Home Blog Page 1191

मराविमं अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत

सरचिटणीस- संजय खाडे तर सचिवपदी विजय गुलदगड

पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२४: राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमधील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत (पुणे), सरचिटणीसपदी संजय खाडे (लातूर) आणि संघटन सचिवपदी विजय गुलदगड (पुणे) यांची निवड झाली.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या संघटनेच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात उपस्थित सदस्यांकडून राज्य कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्ष- संजय चव्हाण, दीपक ढोले, उपसरचिटणीस- प्रणेश शिरसाठ, नंदकिशोर साटकर, कोषाध्यक्ष- प्रवीण गायकवाड, सहसचिव- उमेश काळे, सुनिल पावडे व अजय गुळवे तर महिला प्रतिनिधी म्हणून मंजूषा दुसाने व अर्चना घोंडबरे यांचा समावेश आहे.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व एमएसईबी सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांची ही संघटना प्रतिनिधीत्व करते. सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्थापनाकडे जोमाने पाठपुरावा करण्यात येईल तसेच कंपनीच्या हितासाठी संघटना सदैव कार्यरत राहील अशी माहिती सरचिटणीस संजय खाडे यांनी दिली.

मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुण्यापासून मुंबईपर्यंत 200 हून अधिक सायकलस्वारांसह राइड टू एमपॉवरची सुरुवात

0

मुंबई -मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी एमपॉवर या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या मानसिक आरोग्य सेवा उपक्रमाने आयोजित केलेल्या राइड टू एमपॉवर या सायक्लोथॉनमध्ये 200 हून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला. पुणे ते मुंबई या प्रवासाला एमपॉवरच्या उपाध्यक्ष-ऑपरेशन्स परवीन शेख आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि लांब पल्ल्याच्या सायकलपटू आशिष कासोदेकर आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री आशिष संघवी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

सायक्लोथॉनही एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्षा  श्रीमती नीरजा बिर्ला यांची संकल्पना आहे आणि मानसिक आरोग्यावरील संभाषणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संबंधित कलंक दूर करण्यासाठी समुदायाला एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले होती. राइड टू एमपॉवरच्या 5 व्या आवृत्तीवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले, त्या म्हणाल्या, “प्रत्येक पेडल स्ट्रोक हा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याच्या दिशेने आमच्या सामूहिक प्रवासात एक पाऊल पुढे जाण्याचे प्रतीक आहे. ऐक्य आणि कृतीद्वारे, आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले जाते आणि सर्वांनी स्वीकारले जाते. ”

नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पुणे, दि. २०: नीरा डावा कालव्याचे पहिले उन्हाळी आवर्तन १६ मार्चपासून तर नीरा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन ८ मार्चपासून सोडण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले.

या बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, शहाजी पाटील, राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

उपसा सिंचन योजनांच्या वीजबिलात सवलतीसाठी आगामी वर्षातील ४ महिन्यांसाठी लेखानुदानात तरतूद करणार

उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलात शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने चालू आर्थिक वर्षात मार्च २०२४ पर्यंत ६७५ कोटी रुपये अनुदान ऊर्जा विभागाला उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हा बोजा शासनाने उचलला असल्याने शेतकऱ्यांना वीजबिलाची झळ बसली नाही. पुढील आर्थिक वर्षातील एप्रिल २०२४ पासून पहिल्या चार महिन्यांसाठी लेखानुदानात यासाठीची आणखी तरतूद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

नीरा डावा कालव्याचे पहिले आवर्तन ५६ दिवसांचे
नीरा उजवा कालवा उन्हाळी हंगाम सिंचन व बिगरसिंचनासाठी ६.६३७ टी.एम.सी. उपलब्ध असून उन्हाळी दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. योग्य नियोजनाने रब्बी हंगामातील पाणी वाचल्यामुळे तेच आवर्तन १५ मार्चपर्यंत चालणार असून उन्हाळी पहिले आवर्तन १६ मार्चपासून सोडण्याचे नियोजन आहे. त्यानंतरचे आवर्तन ११ मेपासून सोडण्याचे नियोजन असून लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या त्यावेळच्या मागणी आणि परिस्थितीनुसार यामध्ये आवश्यक तो बदल करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

आमदार श्री. भरणे यांच्यासह निमंत्रित सदस्यांनी सूचना केल्या. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी साखर कारखान्यांनी सहकार्य करण्याची विनंती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

