास उपक्रमांतर्गत आफ्रो – एशियन विद्यार्थ्यांसाठी “गेट फ्युचर रेडी” उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामधे अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, झांबिया, टांझानिया, सूदान, सीरिया, उज्बेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, झिम्बाब्वे, येमेन, दक्षिण सूदान, गांबिया आणि ओमान येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमात जगातील विविध संस्कृती आणि परंपरा, विचार विद्यार्थ्यांना जाणून घेता आले असे डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी सांगितले.
पीसीयूचे प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज म्हणाले, पीसीयूच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात होणारे समजून घेता आले. उद्योग, रोजगार संधी बाबत माहिती मिळाली. पीसीयू ने विविध देशांतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले अभ्यासक्रम परिपूर्ण व उज्ज्वल भविष्यात उपयुक्त ठरतील असे सांगितले.
पुणे बिझनेस स्कूलचे प्राचार्य डॉ. गणेश राव, एएएससीआय आणि एएसएआयचे अध्यक्ष वाली रहमान रहमानी, असाईच्या अध्यक्ष संतो ओचन मोडी टोंबे यांनी एआय मधील भविष्यातील संधी, आवश्यकता, बदल, रोजगार निर्मिती, समाज विकासासाठी उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी, शेतकरी, जवान, महिला तरुण सर्वांना फसवले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य आणण्याचा संकल्प करा.

पुणे, दि. २४ फेब्रुवारी
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली परंतु यवतमाळच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी दिलेली कर्जमाफीची गॅरंटीही खोटी निघाली. मोदी सरकारने शेतकरी, तरुण महिला अशा सर्वांना फसवले. या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले असून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे..

पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की, २०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहे, हे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत. पुण्यातूनही इंडिया आघाडीचाच खासदार निवडून येणार आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतीक वारसा लाभलेले शहर आहे, या शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे. पुण्याची संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात आहे. पुण्याला, महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात अडकवू नका. पुण्यात विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत पण त्यांना आंदोलनाची परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. या मुलांचा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारु, असेही नाना पटोले म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे. माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वंदना चव्हाण,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय जगताप, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, माजी मंत्री शिवसेनेचे नेते सचिन अहिर, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, आमदार रविंद्र धंगेकर, प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह महाविकास आघाडीस सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पुण्यामध्ये आयोजित महाराष्ट्र एमएसएमई संरक्षण प्रदर्शन 2024 ला दिली भेट

0

पुणे, 24 फेब्रुवारी 2024

राष्ट्र उभारणी मधील संरक्षण क्षेत्राच्या मोठ्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषद केंद्र, मोशी, पुणे येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) संरक्षण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी भारतीय हवाई दलाला  आमंत्रित केले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) प्रयोगशाळा आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन केंद्रे (DPSU) मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, यामधून संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने भारताने केलेली प्रगती, आणि सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची पूर्तता करण्याची क्षमता प्रतिबिंबित होत आहे.

एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शनाला भेट दिली, आणि भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय वायुदलाच्या स्वावलंबी बनण्याच्या भविष्यातील गरजेची जाणीव निर्माण करण्यासाठी सहभागी उद्योगांशी संवाद साधला. प्रदर्शनात मांडण्यात आलेले  आकाश आणि SAMAR क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर, संरक्षण क्षेत्राच्या ‘स्वदेशी’ क्षमतेची प्रचीती देत आहेत. भारतीय हवाई दलाच्या  स्टॉलवर, देशांतर्गत संस्थांनी खासगी उद्योगांच्या भागीदारीने विकसित केलेली उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत.

तरुणांना भारतीय वायुसेनेत सहभागी होण्यासाठी आकर्षित करण्याकरता हवाई दलाने  या ठिकाणी प्रसिद्धी स्टॉल देखील उभारला आहे. वायुसेनेच्या  विविध कामांची आणि हाती घेतलेल्या उपक्रमांची  माहिती देण्यासाठी या ठिकाणी इंडक्शन पब्लिसिटी एंड एक्झिबिशन व्हेईकल (IPEV) ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना या प्रसिद्धी मोहिमेचा लाभ मिळाला, ज्यांना वायुसेनेच्या  विविध पैलूंबद्दल तसेच हवाई दलामध्ये  करिअरसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती घेण्याची उत्सुकता होती. भारतीय हवाई दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून तसेच अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) म्हणून रुजू होण्याचे फायदे काय आहेत, याबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.

