पुणे-सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सवात तरुण कलाकारांनी सादर केलेल्या एकांकिका, ‘स्वातंत्र्य आणि अस्तित्व’ या काव्यवाचनाचा अविष्कार पुणेकरांनी अनुभवला. तरुण कलाकारांच्या सादरीकरणाला पुणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे ‘अभिरंग’च्या कलाकारांनी ‘नेकी’,‘समर्थ थिएटर’ने ‘मजार’ आणि ‘अप्पासाहेब जेधे महाविद्यालया’च्या कलाकारांनी ‘बी अ मॅन’ या एकांकिका सादर करत रसिकांची मने जिंकली. रसिकांनी अभिनय आणि संवादांना उत्स्फूर्त दादही दिली. त्यानंतर ‘अभिरंग’च्या कलाकारांनी ‘स्वातंत्र्य आणि अस्तित्व’ हा कविता अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला. संतोष पवार दिग्दर्शित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
महोत्सवांतर्गंत गदिमा नाट्यगृह येथे ‘कलाकार मंडळी’ने ‘चाहूल’, ‘ऱ्हस्व दीर्घ’च्या कलाकारांनी ‘ना ना नाना’ आणि ‘नाट्यहॉलिक’च्या कलाकारांनी ‘विनाशलीला’ या एकांकिका सादर केल्या. प्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि गायिका सावनी शेंडे यांच्या ‘तुझी आठवण’ या कार्यक्रमाने शुक्रवारची सांगता झाली. आचार्य अत्रे नाट्यगृहात डॉ. भावार्थ देखणे यांनी भारुड सादर करत लोकपरंपरेचे दर्शन घडविले.
—