मुंबई-
बारामती मधील आपल्या घरी खासदार शरद पवार यांनी तिघांनाही जेवणाचे आमंत्रण दिले आहे. मात्र, आधीच व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला यावेळी जेवायला घरी येणे शक्य होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवले आहे. त्यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र देखील शरद पवारांना लिहिले असून जेवायला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.
बारामती मध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याबद्दल विरोधी पक्षाने सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी बारामती मध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवणासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी जातात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या घरी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे यावेळी येणे शक्य नसल्याचे फडणवीस यांनी शरद पवार यांना कळवले आहे.