शरद पवारांनी रायगडावरून फुंकली तुतारी:पालखीतून गाठला गड

रायगड-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या आपल्या नव्या निवडणूक चिन्हाचे अनावर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वच महत्त्वाचे नेते होते. या कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः पालखीतून रायगडावर पोहोचले होते.

यावेळी पवार म्हणाले, ”ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल”.

“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असे शरद पवार म्हणाले.

“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असेही आवाहन शरद पवारांनी केले.

स्वयंपुनर्विकास’ हे मुंबईच्या हौसिंग सेक्टरमध्ये परिवर्तन करणारे अभियान

0

विक्रोळीतील भूमिपूजन सोहळ्यात भाजपा आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

मुंबई- विक्रोळी (पूर्व) कन्नमवार नगर येथील गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्था. मर्या. इमारतीचा मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. ‘स्वयंपुनर्विकास’ हे मुंबईच्या हौसिंग सेक्टरमध्ये वेगळे परिवर्तन करणारे एक अभियान असल्याचे प्रतिपादन आ. दरेकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, राजेंद्र सावंत, गुरुकुल सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण जाधव, सचिव कविता कामेरकर, खजिनदार नामदेव ढगे यांसह रहिवासी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास हे एक अभियान म्हणून मी मुंबईत सुरू केले. आपला सर्वसामान्य मराठी माणूस विशेषतः या इमारतींमध्ये राहतो आणि आपण बिल्डरच्या दावणीला बांधले जातो. मग आपल्याला अपेक्षित असणारी जागा मिळत नाही. त्यामुळे सर्व सभासदांची हेळसांड होते. त्यांच्या अडचणी सोडवल्या तर मराठी, मध्यमवर्गीय माणूस स्वतःची संस्था स्वतः विकसित करू शकतो. या भावनेतून मुंबई जिल्हा बँकेने कर्जाचे धोरण बनविले. स्वयंपुनर्विकासाचे धोरण आणले. आज मोठ्या प्रमाणावर अर्थपूरवठा करून एक चळवळ म्हणून स्वयंपुनर्विकास या मुंबई शहरात उभी राहिली असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील स्वप्न हे आपले घर असावे असते. ५०-५० वर्ष मोडकळीस आलेल्या इमारतीत आपण राहतो. कुटुंब, संसार वाढतो आणि त्यावेळेला मोठी जागा मिळणे ही अपेक्षा असते. म्हणून स्वयंपुनर्वीकासातून ती अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. गुरुकुल सोसायटीत साडेपाचशे स्क्वे. फुटाच्या जागा होत्या. आता तुम्हाला जवळपास बाराशे स्क्वे. फुटाची जागा या स्वयंपुनर्विकासातून मिळणार आहे. विकासक कधीच आपल्याला एवढी जागा देऊ शकत नाही. त्यामुळे हा एक विक्रम असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच मुंबई बँकेने ज्या १५-१६ संस्थांना पैसे दिलेत त्या उभ्या राहिल्या आहेत. या अभियानात एक वेगळा आनंद आम्हाला असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास मुंबईच्या हौसिंग सेक्टरमध्ये वेगळे परिवर्तन करणारे अभियान आहे. दोन दिवसांपूर्वी ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्वयंपुनर्विकासाला ताकद दिली ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ कार्यक्रमात मुंबईकरांनी अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. त्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे. कितीही प्रकल्प आले तरी त्यांना अर्थपूरवठा करण्याची जबाबदारी मुंबई जिल्हा बँक म्हणून आम्ही घेऊ. तसेच आपण विश्वासाने हे स्वयंपुनर्विकासाचे काम पुढे न्या आपल्या पाठीशी मुंबई जिल्हा बँक आणि राज्य सरकार ताकदीने पाठीशी राहील, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिला.

महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.२४: देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, महेश शिंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, निबे लि. चे गणेश निबे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला. त्यातून ६०० एमएसएमई तयार झाल्या आहेत. केवळ ३०० कोटीतून १२ ते १५ हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्रे राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू, असे श्री.फडणवीस म्हणाले.

मेक इन इंडिया‘ मुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती ओळखली. आपला देश शस्त्रास्त्रांसाठी परदेशावर अवलंबून होता. आज जगाच्या पाठीवर सामरिक शक्तीत पहिल्या पाचमध्ये असलेले देश  स्वत:ची संरक्षण सामग्री स्वत:च्या देशात तयार करून जगाला निर्यात करतात. हीच क्षमता देशात निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ वर भर देण्यात आला. भारताने शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांसाठी त्याचा काही भाग भारतात उत्पादन करावा लागेल आणि निर्मिती तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करावे लागेल अशी अट ठेवली. म्हणून देशात संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण झाली. जगातील उत्तम शस्त्रसामुग्री देशात निर्माण होत आहे. यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा ३० टक्के दारुगोळा भारतात तयार होत आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

पुणे देशाच्या सामरिकदृष्टीने महत्वाचे केंद्र

पुणे हे भारताच्या सामरीक शक्तीच्यादृष्टीने महत्वाचे केंद्र असून गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे.  नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमाने तयार होतात, माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे.

अमरावतीजवळ बीडीएल मिसाईल उत्पादन युनिट सुरू होत आहे. चंद्रयान-३ करता भंडाऱ्याच्या ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये काही भाग बनले. राज्यात ११ ऑर्डीनन्स फॅक्टरी, ५ डिफेन्स पीएसयु, ८ विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहे. पुण्यात डिआरडीओची सर्वोत्तम सुविधा आणि देशाची महत्वाची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीदेखील आहे. म्हणून एमसएसमईसाठी महत्वाचे स्थान महाराष्ट्र आहे आणि राज्यात पुणे आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही मोठी संधी

संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे गेला आहे. यासाठी पुरवठा साखळीचा भाग होणाऱ्या एमएसएमईसाठी चार क्लस्टर तयार करण्याचे उद्योग विभागाने ठरविले आहे. त्यातून या क्षेत्रात काम करणारे उद्योजक तयार करता येतील. प्रदर्शनात खाजगी संस्थांचा चांगला सहभाग आहे. नवीन इको सिस्टीम तयार करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग ही मोठी संधी आहे. प्रदर्शनातून आपल्याला या इको सिस्टीमचा भाग कसा होता येईल याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदर्शनाला पहिल्या दिवशी ८० हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे, यावरून तरुणाईला आपल्या संरक्षण सिद्धतेबद्दल आकर्षण आहे हे पहायला मिळते. संरक्षण दलाने प्रदर्शनासाठी आपली शस्त्रास्त्रे आणि यंत्रणा पाठविल्याने प्रदर्शनाला शोभा आली आहे असे सांगून त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना धन्यवाद दिले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, अतिशय भव्य प्रकारचे हे प्रदर्शन असून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आहे. संरक्षण उद्योग हा देशात नव्याने विकसीत होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची गरज ओळखून अभ्यासक्रम विकसीत करण्यावर भर देण्यात आला आहे. अशा अभ्यासक्रमासाठी केंद्र आणि राज्य शासन सहकार्य करीत आहे. येत्या जूनपासून त्या-त्या जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक असणारे अभ्यासक्रम विकसीत करण्यात येणार असून संरक्षण उद्योगातील संधी लक्षात घेता यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या एमएसएमईने संरक्षण क्षेत्रात उमटवला आहे. राज्यात आधुनिक शस्त्रास्त्रे, वायुसेनेसाठी हेलिकॉप्टर तयार करण्यात येते. त्यामुळे या उत्पादनांच्या किंमती कमी होत आहे. देशाच्या संरक्षण विभागाला बळ प्रदान करण्याचे काम राज्यातील एमएसएमई करीत असून भविष्यात महाराष्ट्र डिफेन्सचा हब बनेल असे प्रयत्न उद्योग विभागामार्फत करण्यात येईल. भविष्यात नागपूर, शिर्डी, पुणे आणि रत्नागिरी डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या मागणीप्रमाणे १ हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रदर्शनाच्या माध्यमातून देशाचे संरक्षण करणारी यंत्रणा पाहण्याची विद्यार्थ्यांना आणि एमएसएमईंना सुवर्ण संधी आहे. सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांचा दृकश्राव्य संदेश दाखविण्यात आला. आता संरक्षणातील गरजा देशातच पूर्ण होतील. २०४७ पर्यंत देशाची ओळख विकसीत राष्ट्र म्हणून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका सर्वेक्षणात शस्त्र निर्यात करणाऱ्या २५ देशांमध्ये पहिल्यांदाच भारताचा समावेश झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था आणि एमएसएमई यांच्यात निकोप स्पर्धा झाल्यास देशासाठी चांगली आणि कमी किंमतीतील उत्पादने मिळू शकतील आणि देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असे  त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्री.कांबळे यांनी प्रास्ताविकात डिफेन्स एक्स्पोच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात असे प्रदर्शन प्रथमच आयोजित होत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित एमएसएमईंना प्रदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.  प्रदर्शनाच्या आयोजनासाठी भारतीय संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल आणि वायुसेनेचे सहकार्य मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मॅक्स एअरोस्पेस ॲण्ड एव्हीएशन प्रा.लि., एसबीएल एनर्जी लिमिटेड, निबे लिमिटेड आणि एमआयल आणि महाराष्ट्र शासन यांच्यात संरक्षण उत्पादनाशी संबंधित विविध सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार!

0

माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगार विरोधी जीआर मागे घेण्याबद्दल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने दि. २६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण! 

मुंबई, दि.२४:- माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि.१६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख माथाडी कामगार संघटनांचे नेते व कार्यकर्ते दि.२६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत.

जेष्ठ समाजसेवक – जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने हे आंदोलन करण्यात येणार असून, या कृती समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, शिवाजी सुर्वे, निवृत्ती धुमाळ, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, दत्ता घंगाळे, सतीशराव जाधव आदी नेत्यांचा समावेश आहे.

माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्र.३४ मागे घेऊन या अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार सल्लागार समितीची व विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करुन अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणुक करावी, विविध माथाडी मंडळात माथाडी कामगारांच्या शिकलेल्या मुलांचीच भरती करावी, माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग केला जात आहे, त्यासंदर्भात माथाडी कायदा बचाव कृती समितीने दिलेल्या सूचनांनुसार उपाययोजना होणे, शासनाच्या कामगार, पणन विभागाकडून माथाडी, वारणार, मापाडी कामगारांवर अन्याय करणारे शासन जीआर काढले आहेत ते तातडीने मागे घ्यावे, असे जीआर काढण्यापुर्वी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांना विश्वासात घेतले जात नाही तसेच हिवाळी अधिवेशाना दरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी होत नाही याकरीतां आणि राज्य सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याच्या निषेधार्थ हा आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाबळेश्वर येथे विभागीय नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

0

सातारा दि. २४ : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत.  यामध्ये 52 नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत . ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रंगभूमी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नगरी या ठिकाणी संपन्न होत आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार मकरंद पाटील , संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल, माजी संमेलन अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अशा नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. यातूनच स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध होतो. महाबळेश्वर येथे होत असलेल्या विभागीय नाट्यसंमेलनाप्रमाणेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नाट्य संमेलने होत आहेत. यातून गौरवशाली नाट्य संस्कृतीचा विस्तार दिग्गज कलाकार करत आहेत. नाट्यकलेमध्ये कार्य करणारे कलाकार हे सेवाभाव घेऊन नाट्य संस्कृती जोपासत असतात. कलेला जेंव्हा रसिक दाद देतात तेव्हांच कलाकार कला समृद्ध करू शकतो. यावेळी त्यांनी जेष्ठ कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र शासनाने गौरव केल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून ते सध्या बंद स्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई येथील फिल्म सिटी बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ही फिल्म सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार आहे. मराठी भाषा व नाट्य चळवळ यांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले, कला आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे. विविध कलांसाठी सर्वांगीण आणि एकात्मिक, परिपूर्ण असे व्यासपीठ असले पाहिजे. त्यासाठी विचारवंत, कलावंत, आणि रसिक यांची समिती स्थापन करून कलेच्या उत्थापनासाठी कार्य व्हावे.