नीरा उजवा कालव्याचे ७० दिवसांचे आवर्तन
नीरा उजवा कालवा उन्हाळी हंगाम सिंचन व बिगरसिंचनासाठी ९.७९५ टी.एम.सी. पाणीवापराचे नियोजन असून वीर व फलटणसाठी ८ मार्चपासून ७० दिवसांचे आवर्तन तर माळशिरस व माचणूरसाठी १० मार्चपासून ७१ दिवसांचे आवर्तन देण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शाखा क्र. २, पंढरपूर आदींचेही योग्य नियोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कालव्याच्या शेवटच्या भागात (टेल) कालव्याद्वारे सोडलेले पाणी वाया जाऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असेही श्री. पवार म्हणाले. एकवेळ पाणी सोडलेले असताना शेतकऱ्यांकडे चारवेळची पाणीपट्टीची मागणी करण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधी म्हणाले. त्यावर योग्य ती माहिती तपासून नियमाप्रमाणे पाणीपट्टी भरुन घेऊन पुढील पाणी मागणीचे अर्ज घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. तसेच मनुष्यबळ अपुरे असल्याने सुरळीत सिंचन व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक कामासाठी घेण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी लोकप्रतिनिधींनी डी-३ पोटचारी, उंबरगाव, भोवाळी चारी आदीतून पाणी सोडावे आदी मागण्या केल्या.

बैठकीत अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, शिवाजी जाधव, महेश कानेकर यांनी सादरीकरण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. २४: कुकडी डावा कालव्याचे तसेच घोड डावा आणि घोड उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राम शिंदे, रोहित पवार, वल्लभ बेनके, संजय शिंदे, बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, 15 जुलै २०२४ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच टँकरसाठी पाणी स्रोत आदींचे नियोजन करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरुन पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे निर्देशही त्यांनी दिले.

कालव्यांची गळती असल्यास ती काढण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १५.८६५ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे १ मार्चपासून पाणी सोडण्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा, तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तन क्रमांक.२ घ्यावे किंवा कसे याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

घोड प्रकल्पाचे पहिले आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शिल्लक राहणारे पाणी पाहता दुसरे आवर्तनही शक्य असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

पिण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवा ,महापालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजना कराव्यात-अजित पवारांचे आदेश

पुणे, दि. २४: खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे पाणी गळतीच्या उपाययोजना राबवून पाणीबचत करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खडकवासला प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, रवींद्र धंगेकर,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

सर्व धरणे व इतर पाणीसाठ्यातून पिण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवण्यात यावे असे ठरले असून त्याप्रमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बैठकीत पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणीपट्टी आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेने पाणी बचत करावे, त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने खालील भागातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार श्री. भरणे, श्री. कुल यांच्यासह निमंत्रित सदस्यांनी केली.

खडकवासला प्रकल्पात १६.१७ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून सिंचन व बिगर सिंचनासाठी १४.९८ टी.एम.सी. उपलब्ध होत आहे. त्यातून सिंचनासाठी ६.९८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध होत आहे. ४ मार्चपासून पहिले उन्हाळी सिंचनासाठीचे आवर्तन ४५ दिवसांचे सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे.

फुरसुंगीपर्यंत बोगदा करुन कालव्याचे पाणी पुढे नेल्यास मोठी पाणीबचत होणार असून सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने संयुक्तरित्या याबाबत चर्चा करुन तसेच या प्रकल्पासाठी आर्थिक तरतुदीच्या अनुषंगानेही प्रस्ताव तयार करावा, असेही श्री.पवार म्हणाले.

बैठकीत टेमघर धरणातून होत असलेल्या पाणीगळतीच्या अनुषंगाने ग्राउटींग आणि इतर उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे मनपाने उपलब्ध करुन दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली.

पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा
पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टी.एम.सी., औद्योगिक व इतर खासगी संस्थांना ०.४६ टी.एम.सी. असा बिगर सिंचनासाठी देण्यात येणार आहे. सिंचनासाठी उन्हाळी हंगामात ०.२५ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येणार आहे.

चासकमान प्रकल्पातही चासकमान व कळमोडी धरण मिळून एकूण ५.२५ टी.एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यापैकी वहनक्षय, बाष्पीभवन व्यय वगळता उन्हाळी हंगामासाठी ३.६३ टी.एम.सी. पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध आहे. पिण्यासाठी ०.१३ टी.एम.सी. आणि सिंचनासाठी ३.५ टी.एम.सी. पाणी देण्यात येणार आहे. त्यातून सिंचनासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन असून पहिले उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत तर पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे द्यावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १ टी.एम.सी., सिंचन व बिगर सिंचनासाठी २.०२ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून जलाशयातून उपसा ०.०७ टी.एम.सी. आणि धरणाच्या खालील नदी व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांसाठी १.९५ टी.एम.सी. पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भामा व भिमा नदीत पहिले आवर्तन १ मार्च ते १६ मार्च व पुढील आवर्तन २० एप्रिलपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

यावेळी अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, श्रीकृष्ण गुंजाळ, शिवाजी जाधव, दिगंबर डुबल व महेश कानेटकर यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पातील पाणीसाठा तसेच नियोजनाची माहिती दिली.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन

0

छत्रपती संभाजी नगर दि.२४: विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात जाऊन विधिवत पूजा, आरती केली व दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.

घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्री घृष्णेश्वराचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर हवामानाच्या बदलामुळे दुष्काळ, अवकाळी यापासून होणाऱ्या परिणामापासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली.

महाराष्ट्रातील तुरुंग भरून वाहे तुडुंब…

अपुऱ्या तुरुंगात आरोप सिद्ध न झालेले कैदी ३२ हजार २१५ तर आरोप सिद्ध झालेले कैदी अवघे ७८५०

महाराष्ट्रातील तुरुंगातील गर्दीमुळे कैद्यांच्या मानवी हक्कांचे सर्रास उल्लंघन ?

सरकारकडून सुविधांसाठी ५८ कोटीची तरतूद

पुणे-महाराष्ट्रातील ६० तुरुंगात २६हजार ३७७ कैद्यांची क्षमता असताना प्रत्यक्ष ४० हजार ४८५ कैद्यांना ठेवण्यात आले असून यात अपराध सिद्ध झालेल्या कैद्यांची संख्या अवघे ७८५० एवढी आहे तर ३२ हजार २१५ आरोपी आहेत ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नसताना न्यायाच्या प्रतीक्षेत ते न्यायाधीन बंदी म्हणून तुरुंगात खितपत पडलेले आहेत. या शिवाय स्थानबद्ध केलेले ४२० कैदी याच तुरुंगात आहेत. कैद्यांच्या तुलनेत कारागृहे अपुरी पडल्याने तुरुंगात आरोप सिद्ध झालेल्या कैद्यांबरोबर आरोप सिद्ध झालेले नाहीत असे कैदी देखील या अपुऱ्या पडलेल्या कारागृहात गर्दीशिक्षा भोगत आहेत.अपुरी कारागृहे आणि कैद्यांची क्षमतेहून अधिक संख्या या कारणाने होणारी हेळसांड मग ती कैद्यांची असो वा जेल कर्मचाऱ्यांची असो त्यांना सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ५८ कोटी रुपयांची कामे विविध कारागृहात करण्यास मंजुरी दिली आहे.

कल्याण जिल्हा कारागृहाची क्षमता ५४० कैदी एवढीच असताना तिथे प्रत्यक्ष २१९१ कैदी आहेत,येरवडा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता २७५२ एवढीच असताना तिथे ६५२५ कैदी आहेत.ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ११११ एवढी असताना तिथे ४१८४ कैदी आहेत.मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ९९९ असताना तिथे ३७२२ कैदी आहेत.बुलढाणा जिल्हा कारागृह वर्ग २ ची क्षमता १०१ असताना तिथे ३५४ कैदी आहेत.सोलापूर जिल्हा कारागृह वर्ग २ ची क्षमता १४१ असताना तिथे ४६२ कैदी आहेत.नांदेड जिल्हा कारागृह वर्ग२ ची क्षमता २०४ असताना तिथे ६०१ कैदी आहेत.जळगाव जिल्हा कारागृह वर्ग २ ची क्षमता २० एवढी असताना तिथे ५०० कैदी आहेत.

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सर्कल नं. १ च्या जवळ २०० बंद्यांसाठी ०८ बॅरेक,तसेच स्वच्छता गृहे,स्नान गृहे,स्वयपाकासाठी ओटे बांधण्यासाठी १३ कोटी ४८लाख ७५ हजार ७४१ रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. तर याच येरवडा कारागृहात अंतर्गत रस्ते करण्यासाठी १ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या शिवाय अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे सुमारे साडे चौदा कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.अमरावतीत मात्र जेल अधिकारी, कर्मचारी,आस्थापना कार्यालयाच्या बांधकामावर खर्च करण्यत येणार आहे. नागपूर ला संरक्षक भिंतीणसाठी सुमारे अडीच कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.ठाण्यात तृतीय पंथी कैद्यांच्या स्वतंत्र सेल करता २ कोटी ६८ लाख खर्च करण्यात येणार आहे.गडचिरोली ला साडेसात कोटी तर रत्नागिरीला सवा आठ कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.मात्र येथेही कंपाउंड वॉल इमारतीचे मजबुतीकरण यांचा ९९ टक्के समावेश आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे उद्घाटन

