Home Blog Page 1178

कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी, संपन्न करण्याचे आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

सिंधुदुर्गनगरी, दि ०२

: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आई भराडी देवी चरणी घातले.

आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते.यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आंगणे कुटुंबियांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आई भराडी देवीच्या आर्शिवादाने मला मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दीड वर्षामध्ये शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. सिंचनाचे प्रकल्प वाढवून कोकणातील अनुशेष भरुन काढण्यासंदर्भात अधिवेशनात नुकतीच चर्चा झाली. कोकणात शक्य तितके बंधारे, लघु व मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करुन वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे. आरोग्य, दळण-वळण अशा अनेक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई-सिंधुदुर्ग हा ग्रीनफिल्ड रस्ता बनविण्यात येणार आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील शेतकरी आणि नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्यात येणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

सहकारनगरच्या तुकाराम कांबळेंना घरात घुसून तिघांनी ठार मारल्याचे निष्पन्न

पुणे -गेल्या २४ फेब्रुवारी रोजी सहकार नगर मधील समता सोसायटी तील घरात सापडलेल्या तुकाराम निवृत्ती कांबळे यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून तुकाराम कांबळे यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारल्याच्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि , अनिता कांबळे वय ५५ वर्षे रा. पदमावती सहकारनगर, पुणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होतीदि. २४/०२/२०२४रोजी रात्रौ ०१/३० वा सुमा.८३९, समता सोसायटी, सहकारनगर पुणे सहकारनगर पो.स्टे.अ.म.रजि.नं.१३/२०२४ सीआरपीसी कलम १७४ अन्वये दाखल मयताचे एकंदरीत झाले तपासावरून तसेच प्राप्त पोस्टमार्टेमनोटस वरुन फिर्यादी यांचे दिर तुकाराम निवृत्ती कांबळे वय ५७ वर्षे रा.८३९ समता सोसायटी, सहकारनगर, पुणे यांचेमध्ये झालेल्या वादाच्या रागातुन नमुद इसम यांनी फिर्यादी यांचे दिराचे घरात घुसुन त्यांना शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून त्यांना जिवे ठार मारले आहे. पो.उप. निरी. महेश नलावडे मो.नं. ९४०४४०५१९६ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत,ते म्हणाले कि, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून कोर्टात हजर देखील केले आहे. याप्रकरणाची माहिती थोड्या वेळातच माध्यमांना देण्यात येईल

महिलांनी आर्थिक सक्षम होण्याला प्राधान्य द्यावे : नित्यानंद पाटील

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, वंचित विकास यांच्या वतीने महिलांसाठी ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’
पुणे : “देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे आहे. सन्मानाने जगण्यासाठी महिलांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. महिलांमध्ये उपजत नियोजन, समन्वय व जबाबदारीचे भान असते. त्यामुळे त्यांच्यातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले, तर त्या चांगल्या रीतीने उद्योग-व्यवसाय उभारू शकतील,” असे मत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी एकदिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेत कर्ज प्रस्ताव व पुरवठा या विषयावर नित्यानंद पाटील बोलत होते. नारायण पेठेतील वंचित विकासच्या केंद्र कार्यालयात ही कार्यशाळा झाली. प्रसंगी वंचित विकासच्या कार्यवाह मीना कुर्लेकर, संचालक सुनीता जोगळेकर, समन्वयक तेजस्विनी थिटे आदी उपस्थित होते.

सरकारी योजना व संधी यावर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात, व्यवसायासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी व अर्थसहाय्य याविषयी जनता सहकारी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक संजय गायकवाड, पतपुरवठा व अर्थसहाय्य योजनेविषयी कॉसमॉस बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक प्रियांका सुमंत, विक्री व्यवस्थापनावर योगेश गोगावले यांनी मार्गदर्शन केले.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “सुरुवातीपासूनच महिला सबलीकरणाच्या कार्यात अग्रेसर वंचित विकास संस्थेने नोव्हेंबर २०२३ मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने महिला उद्योजिकांचे प्रदर्शन भरवले होते. त्याचाच पुढील भाग म्हणून उद्योग करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह उद्योगासाठी आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. उद्योग करू पाहणाऱ्या महिलांना सल्ला व मार्गदर्शन पुरवण्यासाठी संस्थेमध्ये स्वतंत्र केंद्र सुरु केले आहे.”

