Home Blog Page 1176

आपकी बार, भाजप तडीपार:उद्धव ठाकरे यांची नवी घोषणा; म्हणाले, ‘महाराष्ट्रातील युतीच्या 42 जागांमुळेच भाजप 250 पार’

भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाही कृपाशंकर सिंह यांचे नाव यावरूनच काय ते समजा

मुंबई-आगामी लोक निवडणुकीतील लढाई ‘माज’वादीविरुद्ध समाजवादी अशी अशी होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘आपकी बार, भाजप तडीपार’ अशी नवी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज दिली. धारावी मध्ये आयोजित संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उमेदवारांच्या पहिला यादीत नितीन गडकरी यांचे नाव हवे होते, असे म्हणत त्यांनी कृपाशंकर सिंग यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले.

मोदीजी आता फसवाफसवी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी प्रत्येक वेळी वेगवेगळे रूप घेऊन येतात आणि ‘भाई और बहनो’ म्हणत आपण एक असल्याचे सांगतात. अशीच दोन वेळा आमची देखील फसवणूक झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही देखील दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्या भुलथापांना बळी पडलो होतो. आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, आमच्या पदरात धोंडे पडले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मागील दहा वर्षांमध्ये देशांमध्ये केवळ नामांतर झाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ शहरे, रेल्वे स्टेशन आणि योजनांची नावे बदलायचे काम केले आहे. योजनांची केवळ नावे ते बदलत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. मात्र, आता त्यांनी ‘जुमला’चे नावे देखील बदलले आहे. त्यांनी जुमलाचे नाव गॅरंटी केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नेत्यांवर केवळ आरोप करायचे आणि आरोप करून त्यांना भाजपमध्ये घ्यायचे. भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जी 195 लोकांची नावे घोषीत केली, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची नावे आहेत. मात्र, आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा माहित नव्हते. तर भारतीय जनता पक्षाची ओळख ही आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार हे प्रमोद महाजन होते. त्यांचे आणि आमचे घरचे संबंध होते. त्यानंतरच्या काळात नितीन गडकरी यांच्याशी आमचे संबंध आले. त्यांनी महायुती सरकारच्या काळात चांगले काम केले. संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन गडकरी आहेत. मात्र, असे असले तरी पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याबद्दल ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्रातील एकही नाव यादीत नाही, यावरूनही तुम्ही बोलू शकता. मात्र, ज्या व्यक्तीवर तुम्ही कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, त्या महाराष्ट्रातील माणसाला या यादीत स्थान दिले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक – प्रा.डॉ. कस्तुरी पायगुडे

पिंपरी, पुणे (दि. ३ मार्च २०२४) लहान वयोगटातील बालकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे श्रवण आणि सराव केला तर स्मृती सुधारणे, सामाजिक, भावनिक, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास उपयोग होतो असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. गायन आणि योगाद्वारे शारीरिक हालचाली सह भाषा आणि संज्ञानात्मक, कलात्मक विकास साध्य करता येतो असे प्रा. डॉ. कस्तुरी पायगुडे राणे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘स्पीक मॅके’ (SPIC MACAY सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल) या संस्थेच्या वतीने ‘आरंभ’ या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख आणि आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. कस्तुरी पायगुडे राणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संयोजक सुमन डोंगा, प्राचार्य डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. ‘स्पीक मॅके’ या संस्थेची स्थापना आयआयटी दिल्ली येथील प्रा. किरण शेठ यांनी १९७७ मध्ये देशव्यापी स्वैच्छिक, चळवळ सुरू करून केली. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून देणे. त्याचे श्रवण आणि गायन केल्यामुळे होणारे सकारात्मक बदल याविषयी संशोधन करणे यासाठी ही संस्था काम करीत आहे. त्या अंतर्गत ‘आरंभ’ या प्रकल्पाचे पुण्यातील पहिले सत्र नुकतेच एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
आरंभ अंतर्गत लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची प्रेरणा देणाऱ्या संवादात्मक माध्यमातून योग आणि संगीत समजून सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

केवळ आंदोलने आणि असहकार चळवळ करून स्वातंत्र्य मिळालेले नाही- माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

 मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘दे दि हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल’ ही भावना भारतीयांची होत गेली , हे अंशतः खरे पण आहे, परंतु आम्ही खड्ग उचलण्याच्या लायक नाही का? कुणीतरी म्हटले चले जाव आणि परकीय गेले असे आहे का? त्याच्याआधी  स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी आपले रक्त सांडले, किती लोकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य मिळविण्याचा इतिहास मोठा आहे. केवळ आंदोलने आणि असहकार चळवळ करून स्वातंत्र्य मिळाले नाही, परंतु महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा विचार घराघरात पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले, असे मत माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.

मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफि थिएटर मध्ये झाला. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, पंडित शौनक अभिषेकी, सीए. धनंजय बर्वे, सीए. रणजीत नातु, सीए. अमेय कुंटे, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, रवी ढवळीकर यावेळी उपस्थित होते. प्रसाद माधवराव कुलकर्णी हे या वक्तृत्व स्पर्धेचे महाविजेते ठरले.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झालेली दिसली नाही. परंतु आज इतक्या वर्षानंतर गावागावात ‘आमच्याकडे पण कोणीतरी क्रांतिकारी होते’ याची आठवण उत्स्फूर्तपणे होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, आपण सतत पराभूत होतो ही भावना जाणून बुजून रुजवण्यात येत होती. विजयाच्या आठवणी पुसल्या गेल्या होत्या. परंतु अटक ते कटक, विजयनगर साम्राज्य ह्या आपल्या विजयाच्या आठवणी आहेत. ६५ वर्षात माझा देश स्वतंत्र आहे, हा भाव जागृत होणे गरजेचे होते, तर ते टिकवण्याची आणि बलशाली करण्याची ताकद आली असती. परंतु ते आता होत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर उपेक्षित नव्हते त्यांना पेलायची ताकद आता आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रमोद रावत म्हणाले, सध्याच्या राजकारणात आपल्या महान नेत्यांचा, त्यांच्या विचारांचा अपप्रचार होत आहे. तो थोपविण्यासाठी मेहनत लागते. यासाठी विचारांचे पाईक घडवावे लागतात. अशी मेहनत समाजात पुढे घेऊन जावी लागते, हे काम मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेतून होत आहे.

वक्तृत्व स्पर्धा विविध गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते –  १) नित्य श्रद्धा निळकंठ पवार (गट – इयत्ता पाचवी ते आठवी), वेदांत पंकज बागुल (इयत्ता ९ ते १२ वी), ईश्वरी दीपक डाखोळे (महाविद्यालयीन विद्यार्थी), सतीश सगदेव (ज्येष्ठ गट), तृप्ती अभिजीत यरनाळकर (युवा गट), संतोष कानडे (वरिष्ठ गट), मधुमंजिरी गटणे (नवनिर्मित काव्यरचना), माही आशिष गाडगीळ, अनुजा पेठे (वादविवाद, कौशल्य),  सारंग हेरंब चिंचणीकर आसावरी अमित बर्वे (नाट्यवाचन), गायत्री प्रसाद यरगुद्दी (संगीतमय सावरकर)

सुरभी नातू यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत नातु यांनी प्रास्ताविक केले. सीए अमेय कुंटे यांनी आभार मानले.

पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी गौतम चाबुकस्वार, महासचिवपदी अभिमन्यू सुर्यवंशी

पुणे-

पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनाची वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणुक रविवार दि.३ मार्च, २०२३ रोजी डिलक्स चौक, पिंपरी, पुणे येथे पार पडली. ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या संपुर्ण निवडणुक प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील ७ तालुके व २ कँटोन्मेंट बोर्ड याप्रमाणे एकूण ९ संलग्न संघटना प्रतिनिधी सहभागी झाले होते. निवडणुक निर्णय अधिकारी व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सहयोगी सदस्य श्री. मनोज भोरे यांनी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-

अध्यक्ष: ॲड. गौतम चाबुकस्वार (मावळ तालुका)
कार्याध्यक्ष: श्री. भरतकुमार व्हावळ (पुणे कँटोन्मेंट)
उपाध्यक्ष: श्री. अजितसिंग कोचर (खडकी कॅन्टोन्मेंट)
उपाध्यक्ष: श्री. कृष्णदेव क्षीरसागर (इंदापूर तालुका)
उपाध्यक्ष: श्री. संदीप देवकाते (बारामती तालुका)
महासचिव: श्री. अभिमन्यू सुर्यवंशी (हवेली तालुका)
खजिनदार: श्री. सुर्यकांत दुधभाते (शिरूर तालुका)
सहसचिव: श्री. निलेश खुडे (खडकी कॅन्टोन्मेंट)
सदस्य: श्री.पृथ्वीराज ओव्हाळ (भोर तालुका), श्री. इरफान शेख (बारामती तालुका), श्री. रवींद्र कजानिया (मावळ तालुका), श्री. आसिफ शेख (पुणे कँटोन्मेंट), श्री. अमोल गोडसे (इंदापूर तालुका), अमोल धनवडे (दौंड तालुका).

या सभेस निवडून आलेल्या सदस्यां व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय कोच श्री. विजय गुजर, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे प्रभारी सचिव श्री. अमोल सोनवणे, श्री. शकील शेख, श्री. सुधीर ओव्हाळ, श्री. योगेश सातव, इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

सुलतान्स ऑफ सिंधला पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद-महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी

mसिंधी तरुणांकडून सामाजिक भान जपत एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन

पुणे : सुलतान्स ऑफ सिंधने हेमू कलानी ग्लॅडिएटर्सचा १० गडी राखून पराभव करत पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा धीरज मनवानी सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. नाणेफेक जिंकून हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा हा सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.
हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने पहिल्या डावात ९ षटकात ४ गडी गमावत ५५ धावा करून सुलतान्स ऑफ सिंधला ४९ धावांवर रोखत अवघ्या ६ धावांची आघाडी घेतली. हेमू कलानी ग्लॅडिएटर्स दुसऱ्या डावातही फारसा प्रभावी खेळ करू शकले नाहीत. ९ षटकांत ८ बाद ४४ धावा करत ५० धावांचे आव्हान उभारले. पहिल्या डावात अंकुश आहुजाच्या २४ धावा वगळता इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. दोन्ही डावांत मिळून हानिशने ४० धावांत ३, अमितने २० धावांत ३, तर धीरज मनवानीने २२ धावांत २ गडी बाद केले.
पहिल्या डावात ४९ धावा करून पिछाडीवर असलेल्या सुलतान्स ऑफ सिंधसमोर विजयासाठी ५० धावांचे लक्ष्य होते. विजयी निर्धाराने मैदानात उतरलेल्या सुलतान्स ऑफ सिंधने आक्रमक खेळ केला. पहिल्या डावात सलामीवीर सनी सुखेजा (२४) व धीरज मनवानी (१९) यांनी दुसऱ्या डावातही अनुक्रमे १३ व नाबाद १३ धावा केल्या. डब्बू आसवानी (१५) व कर्णधार अमित (६) यांनी सुलतान्स ऑफ सिंधला विजय मिळवून दिला. यतीन मंगवानीने ३२ धावांत २, तर पवन पंजाबीने २० धावांत २ गडी बाद केले. 
सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन, सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संस्थेला दीड लाख, तर आळंदी येथील अंध मुलींच्या शाळेला ५० हजारांची देणगी देण्यात आल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले.————————————-महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयीसिंधी प्रीमिअर लीगमध्ये यंदा पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा घेण्यात आली. सहा संघांचा यात समावेश होता. गंगा वॉरियर्स आणि झेलम क्वीन्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानीच्या धडाकेबाज ३४ चेंडूतील ९५ धावांची खेळी व चार धावांत ३ गडी बाद करत केलेली भेदक गोलंदाजी याच्या जोरावर झेलम क्वीन्सवर ४८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत वॉरियर्सने ८ षटकांत ४ बाद ११४ धावा केल्या. ११५ धावांचे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झेलम क्वीन्सने चांगली सुरुवात केली. मात्र, सलामीवीर अंजली आसवानी (१२) जायबंदी झाल्याने, तसेच नेहा (१८) व याकृत (२४) फटके मारण्याच्या नादात लवकर बाद झाल्याने त्यांचा डाव गडगडला. अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने ७.४ षटकांत अवघ्या ६६ धावांत झेलम क्वीन्सचा डाव संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला. ————————-संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)हेमू कलानी ग्लॅडिएटर्स : पहिला डाव – ४ बाद ५५ (अंकुश अहुजा २४, यतीन मंगवानी ८, अमित ८-२), सुलतान्स ऑफ सिंध : पहिला डाव – ७ बाद ४९ (सनी सुखेजा २४, धीरज मनवानी नाबाद १९, पवन पंजाबी १२-२, यतीन मंगवानी १९-१, नरेंद्र लुंड १०-१) हेमू कलानी ग्लॅडिएटर्स : दुसरा डाव – ८.५ षटकांत सर्वबाद ४४ पराभूत विरुद्ध सुलतान्स ऑफ सिंध : दुसरा डाव – ७.५ षटकांत २ बाद ५२ (डब्बू आसवानी १५, सनी सुखेजा १३, धीरज मनवानी नाबाद १३, यतीन मंगवानी १३-१, मनीष कटारिया २२-१)————————–संक्षिप्त धावफलक : (महिला गट)
गंगा वॉरियर्स – ८ षटकांत ४ बाद ११४ (शीतल आसवानी ९५, नेहा १५-२) विजयी झेलम क्वीन्स : ७.४ षटकांत सर्वबाद ६६ (याकृत २४, नेहा १४, अंजली आसवानी १२, शीतल आसवानी ४-३, सम्या ५-२)

रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन:काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती, या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला, त्याला यश आले, परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप’ पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी ६ तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो सेवा मुळात काँगेसचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल २ विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

निवडणूक विषयक समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मतदार नोंदणी आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे दि.२९-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी कामासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. पात्र व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्यावा, निवडणूक प्रक्रिया उत्तमरीतीने पार पाडण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी दिले.

बैठकीला मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि विविध विषयांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे वेळेवर होतील याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेली कालमर्यादा पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि क्षमतेने काम करावे. चारही मतदारसंघात जबाबदऱ्यांची मानके किंवा नमुने ठरवून त्यानुसार काम करावे. दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधेचे नियोजन करावे.

एकाच ठिकाणी पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास अशा ठिकाणी स्वयंसेवकांची मदत घ्यावी. पुणे शहरात प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सुविधा करण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करतांना त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी श्रीमती कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीत मतमोजणी स्थळ, वाहतूक आणि संवाद आराखडा, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, निवडणूक विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण, निवडणुकीसाठी मनुष्यबळ, निवडणूक खर्चाबाबत दर निश्चिती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदीविषयक आढावा घेण्यात आला.

पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ‘ताडोबा भवन’

चंद्रपूर, दि. 3 : ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे पंतप्रधान ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटर मध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.  चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन करताना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता राजेश चव्हाण, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

सुरवातीला इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन झाले असे घोषित करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा भवन ही निर्जीव इमारत नसेल. तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ते एक चालतं-बोलतं विद्यापीठच राहील.  देशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतो, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहे, तशीच वसुंधरेची रक्षा रक्षा होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहील.

पुढे ते म्हणाले, ताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावे, या इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नये, त्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम :

वन विभागाच्या इमारती, विश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुध्दा कॅम्पा मधून उत्तम करण्याच्या सुचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन :  

चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालक, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर (1360.47 चौ. मी.) 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयम, पहिल्या माळ्यावर (1558.58 चौ. मी.) उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर (1563.14 चौ. मी.) क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप

मुंबई, दि.3 – देशात जवळपास 6.3 कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे. यातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना श्रवणयंत्र तसेच इतर सुविधांचे लाभ मिळत नाहीत.  या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  सर्वांना दृष्टी व श्रवणाची क्षमता प्राप्त झाल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जागतिक श्रवण दिवसानिमित्त राज्यपाल बैस  यांच्या हस्ते रविवारी (दि. 3)  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गरीब आणि गरजू कुटुंबातील 250 लहान मुलामुलींना मोफत  श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने तसेच सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, बहिरेपणामुळे मुलांचे अवलंबित्व वाढते.  या विकलांगतेमुळे देशाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती देण्याची सूचना केली असून राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने दिव्यांगांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला ‘विकलांग मुक्त’ बनविण्याच्या कार्यात अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

बहिरेपण असलेल्या मुलांच्या समस्यांचे लवकर निदान व उपचार होणे गरजेचे आहे असे सांगून शाळांमधून मुलांच्या श्रवणशक्तीची चाचणी झाली पाहिजे तसेच श्रवण दोष असलेल्या मुलांना गरजेनुसार कॉक्लीअर इम्प्लांट करुन दिले पाहिजे. या कार्यात कॉर्पोरेट्सने देखील सहकार्य केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

सांकेतिक भाषेतील शिक्षक निर्माण करावे: अनुराधा पौडवाल

लहान मुलांना ‘दिव्यांग प्रमाणपत्र’ मिळत नाही. त्यामुळे त्यांना श्रवणयंत्र आदी साहित्य मिळत नाही असे सांगून लहान मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्याबाबत राज्यपालांनी मदत करावी असे आवाहन अनुराधा पौडवाल यांनी यावेळी केले. महाविद्यालयांमध्ये ‘सांकेतिक भाषा’ शिकवली जावी तसेच सांकेतिक भाषा शिकविणारे प्रशिक्षित शिक्षक देखील निर्माण केले जावे, असे त्यांनी सांगितले.

सूर्योदय फाउंडेशन या संस्थेने आतापर्यंत 2000 मुलांना श्रवणयंत्र भेट दिले असून वर्षाअखेर आणखी 1500 मुलांना श्रवणयंत्र दिले जाणार असल्याचे कोषाध्यक्ष कविता पौडवाल यांनी सांगितले.

महाट्रान्सको या संस्थेने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून 250 लहान मुलांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात केले. कार्यक्रमाला महाट्रान्सकोचे संचालक विश्वास पाठक, टाइम्स समूहाचे विनायक प्रभू व WS ऑडिओलॉजी कंपनीचे मुख्याधिकारी अविनाश पवार उपस्थित होते.

ONGC कृष्णा गोदावरी खोऱ्यातील ब्लॉकमधून पहिल्या क्रूड ऑइल टँकरला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली |

भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीचे प्रतीक म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज ONGC च्या कृष्णा गोदावरी खोऱ्यामधून ‘पहिला क्रूड ऑइल’ टँकर ‘स्वर्ण सिंधू’ला हिरवा झेंडा दाखवला. या प्रकल्पाने उत्पादनाची उच्च पातळी गाठल्यानंतर हा प्रकल्प भारताच्या तेल आणि वायू उत्पादनात  7 टक्के वाटा घेईल.

बिहारमधील बेगुसराय येथे आयोजित या समारंभास बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार आणि ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभाग मंत्री आणि खासदार, बेगुसराय लोकसभा मतदारसंघ श्री गिरीराज सिंह यांच्यासह माननीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंग पुरी आणि पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ मान्यवर, ONGC चे अध्यक्ष आणि CEO आणि ONGC चे संचालक श्री अरुण कुमार सिंग उपस्थित होते.

ONGC कृष्णा गोदावरी खोऱ्यातून पहिल्या कच्च्या तेलाच्या रवानगीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

कार्यक्रमादरम्यान, माननीय पंतप्रधानांनी कृष्णा गोदावरी नागायलंका NELP ब्लॉकमधील ONGC चा मुंबई हाय नॉर्थ ऑइल फील्ड पुनर्विकास टप्पा IV, हीरा पुनर्विकास टप्पा-III आणि टप्पा-II विकासदेखील राष्ट्राला समर्पित केला.

कृष्णा गोदावरी खोऱ्यातील KG-DWN 98/2 डीपवॉटर ऑइल फील्ड M हा 41,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह विकसित केलेला सर्वात तांत्रिकदृष्ट्या जटिल प्रकल्पांपैकी एक आहे. प्रकल्पातून एकूण अपेक्षित शिखर वायू उत्पादन आणि तेल उत्पादन सुमारे 10 MMSCMD (दशलक्ष मानक घन मीटर प्रतिदिन) 45,000 BOPD (प्रतिदिन तेलाचे बॅरल) आहे.

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार ONGC कडे कट्टुपल्ली येथे भारतीय उत्पादकांनी बनवलेल्या सर्व उपसमुद्री संरचना आहेत.

… निष्ठावंतांना डावलले तर कॉंग्रेस भवनला म्हटले जाईल ठेकेदारोंका खिदमतघर किंवा ‘मॅजिक हाऊस’

पुणे-लोकसभेच्या रणांगणात देशात नमो ना कोणाचे आव्हान पेलायचे असेल तर ते म्हणजे राहुलगांधींचे आणि प्रियांका गांधींचे , या दोन नावाची नमोंना भयंकर भीती वाटते असे बोलले जाते . पण केवळ गांधी या नावानेच काँग्रेस पक्ष चालत आला हेही तेवढेच खरे आहे. या पक्षाला लोक चांगले मिळत नाहीत हे या पक्षाची दुरावस्था होण्यामागचे सरावात पहिले आणि प्रमुख कारण आहे. तरीही गांधी या नावावर हि सर्वधर्मभावची नौका पार होते आहे . जिची मोदी :शहांना त्यांच्याकडे सारे काही असूनही धडकी भरते आहे. ज्या पक्षाने कलमाडी ,लालू यादव यांचे अपराध देखील माफ केले नाहीत, या पक्षाला अजूनही चांगली माणसे मिळू नयेत हे या पक्षाचे दुर्दैव मानले जाते.

महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यातल्या काँग्रेस भवनावर अत्यंत चांगले आणि अत्यंत वाईट दिवस पाहण्याची वेळ वारंवार आली, पण अलीकडे या भूमीच्या ,भवनाच्या नशिबी मात्र चांगले दिवस येणार काय ? हे कॉंग्रेस भवन’ सच्चे सेवको के लिये खिदमतगारोका घर बने’ … हे गांधीजींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार कि हे ठेकेदारों के लीये खिदमत घर बनणार ? हेच आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मोदी सरकारला या देशावर १० वर्षे जनतेने संधी दिली .या १० वर्षातील कारकीर्द पाहता जनता आता पुन्हा कॉंग्रेसला संधी देईल असे मानणारा मोठा वर्ग देशात आहे. पण लोकसभेची उमेदवारी देताना या पक्षाची कसोटी लागणार आहे. या संधीचे सोने करायला अनेकजण टपून आहेत, आणि त्यात काही धर्मांध , काही मॅजीक वाले , काही दलबदलू आहेत हेही जनता जाणून आहे. जी गरिबोंके लिये खिदमत गारों का मकान नाही तर कॉंग्रेस भवन हे ठेकेदारोंके लिये खिदमत घर बनवतील यात शंका नाही . आणि अशाच लोकांच्या नावाची उमेदवारी देताना प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना भुरळ पडू लागली आहे हे वास्तव आहे .

पुणे लोकसभा निवडणुकीत महापालिकेच्या गेल्या सत्ताकाळातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला कॉंग्रेस मुक्त भारत करू पाहणाऱ्या भाजपने उमेदवारी दिली तर हातून निसटलेला कॉंग्रेसचा हा गड पुन्हा हाती मिळवायची हि निवाद्नुक्म्हन्जे नामी संधी मानली जाते. आता हि संधी घालवायची कि आपली तत्वे , निष्ठा , प्रामाणिकपणा पाळत या संधीचे सोने करायचे हे प्रादेशिक नेत्यांच्या हाथी आहे. येत्या ५ आणि ६ तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे ज्यात जागा वाटप निश्चित होईल आणि कॉंग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या २/३ उमेदवारांची नावे दिल्लीदरबारी पाठवली जातील असा अंदाज आहे.आणि १० तारखेला कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर होईल असे सांगितले जाते आहे.

पुण्याच्या कॉंग्रेस मधून अनेकजणांनी उमेदवारी मागितली आहे ओबीसी वर्गाला उमेदवारी द्यायची म्हणून एखादे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो आहे. पण वेगवेगळ्य पक्षात नेत्यांना दगा देऊन , वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी,मारहानीच्या धमक्या देत,आपण मोठ्ठे पूजक आहोत असे चित्र दाखवीत देवादिकांचा धाक निर्माण करून अंध श्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या , कॉंग्रेस विरोधी धोरणाच्या इच्छुकाला उमेदवारी देण्याचा घाट घातला जातोय अशी अनेकांची समजूत होऊ लागलीये.आणि याच समजुतीतून संबधीताच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची हव्वा हि पसरवली जाते आहे. सर्वात वाईट म्हणजे सारे पक्ष निष्ठ हे शांतपणे पाहत आहेत आणि याबाबत दिल्लीपर्यंत माहिती न्यायला देखील कुणी पुढे यायला तयार होईना हे आणखी मोठे दुर्दैव आहे. पण सत्य कधी झाकले गेलेय काय ?झाकले जाणार आहे काय ? या प्रश्नांचे उत्तरे आता या पक्षातील होणाऱ्या हालचालींच देतील यात शंका नाही .

पुण्यातून भाजप विरोधातील लढाई तशी सोपी नाही
काँग्रेस पक्षातून यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे ,निष्ठावंत म्हणून पक्षाची मोट नेहमी पुढे नेऊ पाहणारे माजी आमदार मोहन जोशी ,शिवसेनेचे रमेश बोडके यांचा पराभव करून नगरसेवक झालेली आणि मनसे चे नगरसेवक केलेले आणि आताचे कसब्यात आपला झेंडा रोवलेले आमदार रवींद्र धंगेकर, नागरी संघटनेचे ना. तू. पवार यांचा पराभव करून राजकारणात सक्रिय झालेले आणि शांत स्वभावाचे म्हणून परिचित असलेले व्यापारी वर्गाचाही पाठिंबा मिळविलेले अभय छाजेड , वारंवार महापालिका निवडणुकीत विजय मिळवीत कायम आयुष्यभर नगरसेवक पदी काम करत राहिलेले काँग्रेसचे निष्ठावंत आबा बागुल अशी प्रमुख नावे रेस मध्ये आहेत.लोकांना काँग्रेस हवी आहे, पण काँग्रेस चांगल्या लोकांना पुढे स्थान देत नाही हि कायम तक्रार राहिली आहे. तसे पाहिले तर काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येऊ शकतात असा अनेकांचा अंदाज आहे पण पक्षातील अंतर्गत पाय खेचाखेची च्या राजकारणात त्यांनी माघार घेतल्याचे दिसले आहे.दीप्ती चवधरी यांनी आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत चांगले काम केले आहे .पण त्याही निवडणूक लढवू इच्छित नाहीत . निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असलेले बळ अनेक चांगल्या उमेदवारांकडे नाही हे हि तितकेच खरे आहे. पण त्याचबरोबर निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष महत्वाचा मानायचा झाले तरी कॉंग्रेसकडे २/३ इच्छुक यंदाही आहेत फक्त त्या योग्य निष्ठावंत चेहऱ्यांना प्रादेशिक नेते ओळखू शकणार काय ? हि त्यांचीच कसोटी ठरणार आहे.

दादा हे वागणं बरं हाय काय …?

शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवारांनी राजकीय दृष्टीने डॉ. अमोल कोल्हे यांना कट्टर विरोधक केलं ,आमचे काहीही म्हणणे नाही, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना पाडायची जय्यत तयारी करू द्यात आमचे काहीही म्हणणे नाही. आपण आपले काका आणि बहिण यांच्या विरोधात राजकीय शड्डू ठोकलेत तर कोल्हे कोण ? हे आम्ही समजू शकतो ..पण दादा ,तुम्ही असं करायला नको होतं … त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन त्यांचा असा अवमान करणं अपेक्षित नव्हतं , दादा हे वागणं बरं हाय काय ? ….असा प्रश्न उपस्थित करणारी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे,शंभूराजेंच्या नावाचा राजकीय इव्हेन्ट करून राजकीय वापर करत अमोल कोल्हे यांच्या स्थानिक मतदारसंघात त्यांचे नाव न टाकता ,निमंत्रण न देता त्यांचा अवमान करणे अनेकांना रुचलेले नाही , माळी आणि ओबीसी समाजातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिरूर ला कोल्हेंना धूळ चारू पाहणाऱ्या दादांना आता झटका नेमका किती व्होल्ट चा बसेल ते येणारा काळच सांगणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ काल (2 मार्च) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडले.खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.खुद्द शंभूराजेंचा ही फोटो नाही निव्वळ राजकीय पक्षांचे झेंडे ..हि कल्पना मानवली नाही म्हणून त्यांनी येथून काढता पाय घेतला.

खासदार अमोल कोल्हे यांनी नेमके काय म्हटलेय ….

काही लोकं 15 वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही?

शंभूराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाची संकल्पना आम्ही राबवली, ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी परिश्रम घेऊनही आज फलकावर शंभूराजांचा फोटो नाही, तसेच कोनशिलेवर नामोल्लेख नाही व कार्यक्रमातही स्मारकाबाबत बोलण्याची संधी न देता डावलण्यात आल्याच्या भावनेतून खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी तीव्र नाराजीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे भाषण चालू असतानाच सभात्याग केला. याबाबत आमदार पवार म्हणाले, “हा विकास आराखडा मंजूर व्हावा व निधी उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही सतत पाठपुरवठा केला. स्थानिक खासदारांनाही डावलले जाते, याची खंत आहे. आम्हाला केवळ व्हॉट्स अॅपवर निमंत्रण पाठविले होते. राज्य सरकारकडून कोणतेही अधिकृत निमंत्रण मिळाले नाही. भूमिपूजन फलकावरही आमची नावे नाहीत

ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे. त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. हा सोहळा नाही तर राजकीय इव्हेंट होता, अशी टीका  खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, खरं तरं नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग होत आहेत. जवळपास 1 लाख लोकं हा प्रयोग याची देही याची डोळा अनुभवतात. त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो, अशी कार्यक्रम आयोजित केला त्यांची समजूत झाली असेल. आणि पुण्यात कोथरूडमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दरवर्षी महापालिका निधीची तरतूद करतेय , कुठे कोथरूडच्या शिवसृष्टी ? अशा प्रश्न त्यांनी केलाय.निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा ही जिवंत चैतन्यातून मिळते, हेच चैतन्य जागविण्यासाठी आता अहमदनगरमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याचेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली 334 वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवणही अमोल कोल्हे यांनी करुन दिली.  काही लोकं 15 वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास 157 देशात पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो.ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच 2019 नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरं म्हणजे कोनशिलेवर नाव नसलं तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय हे मायबाप जनता जाणते, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

गेल्या दोन दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली. त्यामुळे काल रात्री उशिरा म्हणजे 10.42 वाजता कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता. त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटचे स्वरुप दिल्यामुळे या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचविणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

ई मोटारींसाठी महापालिका भाडे मोजणार २७ कोटी, आणि इचार्जींग स्टेशनला सहा भूखंड मोफत-मर्जीतील ठेकेदारांना गब्बर करणारी महापालिका

काही लोकांसाठी PMC बनली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी

पुणे- महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जिथे महापालिकेच्या क्षेत्रफळाचा प्रश्न आहे, दूरवर हद्द पोहोचली आहे जिथे सातवा वेतन आयोग घेणाऱ्या असंख्य अधिकाऱ्यांना वारंवार साईटवर जावे लागते या सर्वांना मोटारी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ई -मोटारी घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्ताव चांगला आहे. प्रदूषण कमी होईल,चालक म्हणून बेरोजगारांना रोजगार थेट महापालिकेचे चालक म्हणून उपलब्ध होईल या सध्या सरळ चांगल्या दिसणाऱ्या प्रस्तावाचा लाभ ‘भुरटे ‘ घेणार नाहीत तर कोण घेणार ? असा प्रश्न कोणी जर उपस्थित केला तर ? आणि हो आता तसाच विषय महापलिकेत होतो आहे. बेरोजगारांना थेट महापालिकेत कशाला नौकरी द्यायची,त्यांना ठेकेदारांची गुलामी करू द्यात,ठेकेदाराला त्यांच्या कमाईचा मलिदा खाऊ द्यात,आणि मोटारी खरेदी कशाला करायच्या त्या भाड्याने घेऊ यात,असा अनैतिक धंदेवाईक वाटेल असा प्रस्ताव महापालिका प्रशासन सध्या मंजूर करत आहे. एखाद्या ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी चाललेला हा आटापिटा कुणाच्या लक्षात का येत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

काय आहे हा प्रस्ताव प्रथम समजून घ्या…

महापालिका आपल्या अधिकाऱ्यांसाठी ९४ ई -मोटारी ५ वर्षासाठी २७ कोटी रुपये खर्च करून भाड्याने घेणार आहे.

आता या मोटारींसाठी ६ भूखंड महापालिका ठेकेदाराला देणार आहे जिथे तो चार्जिंग स्टेशन चालविणार आहे.

म्हणजे ठेकेदाराला मिळणार २७ कोटी रुपये आणि सहा भूखंड..आता तिथे तो अन्य काय व्यवसाय करेल,या भूखंडावर तो किती माया गोळा करेल हे त्याचे कौशल्य.आणि हाथ मिळवणी चा भाग.

आता पाहू या ९४ ई -मोटारी थेट महापालिकेने खरेदी केल्या तर ..

एखाद्या कंपनीला थेट एवढ्या मोटारींच्या खरेदीची ऑर्डर दिली तर ५ वर्षासाठी कंपनी फ्री सर्विस देईल असे वाटत नाही?

शिवाय काही सवलतीचा दर लावणार नाही असे वाटत नाही?

याही शिवाय शासन ई मोटारी खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी किती अनुदान देते ? त्यात काही वाढ होऊ शकत नाही?

या मोटारींवर चालक नेमण्यासाठी महापालिकेने थेट भारती केली तर..किती बेरोजगारांचे कल्याण होऊ शकेल ?त्यांच्यावर असा किती खर्च येऊ शकेल?

म्हणजेच मोटारी केवळ ५ वर्षे नाही तर कायमस्वरूपी महापालिकेच्या मालकीच्या राहतील आणि त्यावरील चालक देखील सेवेत राहतील ज्यांची कुणी घरबसल्या आर्थिक वा शाररीक पिळवणूक करू शकण्याची शक्यात दिसणार नाही.

…पण या सर्व प्रश्नांना बगल कशी द्यायची ते महापालिका प्रशासनाला चांगले ठाऊक आहे. आणि त्यांच्या डोळ्या समोर ठेकेदार ठेऊन त्यांनी या योजनेला अगदी गोंडस स्वरूप दाखवून वर लोकांची वाहव्वा मिळवणे सुरु केले आहे. ठेकेदाराला गब्बर करून गरीब बेरोजगारांची अवस्था आणखी दिन करून ठेवण्याचाच उद्देश यामगे असल्याचे स्पष्ट आरोप आता होत आहेत आणि होणार आहेत. जसे महापालिका सुरक्षा रक्षकांचे टेंडर एका नामचीन आमदाराला दिले गेले आणि मग अत्यल्प पगारात शेकडो सुरक्षा कामगारांची पिळवणूक हीच महापालिका बघत आली आहे. एवढेच नव्हे तर याच महापालिकेने हजारो च्या संख्येने कंत्राटावर कामगार घेतलेले आहेत.म्हणजे ठेकेदारांच्या मार्फतच ते घेतलेत.

खरे तर इथल्या आजवरच्या कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी किती मुजोरी केली याचा हा नमुना शोधून सापडणार नाही असाच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये गरजू कामगारांना अशा वेठबिगारी पद्धतीने राबवून घेणे,चमचेगिरी करतील,हाजी हाजी करतील त्यांना सेवेत घेणे हि इथली आता परंपराच बनली आहे.जी जी कामे कायमस्वरूपी आहेत त्या त्या कामांवर कुणलाही कंत्राटी पद्धतीने भारती करता येणार नाही असा कायदा आहेच.पण अगदी मुख्यमंत्र्यांपासून आयुक्तांपासून ते इथल्या कामगार आयुक्त,कामगार कल्याण अधिकारी या सर्वांनीच याकडे बिनधास्त डोळेझाक चालविली आहे. आणि हो यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही,कारण गुलामी करणारे, हाजी हाजी करणारे एक धुंडो मिळते ही हजारो..अशी परिस्थिती आहे. आणि विरोध तर कोणी करायची हिम्मत द्खील दाखवीत नाही. एवढेच काऊ थेट मिळकत कर विभागात बसून कर गोळा करताना एक बोगस कामगार आयुक्तांच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरच रंगे हाथ माय मराठी ने पकडून दिला त्यावर तर कोणीच तोंड उचकटले नाही.आसे अन्य कामगार हि महापालिकेत राबताहेत जे ना ठेकेदाराचे आहेत ना महापालिकेचे आहेत पण थेट ते आयुक्तांच्या कार्यालयात त्यांच्याशी संपर्क साधतात,महापालिकेच्या सभागृहात सारे कामकाज सांभाळतात हेही माय मराठी ने दाखवून दिलेले होते.पण यांना साथ मोठी मजबूत आहे. म्हणूनच ते या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे पुढे चालत आहेत.हेच दिसून आले आहे.

आता लोकप्रतिनिधी नसतानाही यात फरक पडला नाही हे विशेष म्हणावे लागणार आहे.

आता महापालिकेने हि गोंडस योजना कोणत्या स्वरूपात आणली आहे ते पाहू या.

महापालिकेने अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी पेट्रोल कार ऐवजी इलेक्ट्रिक कार पाच वर्ष भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठेकेदाराला महापालिका २७ कोटी रुपये देणार आहे. मात्र, पेट्रोल आणि इ कारचा तुलनात्मक अभ्यास केला असता, त्यामध्ये महापालिकेला पेट्रोल कारच्या वापरासाठी ४४ कोटी ७ लाख रुपयांचा खर्च होतो असा दावा महापालिकेने केला आहे.

तर इ कारसाठी २७ कोटी रुपये खर्च येणार आहे. इ कारमुळे ४० टक्क्यांनी खर्च कमी होऊन कमी होऊन महापालिकेचे १७ कोटी ७ लाख रुपये बचत होणार आहेत. महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांना कारची सुविधा उपलब्ध आहे.राज्य सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी शासकीय सेवेत इ कारचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला. पुणे महापालिकेने त्या धोरणानुसार इ कार घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये सेदान आणि एसयुव्ही या दोन प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या कामाची निविदा स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी आहे.महापालिका मोठ्या प्रमाणात म्हणजे एकदम ९४ गाड्या भाड्याने घेणार असल्याने त्याचा दरवर्षी ५ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत इ कार महापालिकेला परवडते का? याची तुलना केली असता त्यात पैशाची बचत होत असल्याचे समोर आले.महापालिकेची निविदा काढताना त्यात महागाईप्रमाणे दरवर्षी ठरावीक टक्के रक्कम ठेकेदाराला देण्याचे मान्य केलेले असते. पण इ कारच्या निविदेत पाच वर्षात महापालिकेला वाढलेले वीज बिल, चालकाचा पगार, देखभाल दुरुस्तीचा खर्च यासह इतर कोणत्याही कारणाने वाढीव रक्कम दिली जाणार नाही.

महापालिकेच्या मोटार वाहन विभागचे वाहतूक व्यवस्थापक ऋषिकेश चव्हाण यांनी तर स्पष्ट म्हटले आहे कि,’या योजनेमुळे चालकाच्या पगाराचा भार उचलावा लागणार नाही, म्हणजे त्यांना चालकांच्या कामाबाबत, कुटुंबाच्या चरितार्था बाबत किती काळजी आहे हे दिसून येते,कारण ते तर इथे सेटल झालेले आहेत. जर महापालिकेला चालक कायम स्वरूपी पाहिजेत तर ते कंत्राटावर, ठेकेदाराच्या मार्फत का घेऊ इच्छितात ? हा प्रश्न त्यांना विचारणारे कोणी नाही,न हा कायदा त्यांना सांगणारे कोणी नाही ते पुढे ते म्हणतात – १४ ते १४.५ लाख रुपये किमतीची नवी कार मिळणार,- इ कार प्रति दिन ८० किलोमीटरचा प्रवास अपेक्षित- ठेकेदार सहा चार्जिंग स्टेशन उभारणार,पण यासाठी महापालिका कुठे कशी कितीजागा उपलब्ध करून देणार ?ठेकेदार तिथे अन्य गाड्यांचे चार्जिंग करणार काय ?अन्य व्यवसाय करनार काय या संदर्भात ते काहीही म्हणत नाहीत,पुढे ते म्हणतात -‘‘राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिच्या सेवेत इ कार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ९४ कार पाच वर्षाने भाड्याने घेतल्या जाणार आहेत. पेट्रोल कारच्या तुलनेत इ कारच्या वापरामुळे १७ कोटी पेक्षा जास्त निधीची बचत होणार आहे.’’

सध्या ठेकेदारावरील त्या ४० चालकांचे काय हो ?
चालक हे पद असे आहे महापालिकेत जे कायमस्वरूपी मानले जाते आणि याच पदावर कंत्राटी भारती केली जाते आहे . कंत्राटी भरती म्हणजे एखाद्या ठेकेदाराच्या मार्फत लोक कामासाठी घेणे आणि त्यांचा पगार ठेकेदाराला महापालिकेने देणे आणि नंतर त्या ठेकेदाराने कामगारांना पगार देणे या प्रक्रियेत प्रत्येक कामगाराच्या घामाचे पैसे मध्ये खाल्ले जातात काम करतो कोण आणि मलिदा खातो कोण? अशी हि कंत्राटी सेवा आहे. सध्या महापालिकेत ४० चालक कान्तार्ती सेवेत असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे या ४० लोकांना गेली ४ महिने पगार झालेले नाही अशीही ओरड होते आहे. कायम कंत्राटी कामगारांनाच पगार होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात . कायम सेवेत असलेल्यांना याबाबत चिंता नसते. वेतन आयोग वगैरे त्यांचे सुरळीत असते . पण शिव्या खाणारे , कष्ट करणारे यांना योग्य दाम मिळत नाही अशी इथली व्यवस्था बनली आहे. आता ज्या ४० लोकांचे पगार ज्याने थकविले आहेत त्यालाच तर पुन्हा E मोटारी भाड्याने देण्याचे २७ कोटीचे काम महापालिका करत नाही ना ? हे देखील पाहणे जरुरीचे आहे

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न

पुणे – रसिकशेठ यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतू आपल्या स्वकर्तुत्वाने आणि कठीण परिस्थितीतूनही कष्टाने उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले आणि उद्योगजगतात जसे अजरामर झाले तसेच सामाजिक कार्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतभर उमटविणारे श्री रसिकशेठ यांनी गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आर एम डी फाऊंडेशनच्या मदतीने शिष्यवृत्ती योजना राबवून गेल्या 18 वर्षापासून आज पर्यंत १२००० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी दिली. श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आपल्या वडिलांची सामाजिक कार्यपरंपरा सतत कार्यरत राहण्यासाठी नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात त्यांच्याच आशीर्वादाने आज भारत भर अनेक सामाजिक उपक्रम सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येतात व पुढेही नवनिर्माण योजना राबविल्या जातील अशी भावना फाऊंडेशन द्वारा आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी व्यक्त केली.यावेळी बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री पुनीत बालन उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते श्री मकरंद अनासपुरे यांनी केले..

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शुभेच्छा देण्यासाठी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली व रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी, उदयोग जगतातील मान्यवर,विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी,शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालियन विद्यार्थी,पोलीस अधिकारी, इत्यादी रक्तदाते रक्तदानास स्वईछेने आले होते. यावेळी 425 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सर्व रक्तदात्यांचे शोभा धारीवाल यांनी आभार मानले .

भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

मुंबई दि. २ : निर्यातबंदी उठल्यानंतर प्रथमच भारतातून अमेरिकेला समुद्रमार्गे डाळिंब निघाली आहेत. वाशी येथील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरुन एकूण ४ हजार २५८ पेट्यांमधून १४ मे. टन डाळिंब भरलेला कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्र न्हावा-शेवा येथून समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क बंदराकडे रवाना करण्यात आल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे.

सन 2017-2018 मध्ये डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी घातली होती.  त्यामुळे गेली 5-6 वर्षे अमेरिकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नाही. ही निर्यातबंदी उठविण्याबाबत अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार सन 2022 पासून अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवली, मात्र त्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या. त्यामध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानकांनुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. त्यानुसार अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जुलै 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर डाळिंबाची पहिली शिपमेंट विमानमार्गे कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाने डाळिंबाची आणखी एक शिपमेंट विमानमार्गे अमेरिकेला पाठवण्यात आली.

अमेरिकेचे निरीक्षक डॉ. लुईस हे कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावर डाळींब तपासणीसाठी जानेवारी ते मार्च 2024 या हंगामासाठी कार्यरत आहेत. पहिल्या समुद्रमार्गे डाळिंब कंटेनरसाठी प्रथम यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) यांच्या पॅकहाऊस येथे डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सदर डाळिंब 4 किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्रात अमेरिकन इन्‍स्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण 4 हजार 258 बॉक्सेसमधून 14 मे. टन डाळिंबाचा कंटेनर दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी नाव्हा शेवा येथील जे.एन.पी.टी. वरुन समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी रवाना करण्यात आला.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी डाळिंबाच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, अपेडाच्या महाप्रबंधक विनीता सुधांशु, अपेडा मुंबईचे उपमहाप्रबंधक प्रशांत वाघमारे, एन.पी.पी.ओ.चे अधिकारी डॉ. ब्रिजेश मिश्रा; अमेरिका दुतावासाचे मायकेल श्रुडर आणि एल्म्स रायनॉन, अमेरिकन निरीक्षक डॉ. लुईस फेलीसियानो, कृषि पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक तथा विभाग प्रमुख सतिश वाघमोडे, व्यवस्थापक-निर्यात सतिश वराडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, एन.पी.पी.ओ., अपेडा व पणन मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी सदरचे कंटेनर रवाना होतेवेळी उपस्थित होते. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्री. अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. अमेरिकन मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाचा बाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, एन.पी.पी.ओ., कृषि पणन मंडळ आणि निर्यातदार यांच्यामार्फत यु.एस.डी.ए. – अफिस यांच्या सहकार्याने महत्वाची पावले उचलत आहेत. अमेरिकेस भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे डाळिंबाचा कंटेनर निर्यात करण्यात आल्याने ही एक महत्वाची मुहुर्तमेढ रोवली गेली असून भारतीय डाळिंबांनी अत्यंत शाश्वत व मोठी अशी अमेरिकन बाजारपेठ काबीज केली जाणार असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कदम यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ निर्यादारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.