0

सोलापूर:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासंस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी स्थानिक जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिलेला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे. तर सोलापूर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवास व स्थानिक कलाकारांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण,  संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून सिटी एक्जीबिशन हॉल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सव 2024 च्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की संपूर्ण राज्यात महासंस्कृतिक महोत्सवास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच स्थानिक व ग्रामीण भागातील कलाकारांना यानिमित्ताने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. सोलापूर हे मोठे शहर आहे त्यामुळे येथे स्थानिक कलाकार उपलब्ध होतील, परंतु गडचिरोली, वासिम, चंद्रपूर व हिंगोली यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये स्थानिक कलाकारांची संख्या कमी असू शकते, त्या ठिकाणी  इतर जिल्ह्यातील कलाकार जाऊन आपली कला सादर करू शकतात. या महोत्सवातून राज्य शासन हे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देत आहे असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करून महासंस्कृती महोत्सव 2024 चा शुभारंभ केला. या महोत्सव अंतर्गत दिनांक 21 फेब्रुवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. आज सोलापूर येथील 150 स्थानिक कलाकारांचा जय जय महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी राज्यातील विविध भागातील संस्कृतीची झलक आपल्या नृत्य व गायनातून दाखवली. श्री गणेशाच्या आराधनेतून सुरू झालेल्या कार्यक्रमात पिंगळा महागाई आली, वासुदेवाची स्वारी दारी आली, पावसाची गाणी, गोम संगतीन, जय जवान जय किसान, कोळी नृत्य, वाघ्या मुरळी नृत्य असे एकापेक्षा एक सरस नृत्य व गाणी कलाकारांनी सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शनिवार व रविवार चे कार्यक्रम –

शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत वंदे मातरम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुढी  महाराष्ट्राची हा सांस्कृतिक कार्यक्रम सिटी एक्जीबिशन हॉल विष्णू मिल कंपाऊंड सोलापूर येथे होणार आहे.

त्याप्रमाणेच या ठिकाणी चित्र शिल्प दालन, महिला बचत गटांचे स्टॉल, वस्त्र दालन, शस्त्र प्रदर्शन स्टॉल लावण्यात आलेले आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी भाजप चे महा-षडयंत्र: आम आदमी पार्टी

पुणे-आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा यशस्वीपणे पूर्ण केल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखत आहे. आप आणि काँग्रेस यांच्यातील इंडिया आघाडीची चर्चा अतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे. बहुतेक राज्यांमध्ये जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जागावाटपाची ही बातमी समोर येताच भाजपमध्ये भूकंप झाला आहे. आता भाजपने युती तोडण्यासाठी महा-षडयंत्र आखले आहे असा आरोप आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेवून केला.या वेळेस आप प्रवक्ता मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव , अक्षय शिंदे , अमोल मोरे , निरंजन अडागळे, किरण कद्रे , अमोल काळे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
आप च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि,’ कालपासून ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना अनेक लोकांकडून संदेश मिळत आहेत की, ‘आप’ने इंडिया फ्रंट / आघाडी सोडली नाही, तर मोदीजी सीबीआयच्या माध्यमातून ‘अरविंद केजरीवाल’ यांना अटक करतील. आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीजींनी तथाकथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला कामाला लावले आहे. गेल्या दोन वर्षात १००० हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत, इडी ने ७ समन्स पाठवले आहेत, सीबीआय ने अनेक नोटिसा पाठवल्या आहेत, केजरीवाल यांची सीबीआय कडून ९ तास चौकशी करण्यात आली आहे, पण सीबीआय आणि ईडी दोघांनाही एक पैसा किंवा इतर ठोस पुरावा असे काही सापडले नाही.
पण आता इंडिया फ्रंट /आघाडीची चर्चा पूर्ण होत असताना, मोदीजींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे अनेक मार्गाने आम्हाला सांगण्यात येत आहे ते असे आहे की लवकरच एक दोन दिवसांत सीबीआय सीआरपीसी च्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी एकदोन दिवसांत केजरीवाल यांना अटक करतील. आम्हाला हे देखील सांगण्यात आले आहे की जर आप ने इंडिया फ्रंट /आघाडीची सोडली तर सीबीआय नोटीस पाठवणार नाही किंवा अरविन्द केजरीवाल यांना अटक करणार नाही.असा आरोप आप प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला. पण ‘आप’ हा मोदीजी किंवा त्यांच्या कोणत्याही यंत्रणाना घाबरणारा पक्ष नाही – मग ती सीबीआय असो किंवा ईडी. ‘आप’ देशातील जनतेसाठी लढत राहील त्यासाठी कोणत्याही प्रकारची किमत मोजण्याची आप च्या नेत्यांची तयारी आहे. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग राहील असे पक्षाने म्हंटले आहे.

