Home Blog Page 1177

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य क्रांतीगुरू म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकारकाचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. स्मारकासाठी साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात संग्रहालय, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगर नियोजन योजनेअंतर्गत उरुळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ,भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,सुनील कांबळे , विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : येत्या आठवडाभरात बोपोडी चौकातील वाहतूक मार्गी लागेल,असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी चौकातील वाहतुकीची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांसमवेत येत्या बुधवारी व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांची वाहतूक संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.

बोपोडी चौकामध्ये रस्त्याची कामे अर्धवट आहेत, तिथे बरेच अपघात होत आहेत. तसेच हॉस्पिटल क्रॉसिंगला सुद्धा अडथळे येत आहेत, अशा प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बुधवार पर्यंत बोपोडी चौकातून डाव्या बाजूकडे हॅरीस ब्रिजकडे जाणारा रस्ता पूर्ण होईल. त्याचबरोबर त्याठिकाणी असलेला सिग्नल बुधवारपर्यंत हलविला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

तसेच जुना मुंबई पुणे हायवेवरील जय हिंद टॉकीजच्या पुढच्या टप्प्याच्या रस्त्याचे काम दहा तारखेपर्यंत पूर्ण होईल. त्याठिकाणी दुहेरी वाहतूक तातडीने सुरू करावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु करावी आणि खडकीवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पाहणीच्या वेळी केली.

या पाहणीच्या वेळी प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, सुनिताताई वाडेकर, दुर्योधन भापकर, संगीताभाभी गवळी, धर्मेश शहा, कार्तिकीताई हिवरकर, नेहाताई गोरे, मनीषाताई कांबळे, अजित पवार, अनिल भिसे, विजय ढोणे, शांतीलाल शेठ, हेमंत शहा, अनिरुद्ध वाकीकर, अनिकेत भिसे, भूषण जाधव, जय भाटीया, देवेंद्र बिडलान, राजेश पिल्ले, योगेश कर्नुर आदि उपस्थित होते.

शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे

सल्लागारपदी प्रा. दिगंबर ढोकले, शामकांत नांगरे, गणपत पाडेकर, बाळासाहेब भोर, नूतन गावडे

पिंपरी (दि. २ मार्च २०२४) पिंपरी चिंचवड शहरातील विश्वासार्ह आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सल्लागारपदी प्रा. दिगंबर ढोकले, शामकांत नांगरे, गणपत पाडेकर, बाळासाहेब भोर, नूतन गावडे यांची नियुक्ती झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद आवटे यांनी कातळे यांच्यासह सल्लागारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी उपाध्यक्ष सुहास गटकळ, संचालक कैलास आवटे, बाळु गुंजाळ, निंबा डोळस, ॲड. सुर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, गुलाब औटी, वसंत कुटे, मुबीन तांबोळी, संतोष बिलेवार, तज्ञ संचालक शांतीश्वर पाटील, ज्योती हांडे, संगिता इंगळे हे संचालक आणि नारायण हाडवळे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून सुनिता आवटे या व्यवस्थापक आदी उपस्थित होते. मनिषा वाघोले, प्रणित महाबरे, जयश्री गजरे आणि विद्या बांदल, दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून प्रमिला औटी, वैशाली कुऱ्हाडे, परिष डागा, ज्ञानेश्वर गाढवे तेजस वाघमारे, बाळासाहेब कराळे आदींनी आयोजनात सहभाग घेतला होता.
शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 1 जून 1995 रोजी झाली आहे. 1 लाख भागभांडवलावर संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली होती. सुरुवातीला संस्थेचे भोसरीगाव कार्यक्षेत्र होते. संस्थेचे व्यवहार वाढत गेल्यानंतर संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिका हद्द कार्यक्षेत्र मंजूर झाले. त्यानंतर संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्राचे निकष पूर्ण केले. त्यामुळे मार्च 2020 मध्ये संस्थेस संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर झाले. संस्थेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ प्राप्त आहे. संस्थेची कर्जवसुली 100 टक्क्याच्या आसपास राहिली आहे. संस्थेचे 3 हजार 843 सभासद असून भागभांडवल 2 कोटी 28 लाखांचे आहे. संस्थेस सन 2016-17 या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. 2016 पासून दरवर्षी संस्थेस बँको पतसंस्था ब्ल्यु रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. सभासदांसाठी आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे उपक्रम राबविले जातात. बायपास, किडनी प्रत्यारोपण, ब्रेन ट्युमर अशा आजारांसाठी सभासदाला आर्थिक मदत केली जाते. मयत झालेल्या सभासदाच्या वारसासही मदत केली जाते.
सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांची तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाने एकमताने ही नियुक्ती केली. संस्थेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल कातळे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी गौरी देवरे हीचा एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याबद्दल सभासद पाल्य सत्कार करण्यात आला.

कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक

एक हात मदतीचा आगळावेगळा फॅशन शो

पिंपरी, पुणे (दि. २ मार्च २०२४) सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन शो सारखे उपक्रम महिलांच्या आत्मविश्वास वाढीस मदत करतात. फॅशनच्या झगमगत्या दुनियेत केलेले रॅम्पवॉक हे आत्मविश्वास वाढविणारे असते. अशा स्पर्धेतील सहभागी महिलांबरोबरच कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींना रॅम्पवॉक करण्याची संधी विष्णुप्रिया सेव्हेन आर्टस् प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या फॅशनशो मध्ये देण्यात आली. अभिनेते देव झुंबरे व छायाचित्रकार गणेश गुरव यांनी चिंचवड येथे महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या संकल्पनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत किड्स कॅटेगरीत अध्या गाडे, मिस कॅटेगरीत तनिष्का वाडकर, मिसेस कॅटेगरीत पायल भाकरे, मिस्टर कॅटेगरीत वरुण नेहुल यांनी विजेते पदाचा मुकुट पटकावला.
नारीशक्ती सरिता साने, उद्योजक अशोक धुरी, उत्कुष्ट अभिनेता सचिन दानाई, उत्कुष्ट पत्रकार अनिल वडघुले यांना ‘महाराष्ट्र आयकॉन २०२४’ हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुनील हिरूरकर, अपंग केंद्र प्रमुख सुनील चोरडिया यांच्या उपस्थितीत बक्षीस व पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून सोनाली कनखरे व मोनिका बांगाळ यांनी काम पाहिले.
विस्तृत विजेता निकाल – किड्स कॅटेगरीत फर्स्ट रनरअप पुर्वी आहिरे व सेकंड रनरअप तनुश्री कडु, मिस कॅटेगरीत फर्स्ट रनरअप ऐश्वर्या नारवणकर व सेकंड रनरअप श्रेया शिंदे, मिसेस कॅटेगरीत फर्स्ट रनरअप श्वेता रायकर व सेकंड रनरअप लक्ष्मी डावखरे आणि मिस्टर कॅटेगरीत फर्स्ट रनरअप आर्यन बजाज व सेकंड रनरअप निखिल फड यांनी बक्षीस पटकावले.
यावेळी सिने अभिनेते केतन लुंकड, प्रशांत तपस्वी, सुभाष खुडे, आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड, स्वाती मगर, राहुल जगताप, वसीम बागवान, गायत्री बनसोडे, राहुल रांजणे, महेश कंडपाल, राहुल सोनिगरा, ऋषिकेश साने, अनिकेत कांबळे, अमोल रोडे, राजेंद्र तरस, हेमंत कोठावडे, गणेश सुतार, धीरज कांबळे, ॲड. सुमेध डोंगरे, ओम काळे, तुकाराम डफळ, विनोद साळवे, बाबुराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका गोवंश व मोठ्या पशुधनासाठी कोंडवाडा कधी उभारणार – कुणाल साठे

पिंपरी (दि. २ मार्च २०२४) तीन वर्षांपूर्वी शहरातील भटक्या व मोठ्या जनावरांसाठी टाळगाव चिखली येथे कोंडवाडा (गोठा) प्रकल्प उभारण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मंजुरी दिली होती. यासाठी शहरातील विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलने करून प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. २०२२ मध्ये विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने महानगरपालिका भवन परिसरामध्ये भटकी जनावरे सोडून आंदोलन केले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. परंतु अद्यापही हा प्रश्न प्रलंबित आहे. पिंपळे सौंदागर येथे श्वान फिरवण्यास आणण्यासाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. याचा आनंदच आहे. यासाठी तत्परता दाखवणारे प्रशासन अनेक वर्षापासून रस्त्यावर फिरत असलेल्या गोवंश साठी कोंडवाडा (गोठा) उभारण्यास का दिरंगाई करीत आहे ? असा प्रश्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सह संयोजक कुणाल साठे यांनी उपस्थित केला आहे.
सकल हिंदू समाज पुणे जिल्हा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संस्थांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात साठे यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात भटक्या जनावरांचा गंभीर प्रश्न आहे. गोवंशाची तस्करी, चोरी असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी भोसरी, मोशी परिसरात गोवंशला भूलीचे इंजेक्शन देऊन तस्करी, चोरी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा भटक्या जनावरांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. याबाबत वेळोवेळी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने करून प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेत प्रशासकिय राजवट सुरू होण्याअगोदर २०२२ मध्ये कार्यकर्त्यांनी मनपा भवन परिसरामध्ये भटकी जनावरे आणून सोडून आंदोलन केले होते. त्यावेळी देखील हा प्रकल्प लवकर मार्गी लावू असे आश्वासन प्रशासनाने शिष्टमंडळास दिले होते. २०१२ पासून भटक्या गोवंशासाठी आणि मोठ्या जनावरांसाठी असा प्रकल्प उभारला जावा ही मागणी होती. तीन वर्षांपूर्वी चिखली येथे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देखील मिळाली. श्वानांसाठी स्मशानभूमी व पार्क विकसित करणारे प्रशासन, दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ३५० कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या कामांना मंजूरी देणारे प्रशासक तथा मनपा आयुक्त शेखर सिंह हे गोवंश व मोठी भटकी, जखमी जनावरे यांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी कोंडवाडा (गोठा) उभारण्यासाठी २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पास का चालना देत नाहीत ? असा उद्विग्न सवाल सकल हिंदू समाज पुणे जिल्हा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारला आहे. याचे उत्तर प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह देतील काय ?
पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. स्मार्ट सिटी, स्वच्छ सिटी, मेट्रोसिटी म्हणून शहराचा नावलौकिक वाढत आहे. नागरिकांची मागणी नसताना अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देऊन पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास असणारे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन ती पत्रकार परिषदेत जाहीर करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ५० हून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून १०० हून प्रकल्प सादर


एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान परिषद

 पुणे-  एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘सायफेस्ट २०२४’ द्वारे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचा समारोप करण्यात आला. या दोन दिवसांच्या उत्साहपूर्ण विज्ञान मेळ्यासाठी महाराष्ट्रातील ५० हून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र आले होते. शिक्षण मंत्रालयाच्या इन्स्टिट्युशन इनोवेशन कौन्सिलच्या सहकार्याने व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात १०० हून अधिक वैज्ञानिक प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये विविध तंत्रज्ञान आणि उत्पादन तयारी स्तरावरील नवकल्पनांवर प्रकाश टाकण्यात आला.एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी मान्यवरांच्या समवेत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.नचीकेत ठाकूर, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, डाॅ.सुदर्शन सानप व विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. कराड यावेळी म्हणाले, सायफेस्ट हा विद्यार्थ्यांसाठी केवळ त्यांच्या नवकल्पना मांडण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या समवयस्कांकडून शिकण्याचा आणि प्रेरित होण्याचा एक टप्पा आहे. वैज्ञानिक विचारातील शाश्वतता आणि अध्यात्माची बांधिलकी ही आमच्या विद्यापीठाची ओळख असून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर कायमच भर देतो.
एमआयटी विश्वशांती गुरुकुल, लेडी झुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी हायस्कूल, साधना विद्यालय आणि पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्प सादर केले, ज्यामुळे त्यांना विजेते घोषित करण्यात आले. यंदाचा सायफेस्ट विज्ञान, टिकाऊपणा आणि अध्यात्म आदी थिमवर आयोजित करण्यात आला होता. ज्याची सांगता स्पेक्ट्रा – कल्चरल नाईटने झाली, ज्यात बँड नाईट, सिंगिंग आणि ग्रुप डान्स यांसारखे मंत्रमुग्ध करणारे कलाअविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.
सायफेस्टचे आयोजक व निमंत्रक, प्रा. डॉ. सुराज भोयर, यांनी याप्रसंगी, प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केवळ नाविन्यपूर्ण कल्पना नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या आध्यात्मिक वारशासह स्वतःमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांचे सादरीकरण करताना सर्वांना मने जिंकली, असे अखेरीस डाॅ.भोयार यांनी म्हटले. 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: नाना पटोले

दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले.

