शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवारांनी राजकीय दृष्टीने डॉ. अमोल कोल्हे यांना कट्टर विरोधक केलं ,आमचे काहीही म्हणणे नाही, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांना पाडायची जय्यत तयारी करू द्यात आमचे काहीही म्हणणे नाही. आपण आपले काका आणि बहिण यांच्या विरोधात राजकीय शड्डू ठोकलेत तर कोल्हे कोण ? हे आम्ही समजू शकतो ..पण दादा ,तुम्ही असं करायला नको होतं … त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन त्यांचा असा अवमान करणं अपेक्षित नव्हतं , दादा हे वागणं बरं हाय काय ? ….असा प्रश्न उपस्थित करणारी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे,शंभूराजेंच्या नावाचा राजकीय इव्हेन्ट करून राजकीय वापर करत अमोल कोल्हे यांच्या स्थानिक मतदारसंघात त्यांचे नाव न टाकता ,निमंत्रण न देता त्यांचा अवमान करणे अनेकांना रुचलेले नाही , माळी आणि ओबीसी समाजातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिरूर ला कोल्हेंना धूळ चारू पाहणाऱ्या दादांना आता झटका नेमका किती व्होल्ट चा बसेल ते येणारा काळच सांगणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ काल (2 मार्च) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडले.खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.खुद्द शंभूराजेंचा ही फोटो नाही निव्वळ राजकीय पक्षांचे झेंडे ..हि कल्पना मानवली नाही म्हणून त्यांनी येथून काढता पाय घेतला.
खासदार अमोल कोल्हे यांनी नेमके काय म्हटलेय ….
काही लोकं 15 वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही?
शंभूराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाची संकल्पना आम्ही राबवली, ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी परिश्रम घेऊनही आज फलकावर शंभूराजांचा फोटो नाही, तसेच कोनशिलेवर नामोल्लेख नाही व कार्यक्रमातही स्मारकाबाबत बोलण्याची संधी न देता डावलण्यात आल्याच्या भावनेतून खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी तीव्र नाराजीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे भाषण चालू असतानाच सभात्याग केला. याबाबत आमदार पवार म्हणाले, “हा विकास आराखडा मंजूर व्हावा व निधी उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही सतत पाठपुरवठा केला. स्थानिक खासदारांनाही डावलले जाते, याची खंत आहे. आम्हाला केवळ व्हॉट्स अॅपवर निमंत्रण पाठविले होते. राज्य सरकारकडून कोणतेही अधिकृत निमंत्रण मिळाले नाही. भूमिपूजन फलकावरही आमची नावे नाहीत
ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे. त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. हा सोहळा नाही तर राजकीय इव्हेंट होता, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, खरं तरं नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग होत आहेत. जवळपास 1 लाख लोकं हा प्रयोग याची देही याची डोळा अनुभवतात. त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो, अशी कार्यक्रम आयोजित केला त्यांची समजूत झाली असेल. आणि पुण्यात कोथरूडमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दरवर्षी महापालिका निधीची तरतूद करतेय , कुठे कोथरूडच्या शिवसृष्टी ? अशा प्रश्न त्यांनी केलाय.निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा ही जिवंत चैतन्यातून मिळते, हेच चैतन्य जागविण्यासाठी आता अहमदनगरमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याचेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली 334 वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवणही अमोल कोल्हे यांनी करुन दिली. काही लोकं 15 वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजित पवार साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास 157 देशात पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो.ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच 2019 नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरं म्हणजे कोनशिलेवर नाव नसलं तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय हे मायबाप जनता जाणते, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली. त्यामुळे काल रात्री उशिरा म्हणजे 10.42 वाजता कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता. त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटचे स्वरुप दिल्यामुळे या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचविणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.