ड्रगच्या गुन्ह्यात पीएसआयचा सहभाग निष्पन्न

ड्रग्सच्या प्रकरणात थेट पोलिसाचा सहभाग असल्याने पिंपरी- चिंचवड पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शंकर झा याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर विकास शेळके या पीएसआय विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पुणे- पिंपरी- चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटींचं मेफेड्रॉन अमली पदार्थ सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान पकडले होते. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात शंकर झा ( वय -२२, मु.रा.बिहार) याच् आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या गंभीर गुन्ह्यात निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव समोर आल असून त्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि सांगवी पोलिसांनी सखोल चौकशी आणि तपास करत आणखी ४३ किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ४५ किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. या ड्रग्स ची किंमत तब्बल ४५ कोटी इतकी आहे. या घटने प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी विजय मोरे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी एपीआय नारायण पवार यांचे पथक गस्त घालत असताना आरोपी शंकर झा याच्या ताब्यातून दोन कोटी दोन लाख रुपयांच २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी शंकर झा याला अटक करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव पुढे आलं असून ड्रग्स च्या या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळला आहे.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा साई पॉवर हिटर्स संघाला विजेतेपद

पुणे, २ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर संघाने विजेतेपद साकार केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना साई पॉवर हिटर्सने ९२ धावांचे लक्ष्य उभे केले. ४ गडी बाद ३१ धावा असा संघ अडचणीत सापडलेला असताना संघाच्या हुमेद खान याने ४५ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. कर्णधार श्रीधर मोहोळ याने २५ धावा करून हुमेद याला उत्तम साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६८ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा डाव ५५ धावांवर मर्यादित राहीला. साई संघाच्या हुमेद खान याने ११ धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) श्री. अमिताभ गुप्ता, प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, दिक्षीत मोटर्सचे श्रेयस दिक्षीत, मोहनदादा जोशी, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, नितीन पंडीत, कुमार रेणूसे, योेगेश शांडिल्य, गगनदीप ओबोरॉय, शिरीष मोहीते, अनिल सपकाळ, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांच्यावतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.विजेत्या साई पॉवर हिटर्स संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या रूपक तुबाजी याला ५१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- कपिल राऊत, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- हुमेद खान, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- आदित्य अष्टपुत्रे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रथमेश गोवकर या सर्व खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आला. फेअर प्ले पुरस्कार तुळशीबाग टस्कर्स आणि मिडीया मास्टर्स या दोन संघांना देण्यात आला.सामन्यांचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाःसाई पॉवर हिटर्सः १० षटकात ७ गडी बाद ९२ धावा (हुमेद खान ४५ (२५, ६ चौकार, २ षट कार), श्रीधर मोहोळ २५, रूपक तुबाजी २-२६) वि.वि. शिवमुद्रा ब्लास्टर्सः १० षटकात ९ गडी बाद ५५ धावा (रोहीत खिलारे ११, तुषार आंबट १०, हुमेद खान ४-११, निखील वाटणे १-२); सामनावीरः हुमेद खान

निवडणूक कामाला सर्वोच्च प्राधान्य..

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. निवडणूक विषयक कामकाजास सर्वच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई शहर उपनगर जिल्हा कार्यालयात आज जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मुंबई शहर उपनगर जिल्हा अंतर्गत चारही लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.             यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गोहाड, उपजिल्हाधिकारी दादाराव दातकर व वंदना सूर्यवंशी,  उपजिल्हाधिकारी शशिकांत काकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, आदींची उपस्थिती होती. इतर अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

येत्या काही दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत आचारसंहिता काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर पथकाच्या स्थापना करावयाच्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व साधनसामुग्री संबंधित यंत्रणांना पुरविण्यात येईल असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

चारही लोकसभा मतदारसंघात 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवा मतदारांची नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात यावे. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने कामकाजात अधिक गतिमानता आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, मतदान केंद्र संख्या, तेथील व्यवस्था, आदर्श मतदान केंद्र उभारणी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केल्या.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देश यांच्याबाबत वेळोवेळी राजकीय पक्षांना अवगत करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी चारही निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.

झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील महिला सुरक्षेबाबत चिंता
हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाट परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. स्पॅनिश महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती.फिरताना रात्र झाली तेव्हा ही महिला कुरमाहाट परिसरातील एका शेतात तंबूत आराम करत होती. यावेळी हा प्रकार घडला. विरोध केला असता तिला मारहाणही करण्यात आली.
हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावातील 7-8 तरुण या सामूहिक बलात्कारात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

घटनेची माहिती मिळताच एसपी पितांबर सिंह खैरवार रात्री उशिरापासून हंसदिहा पोलीस ठाण्यात तळ ठोकून प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. जिल्हा मुख्यालयातून श्वानपथकाची टीमही मागवण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित परदेशी महिलेचे वय सुमारे 30 वर्षे आहे.पती-पत्नी स्पेनमधून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले आहेत. ते प्रथम पाकिस्तानात गेले होते, तेथून बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले होते. महिला आपल्या पतीसोबत बाईक टूरवर आली होती. ते दुमकामार्गे भागलपूरकडे जात होते. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा त्यांनी तंबू ठोकला आणि हंसदिहा बाजारासमोर निर्जन ठिकाणी झोपले. दरम्यान, शेजारील काही तरुण तेथे पोहोचले आणि त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला मारहाणही केली.रात्री 10.30 च्या सुमारास कुरमाहाट चौकात पोलीस पथक पाहून महिलेने गस्तीवर असलेल्या पथकाला आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित महिला आणि तिच्या पतीला हिंदी येत नसल्याने त्यांनी आपल्या मोबाईलवरून गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा शेतात महिलेची अंतर्वस्त्रे सापडली. जी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी महिलेला रात्री उशिरा सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. जिथे तपासात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी झाली.

महासंस्कृती महोत्सवात काव्यवाचन आणि एकांकिकांना रसिकांची दाद


पुणे-सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सवात तरुण कलाकारांनी सादर केलेल्या एकांकिका, ‘स्वातंत्र्य आणि अस्तित्व’ या काव्यवाचनाचा अविष्कार पुणेकरांनी अनुभवला. तरुण कलाकारांच्या सादरीकरणाला पुणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे ‘अभिरंग’च्या कलाकारांनी ‘नेकी’,‘समर्थ थिएटर’ने ‘मजार’ आणि ‘अप्पासाहेब जेधे महाविद्यालया’च्या कलाकारांनी ‘बी अ मॅन’ या एकांकिका सादर करत रसिकांची मने जिंकली. रसिकांनी अभिनय आणि संवादांना उत्स्फूर्त दादही दिली. त्यानंतर ‘अभिरंग’च्या कलाकारांनी ‘स्वातंत्र्य आणि अस्तित्व’ हा कविता अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला. संतोष पवार दिग्दर्शित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

महोत्सवांतर्गंत गदिमा नाट्यगृह येथे ‘कलाकार मंडळी’ने ‘चाहूल’, ‘ऱ्हस्व दीर्घ’च्या कलाकारांनी ‘ना ना नाना’ आणि ‘नाट्यहॉलिक’च्या कलाकारांनी ‘विनाशलीला’ या एकांकिका सादर केल्या. प्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि गायिका सावनी शेंडे यांच्या ‘तुझी आठवण’ या कार्यक्रमाने शुक्रवारची सांगता झाली. आचार्य अत्रे नाट्यगृहात डॉ. भावार्थ देखणे यांनी भारुड सादर करत लोकपरंपरेचे दर्शन घडविले.  
— 

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्यावी

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

मुंबई, दि. २ :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

आरोग्य विभागाच्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील पाच वर्षाखालील १ कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरात ८९,२९९ बुथ उभारण्यात आले असून सुमारे २ लाख २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी या बुथवर कार्यरत असतील. याशिवाय तीन कोटींपेक्षा अधिक घरांना मोहिमेअंतर्गत भेट दिली जाणार आहे. तसेच एकही बालक पोलिओच्या डोस पासून वंचित राहू नये यासाठी फिरती पथके आणि रात्रीची पथकेही कार्यरत असणार आहेत.

पल्स पोलिओ मोहिमेसंदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली असून सर्व जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली आहे. अति जोखमीच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तराप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पाच वर्षांपर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस न घेऊ शकणाऱ्या वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ युएसएड, लायन्स क्लब रोटरी क्लब व स्वयंसेवी संस्था तसेच बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.
0000

ज्या राज्याचे नेतृत्व एक महिला करत आहे अशा राज्यामध्ये बलात्कारासारखे प्रकार घडणे चिंताजनक -हर्षदा फरांदे