आभाळच फाटले आहे कुठे कुठे ठिगळं लावणार?

मुंबई, दि. २ फेब्रुवारी
मुंबई ते नागपूर ७०० किलोमिटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. १२ तासात मुंबईहून नागपूरला पोहचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच १२ वाजले आहेत. समृद्धी महामार्ग पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. सातत्याने होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या महामार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा पडला आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह तर निर्माण झाले आहे. पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावजवळच्या पुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अवघ्या १४ महिन्यातच पुलावर भला मोठा खड्डा पडल्याने या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. नागपूर-मुंबई समृद्धी हा ५५ हजार कोटी रुपयांचा महामार्ग सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना मोठा भ्रष्टाचार झाला तसेच या महामार्गाच्या तांत्रिक बाबीमध्येही गडबड आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी तज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस वे साठी साठी निश्चित केलेले नियम पाळलेले नाहीत. रोड हिप्नॅासीसमुळे अपघात होतात असे काही काही तज्ञांनी सांगितले आहे त्यावर काही उपाय केलेले नाहीत. रस्त्यावर ठरावीक अंतरावर चहापाणी, हॅाटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्यात आता रस्त्याला भगदाड पडल्याने या महार्गाने कोणाची समृद्धी केली हे दिसत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारामती, दि. २: नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहेअसे सांगत बारामती येथील या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामतीतील विविध विकास कामांतर्गत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन पोलीस वाहनांचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथील हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बारामती शहर विकासाचे मॉडेल

बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते.

१ लाख ६० हजार रोजगार दिले

राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आपल्या दारीमध्ये २ कोटी ६० लोकांना लाभ

‘शासन आपल्या दारी’हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास ५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून ४ ते ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

बारामती विकासाचे मॉडेल

पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असताना सणवार, उत्सव, आंदोलने आदी कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत.  राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई सुविधायुक्त अशी सुसज्ज ‘बसपोर्ट’ करून प्रवाशांना सर्व सोई सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.

राज्यातील शासकीय इमारती बांधताना बारामतीच्या इमारती समोर ठेवणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलीसाकरीता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते. अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या  वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  बारामतीतील विकासकामांचे कौतुक केले.

शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करुन नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम करतील, अशी विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगले काम करावे.

नागपूर येथे आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ११ हजार तरुणाला रोजगार मिळाला असून त्यापैकी काहींना ५० लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार मेळावा बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५५ हजारापेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून ३६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापर्यंत आणखीन अर्ज येतील. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षात काळात जगातील तिसऱ्या  अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याकरीता प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून तरूणांना कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीसाठी १३२ कोटी रुपये, पोलीस वसाहतीसाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च आला. बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत. विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.

पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज ३९ वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात १४ महिला वाहन चालक आहेत. महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जात आहे. महाराष्ट्रात बारामती हा क्रमांक एकचा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याने जर्मनीबरोबर एक करार केला असून त्यांना ५ लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमूल शिक्षण संस्था आयटीआय तसेच मालेगाव येथील शासकीय आयटीआय येथे विविध १५ ते ३० दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध- मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या रोजगार मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील रोजगार मेळाव्यात  उद्योजकांनी ५५ हजार ५५७ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला असून ३८ हजार ७४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील १ हजार  महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. राज्यातील बेरोजगार तरुणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तो पर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, विभागाच्यावतीने युवक युवतींच्या पंखांना बळ देण्याचे काम करतो. २ हजार ठिकाणी प्रमोद महाराज कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत. पहिला नमो महारोजगर मेळावा १० डिसेंबर का नागपूर केला होता त्याची फलश्रुती पाहून ३ महसुली विभागात आयोजित मेळाव्यात ४० हजार मुलांना रोजगार देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नेते खासदार श्री. पवार म्हणाले की, विद्यार्थ्यां रोजगाराची गरज लक्षात घेऊन राज्यात नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गेल्या ३ वर्षात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

००००

न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा-नाना भानगिरे

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी हडपसर विधानसभा मतदारसंघात आपण आणला

पुणे-अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हडपसर मतदार संघात एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात आणला, या निधीतून डीपी रस्ते व अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत विकासकामांमधून  हडपसर परिसर व महंमदवाडी परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे, न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा असा इशारा शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला.
 राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी महंमदवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक भूमिका भानगिरे यांनी मांडली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल घुले,
उपशहर प्रमुख संतोष रजपूत, विकी माने, विभागप्रमुख अभिमनू भानगिरे, महिला उपशहरप्रमुख स्मिता साबळे, जहीर भाई, सविता सोलंखे आदी यावेळी उपस्थित होते.

 हडपसर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर मधील तीन उड्डाणपुल पाडून फातिमानगर पासून एकच मोठा उड्डाणपूल व्हावा व मेट्रोचे काम लवकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले आहे, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे सांगून प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले मुंढवा, केशवनगर, मांजरी या भागातील अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. फुटबॉल मैदान, तसेच शासनाच्या जागेत क्रिकेट प्रेमींसाठीही मोठे मैदान करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, हडपसर महंमदवाडी परिसरातील डीपी रस्ते व्हावेत यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डीपी रस्त्यांसाठी 122 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हडपसर मधील वाढती गुन्हेगारी व पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता येथे आणखी दोन पोलीस स्टेशन व्हावेत म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, हडपसर विधानसभा मतदारसंघात नगरसेवक नसताना महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत आम्ही कामे करतो दुसरे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात अडीच वर्षे त्यांचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला एकही रुपया आणता आला नाही आणि आता आम्ही कामे करतोय तर त्याचे श्रेय घेता अशा विरोधकांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी भानगिरे यांनी दिला. निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत देऊन विरोधकांवर टीका केली.

 लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील व ते निवडूनही येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली तर दहा वर्षात हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असा दावाही नाना भानगिरे यांनी केला आहे.

 “माजी नगरसेवक असताना विकास कामांचा डोंगर…
हडपसरमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खासदार, आमदार अपयशी ठरले असताना शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी माजी नगरसेवक असताना देखील मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची कामे केली आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी भानगिरे यांच्या माध्यमातून मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, भानगिरे यांच्या कार्यालयात जनता दरबार भरतो व तेथे नागरिकांची कामे कोणतीही कारणे न देता तातडीने सोडविली जातात.

पंतप्रधान मोदी वाराणसीतून,अमित शाह गांधीनगर मधून निवडणूक लढवणार:लोकसभेसाठी भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली -2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 195 उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून, अमित शाह गांधीनगर मधून तर स्मृती इराणी अमेठी आणि हेमा मालिनी मथुरेतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत.या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचाही समावेश आहे. त्यात लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे.या उमेदवारांपैकी 28 महिला आहेत. 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. या १९५ पैकी ५७ ओबीसी उमेदवार आहे

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. यामध्ये 195 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये 28 महिला, 47 तरुण, 27 एससी, 18 एसटी आणि 57 ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. पीएम मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशातील गुना आणि शिवराज सिंह यांना विदिशामधून तिकीट देण्यात आले आहे.

या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, दिल्लीचे 5 जम्मू-काश्मीरमधील 2, उत्तराखंडमधील 3, अरुणाचल 2, गोव्यातील 1, त्रिपुरा 1, अंदमान 1, दमण आणि दीव मधील 1 जागांचा समावेश आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 195 उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) पुन्हा एकदा 5 ते 7 मार्च या कालावधीत सलग तीन दिवस बैठक होणार आहे. यामध्ये उर्वरित जागांवर उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. यापूर्वी 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत 17 राज्यांतील 155 लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली होती. या जागांसाठीचे उमेदवार आज जाहीर केले जाऊ शकतात.

29 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांच्यासह मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, सहप्रभारी आणि निवडणूक प्रभारी उपस्थित होते. भाजप शासित राज्ये उपस्थित होते. ही बैठक दुपारी 11 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत सुमारे 4 तास चालली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत पीएम मोदींना वाराणसी, अमित शाह यांना गांधीनगर, राजनाथ सिंह यांना लखनऊ, स्मृती इराणी यांना अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिशाच्या संबलपूर, ज्योतिरादित्य सिंधिया यांना ग्वाल्हेर किंवा गुणा-शिवपुरी, शिवराजसिंह चौहान यांना भोपाळ किंवा विदिशा आणि संबित पात्रा यांना ओडिशातील पुरीमधून तिकीट देण्याची चर्चा आहे.