पुणे ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब बनविले कोणी? पालकमंत्री अजितदादा पुण्यात गाडी अडवून जाब विचारणार -शिवसेना

तरुणांच्या हातात ड्रग्ज:गुंडांना मंत्रालयाचा आशीर्वाद:नितेश राणेच्या बेताल बडबडीला सागर बंगल्यातील बाॅसचा आशीर्वाद …. हेच आहे का महाराष्ट्राचं भविष्य ? – संजय मोरे

पुणे-पुणे ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब बनविले कोणी?असा सवाल करत पालकमंत्री अजितदादा पुण्यात गाडी अडवून याबाबत जाब विचारणार असल्याचे काल येथे शिवेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि पदाधिकारी यांनी सांगितले.

ड्रग्ज प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शहरप्रमुख शिवसेना पुणे संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते .याप्रकरणी संजय मोरे आणि अनंत घरत यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांस पत्र लिहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक अधिकारी यांचे तत्पर निलंबन करावे अशी मागणी केली आहे. .
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि,’ पुणे हे खरंतर शिक्षणाचे माहेरघर पण आता ते एमडी ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून पुण्यात ड्रग्जची निर्मिती होत आहे का ? असे वाटू लागले आहे. त्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या विळख्यात अडकू लागले आहेत. ललित पाटील प्रकरण अजूनही ताजे असताना पुणे शहरात 1850 किलो एमडी ड्रग्स आणि पुण्यामधून देशाची राजधानी दिल्ली येथे पाठवलेले 970 किलो ड्रग्ज सापडले आहे. आणखीन किती राज्यांमध्ये पुण्यात तयार झालेले ड्रग्स पाठवले आहे हे लवकरच कळेल. आता पकडलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास 4 हजार कोटीपेक्षा जास्त आहे. ही भारतातील सर्वात मोठी कारवाई आहे हीच का मोदी साहेबांची गॅरंटी ? खरंतर पुणे पोलीस आयुक्तांचं आणि पोलीस बांधवांचं या कामगिरीबाबत अभिनंदन !!.. परंतु यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक वाटते. या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्री म्हणून अजित दादांचा वचक राहिलेला नाही असं प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याला पर्यावरण मंत्री आहे की नाही हे शोधावं लागेल. कारखान्यांमध्ये काय उत्पादन होत आहे आणि या कारखान्यां मधील रासायनिक सांडपाणी नदीमध्ये आणि धरणांमध्ये सोडले जाते, त्यामुळे नदी प्रदूषण रोजच वाढत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाव बदलून महाराष्ट्र ड्रग वितरण मंडळ करावे असे म्हणावे लागेल. पालकमंत्री अजितदादा पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटून नाहीतर गाडी अडवून याबाबत शिवसेनेच्या वतीने आम्ही नक्कीच विचारणा करणार आहोत.

ड्रग्ज विक्रीसाठी पुणे शहरातील सर्वात मोठे आणि सहजतेने उपलब्ध असलेले ठिकाण म्हणजे पुण्यातील वाढलेले पब व हुक्का पार्लर. तसेच इतर राज्यातील विद्यार्थी आणि आयटी नोकरदार हे ड्रग्ज रॅकेट वाल्यांचे मुख्य गिऱ्हाईक आहेत. पब मध्ये व हुक्का पार्लरमध्ये ड्रग्जचे वितरण सहजतेने होत असल्यामुळे पब मालकांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत.

राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्यातले रोजगार पर राज्यात गेले आणि तरुणांच्या हातात अमली पदार्थ सहजपणे येऊ लागले. तरुणांसाठी हाच रोजगार आता उपलब्ध आहे का ? तसेच पुणे शहरांमध्ये रोज 50 कोटींचा गुटखा विकला जातो यावर दोन वेळा आवाज उठवून झाला, परंतु यावर ना सरकारचा अंकुश, ना पालकमंत्र्यांचा, ना पोलिसांचा त्यामुळे पुणे हे नशेडी शहर म्हणून ओळखले जाईल का याची भीती वाटू लागली आहे. अमली पदार्थ विकून झटपट बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे.