यावेळी प्रशांत दामले यांनी महाबळेश्वर येथे सध्या बंद स्थितीत असलेले नाट्यगृह सोयी सुविधा उपलब्ध  करून पुन्हा सुरू करण्यात यावे, असे सांगितले. तसेच उत्तम नाट्यगृहांची संकल्पना साकारण्यासाठी आचारसंहितेपूर्वी समिती नेमण्यात यावी, असेही आवाहन केले.

यावेळी नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतीश लोटके यांच्यासह विविध दिग्गज मान्यवर, कलाकार, नाट्य परिषदेचे पदाधिकारी,  रसिक आदी उपस्थित होते.

एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ संबोधावे’

वंचित विकास’कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन; शासन आदेश काढण्याची मागणी
पुणे : समाजातील एकल महिलांना विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, बिन लग्नाची, वांझ, एकटी बाई, नवऱ्याने सोडलेली, नवरा सोडलेली असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. तसेच या एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ या शब्दाने संबोधावे, असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले. या संदर्भात सरकारने शासन आदेश काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वंचित विकास संस्थेला दिले.

संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील नवीन विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, सदस्य मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, डॉ. श्रीकांत गबाले, तेजस्विनी थिटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावलेही उपस्थित होते.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “वंचित विकास संस्था गेली ३७ वर्षे समाजातील विविध वंचित घटकांच्या प्रगतीसाठी काम करत आहे. महिलांसाठी काम करत असताना असे जाणवले की, ‘महिलांना उद्देशून आपण अनेक अपमानास्पद शब्द वापरतो; मात्र, त्या शब्दांचा त्या महिलांच्या मनावर आघात होत असतो.’ ही बाब लक्षात आल्यावर आम्ही सन्मान देणारा योग्य शब्द वापरण्याबाबत विचार केला. तेव्हा ‘अभया’ हा शब्द सर्वानुमते पुढे आला. “अभया म्हणजे परिस्थितीला न घाबरता सक्षमपणे तोंड देणारी महिला होय.”

या महिलांचा सन्मान करणाऱ्या विचाराला राज्यभरातून मान्यता देणाऱ्या हजारो स्वाक्षऱ्या, लेखी पत्रे आली आहेत. हे अभियान मागील दहा वर्षापासून सातत्याने सुरु असून, समाजातील विविध मान्यवरांना भेटून याची जनजागृती करत आहोत. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सदर निवेदन पाठवले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. आजवर एकल महिलांना सन्मानाने संबोधण्यासाठी कोणीही विचार केलेला नव्हता. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीचे हे सरकार असून, धडाडीने निर्णय घेणाऱ्या पुरोगामी विचारांचे मा. मुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची विनंती आहे”, असे मीना कुर्लेकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्र अनेक उपक्रमांचे प्रेरणास्रोत असल्याचा इतिहास आहे. एकल महिलांना सन्मान देण्यासाठी ‘अभया’ची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे.’अभया’ संबोधण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला, तर हे एक क्रांतिकारी पाऊल असेल. तसेच भविष्यात मा. राष्ट्रपती मुर्मू यांनी देशपातळीवर ‘अभया’ संबोधन लागू केल्यास, त्याची सुरुवात महाराष्ट्राने केल्याची नोंद होईल. असे झाल्यास ‘अभया’ उपक्रमासाठी देशात महाराष्ट्र राज्य आदर्श व अग्रेसर ठरेल, असा विश्वासही मीना कुर्लेकर यांनी व्यक्त केला.