Home Blog Page 1171

ED ने जप्त केला, बारामती अॅॅग्रोचा कन्नड सहकारी साखर कारखाना

बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. बारामती अॅग्रो संबंधीत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने रोहित पवार आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असल्याचं मानलं जात आहे.ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणी रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लान्ट, साखर कारखान्याची इमारत आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.

ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते.

रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती, ती चुकीची असल्याचे ईडीने म्हटले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.

तुमचे कितीही असू द्यात सत्तेत मात्र आमच्यामुळे हे विसरू नका,रामदास कदमांनंतर संजय शिरसाठांचे BJPला ठणकावले

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नुकताच भाजपवर केसाने गळा कापण्याचा आरोप केला होता. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केल्याचा दावा केला होता. तसेच आम्ही 105 जण असलो तरी आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची आठवणही त्यांनी रामदास कदम यांना करवून दिली होती. त्यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शुक्रवारी समाचार घेतला. भाजपने पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिंदे गटाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही 105 आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याच्या भाजपच्या दाव्यात तथ्य आहे. पण एकनाथ शिंदे यांनी उठाव केलाच नसता तर भाजपच्या 105 जणांना आजही विरोधात बसावे लागले असते हे ही तेवढेच खरे आहे. त्यामुळे कुणीही कुणाचेही श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नये, असे शिंदे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावून सांगितले आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम?

महायुतीतील जागावाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला होता. महाराष्ट्र भाजपतील काही जण अत्यंत घृणास्पद काम करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा असतो. पण जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले, त्यांचा केसाने गळा कापू नका. असे केल्यास भाजपविषयी जनतेत वेगळा संदेश जाईल, असे रामदास कदम म्हणाले होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वकपणे त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. चव्हाणांच्या विषयावरुनच बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट, ‘भाजपाने केसाने गळा कापू नये,’ असा इशारा दिला होता व . ‘माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा,’ असं सूचक विधान करत त्यांनी भाजपा नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं होते.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

रामदास कदम यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केल्याची आठवण करवून दिली होती. ते म्हणाले होते की, रामदास कदम यांना मी गत अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना अशा प्रकारची विधाने करण्याची सवय आहे. ते टोकाचेही बोलतात. बऱ्याचदा रागानेही बोलतात. पण भाजपाने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केला आहे. आम्ही 105 जण आहोत. त्यानंतरही आम्ही आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. कारण, आम्हाला खरी शिवसेना सोबत आल्याचे समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे.

दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व शिवमुखवटा  

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे चक्केश्वराची पूजा
पुणे :  बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, शिव मुखवटा आणि फुलांची आरास करण्यात आली. तसेच मुख्य मंदिरावर १२ ज्योर्तिलिंगांच्या प्रतिमा देखील मंदिरात दर्शनासाठी लावण्यात आल्या होत्या.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.

जागतिक महिला दिन व महाशिवरात्र यंदा एकत्र आल्याने यावेळी ओंकार पौरोहित्य आणि भजनी मंडळातर्फे रजनी जरांडीकर,रेखा शिवनकर, सुषमा समुद्र, माधुरी शिकारखाने, अलका कुलकर्णी, मेधा चौधरी, अंजली बुधकर, वृषाली कुलकर्णी, शोभा पोटे, सुवर्णा तिखे, व स्वाती ढमढेरे या ११ भगिनींनी ११ आवर्तने रुद्रपठण केले.

सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. प्रमोद भगवान यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला. मंदिराचे व्यवस्थापक विक्रम मोटकर व निलेश धर्माधिकारी, विनायकराव झोडगे, नंदू चिप्पा, शोभा गादेकर, प्रताप बिडवे, युवराज पवार या सेवेकऱ्यांनी ही चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास तीन तासात साकारली. पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

युवराज गाडवे म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. बदाम, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिलांमध्ये दुसरे जग निर्माण करण्याची ताकद- सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे

पुणे : आपण एक दिवस महिला दिन साजरा करतो, परंतु महिलांसाठी तर रोजच महिला दिन असतो. महिलांनी जर ठरवले तर दुसरे जग देखील निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी तुमची श्रीमंती, रुप महत्वाचे नाही तर तुमची जिद्द महत्वाची आहे. ही जिद्द आपण राजमाता जिजाऊ यांच्यामध्ये पाहिली, त्यांचे विचार एकले. पण ते विचार आचरणात आणले तर घराघरात शिबवा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे मत सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी व्यक्त केले.

