पुणे-
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक कंपन्यांना आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲक्ट ऑफ कम्पॅशन’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टाईम्स ग्रुप आणि रूबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने 9 विविध प्रवर्गांमधून एकूण 12 कंपन्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात टाईम्स ग्रुप्सच्या संचालिका सुधा नटराजन, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट तसेच शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सीएसआरच्या माध्यमातून वंचित आणि शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न सरकारमार्फत सुरू आहे. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी सीएसआरसंदर्भात कायदा केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. सीएसआरच्या मदतीने गडचिरोलीसारख्या आदिवासी परिसरात सुमारे 1800 शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्यात येत आहेत, अशी माहिती श्री. गडकरी यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले, वंचित-शोषित आणि गरिब सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून कंपन्यांनी सीएसआर उपक्रमांची आखणी करावी. त्याचा लाभ प्रत्येकाला होण्यासाठी त्या योग्य पद्धतीने राबवण्यात येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लातूरसारख्या पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सीएसआरला तंत्रज्ञानाची जोड देऊन उपक्रम राबवण्यात यायला हवेत.
तसेच, सीएसआर उपक्रम हे केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहू नयेत. तर जिथे याची खऱ्या अर्थाने गरज असलेल्या ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचणे गरजेचे आहे. गरिब-गरजूंना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सीएसआर उपयुक्त आहे. सीएसआरमुळे अनेक वंचितांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्या यशकथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्या माध्यमातून इतरांनाही अशा प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. गडकरी म्हणाले.
ॲक्ट ऑफ कम्पॅशन पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष असून त्यासाठी पुण्यातील सुमारे 120 कंपन्यांनी नामांकन अर्ज केले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय ज्युरींच्या समितीने एकूण 9 प्रवर्गांमध्ये एकूण 12 कंपन्यांना हे पुरस्कार प्रदान केले. त्यांची नावे खालीलप्रमाणे –
1) एक्सिलन्स इन कम्युनिटी रेझिलियन्स अँड डिझास्टर रिस्पॉन्स – अ) फोर्ब्स मार्शल ब) तारा कन्स्ट्रक्शन्स
2) एक्सिलन्स इन कल्चरल प्रिझर्व्हेशन अँड हेरिटेज – पी. एन. गाडगीळ अँड सन्स प्रा. लि.
3) एक्सिलन्स इन डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल
4) एक्सिलन्स इन एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट – अ) थर्मेक्स फाऊंडेशन ब) हारविंजर सिस्टिम्स प्रा. लि.
5) एक्सलिन्स इन एम्पॉवरमेंट थ्रू एकोनॉमिक डेव्हलपमेंट – दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड
6) एक्लिलन्स इन एनव्हायरनमेंट सस्टेनिबिलिटी – अ) प्राज इंडस्ट्रीज ब) रेलफोर लॅब प्रा. लि.
7) एक्लिलन्स इन हेल्थ फॅसिलिटीज फॉर द अंडरप्रिव्हिलेज्ड – पर्सिस्टंट सिस्टिम्स
8) एक्सिलन्स इन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट – रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.
9) एक्सिलन्स इन वूमन एम्पॉवरमेंट – प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड