रायगड-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या आपल्या नव्या निवडणूक चिन्हाचे अनावर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वच महत्त्वाचे नेते होते. या कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः पालखीतून रायगडावर पोहोचले होते.
यावेळी पवार म्हणाले, ”ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल”.
“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असे शरद पवार म्हणाले.
“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असेही आवाहन शरद पवारांनी केले.