पुणे -१: पश्चिम बंगालमधील संदेश खाली या गावामध्ये सातत्याने महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध पश्चिम बंगालचे सरकार ज्याच्या प्रमुख एक महिला आहे या कोणतीही कडक कारवाई करताना दिसून येत नाहीत.अशा राज्यात बलात्कारासारख्या निर्घृण व निर्दयी घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे ज्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित नाहीत अशा राज्यांचा कारभार एक महिला चालवते यापेक्षा आणखीन दुर्दैवी काय असू शकते असा सवाल भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी केला.
संदेश खली या गावात झालेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज पुण्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले त्यावेळी सौ. फरांदे बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या ममता बॅनर्जी यांना फक्त सत्ता आणि त्यातून मिळणारे लाभ यामध्येच रस आहे पश्चिम बंगालमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या ,बलात्काराच्या घटना या त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी हे खुलेआम निर्घृण पणे करतात. त्यांच्यावर ५५ दिवस कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतात, पोलीस प्रशासन पश्चिम बंगाल मध्ये हतबल झाल्याचे चित्र यापूर्वीही आपण बघितलेले आहे महिलांची सुरक्षा ही पश्चिम बंगाल मध्ये वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येते भारतीय जनता पार्टीची ही मागणी असेल की संबंधित जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करून एक आश्वस्त वातावरण महिलांसाठी पश्चिम बंगालच्या सरकारने केले पाहिजे अन्यथा भारतीय जनता पार्टी त्या महिलांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे
खरे तर ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे असे प्रतिपादन हर्षदा फरांदे यांनी केले
या आंदोलनाला हर्षदा फरांदे यांच्यासह महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रिया शेंडगे शिंदे, आरती कोंढरे, गायत्री खडके, भावना शेळके , स्वाती मोहोळ, उज्वला गौड, शामा जाधव, कोमल कुटे, प्रेरणा तुळजापूरकर आदी उपस्थित होत्या

जेष्ठ महिलेला मारहाण करुन पैसे पळवुन नेणा-या कासेवाडीच्या भामट्याला २४ तासात केले जेरबंद,

पुणे-जेष्ठ महिलेला मारहाण करुन पैसे पळवुन नेणा-या कासेवाडीच्या एका भामट्याला पुणे पोलिसांनी २४ तासात पकडले आहे. पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २९/०२/२०२४ रोजी फिर्यादी ह्या गगाधाम चौक, बिबवेवाडी, पुणे येथुन पायी जात असताना, अॅक्टिव्हा मोपेड गाडीवरील तीन अनोळखी इसमांनी धक्काबुक्की करुन त्याचेजवळील काळे रंगाची पर्स, व त्यामधील २५,०००/- रु रोख, इतर ऐवज जबरदस्तीने काढुन घेतला म्हणुन मार्केटयार्ड पो.स्टे.गु.र.नं.४२/२०२४ भा.द.वि. कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक, युनिट ०५, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -०५, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार हे मार्केटयार्ड भागात शोध घेत असताना, मिळालेल्या माहितीवरून आतिष जालींदर लांडगे वय २७ वर्षे रा. महादेव मंदिरामागे, कासेवाडी, भवानीपेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने व त्याचे मित्र असे तिघांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडुन गुन्हा करणेसाठी वापरलेली ४०,०००/- रु कि.ची अॅक्टिव्हा मोटार सायकल जप्त करणेत आलेली आहे.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेंद्र बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोउनि अविनाश लोहटे, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, प्रताप गायकवाड, रमेश साबळे, पुथ्वीराज पांडुळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, राजस शेख, शहजी काळे, राहुल ढमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.

फडणवीसांनी नाकारले शरद पवार यांचे जेवणाचे आमंत्रण

मुंबई-

बारामती मधील आपल्या घरी खासदार शरद पवार यांनी तिघांनाही जेवणाचे आमंत्रण दिले आहे. मात्र, आधीच व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला यावेळी जेवायला घरी येणे शक्य होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवले आहे. त्यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र देखील शरद पवारांना लिहिले असून जेवायला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

बारामती मध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याबद्दल विरोधी पक्षाने सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी बारामती मध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवणासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी जातात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या घरी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे यावेळी येणे शक्य नसल्याचे फडणवीस यांनी शरद पवार यांना कळवले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय

मुंबई, दि. १ : – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तिवेतनाच्या ६० टक्के इतके कुटूंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

‘हा निर्णय लाखो कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनंही हितकारक ठरेल,असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचेही नमूद केले. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना सुधारीत करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की, दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना सुधारीत करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करुन सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी, कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शवली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील बाजारामधील चढ-उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तिवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबतीत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल.’

मुख्यमंत्री म्हणाले की, वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळं निवृत्तीवेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो. म्हणूनच सुरवातीपासूनच आम्ही या विषयावर सुरवातीपासून संवेदनशील राहीलो आहोत. निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व मान्य केलंय. याविषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद-संपर्कात होतो. ज्या-ज्यावेळी या संघटनांनी या विषयावर चर्चेची, बोलण्याची मागणी केली. त्या-त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला. समितीच्या अहवालावरही बैठका घेण्यात आल्या. मंत्रिमंडळातील सहकारी, कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी, तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. यात उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान वित्तमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यानी नमूद केले.

दरम्यान, मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील ८० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच २००५ मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या, पण भरती प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जूनी निवृत्तवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यानी दिली.

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीबाबत…
शासनाने दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०१५ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या १३ लाख ४५ हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी ८ लाख २७ हजार इतके आहेत. त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर ५२ हजार ६८९ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा ७ हजार ६८६ कोटी रुपये इतका आहे. याशिवाय एकूण वेतनावरील खर्च १ लाख २७हजार ५४४ कोटी इतका आहे.

तुलनात्मक अभ्यास समितीविषयी…
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती १४ मार्च २०२३ रोजी स्थापन केली गेली होती. दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारसी- अहवाल सादर करणार होती. या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री. सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांचा समावेश होता. या समितीनं अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून, अहवाल सादर केला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदान जनजागृती रॅलीचा शुभारंभ

पुणे, दि. १ : जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग व पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते भिडेवाडा येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी मुख्य प्रवाहात येवून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.

पुणे जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रॅलीचा शुभारंभ भिडेवाडा, बुधवार पेठ पुणे येथे होऊन महात्मा फुले मंडई- बाजीराव रोड- विश्रामबागवाडा या मार्गाने शनिवार वाडा येथे समारोप झाला. याप्रसंगी स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, कर्वे समाजसेवा संस्थेचे प्राध्यापक चेतन दिवाण, युवा विकास आणि उपक्रम केंद्राचे मंगलमुखी किन्नर यांच्यासह मित्र क्लिनिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.दिवसे म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत मतदान न केलेल्या व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. जिल्ह्यात तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबवून मतदार नोंदणी करण्यात आली. सुमारे ७०० तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना मतदार नोंदणीचे महत्व समजावून सांगितले आहे. तृतीयपंथी व्यक्तींची मतदार जागृती रॅली हा देशातील हा अनोखा उपक्रम आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती तांबे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. श्री. लोंढे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

यावेळी तृतीयपंथी व्यक्तींनी श्रीमती तांबे यांच्या उपस्थित मतदानाची शपथ घेतली. या रॅलीत मोठ्या संख्येने तृतीयपंथी उपस्थित होते. रॅलीला तृतीयपंथी व्यक्तींचा तसेच संस्थांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठीपुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई, दि. १ :- राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक शिस्त पाळताना अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे. अशा उपाययोजना आणि कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहाला दिला.

विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामधून भाविक कोल्हापूरमधील ज्योतिबा देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेत असतात. येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला उत्तर देताना केली. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पहिली समिती, पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती, उच्चाधिकार समिती आणि शिखर समितीच्या मान्यतेबाबतची कार्यवाहीदेखील गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रतिदिन १ कोटी ६० लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी २८३ कोटींची आवश्यकता आहे. यापैकी २०४ कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्य चालविणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद लावली पाहिजे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे आणि भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार असून इतर राज्यांपेक्षा आपले राज्य निश्चितपणे आघाडीवर असेल. राज्य स्थूल उत्पन्नात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होत असून त्यात भरीव वाढ करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याद्वारे राज्याने निश्चित केलेल्या कालावधीत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यात येणार असल्याचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, याआधी अर्थसंकल्पात जाहीर योजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्या आणि अतिरिक्त योजनांसाठी आवश्यक निधींसाठी पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. महत्वाच्या योजनांबद्दल माहिती देतांना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आशा स्वयंसेविका मानधन, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा, नमो शेतकरी सन्मान निधी, गरीब-गरजूंना आनंदाचा शिधा अशा महत्वकांक्षी योजनांसाठी निधीची तरतुद केली आहे.

महापुरुषांच्या स्मारकांसाठी केलेल्या तरतुदींसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे, गौरवशाली इतिहास आहे. या वारशाचा, महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी स्मारके आवश्यक आहेत. त्यांच्यासाठीही निधीची तरतूद केली आहे. मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गतीने सुरु आहे. या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात केली आहे. या स्मारकासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादन व इतर बाबींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्यांद्वारे निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली.