मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘दे दि हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल’ ही भावना भारतीयांची होत गेली , हे अंशतः खरे पण आहे, परंतु आम्ही खड्ग उचलण्याच्या लायक नाही का? कुणीतरी म्हटले चले जाव आणि परकीय गेले असे आहे का? त्याच्याआधी स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी आपले रक्त सांडले, किती लोकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य मिळविण्याचा इतिहास मोठा आहे. केवळ आंदोलने आणि असहकार चळवळ करून स्वातंत्र्य मिळाले नाही, परंतु महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा विचार घराघरात पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले, असे मत माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.
मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफि थिएटर मध्ये झाला. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, पंडित शौनक अभिषेकी, सीए. धनंजय बर्वे, सीए. रणजीत नातु, सीए. अमेय कुंटे, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, रवी ढवळीकर यावेळी उपस्थित होते. प्रसाद माधवराव कुलकर्णी हे या वक्तृत्व स्पर्धेचे महाविजेते ठरले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झालेली दिसली नाही. परंतु आज इतक्या वर्षानंतर गावागावात ‘आमच्याकडे पण कोणीतरी क्रांतिकारी होते’ याची आठवण उत्स्फूर्तपणे होत आहे.
त्या पुढे म्हणाल्या, आपण सतत पराभूत होतो ही भावना जाणून बुजून रुजवण्यात येत होती. विजयाच्या आठवणी पुसल्या गेल्या होत्या. परंतु अटक ते कटक, विजयनगर साम्राज्य ह्या आपल्या विजयाच्या आठवणी आहेत. ६५ वर्षात माझा देश स्वतंत्र आहे, हा भाव जागृत होणे गरजेचे होते, तर ते टिकवण्याची आणि बलशाली करण्याची ताकद आली असती. परंतु ते आता होत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर उपेक्षित नव्हते त्यांना पेलायची ताकद आता आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रमोद रावत म्हणाले, सध्याच्या राजकारणात आपल्या महान नेत्यांचा, त्यांच्या विचारांचा अपप्रचार होत आहे. तो थोपविण्यासाठी मेहनत लागते. यासाठी विचारांचे पाईक घडवावे लागतात. अशी मेहनत समाजात पुढे घेऊन जावी लागते, हे काम मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेतून होत आहे.
वक्तृत्व स्पर्धा विविध गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते – १) नित्य श्रद्धा निळकंठ पवार (गट – इयत्ता पाचवी ते आठवी), वेदांत पंकज बागुल (इयत्ता ९ ते १२ वी), ईश्वरी दीपक डाखोळे (महाविद्यालयीन विद्यार्थी), सतीश सगदेव (ज्येष्ठ गट), तृप्ती अभिजीत यरनाळकर (युवा गट), संतोष कानडे (वरिष्ठ गट), मधुमंजिरी गटणे (नवनिर्मित काव्यरचना), माही आशिष गाडगीळ, अनुजा पेठे (वादविवाद, कौशल्य), सारंग हेरंब चिंचणीकर आसावरी अमित बर्वे (नाट्यवाचन), गायत्री प्रसाद यरगुद्दी (संगीतमय सावरकर)
सुरभी नातू यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत नातु यांनी प्रास्ताविक केले. सीए अमेय कुंटे यांनी आभार मानले.