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ ही बिरुदावली मिरवणा-या पुणे विद्यापीठाचे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’-अमित ठाकरेंनी कुलगुरूंकडे केल्यात या मागण्या

पुणे- काल येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठात मोर्चाने जाऊन कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांच्याकडे अमित राज ठाकरे अनेक मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत .त्या करतांना त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि,’

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे नाव आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ ही बिरुदावली मिरवणा-या पुणे विद्यापीठाची गेल्या काही वर्षांत ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशी गत झाली आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यापीठ कॅम्पस आणि विद्यापीठाशी संलग्न पुणे, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना असंख्य शैक्षणिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि साहजिकच त्यामुळे त्यांच्यात असंतोषाची भावना खदखदत आहे. या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी आणि विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढला आहे. मोर्चाला उपस्थित असलेल्या हजारो तरुण- विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही पुढील मागण्या करत आहोत.

१. मराठी भाषा व संस्कृतीच्या अभ्यास आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली असतानाही गेली अनेक वर्षे मराठी भाषा भवनाच्या निर्मितीचे काम रखडलेले आहे. विद्यापीठाने आता अधिक वेळ न दवडता हे काम त्वरित पूर्ण करावे आणि विद्यार्थी तसंच मराठीप्रेमी नागरिकांसाठी ते खुले करावे.

२. विद्यापीठ कॅम्पसमधील काही गटांमध्ये वाद व हाणामारी, विद्यार्थिनींची छेडछाड आणि ड्रग्जचे सेवन अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे अशांतता निर्माण होत आहे. विद्यापीठाची शिस्त मोडून येथील शांतता भंग करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवावी.

३. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची- रोजगाराची कोणतीही शाश्वती नाही. विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरु करुन त्याला आॅनलाइन प्लेसमेंट पोर्टलची जोड द्यावी. विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे भरवण्यासाठी पुढाकार घ्यावा.

४. राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी दरवर्षी पुणे विद्यापीठात पदवी- पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात. मात्र पुरेशी वसतिगृहे नसल्यामुळे ग्रामीण भागांतून आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची हेळसांड होते. वसतिगृह न मिळाल्यामुळे प्रवेश अर्जांत घट होत असल्याचेही दिसून आले आहे. भविष्यात १०,००० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट्य विद्यापीठाने बाळगावे आणि त्या दिशेने त्वरित पावले उचलावीत.

५. विद्यापीठाची जी वसतिगृहे सध्या अस्तित्वात आहेत, त्यांपैकी अनेक वसतिगृहांची दुर्दशा झालेली आहे. मेसमधील जेवणाचा निकृष्ट दर्जा तर विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. नवीन वसतिगृहांची निर्मिती करण्यापूर्वी विद्यमान वसतिगृहांचा सर्वांगीण दर्जा सुधारण्याला विद्यापीठ प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवे.

६. शिक्षणासाठी परदेशात किंवा परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी मागवण्याची प्रक्रिया बंद करावी.

७. नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून, तेथे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासल्यास त्यासाठी पुण्यात न येता त्याला ती उपकेंद्रातच उपलब्ध व्हावीत. रॅंक सर्टिफिकेट, मीडियम सर्टिफिकेट, अटेस्टेशन सर्टिफिकेट, एक्स्टर्नल ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट, एक्स्टर्नल डुप्लिकेट कार्ड आदी कागदपत्रांसाठी संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरजच भासू नये.

८. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. आॅक्टोबर २०२३ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा शासन निर्णय झाला आहे. या शासन आदेशाची अंमलबजावणी करुन किंवा आवश्यकता भासल्यास सीएसआरच्या माध्यमातून विद्यापीठाने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत.

९. आजही विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांत विशाखा समिती अस्तित्वातच नाही आणि ज्या महाविद्यालयांत विशाखा समिती आहे त्या समितीवर तेथील महिला शिक्षिकाच घेतलेल्या असून विद्यार्थिनींना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. यापुढे विशाखा समितीमध्ये त्या त्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्थान द्यावे आणि त्यांच्या मागण्या व प्रश्न महाविद्यालयांनी प्राधान्याने सोडवावेत. प्रत्येक महाविद्यालयातील महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्याबाबत विद्यापीठाने आग्रही पाठपुरावा करावा.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वर नमूद केलेल्या मागण्यांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्याल, हीच एकमेव अपेक्षा. अन्यथा, भविष्यात आक्रमक आंदोलन करण्यावाचून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी-12 कंपन्यांना गडकरींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे-