आम्ही पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त  नवी पेठेतील पत्रकार भवन येथे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला पंडित वसंत गाडगीळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, जिजामाता पुरस्कार वितरण समिती अध्यक्ष मनोज पंडीत, बी.व्ही.जीचे प्रियांक जावळे आदी उपस्थित होते. यावेळी सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, आर्किटेक्चर अर्चना देशमुख कुलकर्णी, पुणे महानगरपालिका अधिकारी अपर्णा बासरकर, डॉ.दिशा वनारसे, उद्योजिका नेहा घोलप पाटील, हिरकणी सुदाम दुर्वे या महिलांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी बी व्ही जी च्या १०८ रुग्णवाहिका साठी काम करणाऱ्या डाॅक्टर महिला अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
मेघराज भोसले म्हणाले, आज आपण म्हणतो महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. पण, त्या एक पाऊल पुढे राहून काम करीत असतात. घरातील आणि बाहेरील कामाची जबाबदारी सांभाळून कोणतीही अपेक्षा न करता त्या सामाजिक कार्य देखील अगदी तत्परतेने करीत असतात. अशा पुरस्कार सोहळ्यातून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कोथरुड मधील खेळाडुंच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

नमो चषक २०२४ चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पुणे: कोथरुड मधील खेळाडुंना आपल्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषक २०२४ चा पारितोषिक वितरण समारंभ नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय बॉडमिंटनपटू रेवती देवस्थळे, आंतरराष्ट्रीय हॉलिबॉलपटू दत्तात्रेय मोरे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा निवेदिता एकबोटे, शहराध्यक्ष करण मिसाळ, दुष्यंत मोहोळ, कोथरुड मंडल दक्षिचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, सरचिटणीस अनुराधा एडके, दीपक पवार, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, उदय कड, कुलदीप सावळेकर, प्रशांत हरसुले, सुशील मेंगडे, दीपक पोटे, बाळासाहेब टेमकर, प्रतिक खर्डेकर, किरण दगडे पाटील, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषकचे आयोजन केले होते. या स्पर्धेमुळे विविध क्रीडा प्रकारातील खेळाडुंना व्यासपीठ मिळाले. अनेक नवोदित खेळाडूंनी याचा लाभ घेत; आपले उत्कृष्ट सादरीकरण करुन, आपल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकली.

ते पुढे म्हणाले की, सामाजिक जीवनात काम करत असल्यापासून सातत्याने खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडुंनी आपल्या कौशल्याने देशाचा नावलौकिक वाढविला‌. कोथरुड मधील अशा नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या खेळाडुंना क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शहराध्यक्ष करण मिसाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषकचे आयोजन केले. यामुळे अनेक खेळाडुंना प्रोत्साहन मिळाले. पुणे शहरातही सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कोथरुड मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या खंबीर पाठबळामुळे सर्वाधिक क्रीडा स्पर्धा झाल्या. यातून सर्वांनाच प्रेरणा मिळाली, असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रेवती देवस्थळे, आंतरराष्ट्रीय हॉलिबॉलपटू दत्तात्रेय मोरे यांनी देखील नमो चषकच्या आयोजनासाठी आयोजकांचे अभिनंदन करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला यांनी केले, तर स्वागत कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले.

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ८: यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवे बळ दिले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना पोषक आहार, महिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धी, महिलांची सुरक्षा, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, त्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्क, संवाद, समन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईल, महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी, शासन-प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, रोजगार-स्वयंरोजगारात समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.  निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी, असा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

“शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य दिनांक ९, १० व ११ मार्च रोजी हडपसरला .. डॉ.अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत-मोफत पासेस उपलब्ध

पुणे- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मराठी माणसांच्या मनामनात रुजवणारे “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य दिनांक ९, १० व ११ मार्च रोजी हडपसर येथे मुंढवा रेल्वे पुलाजवळील मैदानात आयोजित करण्यात आले आहे.
लोकप्रिय खासदार डॉ.अमोल कोल्हे हे शिवपुत्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतून एक अनोखा शौर्यपट आपल्यासमोर उलगडणार आहेत. शौर्याचा, समर्पणाचा, स्वराज्य भक्तीचा हा थरार अनुभवायची सुवर्णसंधी या निमित्ताने तमाम पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे. पुणेकरांसाठी या महानाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले असून सर्वांनी स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास “याची देही, याची डोळा” अनुभवण्यासाठी यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
भोसरी व अहमदनगर येथे महानाट्यास लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता हडपसर येथेही प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेची व पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे.

