पुणे, दि. १ : जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग व पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते भिडेवाडा येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी मुख्य प्रवाहात येवून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.
पुणे जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रॅलीचा शुभारंभ भिडेवाडा, बुधवार पेठ पुणे येथे होऊन महात्मा फुले मंडई- बाजीराव रोड- विश्रामबागवाडा या मार्गाने शनिवार वाडा येथे समारोप झाला. याप्रसंगी स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, कर्वे समाजसेवा संस्थेचे प्राध्यापक चेतन दिवाण, युवा विकास आणि उपक्रम केंद्राचे मंगलमुखी किन्नर यांच्यासह मित्र क्लिनिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.दिवसे म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत मतदान न केलेल्या व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. जिल्ह्यात तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबवून मतदार नोंदणी करण्यात आली. सुमारे ७०० तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना मतदार नोंदणीचे महत्व समजावून सांगितले आहे. तृतीयपंथी व्यक्तींची मतदार जागृती रॅली हा देशातील हा अनोखा उपक्रम आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती तांबे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. श्री. लोंढे यांनी तृतीयपंथी व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.
यावेळी तृतीयपंथी व्यक्तींनी श्रीमती तांबे यांच्या उपस्थित मतदानाची शपथ घेतली. या रॅलीत मोठ्या संख्येने तृतीयपंथी उपस्थित होते. रॅलीला तृतीयपंथी व्यक्तींचा तसेच संस्थांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.