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक कंपन्यांना आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲक्ट ऑफ कम्पॅशन’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टाईम्स ग्रुप आणि रूबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने 9 विविध प्रवर्गांमधून एकूण 12 कंपन्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात टाईम्स ग्रुप्सच्या संचालिका सुधा नटराजन, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट तसेच शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सीएसआरच्या माध्यमातून वंचित आणि शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न सरकारमार्फत सुरू आहे. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी सीएसआरसंदर्भात कायदा केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. सीएसआरच्या मदतीने गडचिरोलीसारख्या आदिवासी परिसरात सुमारे 1800 शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्यात येत आहेत, अशी माहिती श्री. गडकरी यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, वंचित-शोषित आणि गरिब सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून कंपन्यांनी सीएसआर उपक्रमांची आखणी करावी. त्याचा लाभ प्रत्येकाला होण्यासाठी त्या योग्य पद्धतीने राबवण्यात येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लातूरसारख्या पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सीएसआरला तंत्रज्ञानाची जोड देऊन उपक्रम राबवण्यात यायला हवेत.

तसेच, सीएसआर उपक्रम हे केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहू नयेत. तर जिथे याची खऱ्या अर्थाने गरज असलेल्या ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचणे गरजेचे आहे. गरिब-गरजूंना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सीएसआर उपयुक्त आहे. सीएसआरमुळे अनेक वंचितांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्या यशकथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्या माध्यमातून इतरांनाही अशा प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. गडकरी म्हणाले.

ॲक्ट ऑफ कम्पॅशन पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष असून त्यासाठी पुण्यातील सुमारे 120 कंपन्यांनी नामांकन अर्ज केले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय ज्युरींच्या समितीने एकूण 9 प्रवर्गांमध्ये एकूण 12 कंपन्यांना हे पुरस्कार प्रदान केले. त्यांची नावे खालीलप्रमाणे –

1) एक्सिलन्स इन कम्युनिटी रेझिलियन्स अँड डिझास्टर रिस्पॉन्स – अ) फोर्ब्स मार्शल ब) तारा कन्स्ट्रक्शन्स
2) एक्सिलन्स इन कल्चरल प्रिझर्व्हेशन अँड हेरिटेज – पी. एन. गाडगीळ अँड सन्स प्रा. लि.
3) एक्सिलन्स इन डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल
4) एक्सिलन्स इन एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट – अ) थर्मेक्स फाऊंडेशन ब) हारविंजर सिस्टिम्स प्रा. लि.
5) एक्सलिन्स इन एम्पॉवरमेंट थ्रू एकोनॉमिक डेव्हलपमेंट – दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड
6) एक्लिलन्स इन एनव्हायरनमेंट सस्टेनिबिलिटी – अ) प्राज इंडस्ट्रीज ब) रेलफोर लॅब प्रा. लि.
7) एक्लिलन्स इन हेल्थ फॅसिलिटीज फॉर द अंडरप्रिव्हिलेज्ड – पर्सिस्टंट सिस्टिम्स
8) एक्सिलन्स इन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट – रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.
9) एक्सिलन्स इन वूमन एम्पॉवरमेंट – प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड

मुंबई, ठाणे, वापी, सूरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद हे एकच आर्थिक क्षेत्र बनेल :2026 पर्यंत सूरत आणि बिलीमोरा दरम्यान हाय स्पीड रेल्वे सुरु करू : अश्विनी वैष्णव

0

मुंबई-

केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला संकुल  येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळांना भेट दिली आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी  एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक  विवेक कुमार गुप्ता त्यांच्यासोबत होते.

“हा देशातील पहिला अतिवेगवान  (हायस्पीड) मार्गिका  प्रकल्प आहे, असे  अश्विनी वैष्णव यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. अशा प्रकल्पाची रचना ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते यासाठी  अनेक अडचणींवर मात करावी लागते.मात्र  तंत्रज्ञान, डिझाइन क्षमता आणि बांधकाम पद्धती समजून घेणे आणि त्यातून बोध घेणे  हे प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात असून 1969 पासून अस्तित्वात असलेली शिंकानसेन प्रणाली जगभरात सुरक्षिततेसाठी ओळखली जाते.भारतात या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे प्रणालीबद्दलच्या माहितीचा  आधार तयार होत आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. आपला देश 140 कोटी लोकसंख्या असलेला  मोठा देश आहे. 1 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेली अनेक शहरे मेगासिटी म्हणजेच  प्रमुख शहरे होणार आहेत. अशा शहरांना कमी खर्चात, कमी वेळेत उपाययोजना  उपलब्ध करून द्यायच्या  असतील , तर अतिवेगवान (हायस्पीड) मार्गिका तयार करण्यात नैपुण्य  मिळवावे लागेल. “, हे वैष्णव यांनी अधोरेखित केले.