– मोफत पास खालील पत्त्यावर उपलब्ध
१ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भवन, डेंगळे पुलाजवळ, शिवाजीनगर
२- श्री. प्रशांत सुदामराव जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय
जगताप चौक, वानवडी, पुणे -४०

गद्दार निष्ठावंताना धमक्या देत असतील तर कोणत्या भाषेत उत्तर द्यावे ? राऊतांचा सवाल

मुंबई- लोणावळा येथून शरद पवारांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला. माझ्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानिक आमदाराने दमदाटी केली. यापुढे दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला अशा कडक शब्दात ठणकावत सोडणार नाही, असे शरद पवार म्हणले. आपण कोणालाही धमकी किंवा दमदाटी केलेली नाही. एक व्यक्ती तरी पुरावा म्हणून समोर आणा. नाही तर शरद पवार खोटे बोलले असं महाराष्ट्रात सांगणार असा पलटवार शेळकेंनी केला… यानंतर शरद पवारांची ती धमकी नसून तो एक इशारा होता, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आणि पक्ष सोडून गेलेले गद्दार जर निष्ठावंताना धमक्या देत असतील तर कोणत्या भाषेत उत्तर द्यावे ? असाही सवाल केला आहे.

दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षामुळे हे महाशय (अजित पवार) निवडून आले, ते जर शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर दिले पाहिजे ? असा सवालही राऊत यांनी विचारला.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक असून आम्ही एकत्र बसून चर्चा करतो आणि निर्णय घेतो. दोन दिवसांपूर्वी स्वत: बाळासाहेब आंबेडकर बैठकीस उपस्थित होते. एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होतात, पण आम्ही बैठकीतील काही गोष्टी बाहेर न बोलण्याची पथ्य पाळतो. तसेच महाविकास आघाडीत जिथे ज्यांच्याकडे जो ताकदीचा उमेदवार असेल, जो जिंकू शकेल तशी जागावाटप होईल. आमच्यात कोणतेही मतभेत नाहीत. एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुकडे फेकत नाहीत. आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानाने जागा वाटप करतो. आमचे जागावाटप दिल्लीत होत नाही आणि होणारही नाही, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

नार्वेकरांचा निकाल चोरमंडळाच्या बाजूने होता हे उघड झालेय – संजय राऊत

मुंबई-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल कोर्टाशी विसंगत आहे. त्यांच्याकडून घटनेची पायमल्ली झाली असून आमदार अपात्रताप्रकरणी त्यांनी लवादाकडून चोरमंडळाच्या बाजूने निकाल दिल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचे आहे ते ठरत नाही. पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचे आहे, यावर पक्ष कोणाचा आहे हे ठरते. पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण त्यांच्यावर दबाब होता, असे म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदांना पात्र ठरवले. घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यानुसार, पक्षांतर केलेल्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवणे हे अपर्हाय होते. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवले. इतकेच नव्हे तर विधिमंडळीतील पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:चे हसू करून घेतले.

संजय राऊत म्हणाले की, आता जे लवाद म्हणून बसलेत त्यांनी स्वत:च 10 पक्षांतरे केली आहेत, ते कधी शिवसेनेत होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, ते कधी अन्य पक्षात होते आणि त्यानंतर ते भाजप पक्षात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने काल दखल घेतल्याचे त्यांच्या निकालपत्रावरून दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाने या देशाला आशेची किरणे दाखवली आहेत. त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही आशावादी आहोत.

संजय राऊत म्हणाले की, ​​​​​​चोरमंडळाचे वकील रोज नवीन मुद्दे आणत असून भंपक, खोटेपणा या मुद्द्यात असतो. काल त्यांनी बनवाट कागदपत्रांचा मुद्दा मांडला. शिवसेना ही बनवाट आहे का? बाळासाहेब, त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, यांना बाळासाहेबांचे अस्तित्वच मान्य नाही. हाच त्यांचा बनावटपणा असून आम्ही न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात लढू आणि विजयी होऊ.तर बावनकुळे विधानसभेला स्वत: तिकीट मिळवू शकले नव्हते, म्हणत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पाच वर्ष जनतेला लुटायचे अन निवडणुक काळात गॅसच्या किमती कमी करायच्या

धाराशिव – पाच वर्ष जनतेला लुटायचे , अन, निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे नाटक आपल्याला समजलेलं आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सभा होत असून यामधून ते पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आज पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला जातोय. आपलं घटनाबाह्य सरकार आहे, शेवटं अर्थसंकल्प साधर करणारे भाजप सरकार सुद्धा आहे. शिवाय मोदी सरकाने जो अर्थसंकल्प सादर केला तो, शेवटचा अर्थसंकल्प आहे. कारण पुढील सरकार हे मोदींचे नसेल. आज पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींच्या किमती त्यांनी कमी केल्या आहेत, पण हे निवडणुकीच्या काळात होणारच. पण मतदानावेळी आपण बटण दाबलं की, दुसऱ्या दिवशी सगळ्याच्या किमती पुन्हा वाढलेल्या असतील. त्यामुळे पाच वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे नाटक आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे केवळ उत्साहात काम करणं चालणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच ते म्हणाले, ”भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एक आघाडी तयार केली आणि त्या आघाडीला इंडिया असे नाव दिलं. आपण इंडिया असे नाव देताच भाजपला घाम फुटला. कारण इंडियात इंडिया विरोधातच लढणार कसं असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया म्हणजे इंडियन मुजायद्दीन’, अशा शब्दांत खालच्या स्तरावर जात टीका केली. त्यावर आम्ही पंतप्रधानांना उत्तर दिलं होत की, पंतप्रधान मोदी तुम्ही जेव्हा परदेशात जाता तेव्हा आपली ओळखं प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी करून देतात मगते तर आमच्या इनिड्या आघाडीला इंडिया म्हणजे इंडियन मुजायद्दीन म्हणत असतील तर त्यांची पण ओळख प्राइम मिनिस्टर ऑफ इंडियन मुजायद्दीन अशी होते. आमच्या या प्रश्नावर त्यानंतर पंतप्रधानांनी बोलण्याचं बंद केले”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. याशिवाय “आपण महाविकास आघाडीचे कार्यक्रर्ते आहात. पण कार्यकर्ते म्हणून तुम्हाला जे काम करायचं ते म्हणजे 2014 साली मोदींनी चाय पे चर्चाच्या माध्यमातून विदर्भाला अनेक आश्वासनं दिली होती. ती आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नसून त्यावर मागील १० वर्षांत कोणी लक्षही दिलेलं नाही. त्यामुळे 2014पासून मोदींनी मारलेल्या थापांमधून तुम्हाला काय मिळालं हे जनतेला विचारा. सरकारी योजना हातात घ्या आणि या योजनांमधून तुम्हाला काय मिळालं हे विचारा? हीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महिलांनी उद्योजकतेची नवी क्षेत्रे पादाक्रांत करावी: बागेश्री मंठाळकर

पुणे :

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)च्या महिला आघाडीतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित
‘व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला .हॉटेल लेमन ट्री,कॅनॉट रोड,पुणे येथे ८ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन झाले.सिडबी,बँक ऑफ महाराष्ट्र आणि नॅशनल एससी -एसटी हब च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, आरती कांबळे, नेत्रा पाटकर , मीरा बोरा , रोहिणी डेंगळे यांना ‘वूमन अचिव्हर्स अवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आले.१४ विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यासाठीं उपस्थित होते.

एमएनजीएल च्या संचालक बागेश्री मंठाळकर,बेलराईज इंडस्ट्रीजच्या संचालक सुप्रिया बडवे,डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे,सिडबी पुणे चे सह सरव्यवस्थापक दीपक राय, बँक ऑफ महाराष्ट्र चे सरव्यवस्थापक दिनकर संकपाळ,डिक्की महिला आघाडीच्या मार्गदर्शक सीमा कांबळे, आर सी एफ चे कार्यकारी संचालक निरंजन सोनप, एससी एसटी हब,पुणे चे प्रमुख रितेश रंगारी, मुकुंद कमलाकर, राजेन्द्र साळवे, अविनाश जगताप, संतोष कांबळे, चित्रा उबाळे , निवेदिता कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. सीमा कांबळे यांनी प्रास्ताविक केले, मैत्रेयी कांबळे यांनी सूत्र संचालन केले . निवेदिता कांबळे यांनी आभार मानले.

‘व्यवसायासाठी सर्व आवश्यक गुण महिलांमध्ये असतात. मात्र,महिलांनी परंपरागत व्यवसाय पुरते मर्यादित न राहता उद्योजकतेची नवी क्षेत्रे पादाक्रांत करावीत, व्यवसायात शिरताना करो या मरो ‘ या जिद्दीने उतरले पाहिजे. स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, ‘असे आवाहन बागेश्री मंठाळकर यांनी केले.

‘महिला विकसित झाली तरच देश विकसित होणार आहे. महिला उद्योजिकाना सरकारी कंपन्यांमध्ये कसे काम करता येईल याचे मार्गदर्शन महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले, असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले. ‘महिलांनी प्रगतीची, उद्योजकतेची उदाहरणे समोर ठेवावी’, असे आवाहन सुप्रिया बडवे यांनी केले.

ज्यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांनी लढण्याची हौस पूर्ण करावी

नागपूर -नागपूरमधून नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यांना एकूण मतदानाच्या 65 टक्के मतं मिळतील. ज्यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांनी लढण्याची हौस पूर्ण करावी, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून नितीन गडकरीच उमेदवार असणार हे स्पष्ट केले आहे.दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, नाना पटोले यांनीच नितीन गडकरी यांच्याविरोधात लढावे, ते एकदा लढलेच आहेत, असे म्हणत गडकरींनी नाना पटोलेंचा पराभव केल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीच्या लोकसभा जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. जागावाटपाची प्राथमिक चर्चा उत्तम आणि समाधानकारक झाली आहे. आता 11 ते 12 तारखेपर्यंत महायुतीचे जागावाटप जाहीर होईल.

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार उतरवण्याची भाषा केली आहे. काँग्रेसकडे नागपूरसाठी तगडा आणि जिंकणारा उमेदवार आहे. अजून आम्ही आमचे पत्ते उघड केलेले नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले. जागा वाटपाबद्दल लवकरच निर्णय होईल. अजून महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मात्र, महायुतीच्या आधी आमचे (मविआ) जागावाटप जाहीर होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

0

पुणे-

भिडे वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कायदेशीर लढा यशस्वी केल्याबद्दल महिला दिनाच्या पूर्व संध्येला पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मातंग एकता आंदोलन महिला आघाडीच्या वतीने माजी मंत्री रमेश बागवे व जैनब बागावे यांच्या हस्ते मुक्ता साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .महिला दिनाच्या पूर्व संध्येला या पुरस्कार समारंभाचे आयोजन जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम पुणे येथे करण्यात आले होते .

जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे शहर महिला आघाडी व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता .माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व कर्तृत्ववान महिला भगिनींचा राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते आरोग्य सेवेबद्दल डॉ- माधुरी रोकडे ( सोनवणे हॉस्पिटल प्रसृतिगृह रुग्णालय प्रमुख ) अस्मिता तांबे धुमाळ ( सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तथा प्रशासक अधिकारी कर संकलन विभाग पुणे म.न.पा ) एस तोटेवार ( ए,पी,आय खडक पोलीस स्टेशन ) या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक श्विठ्ठल थोरात तर आभार प्रदर्शन मातंग एकता आंदोलन महिला अध्यक्ष अड – राजश्री ताई अडसूळ यांनी मानले.यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे,सौ.सुरेखाताई खंडाळे व इतर महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LPG सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी

नवी दिल्ली-

महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.

या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, भोपाळमध्ये 808.50 रुपये, जयपूरमध्ये 806.50 रुपये आणि पटनामध्ये 901 रुपये झाली आहे.यापूर्वी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात २०० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर दिल्लीत किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये, जयपूरमध्ये 906 रुपये झाली होती.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील 33 कोटी ग्राहकांना होणार आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल.

पुण्यात ईडीची छापेमारी

पुणे: E D ने पुण्यातील काही ठिकाणांवर छापेमारी केल्याचे वृत्त आहे. ईडीने महादेव ॲप कंपनीची उपकंपनी असलेल्या लोटस 365 नावाच्या कंपनीशी संबंधित ठिकाणावर ही छापेमारी केली. या कारवाईत अंदाजे 1.2 कोटी रुपये रोख, कागदपत्रे, युपीआई आयडी, अकाउंट बुक्स आणि बेटिंग आयडीशी संबंधित इतर डिजिटल पुरावे ईडी ने जप्त केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पॅनेल ऑपरेटर आणि संबंधित सहयोगींचे जबाबही नोंदवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.