याशिवाय भिवानी बल्लभगडमधून भूपेंद्र यादव, दिब्रुगडमधून सर्बानंद सोनोवाल, राजौरी-अनंतनागमधून रवींद्र रैना, कोटामधून ओम बिर्ला, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून परवेश वर्मा आणि भोजपुरी गायक पवन हे तृणमूल काँग्रेसचे शत्रू सिंह शत्रू यांच्या विरोधात आहेत.

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती, दि.२: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

बारामतीचा विकासाचा ‘पॅटर्न’ केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखे असे भव्य पोलीस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे. बऱ्हाणपूर या गावाच्या हद्दीत ६५ एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५ हजार ६५९ चौ. मी.च्या जोत्यावर ३२ हजार ७८५ चौ. मीटरमध्ये प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, आर.पी.आय. इमारत, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने, पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट कार्यशाळा या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ८०२ चौ. मीटर बांधकाम क्षेत्रावरील कामे प्रगतीपथावर असून यात क्लब हाऊस, जलतरण तलाव, इन डोअर शूटिंग रेंज, उपहारगृह, शॉपिंग सेंटर, खेळाच्या मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस लॉन, फुटबॉल मैदान, रनिंग ट्रॅक अशा सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजेच्या सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या एकूण प्रकल्पाचा खर्च १४२ कोटी ६२ लाख रुपये आहे.

वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले बारामती बसस्थानक

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते बारामती येथील बसस्थानकाचेही उद्घाटन करण्यात आले.  बसस्थानक, आगार व निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्यात आली असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकतेने उभारला आहे. जागेचे एकूण क्षेत्रफळ २४ हजार ७४८ चौ.मी. आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर बस स्थानक कार्यालय, तळमजल्यावर आगार  आणि पार्सल कक्ष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. बसेस उभे राहण्यासाठी २२ फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर २२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर २१ कार्यालये, १२३ आसनी परिसंवाद कक्ष, ३६ आसनी बैठक व्यवस्था आणि ३२ आसनी शयनकक्ष आहेत.

या बसस्थानकात ६५ बस, ४७ चारचाकी, ४० ॲटोरिक्षा आणि ११७ दुचाकी वाहनाकरीता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे. परिसराचे बाह्य सुशोभिकरण,फर्निचर तसेच प्रवाशांकरीता सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहे. बारामती शहराच्या वैभवात या बसस्थानकामुळे भर पडली आहे.

बारामती अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन

बारामती येथे अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले.  वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण १४ हजार ६२ चौ.मी. क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले आले. या कामाकरीता आतापर्यंत २७ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला आहे.

बारामतीच्या सौंदर्यात भर घालणारी पोलीस वसाहत

बारामती येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० वर्षापूर्वीच्या जुन्या बैठ्या दगडी ७५ निवासी खोल्या होत्या. त्या मोडखळीस आल्यामुळे तेथे ७ मजली ७ इमारती मूलभुत सोयीसुविधांसह बांधण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा १९६ पोलीस कुटुंबियांना होणार आहे. ही निवासस्थाने बैठकीची खोली, स्वयंपाकघर, दोन शयनगृहे आदी सुविधांसह आहेत.

याशिवाय इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गात पोलीस ठाण्याची इमारत गेल्यामुळे तेथे नव्याने पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी ४ अधिकारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या सर्व कामावर ७५ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या वसाहतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठीच्या वाहनांचे लोकार्पण

गृह विभागाच्या विवक्षित प्रयोजनासाठी योजना अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरीता ३१ बोलेरो, ७ स्कॉर्पिओ,१ मराझो अशी एकूण ३९ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ‘डायल ११२’ प्रकल्पासाठी,  नवीन पोलीस ठाण्यांसाठी एस्कॉर्ट, पायलट वाहन तसेच जुनी वाहने निर्लेखित करुन त्याबदल्यात नवीन वाहने अशी ही ३९ वाहने घेण्यात आली असून त्यांचेही लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस शिपाई श्रीकांत गोसावी, पोलीस हवालदार विश्वास मोरे तसेच जयश्री गवळी यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले. पोलीस विभागाला चारचाकी आणि दुचाकी वाहनाचे पोलीस निरीक्षक प्रेमदिन माने यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वाहनांची चावी देऊन वाटप करण्यात आले.

तसेच प्रातिनिधिक स्वरूपात पुणे वन विभागातील संदीप सोनवणे, स्नेहल म्हेत्रे, संतोष रणशिंग यांना वनरक्षक पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय आज झालेल्या उद्घाटन प्रकल्पांच्या बांधकामात योगदान दिलेले अधिकारी, कर्मचारी, वास्तुविशारद, कंत्राटदार आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

०००

अहाहा ..काय ते ST स्टँँड अन काय ते पोलीस कार्यालय .. समदंच कसं डोळंं दिपवणारंं

खास ‘बारामती पॅटर्न’ असलेले पोलीस उपमुख्यालाय पोलीस उपमुख्यालय केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखा भव्यदिव्य उभारण्यात आले आहे. बऱ्हाणपूर या गावाच्या हद्दीत ६५ एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५ हजार ६५९ चौ. मी.च्या जोत्यावर ३२ हजार ७८५ चौ. मीटरमध्ये प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, आर.पी.आय. इमारत, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने, पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट कार्यशाळा या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ८०२ चौ. मीटर बांधकाम क्षेत्रावरील कामे प्रगतीपथावर असून यात क्लब हाऊस, जलतरण तलाव, इन डोअर शूटिंग रेंज, उपहारगृह, शॉपिंग सेंटर, खेळाच्या मैदानात बास्केटबॉल, व्हॉलबॉल, टेनिस लॉन, फुटबॉल मैदान, रनिंग ट्रॅक अशा सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजेच्या सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या एकूण प्रकल्पाचा खर्च १४२ कोटी ६२ लाख रुपये आहे.

डोळे दिपविणारे बारामती बसस्थानक
बसस्थानक, आगार व निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्यात आली असून बसस्थानाकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकतेने उभारला आहे. जागेचे एकूण क्षेत्रफळ २४ हजार ७४८ चौ.मी. आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर बस स्थानक कार्यालय, तळमजल्यावर आगार आणि पार्सल कक्ष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. बसेस उभे राहण्यासाठी २२ फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर २२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर २१ कार्यालये, १२३ आसनी परिसंवाद कक्ष, ३६ आसनी बैठक व्यवस्था आणि ३२ आसनी शयनकक्ष आहेत.

या बसस्थानकात ६५ बस, ४७ चारचाकी, ४० ॲटोरिक्षा आणि ११७ दुचाकी वाहनाकरीता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे. परिसराचे बाह्य सुशोभिकरण,फर्निचर तसेच प्रवाशांकरीता सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहे. बारामती शहराच्या वैभवात या बसस्थानमुळे भर पडली आहे.

बारामती अपर अधीक्षक कार्यालयाची माहिती
बारामती येथे अपर अधीक्षक कार्यालयात वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण १४ हजार ६२ चौ.मी. क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले आले. या कामाकरीता आतापर्यंत २७ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला आहे.

पोलीस वसाहतीचे उदघाटन
बारामती येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० वर्षापूर्वीच्या जुन्या बैठ्या दगडी ७५ निवासी खोल्या होत्या. त्या मोडखळीस आल्यामुळे तेथे ७ मजली ७ इमारती मूलभुत सोयीसुविधांसह बांधण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा १९६ पोलीस कुटुंबियांना होणार आहे. ही निवासस्थाने बैठकीची खोली, स्वयंपाकघर, दोन शयनगृहे आदी सुविधांसह आहेत. याशिवाय वालचंदनगर येथे पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी ४ अधिकारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या सर्व कामावर ७५ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरीता खरेदी करण्यात आलेली वाहने
गृह विभागाच्या विवक्षित प्रयोजनासाठी योजना अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरीता ३१ बोलेरो, ७ स्कॉर्पिओ,१ मराझो अशी एकूण ३९ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ‘डायल ११२’ प्रकल्पासाठी, नवीन पोलीस ठाण्यांसाठी एस्कॉर्ट, पायलटवाहन आणि जुनी वाहने निर्लेखित करुन त्याबदल्यात नवीन वाहने अशी ही ३९ वाहने घेण्यात आली आहेत

तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज:त्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन कायम साथ देऊ -शरद पवार

बारामती -रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असे खासदार शरद पवार यांनी बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात म्हटले आहे.

बारामती येथे विद्या प्रतिष्ठाणच्या संस्थेत नमोरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते. शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल

शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण- तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणाच बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकार तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो.

शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज मुळशीमधील काही भागात ६ तास वीज बंद

पुणे, दि. २ मार्च २०२४: महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. ३) सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुळशी तालुक्यातील काही गावातील सुमारे ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आढळून आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या पाच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामध्ये ४ वीजवाहिन्या उच्चदाब वीजग्राहकांसाठी आहेत तर एका वीजवाहिनीवरून घोटावडे, भरे, रिहे, कातरखडक, पिंपोली, मुलखेड, खानेकर वस्ती, भेगडेवाडी, ओझरकरवाडी, आंधेले गाव, बोरकरवाडी, आमलेवाडी, मातरवाडी, पडळकरवाडी, लांडगेवाडी, केमसेवाडी, खांबोली, गोडंबीवाडी एक व दोन, शेळकेवाडी, देवकरवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे सुमारे ६ हजार लघुदाब व चार उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.  

लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांचे  ‘इवलेसे रोप’ रंगभूमीवर

मंगेश कदम आणि लीना भागवत मध्यवर्ती भूमिकेत

‘इवलेसे रोप’ छान डौलदार बहरावं यासाठी त्याला चांगलं खतपाणी घालावं लागतं. नात्याचंही तसंच असतं ते चांगलं बहरावं यासाठी प्रेमाचं  आणि विश्वासाचं खतपाणी  घालायचं असतं. मुरलेल्या नात्याची अशीच  खुमासदार  गोष्ट घेऊन लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे १३ वर्षांनी रंगभूमीवर आल्या आहेत. रावेतकर प्रस्तुत, नाटकमंडळी प्रकाशित आणि खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई  निर्मित, ‘इवलेसे  रोप’ या  नव्या नाटकाचा  शुभारंभ ८ मार्चला आचार्य  प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर  कल्याण येथे  होणार आहे.  मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेते मंगेश कदम, अभिनेत्री लीना भागवत यांच्यासोबत मयुरेश खोले, अनुष्का गिते, अक्षय भिसे यांच्या भूमिका नाटकात आहेत.   

नातं ह्या शब्दाची जादूच वेगळी आहे. प्रत्येक नात्याची मजा ती उलगडण्यातच येते,पण जास्त आनंद ते नातं जपण्यात आणि आयुष्यभर निभावण्यात असते. मोजायला गेल्या तर कालांतराने नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नातं जेव्हा पिकतं तेव्हा अधिक गोड होतं या  टॅगलाइनसह आलेल्या ‘इवलेसे  रोप’ या नाटकात ‘माई’  आणि ‘बापू’ या नवऱ्या बायकोच्या  नात्यातील विविध रंग पाहायला मिळणार आहेत.

सई परांजपे यांनी लेखन,  दिग्दर्शन करत व्यावसायिक नाटके, बालरंगभूमी, चित्रपट, माहितीपट, लघुपट अशा क्षेत्रात आपला  वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘स्पर्श’ तसेच ‘चष्मेबद्दूर’,‘कथा’,‘दिशा’, ‘पपिहा’, ‘साज’ यांसारख्या वेगळय़ा धाटणीचे चित्रपट आणि अनेक  दर्जेदार नाटकं  देणाऱ्या सई परांजपे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे सन्मान लाभले आहेत.

‘इवलेसे रोप’ या आपल्या नव्या नाटकाबात बोलताना सई परांजपे सांगतात, ‘इवलेसे रोप’ ची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक हे माध्यम मला अधिक योग्य वाटलं. कोणत्याही नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी  काही गोष्टी गरजेच्या असतात या गोष्टींचा उहापोह या नाटकात गमतीदारपणे करण्यात आला आहे.  सई  परांजपे यांनी  ‘इवलेसे  रोप’  हे  छान नाटक आम्हांला  गिफ्ट केलं असून उत्तम संहिता असलेले हे नाटक आम्हाला करायला मिळालं  याचा आनंद अभिनेते मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांनी व्यक्त केला. सई परांजपे  यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव  विलक्षण होताच याचं  श्रेय सई  मावशीला  जातं  कारण  तिच्या मोठेपणाचं  दडपण  तिने आमच्यावर येऊ दिलं नाही.