“आवश्यक परवानग्या आणि मंजुरी मिळाल्यानंतर, प्रकल्पाचे प्रत्यक्ष  बांधकाम सुरू झाले आहे आणि बांधकाम वेगाने सुरु आहे , असे अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाच्या तपशीलाची माहिती देताना सांगितले. या  प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी काही नवोन्मेष साकारण्यात आले आहेत.एकाच वेळी एकाच ठिकाणी काम करण्याऐवजी  चार ठिकाणांहून समांतर काम सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सूरत आणि बिलीमोरा दरम्यानच्या हाय स्पीड रेल्वे मार्गिकेचा  पहिला विभाग जुलै/ऑगस्ट 2026 मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर एकामागून एक इतर विभाग कार्यान्वित होतील. “, असे त्यांनी सांगितले.

समुद्राखालील बोगदा, भारतातील अशा प्रकारचा  पहिलाच बोगदा जो  21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग आहे तो  मुंबई एचएसआर  येथून सुरू होईल आणि कल्याण शिळफाटा येथे संपेल, असे   वैष्णव यांनी सांगितले. यातील 7 किलोमीटरचा भाग  ठाणे खाडीत समुद्राखाली असेल. सर्वात खोल बिंदू अंदाजे 65 मीटर खोल आहे. हा बोगदा 40 फूट रुंद असेल.बोगद्यात दोन मार्गिका  असतील. एक अप मार्गिका  आणि एक डाउन मार्गिका असेल  ज्यावर अतिवेगवान रेल्वेगाडी (हायस्पीड ट्रेन ) धावेल.  बोगद्याच्या आतही रेल्वे  ताशी 320 किमी वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अशा प्रकल्पाच्या फायद्यांविषयी बोलताना वैष्णव म्हणाले की,  “हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे केवळ वाहतूक प्रकल्प म्हणून पाहिले जाऊ नये.

टोक्यो आणि ओसाका दरम्यान हायस्पीड रेल्वे  कार्यान्वित केल्यावर – टोक्यो , नागोया, कोबे, क्योटो आणि ओसाका या पाच शहरांची अर्थव्यवस्था वेगाने वाढली. हायस्पीड रेल्वे शहरांना ,1+1 म्हणजे 2 नाही तर 11 अशा स्वरूपात जोडते. या मार्गिकेमुळे निर्माण होणाऱ्या  कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई, ठाणे, वापी, सूरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद हे एकच आर्थिक क्षेत्र तयार  होईल , असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.  यामुळे या क्षेत्राला मोठी आर्थिक चालना मिळेल. या प्रकल्पात एक सर्व थांब्यांसह आणि एक मर्यादित थांब्यांसह.अशा दोन प्रकारच्या गाड्या असतील.मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ मर्यादित थांब्यांसह दोन तासांचा असेल आणि जेव्हा रेल्वे गाडी सर्व थांब्यांवर थांबेल तेव्हा अंदाजे 2.5 तास लागतील. त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार  आहे. याशिवाय या मार्गिकेच्या सर्व बिंदूंवर आपोआपच  प्रचंड औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकास अपेक्षित आहे.यामुळे पुढील 30-40 वर्षे या प्रदेशात निरंतर  विकास होईल. हा  पंतप्रधानांची दूरदृष्टी असलेला   प्रकल्प आहे यामुळे  देशाला दीर्घकालीन फायदा होईल.”

वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये दिसला #TheTigerEffect 

 बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो इंडस्ट्रीतील सर्वात सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक का आहे ! नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर ने त्याच्या दमदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. 

टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो यात शंका नाही २०२४ मधल्या या खास इव्हेंट मध्ये त्याने धमाकेदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि टायगर चा खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी #TheTigerEffect अनुभवला आहे. 

प्रेक्षकांचा लाडका युथ आयकॉन म्हणून त्याची असलेली अनोखी ओळख #TheTigerEffect प्रेक्षकांच्या हृदयाचा आणि मनाचा ताबा घेते. ट्रेडमार्क आणि अफलातून स्टंट्सने टायगरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो मनोरंजनाच्या जगात एक बेस्ट अभिनेता आहे. या खास इव्हेंटच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगताना टायगरने WPL 2024 चे आयोजक आणि प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

 टायगर व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपापल्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांच्या परफॉर्मन्सने मंचावर लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सुपरस्टार शाहरुख खान ने केलं. टायगर त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असून ज्यामध्ये तो आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. सोबतीला टायगर लवकरच ‘सिंघम अगेन’ मध्येही ॲक्शन अवतारात दिसणार आहे. 

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

मुंबई : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.

राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.